Next
जाणून घेऊ या योगासने – भाग चौथा
BOI
Thursday, June 20, 2019 | 05:36 PM
15 0 0
Share this article:


पाचव्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या औचित्याने काही योगासनांची माहिती आणि व्हिडिओ येथे प्रसिद्ध केले जात आहेत. आज, चौथ्या भागात पाहू या भद्रासन, सेतुबंधासन, शशांकासन, उत्तान-मंडूकासन आणि उत्तानपादासन... 

भद्रासन : धावपळीच्या जीवनात आरोग्यााची काळजी घेतली, तरी मनाची, बुद्धीचीही काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी योगासनांत विशेष आसनांचा अभ्यास करता येईल. बुद्धीची सक्रियता वाढवून स्मरणशक्ती वाढवण्यासाठी भद्रासन करणे उपयुक्त ठरते. 

असे करावे हे आसन :
सर्वप्रथम जमिनीवर चटई अंथरून त्यावर पाय पसरून बसावे. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून एकमेकांना जोडावेत. दोन्ही तळपाय एकमेकांना जोडून राहतील अशा पद्धतीने बसावे. आता दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे चवडे पकडून स्वत:कडे ओढावेत. तुमचे पाय मात्र जमिनीला टेकलेले असतील याकडे लक्ष द्यावे. हे करत असताना तुमच्या पाठीचा कणा ताठ राहणे आवश्यक आहे. ही आसनाची पूर्णस्थिती आहे. या स्थितीत शक्य तेवढा वेळ राहावे. नंतर डोके वर करून श्वास बाहेर सोडावा.

घ्यावयाची काळजी : 
गुडघेदुखीचा त्रास असल्यास हे आसन करू नये. 

आसनाचे फायदे : 
स्मरणशक्ती व कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे. या आसनाने मनाची एकाग्रतादेखील वाढते. शरीर निरोगी आणि मजबूत राहते. पचनशक्ती वाढते. डोकेदुखी, दमा, उचकी, पोटाचे आजार बरे होतात. 


सेतुबंधासन : या आसनामध्ये शरीराचा आकार एखाद्या सेतूप्रमाणे म्हणजेच एखाद्या ब्रिजप्रमाणे होतो, म्हणून या आसनाला सेतुबंधासन म्हटले जाते. 

असे करावे हे आसन : 
सुरुवातीला पाठीवर झोपावे. गुडघ्यातून पाय दुमडून घ्यावेत. पाय आणि गुडघे एका रेषेत ठेवून दोन्ही पायात १० ते १२ इंचाचे अंतर ठेवावे. दोन्ही हात शरीराच्या बाजूस जमिनीवर ठेवावेत. हाताचे पंजे जमिनीकडे असावेत. हळूहळू श्वास घेऊन कमरेच्या वरचे शरीर हळूहळू वर उचलावे. हाताचे खांदे आतील बाजूस घ्यावेत. शरीराचा इतर कोणताही भाग न हलवता कमरेतून शरीर वर उचलावे. खांदे, हात आणि पाय या अवयवांवर शरीराचा संपूर्ण भार पेलण्याचा प्रयत्न करावा. ही आसनाची पूर्णस्थिती आहे. आता हळूहळू पूर्वस्थितीत यावे. 

घ्यावयाची काळजी :
कंबर अथवा मानेच्या संबंधित तक्रारी असल्यास हे आसन करू नये. 

आसनाचे फायदे :
मानसिक आरोग्यासाठी हे आसन फायदेशीर असून, मानसिक ताण कमी करण्याचे कार्य करते. पाठीच्या कण्याला आराम देऊन मजबूत बनवण्याचे काम हे आसन करते. पाठ, छाती आणि मान यांना मोकळे करते. उच्च रक्तदाब, दमा, सायनस यांसारख्या आजारांमध्ये हे लाभकारी आहे. मासिक पाळीदरम्यान, तसेच रजोनिवृत्तीच्या काळातही हे आसन उपयोगी ठरते.


शशांकासन : शशांक हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ ‘चंद्र’ असा आहे. या शब्दाचे दोन अर्थ आहेत. चंद्र आणि दुसरा ससा. हे आसन करताना शरीराचा आकार सशासारखा दिसतो. हे आसन करताना चंद्राची शीतलता अनुभवायला मिळते, तर आकार सशाप्रमाणे दिसतो. यामुळे पाठदुखी कमी होते, तसेच पोटावरची चरबी कमी होण्यासही मदत होते.

असे करावे हे आसन : 
सुरुवातीला वज्रासनामध्ये बसावे. शरीराला शिथिल करावे. आता दोन्ही हात वर करावेत आणि शरीराचा वरील भाग अलगदपणे खाली आणावा. शक्य झाल्यास डोके जमिनीला लावण्याचा प्रयत्न करावा. तसेच दोन्ही हात जमिनीवर ठेवावेत. व पाठीला जेवढे ताणता येईल, तेवढे ताणावे. डोळे बंद असावेत. काही सेकंद या स्थितीत राहावे. शरीराला पुन्हा वर आणताना घाई करू नये. हळुवारपणे अलगदपणे दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवावेत.

घ्यावयाची काळजी :
ज्या व्यक्तींना वज्रासनामध्ये बसल्यावर त्रास होत असेल, त्यांनी हे आसन करू नये. सुरुवातीस वज्रासनामध्ये बसण्याचा सराव करावा. वज्रासनामध्ये बसल्यानंतर आपण शरीराचा वरील भाग अलगदपणे खाली आणावा. एकदम धापकन खाली वाकू नये, तसे केल्यास मानेला झटका बसू शकतो व पाठही दुखू शकते. शक्यतो खाली येताना काळजी घ्यावी व तसेच वरती उठतानादेखील अलगदपणे उठावे. सुरुवातीस शरीराचा वरील भाग वर आणताना त्रास होईल तेव्हा दोन्ही हातांच्या साहाय्याने वर यावे. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास, स्लिप डिस्क व तसेच व्हर्टिगो असे त्रास आहेत त्यांनी हे आसन करू नये.

आसनाचे फायदे : 
हे आसन केल्याने पाठीला आराम मिळतो. पाठदुखीचा त्रास असणाऱ्यांनी हे आसन जरुर करावे. हे आसन दररोज केल्यास पोट कमी होण्यास मदत होते व गॅसचा त्रासही कमी होतो.


उत्तान-मंडूकासन : ‘उत्तान’चा अर्थ होतो ताणलेला आणि ‘मंडूक’चा अर्थ बेडूक. या आसनाच्या स्थितीत शरीराची स्थिती एखाद्या शरीर ताणलेल्या बेडकासारखी दिसते, म्हणून या आसनाला उत्तान-मंडूकासन असे म्हणतात. 

असे करावे हे आसन : 
सर्वप्रथम वज्रासनात बसावे. दोन्ही गुडघे बाजूला करून त्यांमध्ये काही अंतर ठेवावे. आता उजवा हात दुमडून तो उजव्या खांद्यावरून मागे नेत डाव्या खांद्याच्या दिशेने, डावा खांदा पकडण्याच्या दिशेने वर घ्यावा. ताण द्यावा. याचप्रमाणे डावा हात कोपऱ्यातून दुमडून डाव्या खांद्यावरून खाली नेत उजव्या खांद्याच्या बाजूने वर आणण्याचा प्रयत्न करावा. दोन्ही हातांना ताण द्यावा व काही काळ याच स्थितीत राहावे. आता हळूहळू आसनाच्या पूर्वस्थितीत यावे. 

घ्यावयाची काळजी : 
कंबर, गुडघा तसेच खांद्याच्या तक्रारी असणाऱ्यांनी हे आसन करू नये. 

आसनाचे फायदे :
पाठीच्या दुखण्यात या आसनामुळे विशेष फायदा होतो. तसेच गुडघेदुखीच्या तक्रारी उद्भवत नाहीत. याशिवाय गळ्यालादेखील हे आसन व्यायाम देते, तसेच खांदेदुखीमध्येही उपयोगी आहे. पोटावरील चरबी कमी करण्यास हे आसन उत्तम आहे. हे आसन नियमित केल्याने श्वसनासंबंधीच्या तक्रारी दूर होण्यास मदत मिळते. किडनीच्या तक्रारींमध्येही हे आसन उपयोगी आहे. 


उत्तानपादासन : कोणत्याही कारणाने सुटलेले पोट कोणालाही नकोच असते. ते कमी करण्याचा सगळ्यांचाच प्रयत्न असतो. पोटाचा थुलथुलीतपणा दूर करून लठ्ठपणाला अटकाव करणारे आसन म्हणजे उत्तानपादासन. हे आसन केल्यामुळे पोटाच्या आजूबाजूच्या स्नायूंना मजबुती मिळते.

असे करावे हे आसन :
सुरुवातीला सरळ, उताणे झोपावे. हात जमिनीवर जांघेजवळ ठेवावेत. हाताचे तळवे जमिनीवर टेकलेले असावेत. आता हळूहळू श्वास घेत ६० अंशांचा कोन होईल याप्रमाणे पाय उचलावेत. या स्थितीत थोडा वेळ थांबावे. या क्रियेत हाताचे तळवे जमिनीवर टेकलेलेच राहतील याकडे लक्ष द्यावे. श्वासोच्छ्वास सामान्य ठेवून, शक्य तेवढा वेळ आसनात थांबावे. क्रिया करताना डोके जागेवरून हालणार नाही, याची काळजी घ्यावी. दिवसातून दोन ते तीन वेळा हे आसन केले तरी चालू शकते. 

घ्यावयाची काळजी : 
कमरेचे दुखणे, हार्निया आणि उच्च रक्तदाब यांपैकी कोणताही त्रास असल्यास हे आसन करू नये. 

आसनाचे फायदे :
या आसनाने पचनशक्ती वाढते. पचनशक्ती चांगली असेल, तर बद्धकोष्ठता, गॅस, ढेकर येणे, अपचन, भूक न लागणे हे पोटाशी संबंधित विकार बरे होण्यास मदत होते. नियमितपणे हे आसन करत राहिल्याने हृदय, फुफ्फुस कार्यक्षम होतात. कमी रक्तदाब, शरीराला, मनाला जाणवणारी सुस्ती यामध्येही हे आसन फायदेशीर ठरते. चेहऱ्यावरील पीटिकांना अटकाव करण्यातही हे आसन साहाय्यभूत ठरते. केस गळणे, पांढरे होणे या गोष्टी थांबवण्यातही या आसनामुळे मदत होते. हेही जरूर वाचा :

योगासने - भाग पहिला 
योगासने - भाग दुसरा 
योगासने - भाग तिसरा
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search