Next
पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांसाठी ‘पूर्णम’ने उचलले कृतीचे पाऊल
BOI
Tuesday, April 18, 2017 | 01:08 PM
15 3 0
Share this story

कापडी पिशव्यांच्या पर्यायावर ग्राहकही समाधानी असल्याचे दिसत आहे.पुणे : प्लास्टिकची पिशवी पर्यावरणासाठी घातक असल्याने या पिशव्यांचा वापर करू नये, असे आवाहन अनेक माध्यमांमधून केले जाते. त्या संदर्भातील जाहिरातीही केल्या जातात. सोशल मीडियातून मेसेज शेअर केले जातात आणि ते मेसेज लाइक आणि फॉरवर्डही केले जातात; पण हे प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे प्रमाण मात्र या साऱ्या उत्साहाच्या तुलनेत फार कमी असते. अर्थात, प्लास्टिक पिशव्यांऐवजी वापरण्यासाठी सोपा, सुलभ आणि सहज उपलब्ध असलेला पर्याय उभा केल्याशिवाय ही गोष्ट प्रत्यक्षात येणार तरी कशी? ही परिस्थिती लक्षात घेऊन पुण्यातील पूर्णम इकोव्हिजन या पर्यावरणविषयक स्वयंसेवी संस्थेने प्रत्यक्ष कृतीचे पाऊल उचलले आहे.

धायरी फाटा येथील मधुकोष वसाहतीत असलेल्या भाजी विक्रेत्यांकडे या संस्थेने लागतील त्या प्रमाणात कापडी पिशव्या पुरवायला सुरुवात केली आहे. या पिशव्या १० किलो वजन पेलू शकतात. एक कापडी पिशवी साधारण तीन महिने टिकते आणि सुमारे १८० प्लास्टिक पिशव्यांना वापरात येण्यापासून रोखते. त्यामुळे साहजिकच एवढ्या पिशव्या पर्यावरणात जिकडेतिकडे पसरत नाहीत आणि पर्यावरणाची हानी रोखण्यास मदत होते. गेल्या आठवड्यात सुमारे ५०० पिशव्या तेथे वितरित करण्यात आल्या. पूर्णम इकोव्हिजन या संस्थेशी निगडित असलेल्या बचत गटांच्या माध्यमातून दर आठवड्याला किमान एक हजार पिशव्या तयार केल्या जातात. या पिशव्या दुकानांना पुरवल्या जातात.

प्लास्टिक पिशव्यांची जागा घेऊ शकेल असा चांगला पर्याय विक्रेते, तसेच ग्राहकांनाही हवा आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन तो देण्याचा एक छोटा प्रयत्न आम्ही करतो आहोत आणि त्यावर ग्राहक व विक्रेतेही समाधानी असल्याचे दिसत आहेत, असे ‘पूर्णम’तर्फे सांगण्यात आले. तसेच, हा उपक्रम अधिक चांगला होण्यासाठी सूचना करण्याचे, त्यात सहभागी होण्याचे आणि त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

पिशव्यांसाठी संपर्क : ९०७५० ९६२३५

या पिशव्यांच्या वापरासंदर्भात भाजीविक्रेत्याचे काय अनुभव आहेत, ते जाणून घेण्यासाठी सोबतचा व्हिडिओ जरूर पाहावा.

 
15 3 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link