Next
डॉ. संजय कुलकर्णी यांना ब्रिटनमधील तीन मानाचे किताब
प्रेस रिलीज
Friday, July 06, 2018 | 03:19 PM
15 0 0
Share this story

डॉ. संजय कुलकर्णी
पुणे: पुण्यातील प्रसिद्ध मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. संजय कुलकर्णी यांना इंग्लंडमधील ‘रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स’ या संस्थेतर्फे मानद ‘एफआरसीएस’ (फेलो ऑफ रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स) हा मानाचा किताब जाहीर झाला आहे. याशिवाय ‘द ब्रिटिश असोसिएशन ऑफ युरोलॉजिकल सर्जन्स’ आणि ‘गाईज हॉस्पिटल’ या आणखी दोन संस्थांतर्फे त्यांना नुकतेच दोन महत्त्वाचे सन्मान प्राप्त झाले आहेत.

पुरूषांमधील मूत्रमार्गाच्या शस्त्रक्रियेत (युरेथ्रोप्लास्टी) डॉ. कुलकर्णी यांचा हातखंडा असून, त्यांनी विकसित केलेली शस्त्रक्रिया ‘कुलकर्णीज् टेक्निक ऑफ युरेथ्रल रीकन्स्ट्रक्शन’ या नावाने प्रसिद्ध आहे. देशापरदेशातील असंख्य रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. आपल्या ‘कुलकर्णीज स्कूल ऑफ युरेथ्रल सर्जरी’ या केंद्रात ते मूत्रविकारतज्ज्ञांना शस्त्रक्रियेचे मोफत प्रशिक्षणही देतात.

मूत्रविकार क्षेत्रातील या योगदानासाठी त्यांना ‘रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स’ या संस्थेतर्फे ‘मानद फेलो’ हा मानाचा किताब जाहीर झाला आहे. येत्या ११ जुलै रोजी इंग्लंडमध्ये त्यांना हा किताब प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय २१ जून रोजी ‘ब्रिटिश असोसिएशन ऑफ युरोलॉजिकल सर्जन्स’ या संस्थेचे मानद सदस्यत्त्व डॉ. कुलकर्णी यांना बहाल करण्यात आले. हा एक दुर्मिळ सन्मान मानला जातो. त्याबरोबरच लंडनमधील ‘गाईज अँड सेंट थॉमस एनएचएस फाऊंडेशन ट्रस्ट’ या संस्थेतर्फे डॉ. कुलकर्णी यांना नुकताच ‘व्हिजिटिंग प्रोफेसर’ हा खास सन्मान प्रदान करण्यात आला. 

काही महिन्यांपूर्वी डॉ. कुलकर्णी यांची मूत्रविकारतज्ज्ञांच्या ‘सोसायटी इंटरनॅशनल डी यूरॉलॉजी’ या जागतिक संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. या मानाच्या पदी निवड झालेले ते दुसरेच भारतीय ठरले आहेत. भारतात वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान समजला जाणारा डॉ. बी. सी. रॉय राष्ट्रीय पुरस्कार गतवर्षी डॉ. कुलकर्णी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. युरॉलॉजी सोसायटी ऑफ इंडियाच्या सुवर्णपदकाचे ते २०११ मध्ये मानकरी ठरले आहेत; तसेच या संस्थेच्या पश्चिम विभागाचे अध्यक्षपद डॉ. कुलकर्णी यांनी २०१४ मध्ये भूषवले.

डॉ. कुलकर्णी यांनी पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून १९७६ मध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि पुण्यातीलच केईएम रुग्णालयातून प्रसिद्ध सर्जन डॉ. पी. के. भरूचा यांच्या मार्गदर्शनाखाली शल्यतंत्रातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर इंग्लंडमध्ये पाच वर्षे मूत्रविकारांवरील उपचारांचे शिक्षण घेऊन ते मायदेशी परत आले. पुण्यात १९९० मध्ये पहिली ‘लॅप्रोस्कोपीक कोलेसिस्टेक्टोमी’ शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी या त्यांच्या पत्नी आहेत.   
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link