Next
तिहेरी शर्यतींचा ‘कौस्तुभ’मणी
२१ वेळा ट्रायथलॉन जिंकणारे ‘आयर्नमॅन’ डॉ. कौस्तुभ राडकर यांच्याशी संवाद
प्राची गावस्कर
Wednesday, August 29, 2018 | 05:00 PM
15 2 0
Share this article:

‘आयर्नमॅन’ डॉ. कौस्तुभ राडकर

‘ट्रायथलॉन’ म्हणजे जलतरण, सायकल चालवणे आणि धावणे अशा तीन क्रीडाप्रकारांचा समावेश असलेली शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीचा कस पाहणारी स्पर्धा. एकाच दिवसात ठरावीक वेळेत ती पूर्ण करणाऱ्याला ‘आयर्नमॅन’ हा किताब मिळतो. पाश्चात्त्य देशांत प्रचलित असलेल्या या स्पर्धेत तब्बल २१ वेळा ‘आयर्नमॅन’ बनलेले डॉ. कौस्तुभ राडकर हे एकमेव भारतीय आहेत. या स्पर्धेसाठी प्रशिक्षण देणारेही ते पहिले भारतीय आहेत. पुण्यात कार्यरत असलेल्या डॉ. राडकर यांच्याशी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे (२९ ऑगस्ट) औचित्य साधून साधलेला हा संवाद...
......
- ‘ट्रायथलॉन’सारख्या स्पर्धेत भाग घेण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली?
- मी अमेरिकेत शिकत असताना २००६मध्ये तेथील मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. दोन वर्षे त्यात भाग घेतल्यानंतर आता काहीतरी आव्हानात्मक केले पाहिजे असे वाटत असतानाच ट्रायथलॉन स्पर्धेविषयी माहिती मिळाली. तीन वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांचा समावेश असलेली एका दिवसात कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याची ही स्पर्धा खूपच आव्हानात्मक वाटली. त्यामुळे २००८मध्ये मी अॅरिझोना येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत उतरलो. त्यात २.४ मैल पोहणे, ११२ मैल सायकल चालवणे आणि २६.२ मैल धावणे या गोष्टी एकामागोमाग एक पूर्ण कराव्या लागतात. मी मुळात जलतरणपटू आहे. राष्ट्रीय पातळीवर अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतलेला असल्याने जलतरणाच्या आव्हानाचे मला दडपण नव्हते; पण सायकलिंगचे थोडे दडपण होते. मार्ग माहीत असला, तरी सायकल पंक्चर झाली, चेन निघाली, तर त्याची दुरुस्ती आपल्यालाच करावी लागते. कोणतीही मदत घेता येत नाही. अर्थात सायकलिंगसाठी मी वर्षभर सराव केला होता. माझ्या पहिल्या स्पर्धेलाच सायकलचे चाक दोन वेळा पंकचर झाले. तरीही दिलेल्या वेळेच्या आत मी ते अंतर पार केले. सायकलिंग व्यवस्थित पार केले, की धावणे आणि पोहणे यात मला अडचण नव्हती. आधी मॅरेथॉनमध्ये भाग घेतलेला असल्याने धावण्याची स्पर्धाही मी यशस्वीपणे पार केली. पोहण्याचीही स्पर्धा उत्तम प्रकारे पूर्ण झाली आणि एकूण ११ तास ४१ मिनिटे आणि ३६ सेकंदांत ‘ट्रायथलॉन’ ही स्पर्धा पूर्ण करून मी ‘आयर्नमॅन’चा किताब पटकावला. हा किताब पटकावणारा मी पहिला भारतीय ठरलो. हा आनंद खूप मोठा होता. त्यानंतर मी या स्पर्धेत नियमितपणे भाग घेण्यास सुरुवात केली. दुसऱ्या वर्षी कॅनडात झालेल्या स्पर्धेतही मी भाग घेतला आणि ‘आयर्नमॅन’चा किताब पटकावला. मग हा सिलसिला सुरूच राहिला. तब्बल २१ वेळा मी ही स्पर्धा जिंकली आणि ‘आयर्नमॅन’चा किताब पटकावला. जागतिक पातळीवर होणाऱ्या या स्पर्धेत मी आपल्या देशाचे नाव चमकवू शकलो, ही अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. 

- या स्पर्धेचे तुम्ही पहिले भारतीय प्रशिक्षक आहात. याकडे कसे वळलात आणि ही वाटचाल कशी सुरू आहे?
- या स्पर्धेत भाग घेत असतानाच, आपल्या देशातही या स्पर्धेविषयी लोकांमध्ये उत्सुकता वाढत होती. अनेक लोक यात भाग घेण्यास उत्सुक होते; पण यासाठी व्यवस्थित प्रशिक्षण मिळणे आवश्यक होते. या स्पर्धेत भाग घेण्यास उत्सुक असलेल्या लोकांना प्रशिक्षण देण्यास का सुरुवात करू नये, असे वाटले आणि अमेरिकेतच त्याचा अधिकृत अभ्यासक्रम पूर्ण करून मी ‘ट्रायथलॉन’साठीचा प्रशिक्षक बनलो. मी पुण्यातील स. प. महाविद्यालयातून बारावी केल्यानंतर अमरिकेतील इंडियाना विद्यापीठात शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमाची पदवी घेतली. नंतर व्हिसकॉन्सिन विद्यापीठातून याच क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. क्रीडावैद्यक शास्त्रातील एमबीए केले. माझी शैक्षणिक पार्श्वभूमी याच क्षेत्राशी निगडित आहे. त्यामुळे मी ‘ट्रायथलॉन’साठी आवश्यक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. आता पुण्यात मी याचे प्रशिक्षण देत आहे. आतापर्यंत साधारण ५० लोकांनी या स्पर्धेत भाग घेऊन विजेतेपद पटकावले आहे. यात पुण्यातील ६१ वर्षांचे गृहस्थ दशरथ पुजारी यांचाही समावेश आहे. १८ वर्षांपुढील कोणीही व्यक्ती यात भाग घेऊ शकते. २०२०पर्यंत माझ्याकडून प्रशिक्षण घेतलेल्या १०० लोकांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करावी, असे माझे ध्येय आहे. येत्या दोन वर्षांत आणखी ५० लोक नक्कीच ही स्पर्धा पूर्ण करतील, अशी मला खात्री आहे. 

- या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठीचे प्रशिक्षण नेमके कसे असते?
- ‘ट्रायथलॉन’ म्हणजे जलतरण, सायकल चालवणे आणि धावणे अशा तीन वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांची एकत्रित स्पर्धा. यात जलतरण हे ओपन वॉटर म्हणजे समुद्रात असते. त्यामुळे पाणी अतिशय थंड असते. पोहून ठराविक अंतर पूर्ण करायचे असते. त्यानंतर लगेच सायकल चालवायची असते आणि त्यानंतर धावण्याची स्पर्धा असते. तीन वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडाप्रकारांसाठी लागणारी ऊर्जा, शारीरिक हालचाली वेगवेगळ्या असतात. ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी किमान १२ तास लागू शकतात. व्यक्तीनुसार हा वेळ कमी-जास्त होतो. इतका वेळ शारीरिक क्षमता टिकवून ठेवणे, हे मोठे आव्हान आहे. त्यासाठी मानसिक धैर्य अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्यामुळे प्रशिक्षणात शरीराबरोबर मनाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठीही सराव करावा लागतो. आहार हाही अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता, ऊर्जा, वय या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जलतरण, सायकल चालवणे आणि धावणे यांचे प्रशिक्षण दिले जाते. दररोज किमान दोन तास आणि शनिवार-रविवारी अधिक तास सराव घेतला जातो. आठवड्याला १४ ते १५ तास सराव होणे आवश्यक असते. साधारण सहा महिने असा सराव गरजेचा आहे. जलतरण समुद्रात असल्याने त्यासाठी अधिक सराव करावा लागतो. एक अडचण जाणवते, ती म्हणजे सायकल चालवण्याचा सराव करण्यासाठी चांगले ट्रॅक नाहीत. बालेवाडीतील (पुणे) क्रीडा संकुलात या सुविधा आहेत; मात्र तिथे या प्रशिक्षणासठी परवानगी दिली जात नाही. सर्व सुविधा एकाच ठिकाणी असलेल्या ठिकाणी सराव करण्याची संधी मिळाली, तर खूप फायदा होईल. सरकारने याकडे लक्ष द्यावे, असे मला वाटते. 

- या स्पर्धेकडे बघण्याचा भारतीयांचा दृष्टिकोन कसा आहे ?
- मी भाग घेतला, त्या वेळी या स्पर्धेबाबत फार कोणाला माहिती नव्हते; मात्र आता परिस्थिती बदलत आहे. अनेक भारतीय यात सहभाग घेत आहेत. जगभरात ४० ठिकाणी ही स्पर्धा होते. वयाची १८ वर्षे पूर्ण असणारी कोणीही व्यक्ती यात भाग घेऊ शकते. अत्यंत आव्हानात्मक अशा या स्पर्धेबाबत आता भारतात हळूहळू माहिती होत आहे. नवीन, आव्हानात्मक क्रीडा प्रकारात सहभागी होण्यास उत्सुक असलेले तरुण याकडे वळत आहेत. मिलिंद सोमण याने या स्पर्धेत भाग घेऊन ‘आयर्नमॅन’चा किताब पटकावला आहे. त्यामुळे प्रसिद्धी मिळाली आहे. गेल्या काही वर्षांत काही भारतीयांनी यात भाग घेऊन सलग दोन-तीन वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. ही स्पर्धा केवळ शारीरिक कस पाहणारीच नव्हे, तर मानसिकता अधिक सकारात्मक घडविणारी आहे. कोणताही अडथळा आला, तरी त्यावर मात करून पुढे जायचे, एखादी गोष्ट वेळेत पूर्ण करायची, मन शांत ठेवायचे अशा अनेक गोष्टी यातून शिकता येतात. एवढी मोठी स्पर्धा पूर्ण केल्यानंतर होणारा आनंद, आत्मविश्वास नवीन ऊर्जा देऊन जातो. ही स्पर्धा सकारात्मक दिशा देणारी आहे.

- क्रीडा दिनानिमित्त काय सांगाल?
- क्रीडा दिन हा एकाच दिवसापुरता मर्यादित असून चालणार नाही. तो दररोज असला पाहिजे. रोज प्रत्येकाने थोडा तरी व्यायाम केलाच पाहिजे. अर्धा तास कार्डिओ व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमचे शरीर आणि पर्यायाने मन उत्साही राहते. याचा सर्वांनी नक्कीच विचार करावा.

वेबसाइट : https://www.kaustubhradkar.com/

( डॉ. कौस्तुभ राडकर यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)
 
15 2 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Balasaheb kekan About 353 Days ago
तुमच्याजीवनाच्या ध्येयाला सलाम
0
0
Vasant Vasant Limaye About 353 Days ago
अप्रतिम
1
0

Select Language
Share Link
 
Search