Next
युद्धस्य कथा रम्या...!
प्रसन्न पेठे (Prasanna.pethe@myvishwa.com)
Tuesday, August 08 | 12:45 PM
15 0 0
Share this story

तसं पाहायला गेलं, तर अनेकांचे जीव घेणारी, अनेक कुटुंबं उद्ध्वस्त करणारी युद्ध ही गोष्ट कधीही रम्य असू शकत नाही; पण साहसकथा मनुष्याला कायमच आवडतात. त्यामुळे ‘युद्धस्य कथा रम्या’ असं म्हटलं जातं. या पार्श्वभूमीवर, ‘सिनेसफर’ सदराची सुरुवात आपण करणार आहोत ‘वॉरफिल्म्स’ या जॉनरपासून... सुरुवातीला या जॉनरबद्दल थोडं सांगून, काही निवडक वॉरफिल्म्सचा (क्रमशः) आस्वाद घेऊ या.
.........
‘आवडते सिनेमे कोणते’ असा प्रश्न कुणी विचारला, की मग सिनेमांच्या नावांची मारुतीच्या शेपटासारखी लांबच लांब यादी तरळते डोळ्यांसमोर आणि त्यात आपल्याकडच्या सिनेमांबरोबरच हॉलिवूडचेही शेकडो सिनेमे आठवतात. गन्स ऑफ नॅव्हरोन, व्हेअर इगल्स डेअर, व्हॉन रायन्स एक्स्प्रेस, ए ब्रिज टू फार, बॅटल ऑफ दी बल्ज, बिहाइंड एनिमी लाइन्स, पर्ल हार्बर यांसारख्या वॉरफिल्म्सचा त्यात हटकून समावेश असतो.

मुळात वॉरफिल्म्स म्हणजे नक्की कोणत्या फिल्म्स? तर ज्या सिनेमात प्रामुख्याने एखाद्या घडलेल्या युद्धप्रसंगांवर आधारित कथावस्तू असते, आणि ज्यामध्ये युद्धाची तयारी, डावपेच, सैनिकाची मानसिकता इतकंच नव्हे, तर प्रत्यक्ष युद्धाचे प्रसंग हाच त्या फिल्म्सचा गाभा असतो आणि बहुतांशी फिल्म ही त्याभोवतीच चित्रित केली जाते, अशा फिल्म्स प्रामुख्याने वॉरफिल्म्स (युद्धपट) म्हणून गणता येतील. त्यामुळे हिंदी सिनेमाचा विचार करता एखाददुसरं युद्धदृश्य दाखवलेला देव आनंदचा ‘हम दोनो,’ राजकुमारचा ‘हिंदुस्तान की कसम’ किंवा शशी कपूरचा मुलगा कुणाल कपूर याचा ‘विजेता’ यांना वॉरफिल्म (युद्धपट) म्हणता येत नाही किंवा एखाद-दोन लढाया असणारा ‘मुगल-ए-आझम’ हादेखील वॉरफिल्म ठरत नाही. त्यापेक्षा चेतन आनंद यांनी दिग्दर्शित केलेला ‘हकीकत’ किंवा अलीकडच्या काळातले ‘बॉर्डर’ आणि ‘लक्ष्य’सारखे सिनेमे यांना आपण वॉरफिल्म्स म्हणू शकतो. मराठीत विचार केला, तर भालजी पेंढारकरांचे काही शिवकालीन ऐतिहासिक चित्रपट काही अंशी युद्धपटाकडे झुकतात; पण त्यातही ज्याला युद्धापेक्षा छोट्या लढाया म्हणता येईल अशीच दृश्यं असायची. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर स्थलसेना, जलसेना आणि वायुसेना वापरून जी महायुद्धं लढली गेली आणि अशा जागतिक युद्धांच्या पार्श्वभूमीवर जे सिनेमे बनले ते सर्वसाधारणपणे वॉरफिल्म्स किंवा युद्धपट म्हणून ओळखले गेले आहेत!! एखाद्या सैनिकाच्या किंवा मिलिटरी अधिकाऱ्याच्या नजरेतून उलगडत गेलेले असे सिनेमे, हे आधुनिक तंत्रज्ञान आणि लागणाऱ्या अवाढव्य खर्चातून जिथे प्रामुख्याने तयार झाले, तशा हॉलिवूडच्या अनेक सिनेमांना निश्चितच युद्धपटाचा मान मिळाला!!

मुळातच वसाहतवाद आणि अंगभूत आक्रमकता यामुळे ब्रिटिश, फ्रेंच, डच आणि स्पॅनिश मंडळींनी जगभर युद्धं केली. नंतरही १९१४ ते १९४५दरम्यान जी प्रमुख जागतिक महायुद्धं झाली, ती युरोपच्या भूमीवर आणि त्यांच्यामध्ये अमेरिकेचा सहभाग होता आणि नंतरची युद्धं म्हणजे ‘व्हिएतनाम वॉर’ किंवा ‘इराक वॉर’ ज्यात प्रामुख्याने अमेरिकाच लढली. त्यामुळे साहजिकच हॉलिवूडच्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना कायमच ‘वॉरफिल्म’ बनवण्याचं आकर्षण होतं. चीन आणि जपानमध्येही आशियातल्या युद्धांवर सिनेमे बनवले गेले. अनेक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ साहित्यिकांनी विविध युद्धांच्या पार्श्वभूमीवर उत्तमोत्तम कथा-कादंबऱ्या लिहिल्या आणि त्यावर आधारित नितांतसुंदर युद्धपट बनवले गेले.

अशाच काही गाजलेल्या वॉरफिल्म्सवर क्रमशः बोलू या.

दी गन्स ऑफ नॅव्हरोन


अॅलिस्टर मॅक्लीनच्या लोकप्रिय कादंबरीवर आधारलेला हा अत्यंत उत्कंठावर्धक आणि भव्य सिनेमा. या सिनेमाच्या जाहिरातीतली एक ओळ फार आकर्षक होती ‘An impregnable fortress...An invincible army...and the unstoppable commando team!!’ दुसऱ्या महायुद्धाचा काळ. एजिअन समुद्राजवळच्या कीरॉस बेटावर जवळपास दोन हजार ब्रिटिश सैनिक अडकले आहेत. त्यांच्याजवळचा दारूगोळा आणि रसद संपत आल्यामुळे ते खचले आहेत. तशात चारेक दिवसांत ताज्या दमाच्या प्रचंड नाझी सैन्याचा हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या सुटकेसाठी दोस्त राष्ट्रांना जहाजं पाठवायची आहेत; पण त्यात सर्वांत मोठी अडचण आहे ती म्हणजे जवळच्या नॅव्हरोन बेटावरच्या डोंगराच्या बेलाग कड्याच्या गुहेत जर्मनांनी बसवलेल्या दोन रडारकंट्रोल्ड महाकाय तोफा! त्या तोफा ब्रिटिश आरमाराच्या येणाऱ्या प्रत्येक जहाजाला लीलया जलसमाधी देऊ शकतात आणि म्हणूनच दोस्तराष्ट्रांच्या सहा कमांडोजनी नॅव्हरोन बेटावरच्या त्या बेलाग कड्याच्या पोटात लपलेल्या त्या अजस्र तोफा नष्ट करण्याची अत्यंत धाडसी, अशक्यप्राय कामगिरी आखली आहे. ती कशी यशस्वी होते, त्याची ही उण्यापुऱ्या चार दिवसांत घडणारी चित्तथरारक कथा!!

तब्बल दोन हजार ब्रिटिश सैनिकांची सुटका हे ध्येय असल्यानं तोफा नष्ट करणं हेच एकमेव लक्ष्य आहे; पण त्यासाठी तोफांवर हवेतून मारा करणंही अशक्यप्राय झालंय आणि ते का, ते सिनेमाच्या सुरुवातीच्या त्यांच्या मीटिंगमध्ये स्क्वाड्रन लीडर हॉवर्ड सांगतो ते अशा शब्दांत – ‘First, you've got that bloody old fortress on top of that bloody cliff. Then you've got the bloody cliff overhang. You can't even see the bloody cave, let alone the bloody guns. And anyway, we haven't got a bloody bomb big enough to smash that bloody rock. And that's the bloody truth, sir.’

तरीही ते साहसी सहा जण ती कामगिरी शिरावर घेऊन निघतात. नाझी फौझांच्या ताब्यात असलेलं ते ग्रीक बेट.... पहिल्याच दिवशी जर्मन गस्तीच्या नौकेशी सामना होतो. त्या नौकेला जलसमाधी देत ते पुढे निघतात. घोंगावणारे वारे आणि तुफानी वादळाशी झुंज द्यावी लागते. त्या वादळी पावसाच्या माऱ्यात बोट फुटते; पण ते शूरवीर कसेबसे बेटावरच्या कड्याच्या पायथ्याशी पोचतात. रात्रीच्या अंधारात तो निसरडा, सरळसोट कडा चढून जाताना, त्या मोहिमेचा मुख्य ब्रिटिश ऑफिसर जायबंदी होतो. आणि तुलनेने कमी अनुभवी कॅप्टन मॅलरीवर ती जबाबदारी येते. तो आपल्या टीमसह कड्यामार्गे त्या बेटावर प्रवेश मिळवतो ती दृश्यं अंगावर काटा आणणारीच. त्या चमूत एक ‘ब्रिटिश एक्सप्लोझिव्ह्ज’चा एक्स्पर्ट आहे, एक ग्रीक क्रांतिकारी संघटनेचा नेता आहे (ज्याची कॅप्टन मॅलरीवर व्यक्तिगत खुन्नस आहे आणि म्हणून आपली ती मोहीम यशस्वी झाल्यावर कॅप्टन मॅलरीला ठार मारण्याच्या गोष्टी तो करतोय), एक ब्रिटिश इंजिनीअर आहे, जो उत्तम सुर्रेबाज आहे; पण त्या ग्रीक बेटावर ते सारेच अनोळखी आणि उपरे, त्यामुळे कोणालाही संशय येऊ न देता वावरणं महत्त्वाचं. आणि म्हणून तिथल्या कुण्या क्रांतिकारकांची मदत घेणं आलं. अशा दोन स्त्रिया त्यांना सहकार्य करतात. एकेक दिवस जात असताना त्या पूर्णपणे अनोळखी प्रदेशात, प्रचंड रिस्क घेऊन वावरताना ते जर्मन तुकडीच्या तावडीत सापडतात. तिथून सुटका करून घेतात तो सीन उत्कंठावर्धक. ते तोफांच्या गुहेच्या जवळ जाऊन पोहोचल्यावर अचानक कॉर्पोरेल मिलरच्या लक्षात येतं, की त्या तोफा नष्ट करण्यासाठी त्यानं आणलेला दारुगोळा निकामी केला गेलाय...ते काम त्यांच्यातल्याच कुण्या फितुराचं आहे हे उघडच! कोण असतो तो फितूर?...असे एकेक अडथळे पार करत करत...नाझी सैनिकांपासून स्वतःचा बचाव करून घेत घेत, त्या दोन महाकाय तोफा असलेल्या अभेद्य गुहेपर्यंतचा त्यांचा होणारा प्रवास...आणि शेवटी दोन्ही तोफा नष्ट करण्याची कामगिरी फत्ते!!! - आपण अक्षरशः श्वास रोखून बघतो.

ग्रेगरी पेक, अँथनी क्वेल, अँथनी क्वीन, डेव्हिड निवेन, आयरिन पापास, रिचर्ड हॅरिस, स्टेनले बेकर अशी विविध देशांतल्या फेमस चेहऱ्यांची तगडी स्टारकास्ट आणि जे. ली. थॉम्प्सनचं उत्कृष्ट दिग्दर्शन, दिमित्री तिऑम्किनचं या युद्धपटाला पूरक असं पार्श्वसंगीत आणि ओस्वाल्ड मॉरिसचं देखणं छायाचित्रण यामुळे पुनःपुन्हा बघावा असाच हा सिनेमा!! कथानक इतकं वेधक आणि गतिमान आहे की आपण त्यात रंगून जातो. १९६१ सालचं तंत्रज्ञान वापरून केलेली दृश्यं आजही दाद द्यावी अशी! ग्रेगरी पेक, अँथनी क्वीन आणि डेव्हिड निवेन यांचा सहजसुंदर अभिनय आणि खरेखुरे वाटणारे अॅक्शन सीन्स यामुळे हा सिनेमा अत्यंत रंजक बनलाय. लढवैय्या सैनिकाची (कडवट) विनोदबुद्धी युद्धभूमीवरही कशी शाबूत असते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या सिनेमातले डायलॉग्ज!

मेजर फ्रॅन्क्लीन आपल्या टीमसह निघण्याच्या तयारीत असताना मेजर बेकरच्या केबिनबाहेरून त्याचा लाँड्रीबॉय त्यांचं बोलणं चोरून ऐकताना पकडला जातो.

मेजर फ्रॅन्क्लीन
(आपल्या सहकाऱ्याला पापादिमोसला) : ‘तुझ्याकडे लायसन्स आहे ना?’
पापादिमोस : ‘हो’.
मेजर फ्रॅन्क्लीन : ‘मग वापर ते. त्या लॉन्डरीबॉयला गोळी घाल’.
ते ऐकून मेजर बेकर (दचकून) : ‘तुला काय वेड लागलंय?’
मेजर फ्रॅन्क्लीन (पापादिमोसला) : ‘आणि हे बघ, हा मेजर मध्ये आला तर त्यालाही घाल गोळी. माझी आज्ञा समज!’

मेजर फ्रॅन्क्लीनचा (अँथनी क्वेल) पाय अपघातामुळे जायबंदी झालाय. त्यामुळे त्या अवस्थेत त्याला कसं न्यायचं यावर खल सुरू असतो. कॅप्टन मॅलरी (ग्रेगरी पेक) दोन पर्याय सांगतो. एक तर त्याला असंच मागे सोडून द्यायचं; पण मग दुसरा पर्याय तो जर्मन सैनिकांच्या हातात पडला, तर ते त्याचे हाल करून सगळी माहिती द्यायला भाग पाडतील.

त्यावर कर्नल स्ताव्रो (अँथनी क्वीन) : ‘तिसराही पर्याय आहेच की! एक गोळी आणि खेळ खल्लास! त्यालाही बरं आणि आपल्यालाही! त्याला बरोबर घेऊन जाणं म्हणजे सगळ्यांचाच जीव धोक्यात घालणं’

त्यावर हे ऐकत असलेला मिलर (डेव्हिड निवेन चटकन उद्गारतो) : ‘त्यापेक्षा आपण त्याला कड्यावरूनच भिरकावलं तर? गोळीही वाचेल की!’
(अर्थातच कॅप्टन मॅलरी त्यांना हाणून पाडतो).

सिनेमाच्या अखेरीला तोफा आणि संपूर्ण गुहाच उद्ध्वस्त करून, कामगिरी फत्ते करून छोट्या बोटीतून निघाल्यावर मिलर आणि कॅप्टन मॅलरीचं संभाषण -

मिलर
 :‘खरं सांगू का, मला अजिबात वाटलं नव्हतं आपण ही कामगिरी फत्ते करू शकू म्हणून !’
कॅप्टन मॅलरी : ‘तुला खरं सांगू? मलाही नव्हतं वाटलं!’.....आणि दोघांचं मंद स्मित!.......

१९६१ सालचा हा सिनेमा तांत्रिकदृष्ट्या सरसच आणि सार्वकालिक ग्रेट वॉरफिल्म्समधला एक!! जरूर बघावा असाच!

ई-मेल : Prasanna.Pethe@myvishwa.com

(‘सिनेसफर’ हे सदर दर मंगळवारी प्रसिद्ध होते.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link