Next
शून्य मी संपूर्ण
BOI
Monday, October 30 | 03:40 PM
15 0 0
Share this story

किशोरीताई आमोणकर

दिवाळी अंकांमध्ये  ‘चतुरंग अन्वय’चे वेगळेपण नेहमीच अधोरेखित झाले आहे. यंदाचा म्हणजेच २०१७चा अंकही तेवढाच दर्जेदार आहे. किशोरीताई आमोणकरांच्या आठवणींना उजाळा देणारा  ‘शून्य मी संपूर्ण’ हा सुधीर कुलकर्णी  यांचा दीर्घ लेख या अंकात प्रकाशित झाला आहे, तो येथे देत आहोत.
............
आपल्या कळत्या-नकळत्या वयात अचानकपणे अशी काहीतरी घटना घडून जाते, ज्यामुळे आपल्या जीवनाला एक वेगळंच वळण लागायला सुरुवात होते. असं फक्त नाटक, सिनेमा यांतच घडतं असं नाही, तर प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा तरी प्रसंग येऊन जातोच आणि म्हणूनच आपण त्याचे उत्तर आयुष्यात उदात्तीकरण करतो. माझ्याही आयुष्यात असंच काहीसं घडलं आणि एक अखंड स्वरानंदी यात्रा चालू झाली.

आम्ही नुकतंच इंजिनिअरिंग पूर्ण केलं होतं. १९७३ वगैरे साल असेल. स्वातंत्र्याचा लढा पाहिलेली किंबहुना स्वातंत्र्यसैनिक असलेल्या आई-बापाची, पण स्वतंत्र भारतात जन्मलेली आमची पिढीही, महात्मा गांधी, विनोबा भावे, जयप्रकाश यांच्या आदर्शांच्या गोष्टी ऐकत हळूहळू तारुण्यात येत होती. आदर्शांचं मोठं ओझं पाठीवर घेऊन आपापल्या नवीन वाटा शोधण्याचा तो काळ. कॉलेजमध्ये भेटलेले नवीन मित्र, शहरी वातावरणाचा जाणवणारा नवा स्पर्श, आपण मोठे होत असल्याची जाणीव आणि प्रचंड अशा तरुण-सुलभ कुतुहलातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा एक छान असा मनकल्लोळ अनेक गोष्टींची उर्मी देत होता. आमच्या नव्यानेच झालेल्या बिली बर्चिल या मित्राला..

ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घरी गेलो होतो. एका छान, पण वेगळ्याच वातावरणाचा अनुभव तिथे आला. आम्हाला अनेक नवनव्या गोष्टींची अनुभूती देणारा बिली हा म्होरक्या मित्र. त्यानेच टूम काढली, ३१ डिसेंबरला नववर्षाच्या स्वागताला एकत्र जमण्याची. आत्ताच्यासारखा त्यावेळी ३१ डिसेंबर हा काही सर्वमान्य झालेला सण नव्हता. आम्हीही काही त्या दिवशी करायच्या गोष्टीतील दर्दी नव्हतो. हॉटेलमध्ये जाणं वगैरे तर फारच दूर, मग लक्षात आलं की किरण कलगावकरचं घर रिकामं आहे. मग सर्वांनी तिथे जमायचं ठरलं. हो-नाही करत पाच-सहाजण जमले आणि नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू झाली. अजिबात न आवडलेल्या त्या कडक पेयाचा पहिल्यांदाच घेतलेला स्वाद हळूहळू रंगत आणू लागला. अचानकपणे किरणने रेकॉर्डचेंजरवर गाणी लावली. त्या गाण्यांपेक्षा अॅटोमॅटिक बदलणाऱ्या त्या रेकॉर्डचेच अप्रूप वाटायला लागलं. या आपोआपच्या बदलाबदलीत एक गाणं लागलं. बऱ्यापैकी आवडलं. कारण ते खूप वेगळं होतं.. मग जसजसं ते कडक पेय रंगायला लागलं, तसतसं ते कडक गाणंही भावायला किंबहुना भिडायला लागलं. प्रत्येकजण हळूहळू आत्ममग्न व्हायला लागला. मला एकच छंद लागला होता, रेकॉर्ड संपली की परत चालू करायची आणि मान डोलवत ऐकायची बस्स. ग्लानी येऊन झोप लागेपर्यंत हा उपक्रम अखंड सुरू होता. त्या सरत्या वर्षाच्या रात्री त्या कडक पेयाच्या निमित्ताने ‘सहेला रे...’ने घातलेली मोहिनी म्हणजे माझ्यासारख्या खेडूत मुलाच्या आयुष्यात सुरू झालेली एक अखंड स्वरानंदी यात्राच.

किशोरीताई आमोणकरकुमारजींना जाऊन एक वर्ष होत आलं होतं. कोल्हापुरातील आम्ही कुमारप्रेमींनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संगीतसभेचे आयोजन केले व त्यासाठी रीतसर कुमार गंधर्व स्मृती प्रतिष्ठानची स्थापना केली. पहिल्या वर्षाच्या स्मृती जागविण्यासाठी म्हणून आयोजित केलेल्या मैफलीची सुरुवात श्रीमती वसुंधरा कोमकली म्हणजेच कुमारजींच्या धर्मपत्नी आणि मैफलीची सांगता करण्यासाठी गानसरस्वती किशोरी आमोणकर या कीर्तिवंत कलाकारांच्या मैफलीचे आयोजन केले होते. अगदी कुमारजींच्या कीर्तीला साजेल अशा आणि त्या तोलामोलाच्या आणि भव्य संगीत महोत्सवाचं आयोजन आम्ही खूप काटेकोर पद्धतीने करत होतो. किशोरीताईंची सर्व व्यवस्था पाहण्याची जबाबदारी गोपाळ खेर, सदावर्ते व मी अशी घेतली होती. किशोरी आमोणकर यांच्या भूप रागातील ‘सहेला रे..’ या बंदिशीने बाधीत झालेला मी एकटाच नव्हतो, तर या एकाच बंदिशीने माझ्यासारख्या अनेक तरुणांना किंबहुना आमच्या अवघ्या पिढीलाच शास्त्रीय संगीताकडे खेचून आणले होते.  मधल्या काळात मी ताईंच्या बऱ्याच मैफली ऐकल्या. त्यांची कॅसेट प्रसिद्ध होण्याचा अवकाश, की आमच्याकडे ती आलीच म्हणून समजा. मी ताईंच्या गाण्याचा भक्त झालो होतो. अगदी कुमारजींचा होतो तसाच. ताईंना प्रत्यक्ष भेटण्याचा अथवा ओळख करून घेण्याचा एक-दोनदा प्रसंग आला, पण धाडस झालं नाही. कारण शास्त्रीय संगीत आवडत होतं, पण त्याचं शास्त्र अथवा व्याकरण कळत नव्हतं. त्यांच्याशी काय बोलणार, आपली कोण म्हणून ओळख करून देणार असे अनेक प्रश्न मनात असायचे. पण आता तसे नव्हते. आता मी आयोजकांच्या भूमिकेतून त्यांना भेटणार होतो आणि म्हणूनही असेल कदाचित, मी पूर्ण अशा विश्वासाने आणि ऊर्जेने भारून गेलो होतो.

असं असलं तरी आमची कोल्हापुरी मंडळी जरा भारीच. म्हणजे कोणतीही गोष्ट करायला घेतली, की सल्ला देणार म्हणजे देणारच. त्यात मोडता घालणार म्हणजे घालणारच. या मैफलीच्या निमित्ताने मी एका जुन्या जाणकार संगीतप्रेमीकडे गेलो. माझं काम सांगायच्या आधीच त्यांनी प्रश्न विचारला, ‘काय रे.. तुम्ही म्हणे किशोरीचं गाणं ठेवलंय..’.  मी म्हणालो होय, का हो? अरे काय डोकं फिरलंय की काय? का हो काय झालं? मलाच उलटा प्रश्न करून म्हणाले काय झालंऽऽऽ! कळलं कळलं आता बसा. मी आपला तसाच गेल्या पावली परत आलो. नंतर त्यांनी मोठी देणगी पाठवून दिली. अर्थातच अनेक सूचनांसहित. 

असेच जुन्या पिढीतील एक संगीततज्ज्ञ देवल क्लबजवळ भेटले. अगदी समजुतीच्या सुरात म्हणाले, ‘काय रे सुधीर त्या कुमारच्या सभेत तुम्ही म्हणे किशोरीचं गाणं ठेवलंय? अरे.. फार मुडी बाई, सरळ गात नाही, वेळेवर येत नाही आणि त्रास देते रे.. उगाच तुमच्या डोक्याला ताप म्हणून म्हणतो, तरी पण बघा बाबा.’ कोण काय, तर कोण काय हजार सल्ले देत होते. आम्ही बाकी संपूर्ण महोत्सवाची तयारी अगदी जोरात आणि नियोजनबद्ध पद्धतीने करत होतो. तसेच कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचा मनाचा निर्धारही केला होता. किशोरीताईंच्या गाण्याने या संगीत सभेची सांगता होणार असल्याने आम्ही या मैफलीची व मनाची जोरदार तयारी केली होती. अर्थातच येणाऱ्या सर्व कलाकारांची व्यवस्था उत्तम अगदी आपल्या कोल्हापुरी रिवाजाप्रमाणेच करायची आणि किशोरीताईंची तर खासच. आणि.. पण... परंतु... त्यातूनही अडवणूक करण्याचे धोरण वाटलेच तर सरळ मंचावर जाऊन, या... या... कारणामुळे गाणे रद्द केल्याचे जाहीर करायचे (अर्थात हा माझ्या मनातला अती खोल व अतिरेकी विचार, प्रत्यक्षात अशी वेळ आली असती तर मी काय केले असते... निदान मला तरी माहित नाही.)

ताई मैफलीआधी दोन दिवस येणार होत्या. आम्ही म्हणजे गोपाळ काका, सदावर्ते काका, मी आणि माझी पत्नी रोहिणी त्यांना घेण्यासाठी स्टेशनवर गेलो. रोहिणीने घरातील फुलांचा एक सुंदरसा गुलदस्ता घेतला होता. महालक्ष्मी आली आणि साक्षात किशोरी आमोणकर उतरल्या. गोपाळ काकांनी त्यांची खास कोल्हापुरी व गोपाळ-स्टाईलने ओळख करून दिली. ताइंना नेहमी मैफलीत पाहिलं होतं. सर्वांनी ज्याप्रमाणे त्यांचं वर्णन केलं होतं तशा त्या तर नक्कीच वाटल्या नाहीत. प्रथमत: त्यांनी सर्व सामान आलं का.. सर्व उतरले का.. सगळ्यांची राहण्याची व इतर व्यवस्था काय आहे? ही सगळी चौकशी केली. त्यांना पुढे पाठवून मगच स्वत: गाडीत बसल्या.

आमचा हा सर्व लवाजमा हॉटेल शालिनी पॅलेसवर आला. सर्व स्थिरस्थावर झाल्यानंतर चहा पिताना ताई म्हणाल्या, की नृसिंहवाडीला दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे आणि करवीर निवासिनीची ओटीही भरायची आहे. अर्थात कोल्हापुरात आलेल्या कोणत्याही पाहुण्यासाठी ही व्यवस्था आपल्याला करावीच लागते. आम्ही ताईंच्या कोल्हापुरातील सर्व कार्यक्रमांचं नीट नियोजन केलं व त्याप्रमाणे व्यवस्था केली होती. वाडीचा वगैरे प्रवास एकत्रच केल्याने ताईंचे सर्व साथीदार, त्यांचा गान परिवार यांच्याशी छान परिचय झाला. रघुनंदन, नंदिनी, विभास, भारती, मीना वगैरे सर्वांशी छान ओळख झाली आणि आम्हीही त्या परिवाराचा एक भाग बनून गेलो.
 
किशोरीताई आमोणकरमैफलीचा दिवस उजाडला, सर्व तयारी झाली होती. किशोरीताईंच्या आधीच्या कलाकाराचं गाणं संपलं. ताई ग्रीन रुममध्ये तानपुरे जुळवत होत्या. रंगमंचावरील व्यवस्था पूर्ण करून सर्व मंडळी सभागृहात बसली. केवळ मी, गोपाळकाका आणि सदावर्तेकाका मंचावर होतो. मी ग्रीन रुमकडे गेलो. ताईंचा बाहेरून आलेला तरुण शिष्यवर्ग दारातच दाटीवाटीने उभा होता,  मी वाट काढत पुढे गेलो, त्यामुळे शांतता भंगली. हार्मोनियमवर बहुदा आप्पा जळगावकर असावेत, नक्की आठवत नाही. त्यांनी खुणेनंच शांत बसायला सांगितलं.  मी तसाच त्या घोळक्यात उभा राहिलो. दोन-तीन मिनिटे गेली आणि मला जाणवायला लागलं, की आपण जे समोर पाहतोय ते सामान्य नाही, काहीतरी वेगळं आणि अलौकिक आहे. मला एक दृष्य दिसतंय, की समोर एक स्त्री बसली आहे, पूर्णपणे ध्यानस्थ, आत्ममग्न, एकाग्रचित्त, तिने पूर्णपणे गान-मुद्रा धारण केलेली आहे. तिच्या एका हातात तानपुरा असून, एक हात तानपुऱ्याच्या खुंटीवर आहे.  ध्यानमग्न चेहऱ्यावर एक हलकेसे स्मित, हार्मोनियमचे संथ व स्थिर सूर, दुसऱ्या हाताने तानपुऱ्याच्या तारा हळूवारपणे छेडल्या जात आहेत आणि आसमंतात एक अनाहत असा नाद निर्माण होतोय. या नादाची अनेक आवर्तने आसमंतात विहरताना दिसत आहेत. जणू काही ती आसमंताला आमंत्रित करताएत आणि सांगताएत, की या बाळांनो, माझी गानसेवा रुजू करून घ्या. माझं विचारचक्र पुन्हा फिरायला लागलं, गेल्या पन्नास वर्षांची तालीम, तेवढाच रियाझ, त्याहून मोठा अभ्यास आणि चिंतन, तरीही या सेवेसाठी इतकं समर्पण. मला माहित आहे, की त्या स्त्रीरुपाचं नाव आहे किशोरी, पण आता ती मला गानमुद्रतेत आत्ममग्न झालेली वीणाधारी सरस्वती भासत होती. पुन्हा मनात विचार आला, खरंच हा तानपुरा आणि हे गाणं, ही एकग्रता, ही समर्पणाची भावना यांचं नक्की नातं काय?  दुसरं मन सांगतंय, की अरे विचार काय करतोस, बघ ती गानसरस्वती आपली पुढील गानसेवा आसमंतात रुजू करण्यासाठी स्वत:ला कशी तयार करत आहे आणि हळू हळू माझे सर्व विचार विरून जायला लागले. मी भान हरपून त्या सरस्वतीच्या निर्गुण रुपात एकात्म झालो. किती काळ लोटला माहित नाही. भानहीन मनोवस्था प्रथमत:च अनुभवत होतो.

एकदम कानावर आघात झाला... अरे सुधीर, दचकून मी मागे वळलो, तर ते कडक ज्येष्ठ आले होते. अरे.. ती गाणार आहे की नाही? वाजले किती? काय वेळेचं भान आहे की नाही? खरंच दहा वाजून गेले होते. मी त्यांचा हात धरला आणि काहीतरी समजावलं. त्यांना सभागृहात घेऊन गेलो आणि बसवलं. सभागृह तुडुंब भरलं होतं. त्याच तंद्रीत मंचावर आलो आणि जाहीर केलं, की गाणं लवकरच चालू होत आहे. मागे वळलो, तर ताई आल्याच होत्या. मंचावर ताई एकट्याच शांतपणे गानबैठकीच्या मागे उभ्या होत्या. आम्ही सर्व विंगेच्या टोकावर उभे होतो. अचानक ताईंचा आवाज कानावर पडला, अहो कुलकर्णी.... मी लगबगीनेच ताईंच्यासमोर जाऊन उभा राहिलो. बैठकीकडे बोट करून त्या म्हणाल्या, ‘तुम्हाला काय वाटले, यावर बसून मी गायचं आहे?..’ क्षणभर मला काहीच समजेना. गोंधळून मी म्हणालो, ‘एक मिनिट ताई मी काहीतरी बघतो.’ मी विंगेत आलो. गोपाळकाका खूप अस्वस्थ दिसला. सदावर्तेकाका काहीतरी सांगत होते, पण मला काहीच ऐकू येत नव्हते. मला माहित होते, की त्या बैठकीला साजेल असे आत काहीही नव्हते. मी पूर्ण घामाने भरलो होतो. घाम पुसण्यासाठी म्हणून खिशात हात घातला आणि खांद्यावरची शाल हातात आली. एका प्रतिक्षिप्त क्रियेने मी तिची घडी घातली आणि सरळ गानबैठकीवर गेलो. शाल आंथरली. तिच्या चुण्या साफ केल्या आणि आदबीने उभे राहून म्हणालो, ‘ताई आणखी काही?.’ दोन-तीन सेकंदाची शांतता आणि.. माझ्या डोक्यावरून एक मायेचा हात फिरला. शब्द कानावर पडले. छान... चला बाळा, आता गाणे सुरू करू. मग पाच मिनिटांच्या आत बैठक सजली. पडदा बाजूला झाला. हार्मोनियमचे स्वर लहरायला लागले. तानपुरे झंकारायला लागले आणि कल्याणाचे शुद्ध स्वर आसमंताला डोलवायला लागले. शुद्ध कल्याण टिपेला पोहोचला... आसमंताला दाद देण्याचेही भान नव्हते... किती वेळ लोटला कळत नव्हते, आसमंत मंत्रमुग्ध होता...

काळ सरत होता, भैरवीचे सूर कानावर येऊ लागले. सरस्वतीच्या सुराने आसमंत भानहीन होता. हळूहळू ते स्वर गगनात विलीन व्हायला लागले व त्याचीच गाज परत परत येऊ लागली. गानबैठक शांत आणि तेज:पुंज झाली. चार-पाच सेकंद गेले. आसमंत निश्चल-दिग्मूढ होता. आता काळही भान हरपून स्तब्ध उभा होता. दहा सेकंद झाली आसमंत स्तब्ध होता... काळ अजूनही थांबलेला.

आसमंतात बागडणारे स्वर हळू हळू गानबैठकीवर आसनस्थ असलेल्या सरस्वतीमध्ये लीन होऊ लागले. सरस्वतीने पुन:श्च किशोरीचे रूप धारण केले. किशोरीने आसमंताला नमस्कार केला आणि हळूहळू आसमंत सचेतन होऊ लागला... टाळ्यांची आवर्तने झडायला लागली आणि.. आणि टाळ्यांच्या गजराने थबकलेला काळ भानावर आला. या अनुभूतीला पंचवीस वर्षे होत आली. परंतु मी आता कुठे भानावर यायला सुरुवात झालीए. कारण... कारण माझ्या मस्तकी झालेला तो मायेचा स्पर्श आता प्रकर्षाने जाणवायला लागला आहे. ताईंचे, ‘छान... चल बाळा आता गाणे सुरू करू..’ हे आश्वासक शब्द जाणीवपूर्वक माझ्या कानाशी रुंजी घालताएत आणि मी शोधतोय ती गदबळलेली शाल.

ताईंचे अनाहूत स्वर अनंत काळ राहणार आहेत. त्यांनी फक्त शरीर त्यागलंय, त्या गाण्याच्या रुपात सतत आपल्याबरोबर असणार आहे, वगैरे.. वगैरे.. गोष्टी अनेकजण सांगत आहेत. पण गेले पाव शतक या विदुषीशी जुळलेले नाते, आलेल्या अनेक अनुभूती. त्यांचा सहवास, त्यांच्याबरोबर केलेला प्रवास, त्यांचं समजावणं, रागवणं, ते जाणीवपूर्वक नाती जपणं, कळत-नकळत आमच्या फर्माइशी पूर्ण करणं आणि मुख्य म्हणजे आमचं आयुष्य समृद्ध करून आम्हा सामान्यांना असामान्य असल्याची भावना देणाऱ्या या विदुषीला कसे विसरू शकणार..? केवळ अशक्य आणि अशक्यच. म्हणून आठवण रुपातून नेहमीप्रमाणे ताईंच्या पायाशी बसण्याचा हा प्रयत्न.

मैफल संपल्यानंतर एक दिवस राहून ताई जाणार होत्या. माझ्या खूप आग्रहानंतर ताईंनी अर्ध्या तासासाठी घरी येण्याचे मान्य केले. आम्ही सर्वजण दुपारी तीनच्या दरम्यान घरी पोहचलो. घर पाहून झाल्यानंतर ताई शांतपणे हॉलमधील भारतीय बैठकीवर बसल्या आणि आम्ही सर्वजण बागेत, गच्चीवर असे बोलत फिरत होतो. मी, विभास, रघू गच्चीत बोलत असतानाच ताईंची हाक आली, ‘अरे सुधीर.. जरा खाली ये, आता मी ताईंसाठी कुलकर्णी वगैरे न राहता सुधीर झालो होतो. मी धावतच खाली आलो. माझ्यासमोर जुन्या पिढीतील संगीत नाटकातील नामवंत गायक-नट म्हणजेच माझे बाबा उभे होते. मला वाटलंच आता काहीतरी गडबड होणार. इतक्यात ताई म्हणाल्या, जरा बघ रे.. हे काय म्हणतात ते ? आणि डॅडी बोलले, ‘काही नाही रे.. मी बाईंना विचारलं, की स्त्री कलाकारांना जयपूर घराण्याची गायकी झेपते का?’ हा त्यांचा प्रश्न ऐकून मी निम्मा सर्दच झालो. असा प्रश्न कोणाच्याही डोक्याबाहेरचाच होता. आता काय रामायण घडेल याचा अंदाज येईना. मी एकदा डॅडींकडे बघितले आणि एकदा ताइंर्कडे. मी डॅडींना म्हणालो, ‘डॅडी, तुम्ही यांना ओळखता ना.? या खुद्द किशोरी आमोणकर. मोगूबाईंच्या शिष्या आणि कन्याही. मोगुबाई अल्लदिया खांसाहेबांच्या ज्येष्ठ शिष्या. म्हणजे हा प्रश्न आपण खुद्द खाँ साहेबांनाच विचारतोय असं नाही का वाटत आपल्याला? पुढे काय झालं मला माहित नाही, पण डॅडी गडबडीने तिथून निघून गेले. ताईंनीही हा प्रसंग खूपच गमतीने घेऊन तिथेच संपवला. पण असले प्रश्न थेटपणे कोणत्याही अधिकारी व्यक्तीला विचारण्याची हिंमत कोल्हापुरातच केली जाऊ शकते, हे बाकी नक्की.

रोहिणीने घरातील बाग आवडीने आणि प्रेमाने वाढवलेली होती. ताई बागेत आणि घरात इतक्या रमून गेल्या, की मला जाणवत होतं हे सर्व त्यांना हवं तसं आहे. आमच्या घरातील फुललेली बाग आणि साधेपणाने केलेली पण उपयुक्त सजावट हे ताईंच्या प्रसन्न चित्ताचं कारण होतं. मग आमच्यात घर, सजावट आणि सौंदर्यशास्त्र इत्यादी विषयांवर एक सुंदर चर्चासत्रच रंगलं. घराचं आर्किटेक्चर  त्याची प्रपोर्शन्स आणि सौंदर्य इत्यादी विषयांवर ताई अगदी मुलभूत गोष्टी सांगत होत्या. आमच्या घरातील सजावटीचा फोकल पॉईल म्हणजे स्वाती यार्दी या सुप्रसिद्ध चित्रकर्ती व कथ्थक नृत्यांगनेची मिनिएचर फॉर्ममधील सर्व पेंटिग्ज. ती ताईंना खूप आवडली. स्वातीचे ‘वुमेनक’ हे अत्यंत गाजलेले चित्र, खरं तर या चित्राची रिप्लिका आमच्याकडे आहे. मूळ चित्र अमेरिकन एम्बसीमध्ये आहे. या चित्रात तिने एका स्त्रीच्या गळ्यातील दागिने दाखवलेत आणि चेहरा फक्त ओठांनी दर्शवला आहे. ताई हे पेंटिंग खूप वेळ न्याहाळत होत्या. मग एकुणातच पेंटिंग व सर्वच कलांवर बोलताना त्या म्हणाल्या, ‘हे पेंटिंग छानच आहे, पण मला चेहरा नसलेलं काहीच आवडत नाही. म्हणूनच पिकासो किंवा तत्कालीन युरोपातील इतर कलाकार मला अजिबात आवडत नाहीत. कारण त्यात कोणतेही सौंदर्य नसते. तर त्यातून त्या कलाकारांचे डिस्टिक्टिव्ह माइंड दिसते.  चित्र पाहून मन प्रसन्न व्हायला हवे विषण्ण नव्हे. मग ते क्युबिझम असो अथवा तथाकथित मॉडर्न आर्ट असो. मग कोणतीही इमारत, शिल्प, नृत्य अथवा गाणे असो ते शास्त्राधारीत प्रमाणबद्ध असलं तरच आपल्याला आवडतं. आता अनेक क्षेत्रात चालू असलेल्या फ्यूजन नावाचा प्रकार मला आवडत नाही आणि हे सारं ही मंडळी का करतात हेही समजत नाही.’ ताई जणू प्रत्येक नवोदित कलाकाराला सांगत होत्या, की आपल्याला अवगत असलेल्या कलेचा मुळापासून अभ्यास करा. त्यातील शास्त्र आणि सौंदर्य शोधून काढा आणि मगच त्याचे प्रकटीकरण करा. ताईंचा हाच ध्यास आणि अभ्यास संपूर्ण आयुष्यभर चालू होता.

मग चर्चा हळूहळू पाककलेकडे वळली आणि आमची बोलती बंद झाली. रोहिणीबरोबर झालेल्या गहन चर्चेनंतर ताईंनी एक फर्मान काढले. त्यांचे हॉटेलवरील सर्व सामान घेऊन सरळ स्टेशनवर जाण्यात यावे.  त्या इथेच जेवून परस्पर स्टेशनवर येतील. हे म्हणजे आमच्या घरी प्रत्यक्ष परब्रह्म अवतरल्यासारखेच झाले होते. जेवणाचा उत्तम बेत जमला. गानसरस्वती तृप्त झाली. सर्वांसाठी डबा तयार झाला. केवढी ही गानसेवा पदरी पडली आणि मग मात्र प्रत्येक मैफलीच्या वेळी ही गानसेवा देण्याचा मान रोहिणीकडे आला. अर्ध्या तासासाठी आलेल्या ताई आमच्या घरात खूप रमल्या आणि आमच्यासाठी आयुष्यभर साठवून ठेवावा असा समृद्ध अनुभव देऊन गेल्या. ताईंना निरोप देताना इतकीच जाणीव होत होती, की  बस्स आपलं आयुष्य कोणत्यातरी एका अलौकिक शक्तीशी जोडलं जातंय आणि ती शक्ती आपल्याला आशीर्वाद देतीए.

ही मैफल अनेक दृष्टींनी महत्वाची ठरली, संगीतातील अनेक जाणकार, देशी-परदेशी पत्रकार, म्युझिक कंपनीचे प्रतिनिधी या बैठकीसाठी म्हणून खास आले होते. ख्रिस्तिन गिलेस्पी ही मेलबर्न, ऑस्ट्रेलिया इथे राहणारी सुप्रसिद्ध लेखिका आणि पत्रकारही या मैफलीला हजर होती. तिचा भारतातील स्त्री कलाकार,  लेखिका, नाटकाकार, कवी वगैरेबद्दल मुलाखत रूपातून ओळख करून घेऊन, त्यांचा परिचय ऑस्ट्रेलियातील लोकांना करून देण्याचा प्रकल्प होता. आत्तापर्यंत तिने खूपजणींच्या मुलाखती घेतल्या होत्या. ताईंची मैफल ऐकल्यानंतर तिला या प्रकल्पांतर्गत त्यांची मुलाखत हवी होती. कोल्हापुरातील ज्येष्ठ लेखिका सुमित्रा जाधव यांची ख्रिस्तीन ही मैत्रीण. ताईंना भेटायचं आहे म्हटल्यावर त्या ख्रिस्तीनला घेऊन आमच्याकडे आल्या. ख्रिस्तीनने आपला सर्व प्रकल्प मला सांगितला व ताईंची मुलाखत घडवून आणण्याबद्दल विनंती केली. ताई चार दिवसांपूर्वीच कोल्हापुरातून मुंबईला गेल्या होत्या. खरं तर इतक्या अल्प परिचयानंतर लगेच आपण किशोरी ताईंना असं काहीतरी सांगावं आणि त्यांनी ते ऐकावं म्हणजे तर फारच झालं. बराच विचार केला आणि माझ्यातील कोल्हापुरी आगाऊ-बाणा जागा झाला. मग सरळ ताईंना फोन लावला. फोन खुद्द त्यांनीच उचलला. ख्याली-खुशालीचे बोलणे झाल्यावर मी ताईंनी ख्रिस्तीन आणि तिच्या प्रोजेक्टबद्दल तसेच तिला हव्या असलेल्या मुलाखतीबाबत बोललो. मिनिटभर काहीच प्रतिक्रिया आली नाही. नंतर ताई म्हणाल्या, ‘हे बघ सुधीर या पाश्चात्य लोकांना आपल्या संगितातले काहीही कळत नाही. त्यांची संगीताकडे पाहण्याची दृष्टी करमणूकप्रधान असते. असे मला वाटते. म्हणून या लोकांबरोबर फार वेळ फुकट घालवायला मला आवडत नाही. तेव्हा उगाच माझ्याकडे कोणालातरी पाठवू नकोस.’ पण ताई, आपल्या कामाची नोंद निदान जगाच्या कोणत्यातरी कोपऱ्यात होते, हे ही महत्त्वाचे आहे. मी थोडं फार घोडं दामटायचा प्रयत्न केला. पण व्यर्थ. ताईंची प्रतिक्रिया शहाणा आहेस, रोहिणीकडे फोन दे. मी फोन तिच्याकडे दिला. त्यांचं पाच एक मिनिट बोलणं झालं. काय बोलल्या माहित नाही, पण रोहिणीने परत माझ्याकडे फोन दिला. ताईंच्या सूचना : हे बघ, कोण ती नाव काय तीचं..  ख्रिस्तीन. तिला सांग वेळ ठरवून, वेळेवर ये. बाकीची सगळी माहिती दे इत्यादी इत्यादी. मी विचारले, ताई तुमचा फोन नंबर देऊ तिला. ताई म्हणाल्या दे. म्हणजे सगळ्या परवानग्या रितसर मिळाल्या. ख्रिस्तीन ठरल्या वेळी ताईंच्या घरी पोहोचली. तिने ताईंची आणि भारतीय संगीताची भरपूर अशी माहिती जमवली होती. पूर्ण तयारीने ती ताईंना सामोरी गेली. एक तासाची मुलाखत तीन तास चालली. ताईंनी तिला रियाजालाही बसायची आणि फोटो काढण्याची परवानगी दिली आणि मुलाखत संपवून निरोप घेताना पुन्हा चार दिवसांनी परत भेटायचे ठरले. ख्रिस्तीन कोल्हापुरात आल्यानंतर भेटायला आणि आभार मानायला म्हणून घरी आली. आता ती पूर्ण किशोरीमय होऊन गेली होती. फक्त ताई आणि ताइंर्बद्दल इतकी भरभरून बोलत होती, की तिला म्हणजे अगदी संगीतातील महादेवीला भेटल्याचा आनंद झाल्याचे जाणवत होते. आणि तिने तसे बोलूनही दाखवले. प्रत्यक्षात ती पेपरमध्ये एक लेख लिहिणार होती, पण तिने किशोरी ताईंवर स्वतंत्र पुस्तक लिहिण्याचे ठरवले होते. मुंबईला गेल्यानंतर ती परत ताईंना भेटून ऑस्ट्रेलियाला गेली. एकदा ख्रिस्टिनबद्दल विचारल्यावर त्याही तिच्याबद्दल खूप बोलल्या. अरे या पाश्चात्य लोकांकडून एक गोष्ट बाकी शिकण्यासारखी असते बघ, ते लोक आपल्या कामाशी खूप प्रामाणिक असतात. ख्रिस्तीन पूर्ण तयारीनीशी आली होती वगैरे वगैरे आणि बरंच काही बोलल्या. मध्ये बराच काळ गेला आणि एक दिवस सुमित्रा वहिनींकडून कळले की ती तिकडे गेल्यावर ब्रेस्ट कॅन्सरने आजारी पडली आणि त्यातच ती गेली. मग काय सगळेच थांबले किंवा हे लेख / पुस्तक छापले गेले की नाही काहीच समजले नाही.

मी सतत म्हणतोय की ही मैफल अनेक दृष्टीने आमच्यासाठी आणि छत्रपती शाहू महाराजांच्या रसिक द्रष्टेपणातून स्थापन झालेल्या करवीर (जयपूर घराणे) या गान-पिठासाठीही मोलाची ठरली. याच काळात ताईंचा रस-सिद्धांत या विचारावर चिंतन आणि अभ्यास सुरू होता. याच्याच प्रगटीकरणासाठी ताईंनी एका प्रात्यक्षिकासह चर्चेचे आयोजन केले व त्यासाठी कोल्हापूरची निवड केली. हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आम्ही आयोजित केला आणि त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. या पहिल्याच चर्चासत्राला अनेक मान्यवर, गाण्यातील जाणकार, समाजातील धुरीण, अभ्यासक वगैरे उपस्थित होते. ताईंची इच्छा होती, की संगीत आणि इतर कलांचा अभ्यास करण्याऱ्या कलाकारांना त्यांची प्रतिभा प्रगट करण्यासाठी एका व्यासपीठाची आवश्यकता आहे आणि आपण सर्वांनी मिळून त्याची स्थापना करावी. साधक-बाधक चर्चा करून, ताईंच्या संकल्पनेप्रमाणे, त्यांच्याच अध्यक्षतेखाली, विक्रम गोखले उपाध्यक्ष, सदावर्ते खजिनदार आणि मी सचिव अशी योजना करून ‘रस-मंच’ या अभ्यासमंचाची स्थापना झाली आणि कोल्हापुरात सुरू झाला एक कला-विचार मंथनाचा जागर.

या संपूर्ण कालखंडात ताईंनी चार ते पाच सत्रे सजवली. विक्रमभाईंनी अभिनयावरती एक सत्र केले आणि आप्पा जळगावकरांनी हार्मोनिअमवर एक सत्र केले. विक्रमभाईंच्या सत्रासाठी ताई येणार होत्या. त्यांना पुण्यातून घेऊन येण्यासाठी मी गेलो आणि पहिल्यांदाच रघुनंदन किंवा नंदिनी असे दोघेही ताईंच्या बरोबर नव्हते. पुणे-कोल्हापूर प्रवास मी, ताई आणि मीना यांनी केला. हे चार तास म्हणजे माझ्या पूर्ण आयुष्याचे संचित होते.

प्रवास चालू झाल्यानंतर इकडच्या-तिकडच्या गोष्टी झाल्या. मी ताईंना मला आलेल्या त्या अनुभूतीबद्दल बोललो आणि माझ्यासमोर एक अखंड असा ज्ञान-निर्झर वाहायला लागला. ‘हे बघ, तू जी अनुभूती म्हणतोस ती असते एक मानसिक अवस्था. आपण ज्या एखाद्या क्षणी समोर घडणाऱ्या किंवा आपण विचार करत असलेल्या गोष्टीशी आपलं अस्तित्व विसरून एकात्म पावतो, त्याला आपण अनुभूती असं म्हणतो. तुझंही तसंच झालं असावं. त्याला दोन कारणं  आहेत. एक तू मनापासून त्यात मग्न झाला असशील किंवा माझ्या अथवा कोणत्याही कलाकारावरील अती भक्तीमुळेही असं होऊ शकतं. आता तानपुरे जुळवणं वगैरेबद्दल म्हणत असलात, तर तानपुरे जुळवणं व वाजवणं ही एक कला. तानपुरे जुळवताना माझ्या मनात विचार चालू असतात, आज मी काय गाणार आहे, कुठे गाणार आहे, कुठे म्हणजे ठिकाण नव्हे तर स्वरयंत्रात कुठे. एखादी मात्रा खाली-वर वगैरे हे सर्व त्या वेळच्या प्रकृतीवर अवलंबून असते आणि मग त्यानुसार ते जुळतात. तानपुरे जुळवल्यानंतर ते वाजवणे ही एक कला आहे. म्हणजे बघ, पहिली तार छेडल्यानंतर तो ध्वनी तयार होतो तो विरायच्या आत दुसरी तार छेडली जाऊन त्याचा ध्वनी पहिल्या ध्वनीत मिसळायला हवा मग पुढील तार आणि हे ताल चक्र चालू. या स्वरांची कंपनसंख्या वेगवेगळी असली तरी त्याची तीव्रता एकच असायला हवी. या कंपनलहरींतून जो एक गंभीर आणि पवित्र असा नाद तयार होतो तो गाण्यासाठी खूप प्रेरणा देतो. तसंच साथीच्या इतर वाद्यांचं आहे. तबला हा सरळ आणि सुंदर-स्वच्छ ठेक्याने वाजला, की गाण्याला उठाव येतो तसेच हार्मोनियमचे. जर तबला किंवा हार्मोनियम प्रमाणापेक्षा जादा कलाकारीने वाजायला लागली, तेव्हा रागाचा भाव निघून जातो आणि गाणे फक्त तांत्रिक कसरतीचे किंवा करमणूकप्रधान बनते. असे मला वाटते...,’ ताई गाण्याच्या सादरीकरणातील सुक्ष्मशास्त्र समजावून सांगत होत्या.

‘संगीत हे फक्त नोटेशन किंवा बंदिशी नाहीत तर तो तत्त्वज्ञानाचा सागर आणि आत्मज्ञानी गुरुदेखील आहे. म्हणून मी सदैव संगीताची विद्यार्थिनीच राहिले आहे.’ ताईंचा गाण्याविषयीचा हा मुलभूत विचार काहीतरी शाश्वत शोधण्याचा प्रयत्न करतोय असं सतत जाणवतं आणि त्यांच्या या साधनेला आध्यात्मिक अधिष्ठानही असल्याचं लक्षात येतं. 

कसं माहित नाही, पण ताईंशी खूप मोकळेपणाने आणि वेळेला अगदी चेष्टा मस्करीच्या स्वरातही बोलत असायचो. एकदा अशाच गप्पा सुरू असताना ताईंना विचारले, ‘ताई तुम्ही इतर कलांच्या बाबतीत फार भरभरून बोलत नाही किंबहुना तुमचा सूर थोडाफार टिकात्मकच असतो, असं का? माझ्या या प्रश्नाचं ताईंनी इतक्या गंभीरपणे आणि सखोल उत्तर दिलं, की मी मलाच सतत तपासून पहायला लागलो.’ ‘हे बघ आपल्याला ज्ञात असलेल्या जितक्या कला आहेत, त्या अखेरीस स्वरालाच जाऊन मिळतात. इंग्रजीत त्याला आपण म्हणतो, एव्हरी थिंग टुवर्ड्स म्युझिक. 

किशोरी ताई जेवढ्या शिस्तीच्या होत्या, तेवढ्याच मोकळ्या विचाराच्याही. ताईंबद्दल आणखी एक तक्रार केली जाते, ती म्हणजे मैफलीत ताई गातील तेच ऐकावे लागते. श्रोत्यांना फर्माइश करण्याची संधीच त्या देत नाहीत. हे बाकी खरं आहे. ताईंच्या म्हणण्यानुसार मैफलीत काय गायचं आहे हे खूप आधी ठरवलेलं असतं आणि त्यानुसार त्या रागाचा विचार व चिंतन चालू असतं. प्रत्येक वेळी रागाचं वेगवेगळे रूप दिसत असतं. त्यामुळे आज ऐकलेला राग पुन्हा तसाच ऐकायला मिळेल अशी खात्री नसते आणि हाच त्यांच्या अभ्यासाचा व प्रवाही चिंतनाचा परिणाम आहे. म्हणून त्या ऐन वेळेस मैफलीतील राग बदलत नाहीत. ही त्यांची मैफलीबद्दलची शिस्त आणि गाण्यावरील निष्ठा आहे. 

ताई म्हणजे एक मनस्वी आणि सतत आत्म-मग्न असलेलं व्यक्तिमत्त्व. एकच ध्यास गाणं, एकच अभ्यास स्वर-भाषेचा, एकच शोध अंतिम सत्याचा. याचसाठी मैफल ही या अभ्यास पर्वातील एक प्रायोगिक टप्पा-चाचणी असावी असं मला वाटतं. मग ती उत्तमच असली पाहिजे असं ताईंचं म्हणणं होतं. पण उत्तम तेच परिमाण त्यांनी इतक्या उंचीवर नेलं होतं, की तिथे किंवा त्याच्यावर फक्त त्याच पोहचू शकत होत्या. पण ते त्याचं अंतिम ध्येय नव्हतं. म्हणूनच असंही वाटतं, की कधीही न फासणाऱ्या झुबीन मेहतांच्या सिम्फनी पेक्षा ताईंची एखादी फसलेली मैफल ही उच्च दर्जाची असते. हे कोण्या तज्ज्ञांचे मत मला एकदम पटते आणि हा ही अनुभव आम्ही घेतला आहे. एम. टी. डी. सी. ने कोल्हापुरात ताईंची एक मैफल केली होती आणि तिचे नवीन राजवाड्याच्या परिसरात आयोजन केले होते. त्या दिवशी ताईंची प्रकृती थोडी नरम असावी. पण आमची नेहमीप्रमाणे गप्पा मस्ती ही चालू होती. मैफलीला सुरुवात होताच ताईंना त्रास व्हायला लागला. मला आठवतंय ताईंनी यमन रागाने मैफलीची सुरुवात केली. थंडी बऱ्यापैकी होती. ताईंना सर्दीचा त्रास फारच जाणवयला लागला. अचानकपणे ताईंनी गाणं संपवलं आणि मध्यंतर केले. आम्ही सगळेच काळजीने आत गेलो. डॉक्टरना बोलावलं. तपासाअंती डॉक्टर म्हणाले, त्यांना गाता येणे कठीण वाटतंय. पण गरम पाणी घेत पंधरा वीस मिनिटे ताई शांत बसल्या आणि अचानकपणे स्टेजवर आल्या आणि गाणं चालू केलं. कोणत्याही रागाची निवड करण्याऐवजी त्यांनी ‘घट घट मे पंछी बोलता’ हे कबीराचं भजन निवडलं. पाच मिनिटांपूर्वी सर्दीमुळे हतबल दिसणाऱ्या ताई आता कुठेच नव्हत्या. भजन खूप रंगतदार झालं, पण त्यांना होणारा त्रासही जाणवत होता. त्यांनी गाणं पूर्ण केलं व सर्वांची माफी मागून थांबल्या. असं ही होतं कधी कधी, पण असले पन्नास गुन्हे या सरस्वतीला माफ करायला कोणाही रसिकाची कधीच हरकत नसायची. 

ताईंचा रागही टोकाचा होता आणि प्रेमही. पण ताईंच्या रागापेक्षा प्रेमाच्या आठवणीच जास्त आहेत. ताईंचे आपल्या कुटुंबावर प्रेम तर होतेच. बिभास कोल्हापुरात आजारी पडला तेव्हा त्यांची झालेली घालमेल मी पाहत होतो. भारती विद्यापीठात ओडिसी नृत्याचा कार्यक्रम ठरला तेव्हा त्यांच्या सूचनांचे सारखे फोन हेच दर्शवत होते. अलिकडे तेजश्रीचं गाणं कोल्हापुरात झालं तेव्हाही अगदी हेच जाणवत होतं आणि ते नैसर्गिकही आहे. पण याव्यतिरिक्त ताई, रघुनंदन, नंदिनी आणि मीना यांच्या नातेबंधाविषयी नोंद घेतल्याखेरीज ताई संपूर्ण समजू शकणार नाहीत. रघुनंदन हा ताईंचा सर्वार्थांनी पट्टशिष्य. मला एक प्रवास आठवतो. एका बैठकीसाठी आम्ही पुणे-कोल्हापूर प्रवासात होतो आणि ही गुरू-शिष्याची जोडी यमन रागावर चर्चा करत होती, अगदी गंभीरपणे. मी शांतपणे सर्व काही ऐकत होतो. अर्थात मला त्यातलं फार आकलन होत होतं अशातला भाग नव्हता. फक्त इतकेच जाणवले की यमन रागामध्ये कोणीतरी नव्याने येऊ इच्छित होता. मग लक्षात यायला लागलं की, अशी एखादी समस्या भेडसावायला लागली की वादी-संवादीकाशी चर्चा करून ती कशी सोडवावी. त्यांच्या बऱ्याच खलबतानंतर यमनामध्ये नव्याने येऊ इच्छिणारा जो कोणी पाहुणा होता, त्याला जागा मिळाली. अगदी कोंदणासह मग मात्र ताईंचा पूर्वीचा यमन नव्या रुपात आला. 

ताई नेहमी म्हणत आणि मानतही असत की कोल्हापूर हे त्यांचे माहेर आहे आणि त्यांचे माहेरपण जपण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करत होतो. ताईंनी गोपाळ खेर, सदावर्ते, रोहिणी, व्ही. बी. पाटील आणि माझ्यावरही खूप प्रेम केले. पण गोपाळकाकावर जरा खासच. गोपाळकाकाकडे काय खास होते माहित नाही, पण त्याच्यावर खूप कलाकार म्हणजे दामू केंकरेंपासून कुमार गंधर्व, विक्रम गोखले, किशोरी आमोणकर, नाटकातले अनेक कलाकार अगदी मनापासून प्रेम करायचे. पण विक्रमभाई आणि किशोरीताई तर अगदी खासच. ताई खरंच इथे आल्या की माहेरवाशिणीसारख्याच राहायच्या आणि आमचेही दिवस सोनियांचे बनून जायचे. माहेरपणाची उतराई होण्यासाठी म्हणूनच की काय त्यांनी आपल्या ज्ञानाचा संपूर्ण खजिना करवीर-निवासिनीच्या आणि करवीर गान-पीठाच्या चरणी अर्पण केला.

असं म्हणतात, की बहरलेल्या वृक्षाची उंची तो पडल्याखेरीज समजत नाही. असंच काहीसं जाणवतंय. ताईंच्या जाण्याने आपण नेमकं किती काय गमावलंय, हे समजायला किती काळ जावा लागेल याचा अंदाजच येत नाही. कदाचित शंभर वर्षंही...

- सुधीर कुलकर्णी, कोल्हापूर
...............
(हा लेख ‘चतुरंग अन्वय’ या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे. महेश कराडकर हे त्याचे संपादक आहेत. ‘चतुरंग’चा हा पंधरावा दिवाळी अंक आहे. दर्जेदार लेखनामुळे दिवाळी अंकांच्या भाऊगर्दीतही ‘चतुरंग’ने स्वतःचे असे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. यंदाच्या अंकात प्रतिभावंत कथाकार भारत सासणे यांच्या कथांसह इतर अनेक नामांकित कथाकारांच्या कथा समाविष्ट आहेत. हा अंक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Swapnil Natu About 191 Days ago
Feeling like to go & personally meet Mr. Sudhir Kulkarni & listen more about Ganasaraswati. He has grace of the god. It's not easy to write even for a professional author about someone in so deep & pure. He's awesome. Hats off to you Sudhir sir. I am eagered to meet you. Tonnes of Thanks & Regards, Swapnil Natu.
2
0

Select Language
Share Link