Next
टेबल टेनिसमधील नवी आशा : नील मुळ्ये
BOI
Friday, April 06 | 06:45 AM
15 0 0
Share this story

नील मुळ्येडावखुरा आणि आक्रमक असल्याने त्याचा खेळ नेत्रदीपक असतो. मुळातच डावखुऱ्या खेळाडूंची शैली प्रेक्षणीय असते.  उंची कमी असली, तरी अंगातील चपळाईच्या जोरावर तो टेबल कव्हर करतो. यामुळे त्याचा खेळ पाहणारे अचंबित होऊन जातात. असा पुण्याचा खेळाडू नील मुळ्ये.. ‘क्रीडारत्ने’ या साप्ताहिक सदरात आजचा लेख टेबल टेनिसपटू नील मुळ्येबद्दल...
................................
वयाच्या सहाव्या वर्षीच टेबल टेनिस खेळायला सुरुवात केलेला पुण्याचा नील मुळ्ये आज वयाच्या अकराव्या वर्षी बारा वर्षांखालील गटात अग्रमानांकित खेळाडू म्हणून गणला जातो. केवळ पाच वर्षांतच इतकी मोठी झेप त्याने केवळ नशिबाच्या जोरावर घेतलेली नाही, तर त्यामागे अथक मेहनत आणि लक्षकेंद्रित सरावही आहे.  

नीलचे वडील उपेंद्र मुळ्ये हे माजी राष्ट्रीय विजेते टेबल टेनिसपटू आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू व प्रशिक्षक आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली नील पीवायसी क्लब येथे रोज चार तास सराव करतो. वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत हा बालखेळाडू मार्गक्रमण करत आहे. कोणत्याही परिस्थितीत सराव चुकवायचा नाही, हा त्याचा हट्ट. त्याच्याच वयाच्या इतर खेळाडूंसाठी तो एक आदर्श ठरला आहे. 

मागे एकदा त्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे बूटही घालता येत नव्हते, तेव्हा चक्क अनवाणी स्थितीतही त्याने सराव चुकवला नाही. इतकेच कशाला त्याची डेंटल ट्रीटमेंट सुरू असताना धावपळ करायची नाही, असा डॉक्टरांचा सल्लाही त्याने एकदा धाब्यावर बसवत स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि चक्क विजेतेपदही पटकावले होते.

नील डावखुरा आणि आक्रमक असल्याने त्याचा खेळ नेत्रदीपक असतो. मुळातच डावखुऱ्या खेळाडूंची शैली प्रेक्षणीय असते. उंची कमी असली, तरी अंगातील चपळाईच्या जोरावर तो टेबल कव्हर करतो. यामुळे त्याचा खेळ पाहणारे अचंबित होऊन जातात. दहा वर्षांखालील गटात, कॅडेट गटात त्याने गेल्या दोन मोसमात एकंदर १५ स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. त्यातील तेरा स्पर्धांमध्ये त्याने विजेतेपद पटकावत जिल्हा पातळीवर एक अनोखा विक्रमच प्रस्थापित केला आहे. या दोन मोसमात त्याला केवळ दोन स्पर्धांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. म्हणजेच त्याची विजेतेपदाची टक्केवारी एखाद्या विजेत्यालाही लाजवणारी आहे.

येत्या काळात त्याला अशाच सहा जिल्हास्तरीय, सहा राज्यस्तरीय आणि पात्र ठरला तर राष्ट्रीय स्पर्धा खेळायच्या आहेत. गत वर्षी तो राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला होता; मात्र त्याची कामगिरी नजरेत भरेल अशी झाली नव्हती. अर्थात याची कुठेही निराशा न बाळगता त्याने पुन्हा एकदा कसून सरावाला प्रारंभ केला आहे. शिवाय तो ज्या अभिनव इंग्रजी माध्यम शाळेत पाचव्या इयत्तेत शिकत आहे त्या शाळेनेही त्याला स्पर्धेनंतर अंतिम परीक्षा देण्यासाठी मुभा दिली आहे. अंतिम परीक्षेपूर्वी त्याला पश्चिम बंगाल येथे होणाऱ्या टेबल-टेनिस प्रीमिअर लीगमध्ये सहभागी व्हायचे आहे. या लीगमध्ये नीलबरोबरच पुण्याची मानांकित खेळाडू पृथा वर्टीकरदेखील सहभागी होत आहे. नीललाच नव्हे तर क्रीडा क्षेत्रात यशस्वी कामगिरी करणाऱ्या कित्येक विद्यार्थ्यांना ही शाळा संपूर्ण सहकार्य करते. मला वाटते क्रीडापटू घडावेत असे या शाळेला वाटते, हा इतर शाळांसाठी एक वस्तुपाठच ठरतो.

पश्चिम बंगालमधील प्रीमिअर लीगमध्ये नील कशी कामगिरी करतो यापेक्षा त्याला मिळणारा अनुभव महत्त्वाचा ठरणार आहे आणि हाच अनुभव त्याला भविष्यातील वाटचालीसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. शालेय अभ्यासक्रमात तो काही हुशार विद्यार्थी नाही; मात्र वर्ष वाया जाणार नाही इतपत मार्क तो मिळवतो. घरातच क्रीडासंस्कृती असल्याने त्याला त्याच्या टेबल-टेनिसमधील कारकिर्दीसाठी प्रचंड व सातत्यपूर्ण सहकार्य मिळते. या खेळाची पॅशन नीलला इतर खेळाडूंपेक्षा वेगळा ठरवत आहे.

त्याची उंची कमी आहे; पण चपळाईने तो ती उणीव भरून काढतो. असे असले, तरी येत्या काळात त्याला शारीरिक तंदुरुस्ती आणि क्षमता वाढविण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागणार आहे. पश्चिम बंगाल हे टेबल टेनिसचे माहेरघर समजले जाते. तेथील खेळाडू दिवसाला जवळपास सात ते आठ तास सराव करतात. त्यामुळे त्यांना आव्हान द्यायचे असेल, किंवा त्यांच्यावर वर्चस्व गाजवायचे असेल, तर नीललादेखील फिटनेस, क्षमता याबरोबरच सरावही खूपच वाढवावा लागणार आहे.
नवीन मोसमाची सुरुवात जून महिन्यापासून सुरू होणार आहे. या मोसमात जिल्हा व राज्य स्पर्धांबरोबरच पात्रता निकष पार करत त्याला राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान प्राप्त करायचे आहे. गेल्या वर्षी त्याने राष्ट्रीय स्पर्धेतील खडतर आव्हान काय असते याचा अनुभव घेतला आहे. यंदा त्याचे दुसरे वर्ष आहे आणि गेल्या मोसमातील कामगिरीचा अनुभवही पाठीशी आहे. या स्पर्धांबरोबरच त्याला यंदापासून जिल्हा परिषदेच्या स्पर्धांमध्येही सहभागी व्हायचे आहे. एकूण खूप मोठा मोसम समोर उभा ठाकला आहे.

गेल्या वर्षी झालेल्या चुकांमधून त्याने बोध घेतला का, हे यंदाच्या त्याच्या कामगिरीवरून स्पष्ट होणारच आहे; पण जर हा मुलगा राष्ट्रीय स्तरावरही चमकला, तर त्याच्याकडे इंडिया मटेरियल म्हणून निश्चितच पाहिले जाईल. त्याची उंची वाढली तर त्याचा टेबल रीच वाढेल आणि मग त्याच्या चपळ आणि आक्रमक खेळाला प्रत्युत्तर कसे द्यायचे हा प्रश्न प्रतिस्पर्धी खेळाडूंसमोर निर्माण होईल.

आता भारतात क्रिकेटव्यतिरिक्त इतरही खेळात स्टार जन्माला येत असल्याचे चित्र दिसत आहे. नीलसारखे आणखी काही खेळाडू इतक्याच सातत्याने देशाला मिळाले, तर काय सांगावे, राष्ट्रकुल, आशियाईच नव्हे, तर ऑलिंपिक पदके व त्यांची संख्या मोजायला दोन्ही हाताची बोटेदेखील अपुरी ठरतील. आज एकाच हाताची बोटे पुरतात; मात्र हे चित्र लवकरच बदलेल अशी आशा नीलसारखे खेळाडू निर्माण करत आहेत.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Jagdish Abhyankar About 287 Days ago
Your articles are always introspective, positive and encouraging to the sports world. I would say keep it up and do send your posts.
0
0

Select Language
Share Link