Next
ढेपेवाड्यात रंगले ‘चिंटू आणि वाडा संस्कृतीतील खेळ’
प्रेस रिलीज
Monday, November 26, 2018 | 02:40 PM
15 0 0
Share this storyपुणे : वाडा संस्कृतीतील पारंपारिक वातावरण, जुने खेळ, पाटावरील अस्सल मराठी भोजन अशा वातावरणात चिमुकल्यांना त्यांच्या आठवणीतील आजोळ, महिलांना मनातले माहेर सापडले. निमित्त होते ते पुण्याच्या जुन्या वाडा संस्कृतीचे प्रतीक असलेल्या ढेपेवाडातर्फे आयोजित  ‘चिंटू आणि वाडा संस्कृतीतील खेळ’ या उपक्रमाचे.

‘चिंटू’चे निर्माते चित्रकार चारुहास पंडित यांनी या सहलीतील सहभागी मुलामुलींना, पालकांना ‘चिंटू’ची रेखाटने करून दाखवली. मुलांनी ‘चिंटू’चे चित्र रंगविण्याचा आनंद लुटला. कार्टून, अॅनिमेशन या प्रकाराची माहितीही या वेळी पंडित यांनी दिली.

ढेपेवाड्याचे संचालक नितीन ढेपे आणि ऋचा ढेपे यांनी पुण्याच्या वाडा संस्कृतीतील पारंपरिक खेळ शिकवले. त्यात लगोरी, सागरगोटे, भोवरा, सूर पारंब्या, सारीपाट, खांब खांब खांबोळी, गोट्या, आंधळी कोशिंबीर, भातुकली, आट्यापाट्या अशा अनेक पारंपरिक खेळांचा समावेश होता.

या वेळी मुलांना वाडासंस्कृतीतील राहणीमानाची, जीवनशैलीची ओळख करून देण्यात आली. मुदपाकखाना, उखळ, जातं, तुळशी वृंदावन, विहीर, घंगाळ, चौरंग, झोपाळा या विस्मृतीत चाललेल्या गोष्टी बघून बालगोपाळ हरखून गेले. या उपक्रमात सात ते १४ वर्षे वयोगटातील मुलामुलींनी आपल्या पालकांसह एक वेगळा अनुभव घेतला.बालगोपाळांनी ढेपेवाडा महाद्वार, दिंडी दरवाजा, देवळी, देवघर, दिवाणखाना, मुद पाकखाना, न्हाणीघर, शयनघर, पलंग अशा जुन्या वास्तू वैशिष्ट्यांसह पाहिला.

‘ढेपेवाडा हा मुळशीच्या गिरीवन पर्यटनप्रकल्पात असलेला पुणेरी वाडा असून, वाड्याची सर्व वास्तू वैशिष्ट्ये येथे पाहायला मिळतात. जुनी संस्कृती जपण्यासाठी खास ढेपेवाडा बांधून वाड्यातील संस्कृतीचे यथार्थ दर्शन व तशाच राहणीमानाचा, जीवनशैलीचा आनंद देणारे पुण्यातील हे एकमेव पर्यटन स्थळ आहे’ अशी माहिती नितीन ढेपे यांनी दिली.

या उपक्रमातून नव्या पिढीला एकत्रित कुटुंब पद्धतीची माहिती देऊन त्याचे महत्त्व सांगण्यात आले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link