Next
कथामय संगीत नाटकांचा प्रयोग यशस्वी
संगीत नाटकांचा वारसा जपण्यासाठी पं. जयराम पोतदार यांचा उपक्रम
BOI
Monday, November 26, 2018 | 03:09 PM
15 1 0
Share this article:रत्नागिरी :
मराठी संगीत नाटकांची परंपरा एकमेवाद्वितीय अशी आहे. या रंगभूमीने खूप मोठा सुवर्णकाळ अनुभवला आहे; मात्र गेल्या काही वर्षांत कलाकार मिळण्यापासून त्यासाठीच्या खर्चापर्यंत अनेक मुद्दे संगीत नाटक करण्यासाठी अडचणीचे ठरत आहेत. परंतु, यामुळे ही परंपरा खंडित होऊ नये म्हणून पं. जयराम पोतदार यांनी ‘कथामय नाट्यसंगीत’ असा प्रयोग केला आहे. यात नाटकांतील नट-नट्या, सूत्रधार पारंपरिक वेशभूषेत रंगमंचावर येऊन कथानक सांगतात व गायक नाट्यपदे सादर करतात. आतापर्यंत त्यांनी १७-१८ नाटके ‘कथामय’ स्वरूपात सादर केली असून, त्यांचे ३५० प्रयोग झाले आहेत. 

‘एकच प्याला’ या राम गणेश गडकरी यांच्या नाटकाचा ‘कथामय’ प्रयोग दिवाळीत रत्नागिरीत सादर झाला. त्या वेळी पं. पोतदार रत्नागिरीत आले होते. त्या वेळी त्यांची भेट घेतली असता, त्यांनी या वेगळ्या प्रयोगाबद्दलची माहिती दिली. ते म्हणाले, ‘गुरू पं. वसंतराव देशपांडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मी दर वर्षी एका नाटकाचे कथामय नाट्यसंगीतात रूपांतर करतो. आतापर्यंत शाकुंतल, शारदा, स्वयंवर, मानापमान आदी १७-१८ नाटकांचे ३५० प्रयोग केले आहेत.’

‘मी दिल्लीमध्ये भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागात उच्चपदस्थ अधिकारी होतो. त्या वेळी अमराठी लोकांना संगीत नाटकांची महती कळण्यासाठी व संगीत नाटकांच्या प्रसारासाठी हिंदीमधून कथामय नाट्यसंगीताचा प्रयोग सुरू केला होता. नव्या पिढीने असे प्रयोग करावेत. त्यांना मी नक्कीच मार्गदर्शन करीन,’ असेही पोतदार यांनी आवर्जून सांगितले.

‘एकच प्याला’ची शताब्दी
‘किर्लोस्कर नाटक मंडळींतून बालगंधर्व, गणपतराव बोडस आदी बाहेर पडले. गडकरींना ते पसंत नव्हते. एकदा बालगंधर्वांनी गडकरींना घरी बोलावून गंधर्व मंडळीसाठी नाटक लिहिण्याची विनंती केली. त्या वेळी गडकरींनी ‘तुम्हाला फाटक्या लुगड्यात काम करावे लागेल,’ असे सांगितले. बालगंधर्वांनी त्याला होकार दिली आणि ‘एकच प्याला’मध्ये बालगंधर्वांनी सिंधूची भूमिका व बोडस यांनी सुधाकरची भूमिका वठवली. ते सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे नाटक होते. या नाटकातील पदे वि. सी. गुर्जर यांची आणि संगीत उपशास्त्रीय गायिका सुंदराबाई जाधव यांचे आहे. या नाटकामुळे बालगंधर्वांची गायकी अधिक बहरली,’ अशी आठवण पं. जयराम पोतदार यांनी सांगितली. 

‘एकच प्याला’चा पहिला प्रयोग २० फेब्रुवारी १९१९ रोजी बडोद्यात झाला होता. त्यामुळे या नाटकाची शताब्दी सध्या सुरू आहे. त्या निमित्ताने या नाटकाचे ‘कथामय नाट्यसंगीत’ रूपातील सादरीकरण दिवाळी पाडव्याला रत्नागिरीत करण्यात आले होते. (त्याबद्दलची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

‘एकच प्याला’विषयी पोतदार म्हणाले, ‘राम गणेश गडकरी यांनी हे नाटक लिहिले आणि त्यांना कफ व क्षयाचा आजार जडला. ते हवापालटासाठी नागपूरमधील सावनेरला गेले होते. तिथे माझे वडील डॉ. पांडुरंग हे वैद्यकीय अधिकारी होते. उपचारांच्या निमित्ताने वडिलांची व गडकरींची वारंवार भेट व्हायची. गडकरी यांनी ‘दारूचा पेला घेण्यापूर्वी शंभर वेळा विचार करतो; पण ती घेतल्यानंतर विचारप्रक्रिया क्षीण होते. मी हे नाटक स्वानुभवावरून लिहिले आहे,’ असे माझ्या वडिलांना सांगितले होते.’

‘माझे वडील ‘गंधर्व नाटक मंडळीं’चे डॉक्टर असल्याने ‘गंधर्व मंडळी’च्या नाटकाला प्रेक्षकांत नेहमी दोन आसने राखीव असत. अकोल्यातील प्रयोग पाहण्यासाठी वडील आणि भावासोबत मी गेलो होतो. त्या वेळी मी १४ वर्षांचा होतो आणि बालगंधर्व ६७ वर्षांचे होते. सिंधूचे पहिलेच गीत ‘लागे हृदयी हुरहुर’ हे पद षड्जावर गेले. तो षड्ज इतका सुरेल होता, की त्याचा प्रत्यय मला आजही येतो. बालगंधर्व विंगेत सुरांसाठी दोन आणि साथीसाठी समोर एक ऑर्गन घेत. या तीन ऑर्गनच्या आवाजातूनही त्यांचा सूर स्पष्ट ऐकू येत होता. हा प्रसंग आठवून मी आजही तितकाच रोमांचित होतो. ही त्यांच्या सुरांची मोहिनीच होती,’ अशी आठवणही पं. पोतदार यांनी सांगितली. 

‘याच प्रयोगात ‘राजस बाळा बघू नको मजकडे केविलवाणा’ या सिंधूच्या पदात ‘केविलवाणा’ या शब्दाचे प्रस्तुतीकरण करताना बालगंधर्व आपली असहायता इतकी उत्कटतेने प्रकट करत, की प्रेक्षकसुद्धा रडत होते. त्यांचे साभिनय गाणे पाहणे, ऐकणे हा स्वर्गीय आनंदच होता. याचा पुनःप्रत्यय नंतर मला कधी आलाच नाही,’ अशी खंतही पं. पोतदार यांनी बोलून दाखवली.

संगीत नाटकांची अशीच समृद्ध परंपरा पुढेही जपून ठेवण्यासाठी कथामय नाट्यसंगीत हा उपक्रम राबवत असल्याचे पं. पोतदार यांनी सांगितले. 

(राम गणेश गडकरी यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. गडकरींच्या काव्यसृष्टीविषयीचा डॉ. श्रीकृष्ण जोशी यांचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. गडकरींच्या ‘कठीण कठीण कठीण किती’ या पदाचा रसास्वाद वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ‘गुणी बाळ असा...’ या त्यांच्या कवितेबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा. बालगंधर्वांच्या स्वरांनी मोहरलेल्या ‘खरा तो प्रेमा’ या गीताबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(पं. जयराम पोतदार यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
makarand About 323 Days ago
पं पोतदार यांचा खूपच छान प्रयोग आहे, यामुळे युवा पिढीला संगीत नाटक व नाट्यपद कळेल व मराठी संगीत रंगभूमीला संजीवनी मिळेल
0
0

Select Language
Share Link
 
Search