Next
‘आयुष्यात यशस्वी होण्याचा ‘समर्थ-मंत्र!’
प्रसन्न पेठे (Prasanna.pethe@myvishwa.com)
Thursday, March 22, 2018 | 02:58 PM
15 0 0
Share this story

प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही एकाच वेळी कसे ‘नेटके’ आणि यशस्वी करावे ते समर्थांनी दासबोधामधून सांगितलं. त्याचबरोबर सभोवतालची परकीय जुलमी सत्ता आणि त्यामुळे गांजलेली जनता यांतून मार्ग काढण्यासाठी केवळ चांगला नव्हे, तर ‘सामर्थ्यवान’ माणूस बनवण्यासाठी उपदेश केला. आजच्या तरुणाईला आपलं व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्य खऱ्या अर्थानं कसं संपन्न आणि सफल करता येईल ते अरुण गोडबोले यांचं ‘यशस्वी जीवनाची समर्थ सूत्रे’ हे पुस्तक वाचून नक्कीच समजेल...
..............
समर्थांनी दासबोधामधून अत्यंत सोप्या भाषेत जीवनाचं तत्त्वज्ञान मांडलं आहे. आणि त्याचं सार अरुण गोडबोले यांनी ‘यशस्वी जीवनाची समर्थ सूत्रे’ या पुस्तकाच्या १९ प्रकरणांमधून दिलं आहे. 

अव्यंग मनुष्यजन्म मिळणं हे भाग्याचं आणि तो मिळाल्यावर त्याचा यथायोग्य वापर कसा करावा, अवगुणांचा त्याग करून गुणसंपादन कसं करावं, याचं सुरेख विवेचन पहिल्या पाच प्रकरणांमधून केलं आहे. ‘अव्यंग’ देह मिळणं ही कृपाच, अन्यथा आपल्या कर्तृत्वावर बंधनं येतात. देहामुळेच माणूस विविध विद्या आणि कलांची साधना करू शकतो; पण नुसतं शरीर असून चालत नाही, तर ते बलशाली असायला हवं, असं समर्थ आग्रहाने सांगतात. शक्तिवान समाजासाठी प्रत्येक व्यक्ती शक्तिवान हवी आणि त्याला बुद्धीची, युक्तीची जोडही हवी. शरीरसंपदेबरोबरच आधुनिक जीवनात वेळेचं नियोजन महत्त्वाचं आणि ते समर्थांनी त्या काळीच सांगून ठेवलं आहे. 

‘प्रातःकाळी उठावे। काही पाठांतर करावे। येथाशक्ती आठवावे। सर्वोत्तमासी।।’

व्यवहारातही माणसाने सावधपणा कसा बाळगावा याची शिकवण देताना समर्थांनी ‘खबरदार’ हा शब्दप्रयोग वापरला आहे.

‘ज्या ज्याचा जो व्यापार। तेथे असावे खबर्दार।’

सावधपणाविषयी सांगतानाच समर्थ, ‘आळस हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे, गेलेला क्षण परत येत नाही, म्हणून एकही क्षण वाया न घालवता कारणी लावला पाहिजे,’ असं आवर्जून बिंबवतात. माणूस म्हटला, की गुणांबरोबर अवगुणही आलेच. त्यामुळे एकीकडे अवगुणांचा त्याग कसा करावा ते सांगतानाच दुसरीकडे मूर्खांची लक्षणं सांगून, त्यांपासून मुक्त होण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे हे ते ठासून सांगतात.

जगात वावरताना व्यवहारचतुर होण्यासाठी समर्थ काय म्हणतात, ते पुढच्या सात प्रकरणांमध्ये सांगितलं आहे.

‘अंतर्कळा शृंगारावी। नानापरी उमजवावी। संपदा मेळवून भोगावी। सावकाश।।’

आपल्या अंगातल्या गुणांची नानापरीनं, ज्ञानमार्गानं, कर्ममार्गानं आराधना आणि अभ्यास करून वाढ करावी. त्यासाठी पडतील ते कष्ट करावेत आणि स्वतःला विद्या आणि गुणांनी शोभा आणावी, असं ते म्हणतात. असं केल्यावर आपल्याला धन, यश, कीर्ती निश्चितपणे प्राप्त होईल यात शंका नाही. यशस्वी होण्यासाठी संभाषणचतुर असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वाचन, मनन, लेखन आणि चिंतन हवं. बोलण्यात आणि लिहिण्यात नम्रता असावी, कटुता नसावी. 

‘जे दुसऱ्यास दु:ख करी । ते अपवित्र वैखरी। आपणास घात करी। कोणी एके प्रसंगी।।’

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी लोकसंग्रह हवा आणि लोकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या सुखदु:खात आपण सहभागी होणं आवश्यक असतं. 

‘परपीडेचे वाहे दु:ख। परसंतोषाचे सुख। वैराग्य देखोन हरख। तो सत्त्वगुण।।’

आपण लोकांना जोडलं, तर आपलंही भाग्य उजळेल, हे सांगण्यासाठी समर्थ म्हणतात -

‘राखावी बहुतांची अंतरे। भाग्य येते तदनंतरे।।’

अर्थात लोकसंग्रहासाठी आवश्यक अशी आणखी एक गोष्ट म्हणजे परोपकारी वृत्ती. 

‘शरीर परोपकारी लावावे। बहुतांच्या कार्या यावे। 
उणे पडो नेदावे। कोणीयेकाचे।। 
आडले आकसले जाणावे। यथाशक्ती कामास यावे।
मृदुवचने बोलत जावे। कोणी येकासी।।’

त्यापुढच्या दोन प्रकरणांत गोडबोले यांनी समर्थांच्या राजकारण आणि नेतृत्वगुणांविषयीच्या ओव्यांवर भाष्य केलं आहे. राजकारणासाठी नेतृत्वपण, नेतृत्वगुण तर हवेतच. नेतृत्वपदी असताना काही हक्क मिळतात, त्याचबरोबर काही कर्तव्यंही असतात त्यांचा विसर पडू देऊ नये. त्याचबरोबर आपलं स्थान भक्कम करून प्रगती करताना दुय्यम नेतृत्वाची दुसरी फळी उभारणं हेही महत्त्वाचं असतं. समर्थ अगदी कमी शब्दांत प्रचंड सांगून जातात -

‘महंते महंत करावे। युक्तिबुद्धीने भरावे। जाणते करून विखरावे। नाना देसीं।।’

म्हणजे सर्वदूर जाळं पसरावं, आजच्या भाषेत ‘ब्रँचेस’ उघडाव्या हे समर्थांनी साडेतीनशे वर्षांपूर्वीच सांगितलंय, हे बघून त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित होतो.
त्यापुढच्या प्रकरणात समर्थांनी शिवाजीराजांची थोरवी आणि त्यांचे गुण अंगी बाणवण्यासाठी संभाजी महाराजांना लिहिलेल्या पत्राचा तपशील गोडबोले यांनी दिला आहे. तो अत्यंत वाचनीय आहे आणि त्यातल्या काही ओळी आजही अंगावर रोमांच उभ्या करतात -

‘शिवरायांचे आठवावे रूप। शिवरायांचा आठवावा प्रताप।
शिवरायांचा आठवावा साक्षेप। भूमंडळी।।
शिवरायांचे कैसे चालणे। शिवरायांचे कैसे बोलणे।
शिवरायांचे सलगी देणे। कैसे असे।।

पुढच्या काही प्रकरणांत जीवनप्रवास, प्रपंच, परमार्थ आणि मृत्यू यासंबंधी विवेचन आहे. आणि शेवटच्या प्रकरणांत आणि परिशिष्टामधून समर्थांची थोरवी वर्णन करून अरुण गोडबोले यांनी त्यांच्या भाषावैभवाची झलक दिली आहे. एकूण २३४ पृष्ठांमध्ये त्यांनी दासबोधाचं सार सांगून, ‘यशस्वी जीवनाची सूत्रं’ फार प्रभावीपणे आणि समजायला सोप्या पद्धतीनं उलगडली आहेत.

हे पुस्तक प्रत्येकाने संग्रही ठेवून अवश्य वाचून त्यातल्या सूत्रांचं अवश्य पालन करावं. 

पुस्तक : यशस्वी जीवनाची समर्थ सूत्रे  
लेखक : अरुण गोडबोले  
प्रकाशन : कौशिक प्रकाशन, सातारा 
संपर्क : (०२१६२) २३०११४
पृष्ठे : २३४
मूल्य : २२५ ₹ 

(‘यशस्वी जीवनाची समर्थ सूत्रे’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link