Next
दगडूशेठ हलवाई गणपतीला यंदा कोणार्कच्या सूर्यमंदिराची सजावट
BOI
Thursday, August 29, 2019 | 03:54 PM
15 0 0
Share this article:

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या १२७व्या वर्षानिमित्त यंदा श्री गणेश सूर्यमंदिर साकारण्यात आले आहे. गणेश चतुर्थीदिनी सोमवारी, दोन सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी शिर्डी कोकमठाण येथील प. पू. विश्वात्मक ओम गुरुदेव जंगलीदास महाराज यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्घाटन सायंकाळी सात वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

पत्रकार परिषदेला सुनील रासने, डॉ. बाळासाहेब परांजपे, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, विवेक खटावकर, प्रकाश चव्हाण, अक्षय गोडसे, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. 

सोमवारी (दोन सप्टेंबर) प्राणप्रतिष्ठेपूर्वी सकाळी साडेआठ वाजता मुख्य मंदिरापासून शेषात्मज रथातून श्रींची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. फुलांनी साकारलेले २१ नाग रथावर लावण्यात येणार आहेत. सुभाष सरपाले यांनी ही सजावट केली आहे. दुपारी १२.२० पर्यंत प्राणप्रतिष्ठा होणार असून, भाविकांनी दुपारी १२.३० नंतर श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. यंदाची सजावट असलेले श्री गणेश सूर्यमंदिर ओडिशा राज्यातील जगप्रसिद्ध आणि प्राचीन आश्चर्य ठरलेल्या कोणार्कच्या सूर्यमंदिरावर आधारित आहे. ही प्रतिकृती भाविकांकरिता विशेष आकर्षण ठरणार आहे. 

मोतिया रंगाच्या लाखो दिव्यांनी हे मंदिर उजळून निघणार आहे. अत्याधुनिक दिव्यांनी ही विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. मंदिरामध्ये, तसेच रस्त्याच्या दुतर्फा २२५ झुंबरे लावण्यात आली असून, मारणे इलेक्ट्रिकल्सच्या वतीने ती लावण्यात आली आहेत. शिल्पकार विवेक खटावकर यांनी मंदिराचे कलादिग्दर्शन केले आहे. विद्युत रोषणाईचे काम वाईकर बंधूंनी, तर मंडप व्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे. 

तीन सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता ॠषिपंचमीनिमित्त दर वर्षीप्रमाणे २५ हजार महिला सामुदायिकरीत्या अर्थवशीर्ष पठण करणार आहेत. त्यानंतर सकाळी नऊ वाजता गणेशयागाचा शुभारंभ प. पू. गुरुवर्य योगिराज भाऊमहाराज परांडे यांच्या हस्ते होणार आहे. रात्री १० ते पहाटे तीन वाजेपर्यंत हरिजागराच्या माध्यमातून महाराष्ट्रातील समस्त वारकरी बंधू वारकरी गजर करून गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत. 

चार सप्टेंबर रोजी सूर्यनमस्कार व पाच सप्टेंबर रोजी अग्निहोत्र यांसह उत्सवात वेदपठण, महिला हळदीकुंकू असे विविध कार्यक्रम होणार आहेत. 

दररोज पहाटे पाचपासून महाअभिषेक पूजा होणार असून, सकाळी सात ते दुपारी १२ आणि दुपारी दोन ते सायंकाळी सहा या वेळेत मिलिंद राहुरकर शास्त्री व दुपारी १२ ते चार या वेळेत दाक्षिणात्य पद्धतीने नटराजशास्त्री यांच्या उपस्थितीत गणेशयाग होणार आहे. 

तीन ते ११ सप्टेंबरदरम्यान दररोज पहाटे पाच ते सहा या वेळेत विविध शाळांतील विद्यार्थी अथर्वशीर्ष पठण करणार आहेत. नऊ सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत मंत्रजागर होणार आहे. अनंत चतुर्दशीला, १२ सप्टेंबर रोजी श्रींची वैभवशाली विसर्जन मिरवणूक श्री विकटविनायक रथातून निघणार आहे. 

श्री गणेश सूर्यमंदिराची वैशिष्ट्ये
यंदाच्या सजावटीची संकल्पना भारताचे प्राचीन वेद, पुराणे, शास्त्रे यावर आधारित आहे. उंच शिखरे, मंडप असलेले हे सूर्यमंदिर आहे. गेली अनेक वर्षे विविध मंदिरांची उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून साकारण्याकरिता ट्रस्ट प्रयत्नशील आहे. सूर्याच्या प्रभात, माध्यान्ह आणि सायंकालीन अवस्थांचे मनोहारी दर्शन, तसेच १२ आदित्य आणि सूर्यास प्रिय असलेल्या कमल, पुंडरिक आणि उत्पालांच्या लता-वेलींच्या डौलदार नक्षींनी व्यापलेले मंदिर भाविकांना यंदा पाहता येणार आहे. अनेक स्तंभ, मालांची तोरणे आणि सिंह, कीर्तिमुख, हंस, यक्ष, सुरसुंदरी आणि आकाशगामी गंधर्वांनी मंदिर सजविले जाणार आहे. 

सोन्यासारख्या प्रकाशाने व्यापलेले मंदिर गजान्तलक्ष्मीने नटलेले असणार आहे. समृद्धीचे प्रतीक असलेले हत्ती, अरुणाच्या सारथ्याने प्रचंड सूर्यरथाचे धावणारे अश्व व रथचक्र हे असणार आहेत. मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये अनेक स्तंभी पद्मपीठाच्या सुवर्ण सिंहासनावर श्रींची मूर्ती विराजमान होणार आहे. सारसबागेजवळील बाबूराव सणस मैदानासमोरील सजावट विभागात सजावटीचे काम पूर्ण होत आले असून, अनेक कारागिरांनी याकरिता दिवस-रात्र मेहनत घेतली आहे. 

५० कोटींचा विमा व उत्सवावर १५० कॅमेऱ्यांचा वॉच
पुणे शहर महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यासह कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत गणेशभक्तांसाठी तब्बल ५० कोटींचा विमा ट्रस्टतर्फे काढण्यात आला आहे. यामध्ये चेंगराचेंगरी, अतिरेकी हल्ला वा हवाई हल्ला झाल्यास विम्याचे सुरक्षाकवच मिळणार आहे. यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास प्रति व्यक्तीला पाच लाख रुपये, अपघातात अंशत: अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये आणि अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला ५० हजार रुपयांपर्यंत औषधाचा खर्च देण्यात येईल. एक ते १३ सप्टेंबरपर्यंत ही विम्याची सुविधा असणार आहे. 

याशिवाय गणपतीच्या कायमस्वरूपी उभारलेल्या मंदिरात येणाऱ्या भाविकांचा पाच कोटी रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. यामध्येदेखील चेंगराचेंगरी, अतिरेकी हल्ला वा हवाई हल्ला झाल्यास विम्याचे सुरक्षाकवच मिळणार आहे. यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास प्रति व्यक्तीमागे दोन लाख रुपये, अपघातात अंशत: अपंगत्व आल्यास एक लाख रुपये, अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला ५० हजार रुपयांपर्यंत औषधाचा खर्च देण्यात येईल. अतिरेकी हल्ला झाल्यास मंदिराच्या किलोमीटरच्या परिसरातील दुकान किंवा घराचे नुकसान झाले तर हा विमा लागू आहे. गणेशाचे कायमस्वरूपी मंदिर व मंदिरापासून १ किलोमीटरच्या परिसरातील फक्त भाविकांसाठीच हा विमा असणार आहे. 

सुरक्षेच्या कारणास्तव देखाव्याच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच फरासखाना चौक, बाबू गेनू गणपती, दगडूशेठ दत्तमंदिर, सिटी पोस्ट अशा परिसरातदेखील सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. याशिवाय मंदिर परिसरात कायमस्वरूपी असलेल्या कॅमेऱ्यांचा ‘वॉच’ही उत्सवावर असणार आहे. त्यामुळे तब्बल १५० कॅमेऱ्यांद्वारे या परिसरावर पोलीस यंत्रणेसोबत ट्रस्टची २०० पुरुष व महिला यांची खासगी सुरक्षाव्यवस्था लक्ष ठेवणार आहे. 

(सजावटीची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत.. दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search