Next
‘देवेंद्र फडणवीस हे ‘डेव्हलपमेंट फडणवीस’ म्हणून ओळखले जातील’
श्वेता शालिनी यांचे प्रतिपादन
BOI
Tuesday, September 10, 2019 | 03:32 PM
15 0 0
Share this article:

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नेतृत्वशैली व विकासदृष्टी’ या विषयावरील चर्चासत्रात बोलताना श्वेता शालिनीपुणे : ‘राज्यातील आयआयटी, आयआयएममधील युवकांना एकत्रित करून कार्यान्वित केलेली ‘वॉर-रूम’, शासकीय अधिकाऱ्यांपासून सामान्य तक्रारदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तयार केलेले ‘आपले सरकार’सारखे व्यासपीठ, व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन याद्वारे सीएसआरच्या निधीतून सुरू झालेली ग्रामीण भागातील विकासकामे, जलयुक्त शिवारसारख्या कार्यक्रमांमधून राज्य दुष्काळमुक्त करण्याकडे वाटचाल आणि पक्षाअंतर्गत व बाहेरील राजकीय विरोधातून यशस्वीपणे काढलेली वाट या बाबी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आतापर्यंत राज्यात झालेल्या इतर मुख्यमंत्र्यांपासून वेगळे बनवितात. त्यामुळेच महाराष्ट्राच्या इतिहासात देवेंद्र फडणवीस हे ‘डेव्हलपमेंट फडणवीस’ म्हणून ओळखले जातील,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार श्वेता शालिनी यांनी केले.
                      
डेक्कन एज्युकेशन सोसायटी व रोटरी क्लब ऑफ पुणे साउथ यांच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित एका चर्चासत्रात त्या बोलत होत्या. ‘गेन इनसाइट इनटू द लीडरशिप स्टाइल अँड डेव्हलपमेंट व्हिजन ऑफ महाराष्ट्राज् चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस’ अर्थात ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नेतृत्वशैली व विकासदृष्टी’ हा या चर्चासत्राचा विषय होता. 

‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या इतिहासात संपूर्ण कालावधी पदावर राहून राज्यकारभार करणारे देवेंद्र फडणवीस दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. अनेक अडचणी, ताणतणाव, आंदोलने, नैसर्गिक आपत्ती अशा अनेक संकटांना तोंड देत फडणवीसांनी केलेला यशस्वी राज्यकारभार हा व्यवस्थापनशास्त्राचा विषय असून, याच विषयाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर देवेंद्र फडणवीस हे एक ‘केस स्टडी’ म्हणून समोर येत आहेत. त्यांच्या याच पैलूंवर चर्चा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘देवेंद्र डेव्हलपमेंट डॉक्ट्रिन’ या पुस्तिकेचे प्रकाशनही या वेळी करण्यात आले.  

चर्चासत्रात सहभागी झालेले पत्रकार मयुरेश दिडोलकर, डॉ. दीपक शिकारपूर, डॉ. राधाकृष्ण पिल्लई, अभिजित जोग आदी

पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कॉर्पोरेट चाणक्य व व्यवस्थापन गुरू डॉ. राधाकृष्ण पिल्लई, ज्येष्ठ पत्रकार व लेखक मयुरेश दिडोलकर, आयटीतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनीही या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वशैलीवर आपली मते व्यक्त केली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरद कुंटे आणि रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथचे अध्यक्ष अभिजित जोग या वेळी उपस्थित होते.

श्वेता शालिनी पुढे म्हणाल्या, ‘सामान्य नागरिकांपर्यंत सरकार पोहोचावे या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक ‘आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग’ आयडीया काढल्या आणि त्यांची यशस्वी अंमलबजावणी करून दाखविली. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून नाही तर ‘मुख्य सेवक’ म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पाच वर्षांत जनतेने  याचा अनुभव घेतला आहे. एखादा उपक्रम करायचा असेल, तर त्याचे बाह्यरूप नाही तर त्यामागील विचार महत्त्वाचा असतो. हाच विचार देवेंद्र फडणवीस देताना दिसत आहेत.’

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवडून येतील का, या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना श्वेता शालिनी म्हणाल्या, ‘फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची नको आहे; मात्र आज राज्याला त्यांच्यासारख्या मुख्यसेवकाची निश्चित गरज आहे.’

‘मिशन मोड डिलिव्हरी’ या विषयावर आपले मत मांडताना सौरभ राव म्हणाले, ‘कल्याणकारी राज्य चालविण्यासाठी आरटीआय (माहितीचा अधिकार) आणि राईट टू सर्व्हिस (सेवेचा अधिकार) यांचे महत्त्व देवेंद्र फडणवीस यांना समजले असून, या दोहोंचा समन्वय साधत ते कार्यक्षमपणे काम करीत आहेत. एक दूरदर्शी नेता म्हणून त्यांचा दृष्टीकोन सकारात्मक असून, राज्यात व्यवसाय वाढावेत या दृष्टीने ‘लायसन्स राज’ संपविण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न हा आवर्जून नमूद करण्यासारखाच आहे. या उपक्रमामुळे आधी लागणाऱ्या ७६ परवानग्या आता केवळ २५ वर आल्याने त्याचा फायदाही दिसून येत आहे. याशिवाय गेल्या पाच वर्षांत शिक्षण, आरोग्य, नोकऱ्या, स्वयंरोजगार यांमुळे सकारात्मक बदल दिसत असून, देशात शिक्षण क्षेत्रात सहाव्या व आरोग्य क्षेत्रात १६ व्या क्रमांकावर असलेले महाराष्ट्र राज्य आता दोन्हीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आले आहे.’

‘खूपदा वैयक्तिक बाबींवर अर्वाच्य टीका होऊनदेखील ‘मी पीडित आहे’ असे भांडवल करून जनतेची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी कधीही केला नाही.  त्यांनी त्याला अत्यंत योग्य पद्धतीने उत्तर दिले,’ असे निरीक्षण मयुरेश दिडोलकर यांनी मांडले.

अभिजित जोग यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. शिखा जैन यांनी आभार मानले.

(या कार्यक्रमाची झलक दर्शविणारा पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

(देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल भाऊ तोरसेकर यांनी लिहिलेला लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search