Next
कल्याणमध्ये कवितेतून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना
BOI
Monday, February 25, 2019 | 01:32 PM
15 0 0
Share this article:कल्याण : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्याणमधील लाख मोलाच्या कविता काव्यमंच, भिवंडीतील माझी आई प्रतिष्ठान, बहुउद्देशीय मानवसेवा संस्था, मुंबईतील विकास प्रबोधिनी संस्था, दिवा येथील रामवेणू काव्यमंच, कवी कट्टा कल्याण-मुंबई व ठाण्यातील जेष्ठ पत्रकार चैतन्य सुखदेव सोनावणे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २३ फेब्रुवारी २०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज कवी संमेलनाचे आयोजन शहरातील नुतन विद्यालयात केले होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कवी दीप यांनी भूषविले. जेष्ठ कवी, गायक, मास्टर राजरत्न राजगुरू, अॅड श्रीकृष्ण टोबरे, साहित्यिक विजयकुमार भोईर, विलास बसवंत, जगदेव भटू, नवनाथ रणखांबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी पुलवामातील शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

प्रास्ताविक करताना अॅड. सोनावणे म्हणाले, ‘शिवरायांचा इतिहास म्हणजे केवळ अफजलखान वध, शाहिस्तेखानावर हल्ला, पन्हाळा, आग्रा कैद यापेक्षा शिवाजीराजांचे कार्य भव्यदिव्य आणि उतुंग असे जगविख्यात आहे. शिवाजीराजांचा मोगल, आदिलशहा यांच्याविरुद्ध राजकीय लढा होता, धार्मिक लढा नव्हे. त्यांनी रयतेचे राज्य स्थापन केले. त्यांचा राजकीय व्यवहार स्वच्छ होता. शिवकाळात भ्रष्टाचार झाला नाही. शिवाजीराजे स्वतः आरपार निर्मळ व पारदर्शक होते. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये, असे फरमानच त्यांनी काढले. त्यामुळे शिवकाळात एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली नाही. असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. म्हणून आम्ही या महान राजाला कवितेतून मानवंदना देत आहोत.’

कवी दीप यांनी शिवाजी महाराजांनी जातीविरहीत क्रांती केली आहे, म्हणूनच या कवी संमेलनात आम्ही विविध जाती-धर्मांचे कवी एकत्र येऊन कवितेतून शिवाजी महाराजांचा जागर करत असल्याचे सांगितले.

या वेळी संमेलन अध्यक्ष कवी दीप, जेष्ठ कवी-गायक, मास्टर राजरत्न राजगुरू, जेष्ठ साहित्यिक विलास बसवंत, अॅड. टोबरे, साहित्यिक भोईर, साहित्यिक भटू, अॅड. सोनावणे, कवी रणखांबे, कांबळे, उदय क्षीरसागर, सुरेखा गायकवाड, मनीषा मेश्राम, प्रतिभा सोनावणे, ज्योती गोळे, नीलम पाटील, मिलिंद जाधव, संघरत्न घनघाव, मारुती कांबळे, रवींद्र आडके, अनिल शेलार, चेतन जाधव, गोविंद मोरे, राष्ट्रपाल काकडे, विनोद गायकवाड या कवींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर स्वरचित कविता सादर केल्या.

सहभागी कवींना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. अॅड. टोबरे यांनी आभार मानले. कवयित्री सुरेखा गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search