Next
‘आई हा मोठा ऊर्जास्रोत’
प्राची गावस्कर
Monday, October 29, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this article:

लेखक, कवी, नाटककार आणि विशेषतः प्रायोगिक रंगभूमीवरील संवेदनशील विषय हाताळणारे, वेगळे विचार मांडणारे नाट्यलेखक म्हणून आशुतोष पोतदार परिचित आहेत. इंग्रजी साहित्यात पीएचडी प्राप्त केलेले आशुतोष पोतदार पुण्यात फ्लेम युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक आहेत. एनएसडी, आयआयटी पवई या संस्थांमध्ये ते नाटक, भाषा, साहित्य या विषयांवर मार्गदर्शन करतात. शिक्षक-विद्यार्थी हा संवाद दुहेरी झाला, की ऊर्जेचे अनेक स्रोत गवसतात, असे त्यांना वाटते. ‘बी पॉझिटिव्ह’ सदरात आज जाणून घेऊ या त्यांचे सकारात्मकतेबद्दलचे विचार...
.....
- तुमच्या आयुष्यातील सकारात्मक ऊर्जेचा स्रोत काय?
- सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते ती आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या माणसांमधून. मला सकारात्मक ऊर्जा मिळाली आणि मिळते ती माझ्या आईकडून. लहानपणापासून आई, वडील, आजी, आजोबा, घरातील अन्य महिला सतत कामात मग्न असलेल्या मी पाहत आलेलो आहे. आपणही आपल्या घरात अशा लोकांना पाहत असतो. कोणताही नकारात्मक विचार मनात न आणता हे लोक धडपडत असतात. त्यांच्याकडून सकारात्मक ऊर्जा मला मिळत असते. माझी आई ही अशा ऊर्जेचा मोठा स्रोत आहे. ती घर सांभाळते, स्वतःचे छंद जोपासते. कधीही कुरकुर नसते. नाही, नको, पुरे झाले, असा विचार तिच्या मनात फार कमी वेळा येतो. मी शिकवत असतो, नाटक लिहीत असतो, अशा वेळी अनेकदा वाटते ‘नको, पुरे आता,’ त्या वेळी मला आई आठवते. ती सांगते, ‘थांबायचे नाही, हे काम आपल्याला पूर्ण करायचे आहे.’ आपला आपल्याशीदेखील संघर्ष सुरू असतो. त्यावर मात करून आपण पुढे जातो, यातून सकारात्मक ऊर्जा मिळत असते.

तुमची या क्षेत्रात येण्यामागची प्रेरणा काय? लेखनाची प्रेरणा कशातून मिळते?
- लेखन हे माझे एक क्षेत्र आहे. मी शिकवतोदेखील. लेखन हे माझ्या आयुष्यात खूप उशिरा आले. महाविद्यालयात शिकत असताना स्पर्धांमध्ये, कार्यक्रमासाठी नाटक बसवण्याबाबत चर्चा होत असत. त्या वेळी कोणाला तरी नाटक लिहिण्याची जबाबदारी घ्यावी लागते, ती मी घेत असे. नंतर शिकवायला लागल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी पथनाट्ये लिहायला लागलो. ती त्या काळाची गरज होती. स्वतःला व्यक्त करण्यासाठीदेखील ते आवश्यक असते. त्यामुळे हळूहळू कारणपरत्वे होणारे लेखन हे स्वतःला व्यक्त करण्यासाठी होऊ लागले. त्यात मला स्वतःला नाटक, कविता हे प्रकार जास्त आवडत असल्याने माझा त्यावरचा भर वाढला. व्यक्त करणे आणि या भवतालाशी जोडून घेण्यासाठी हे मार्ग मला आवडतात. हे करावेसे वाटते, कारण हे जग सुंदर करायचे आहे. अर्थात जगाच्या सुंदरतेची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असू शकते. त्याकरिता मी काय करू शकतो? तर, मी माझ्या लेखनातून प्रश्न उभे करू शकतो. मला स्वतः ला हे प्रश्न पडले, तर मी ते मांडू शकेन, असे मला वाटते. प्रश्न उपस्थित होतात, त्यांची उत्तरे मिळतात. पुन्हा नवे प्रश्न उपस्थित होतात. ही प्रक्रिया सतत सुरू असते. त्यामुळे त्यातूनच मला लेखनाची प्रेरणा मिळत असते.

आशुतोष पोतदार यांच्या ‘आनंदभोग मॉल’ या नाटकात काम करणारे कलाकार गिरीश कुलकर्णी आणि अनिता दाते.
- तुम्हाला निराशा येते तेव्हा काय करता?
- येणारा क्षण, दिवस हा आशा-निराशेचा खेळ असतो. अनेक गोष्टी घडत असतात. त्या का, कशा, याचे मला पूर्ण आकलन झालेय असे कधी वाटत नाही. कधी असे वाटले तर मग आता आपण काय आणखी समजून घ्यायचे, असा विचार येतो. प्रत्येकाच्या मनात असा आशा-निराशेचा खेळ सुरू असतो. हा खेळ मला जिवंत ठेवत असतो. मला लिहायला सुचत नाही, तेव्हा कधी कधी हताश वाटते. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमुळेही आपल्याला निराश वाटते. त्यामुळे आशा-निराशेचा खेळ हा फक्त व्यक्तfगत नसतो. समाजात घडणाऱ्या घटनांचाही आपल्या मनावर परिणाम होतो. आजूबाजूच्या अस्वस्थतेतूनही निराशा येते. त्याच वेळी आजूबाजूला घडणाऱ्या चांगल्या, अगदी छोट्याशा गोष्टीही, जसे पावसाचे थेंब पडले की मातीतून इवलासा कोंब बाहेर येतो, ते बघितले की सगळी निराशा पळून जातात. सामाजिक, राजकीय गदारोळात निराश वाटत असतानाच ‘मी टू’सारखी चळवळ आशा देते. वाचन करताना अनेक लेखक भेटतात. आपण काही नवीन करू शकतो, अशी प्रेरणा देतात. त्यामुळे अनेक गोष्टी निराशेकडून आशेकडे नेतात.

- तुमच्या कार्यक्षेत्राचे सकारात्मकेत असलेले स्थान काय?
- मी शिकवतो, तसेच लिहितोही. शिकवताना समाजातील अत्यंत सक्रिय, उमदा असा तरुण वयोगट माझ्यासमोर असतो आणि बराच काळ मी त्यांच्यासमवेत असतो. इंटरनेटसारखी अत्याधुनिक साधने असतात. त्यांच्याबरोबर राहताना खूप नवीन गोष्टी शिकता येतात. शिकवताना अवघड संकल्पना सोप्या पद्धतीने त्यांच्यासमोर मांडायच्या असतात. शिक्षणाचा व्यवहार रटाळ होऊ नये यासाठी मी प्रयत्न करत असतो. त्यांच्याबरोबर एक नाते जोडत असतो. हे नाते अधिक चांगले कसे होऊ शकेल, यासाठी नेहमी प्रयत्न करायला मला आवडते. त्यामुळे अभ्यासशास्त्राच्या चौकटीतून पलीकडे जाऊन अनेक प्रयोग त्यांना सांगू शकतो. नवे विचारप्रवाह या विद्यार्थ्यांना समजावून देऊ शकतो. शिक्षक आणि विद्यार्थी हा एकतर्फी संवाद न राहता तो दुहेरी झाला, की ऊर्जेचे अनेक स्रोत गवसतात. प्रेरणा मिळते. 

- सकारात्मक, आनंदी राहण्यासाठी लोकांना काय सांगाल?
- अलीकडेच माझी जिज्ञासा लर्निंग सेंटर या संस्थेशी ओळख झाली. शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सुसंस्कृत नवीन पिढी घडवण्यासाठी ‘नई तालीम’सारख्या कार्यक्रमाप्रमाणे ही संस्था काम करत आहे. अशा संस्था बघितल्यावर आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. लहान मुलांना माहिती नसते, की एखादी गोष्ट आपल्याला येणार आहे की नाही, तरीही ती प्रयत्न करत असतात. त्यांना बघितले, तर आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळेल. शास्त्रज्ञ, कलाकार नवनवे प्रयोग करत असतात. समाज ढासळताना आपण पाहत असतो, वर्गसंघर्ष, जातींचा संघर्ष पाहत असतो. अशा वेळी चांगले उपक्रम पाहिले, संस्था पाहिल्या, तर आपल्याला नक्कीच सकारात्मक ऊर्जा मिळेल. 

(‘बी पॉझिटिव्ह’ हे सदर ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर सोमवारी प्रसिद्ध होते. त्यातील सर्व मुलाखती https://goo.gl/gfcuAb या लिंकवर उपलब्ध आहेत. आशुतोष पोतदार यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search