Next
मुलांनी घेतली ‘फटाकेमुक्त दिवाळी’ची शपथ
देवरुखमधील युयुत्सू आर्ते यांचा उपक्रम
संदेश सप्रे
Monday, November 05, 2018 | 01:24 PM
15 0 0
Share this article:

फटाकेमुक्त दिवाळीची शपथ घेताना देवरुख शाळा क्रमांक चारमधील विद्यार्थी

देवरुख :
फटाकेमुक्त दिवाळी हा विषय दर वर्षीप्रमाणेच यंदाही चर्चेत आला आहे. यंदा त्याला न्यायालयाच्या निकालाची पार्श्वभूमी आहे. अर्थात, दिवाळी प्रत्यक्षात फटाकेमुक्त झालेली मात्र दिसत नाही. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमधील सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांनी ‘फटाकेमुक्त दिवाळी’ हे अभियान सलग चौथ्या वर्षी यशस्वी केले आहे. यंदा देवरुखातील ३०० विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे महत्त्व लोकांना पटू लागले आहे. 

दिवाळीत फटाक्यांमुळे प्रदूषणाचे प्रमाण अधिक होते. फटाक्यांमुळे होणारी संपत्तीची नासाडी आणि अपघात हाही एक वेगळा भाग आहे. म्हणूनच गेली काही वर्षे ‘फटाकेमुक्त दिवाळी’ ही संकल्पना चर्चिली जाऊ लागली. प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र फार मोठ्या प्रमाणावर झाली नाही. देवरुखचे सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांनी मात्र हा उपक्रम मनावर घेतला. तीन वर्षांपूर्वी शहरातील एका शाळेतून या उपक्रमाची सुरुवात झाली. त्या वेळी शपथ घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी निम्म्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली. गेल्या दोन वर्षांत या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. 

यंदा या उपक्रमाचे चौथे वर्ष आहे. देवरुख शाळा क्रमांक चारमधील ३०० मुलांनी या उपक्रमात सहभाग घेतलवा आहे. ‘आम्ही पैसे जाळणार नाही, आम्ही फटाके वाजवणार नाही,’ अशी शपथ या मुलांनी घेतलीच. शिवाय ‘यापुढे प्लास्टिक पिशवीचा वापर करणार नाही,’ असाही निर्धार त्यांनी केला. 

मुलांनी फटाके वाजवू नयेत, यासाठी आर्ते यांनी सलग तीन वर्षे कृतिशील अभियान राबवले. या अभियानाला मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. दिवाळीत आम्ही फटाके वाजवले नाहीत, असे सांगणाऱ्या ३००हून अधिक मुलांना आर्ते यांनी बक्षिसे दिली. याच धर्तीवर शासनानेही फटाके न वाजवण्यासाठी मुलांमध्ये जागृती केली. परिपत्रक काढून हे अभियान राबवले.

यंदाही आर्ते यांनी संगमेश्वर तालुक्यातील शाळांमध्ये जाऊन पर्यावरण प्रदूषणाबद्दल मार्गदर्शन करून, फटाके न वाजवण्याचे आवाहन मुलांना केले. या वर्षी चिपळूण, गुहागर, दाभोळ या भागातही त्यांनी या पत्रकांचे वाटप करून आपल्या अभियानाची व्याप्ती वाढवायला सुरुवात केली आहे. या उपक्रमासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरील जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनच्या देवरुख शाखेने सहकार्य केले. 

‘फटाके न वाजवता वाचलेले पैसे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या चांगल्या खाण्यावर, आरोग्यावर, शैक्षणिक साहित्यावर खर्च करावेत. ज्यांना शक्य असेल त्यांनी आई-वडिलांच्या मदतीने ते पैसे सामाजिक उपक्रमासाठी वापरावेत,’ असे आवाहन युयुत्सू आर्ते करतात.  

संपर्क : युयुत्सू आर्ते : ९४२२३ ५१२९६ 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search