Next
चिऊताई, चिऊताई दार उघड!
BOI
Saturday, March 03 | 08:30 AM
15 0 0
Share this story

 

मंगेश पाडगांवकर म्हणजे जीवनाचं आनंदी गाणं गाणारे आणि सकारात्मकतेचा संदेश आपल्या कवितांतून देणारे कवी. ‘चिऊताई, चिऊताई दार उघड!’ आणि ‘सांगा कसं जगायचं?’ या त्यांच्या कविताही त्याचीच साक्ष देतात. ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमात या कविता आपल्यासमोर सादर केल्या आहेत पुण्यातील गायिका आणि अभिवाचक चैत्राली अभ्यंकर यांनी...
............
मंगेश पाडगांवकर
चिऊताई, चिऊताई दार उघड!

चिऊताई, चिऊताई दार उघड!
चिऊताई, चिऊताई दार उघड!
दार उघड , दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड!
दार असं लावून,
जगावरती कावून,
किती वेळ डोळे मिटून आत बसशील?
आपलं मन आपणच खात बसशील?

वारा आत यायलाच हवा,
मोकळा श्वास घ्यायलाच हवा!

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड!

फुलं जशी असतात,
तसे काटे असतात;
सरळ मार्ग असतो,
तसे फाटे असतात!

गाणाऱ्या मैना असतात ;
पांढरे शुभ्र बगळे असतात ;
कधी कधी कर्कश काळे
कावळेच फक्त सगळे असतात!

कावळ्याचे डावपेच पक्के असतील,
त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील!
तरी सुद्धा या जगात वावरावंच लागतं
आपलं मन आपल्याला सावरावंच लागतं!

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड!

सगळंच कसं होणार
आपल्या मनासारखं?
आपलं सुध्दा आपल्याला
होत असतं पारखं!

मोर धुन्द नाचतो म्हणुन
आपण का सुन्न व्हायचं?
कोकीळ सुंदर गातो म्हणून
आपण का खिन्न व्हायचं?
तुलना करीत बसायचं नसतं गं,
प्रत्येकाचं वेगळेपण असतं गं!

प्रत्येकाच्या आत एक
फुलणारं फूल असतं ;
प्रत्येकाच्या आत एक
खेळणारं मूल असतं!

फुलणाऱ्या या फुलासाठी,
खेळणाऱ्या या मुलासाठी

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड!

निराशेच्या पोकळीमधे
काहीसुद्धा घडत नाही!
आपलं दार बंद म्हणुन
कुणाचंच अडत नाही!

आपणच आपला मग
द्वेष करू लागतो!
आपल्याच अंधाराने आपलं
मन भरू लागतो!

पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं,
तुला शोधीत फुलपाखरु नाचत आलं!
चिऊताई ,चिऊताई,
तुला काहीच कळलं नाही!
तुझं घर बंद होतं,
डोळे असून अंध होतं!

बंद घरात बसून कसं चालेल?
जगावरती रुसून कसं चालेल?

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई,चिऊताई दार उघड!
- मंगेश पाडगांवकर
...........
सांगा कसं जगायचं?

सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा!

डोळे भरून तुमची आठवण
कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुमच्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीच ठरवा!

काळ्याकुट्ट काळोखात
जेंव्हा काही दिसत नसतं
तुमच्यासाठी कोणीतरी
दिवा घेऊन ऊभं असतं
काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीच ठरवा!

पायात काटे रुतून बसतात
हे अगदी खरं असतं,
आणि फुलं फुलून येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं
तुम्हीच ठरवा!

पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीच ठरवा!

सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा!
- मंगेश पाडगांवकर

(मंगेश पाडगांवकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी https://goo.gl/wtck5N येथे क्लिक करा. मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध झालेले सर्व लेख, कविता आणि व्हिडिओ https://goo.gl/qgDdWU या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link