Next
‘...तरच आत्मचरित्र लिहिणे शक्य’
BOI
Saturday, September 02 | 07:26 PM
15 0 0
Share this story

शिरीष पैज्येष्ठ कवयित्री आणि सामाजिक कार्यकर्त्या शिरीष पै यांचे शनिवारी (दोन सप्टेंबर २०१७) निधन झाले. प्रसिद्ध साहित्यिक आचार्य अत्रे यांची कन्या ही जन्मासोबत मिळालेली ओळख त्यांनी स्वकर्तृत्वाने खूप मोठी केली. हायकू हा जपानी काव्यप्रकार त्यांनी मराठीत रूढ केला आणि काव्य, कथा, ललित, नाटक असे विविध साहित्यप्रकार त्यांनी लीलया हाताळले. ‘वडिलांच्या सेवेसी’ या पुस्तकात त्यांनी आई, वडील आणि पती यांच्याबद्दलच्या काही आठवणी लिहिल्या आहेत. या पुस्तकाच्या मनोगतात त्यांनी स्वतःची आत्मचरित्राबद्दलची भूमिका लिहिली आहे. ते मनोगत येथे देत आहोत.   
.............
‘वडिलांच्या सेवेसी’ हे पप्पा, आई आणि व्यंकटेश मिळून त्यांचे आणि माझे बरेचसे जीवन किंवा जीवनाचे तुकडे, जे मी शब्दांतून उभे केले आहेत. अलीकडे पुष्कळ लोकांनी मला आग्रह केला आहे, की तुम्ही तुमचे आत्मचरित्र लिहा. पप्पांचे चरित्र मी लिहावे अशाही सूचना मला बऱ्याच जणांकडून येत आहेत. पप्पांचे चरित्र लिहिणे ही काही सोपी गोष्ट नाही आणि खरे म्हणजे त्यांनी ‘मी कसा झालो’ आणि ‘कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्रात्मक लिखाण करून स्वत:चे समग्र जीवन महाराष्ट्रापुढे मांडले आहेच. त्यापलीकडे जाऊन त्यांच्या व्यक्तिगत जीवनाचा शोध माझ्या शक्तीबाहेरचे काम वाटत आलेले आहे. एकतर ममत्वामुळे असेल किंवा त्यांच्याबद्दलच्या निस्सीम भक्तियुक्त आदरामुळे असेल, तटस्थपणे, अलिप्तपणे मला त्यांचे चरित्र लिहिणे, ही एक अवघड बाब वाटते. मी कधी कधी प्रयत्न करून पाहिलेही आहे. तथापि संपूर्ण सत्य सांगणे ही एक अशक्यप्राय गोष्ट आहे. कुठल्याही प्रश्नाच्या सगळ्या बाजू समजतात, तेव्हाच सत्य उलगडता येण्याची शक्यता निर्माण होते. आपल्याला ज्ञात असतात फक्त आपल्याला कळलेल्या सत्याच्या बाजू. अलीकडच्या, तिकडच्या, इकडच्या, पलीकडच्या-सगळ्याच बाजू अंधारात असतात. कुठलेही सत्य हे आपले सत्य असते. समग्र सत्य आपल्या हाती कधी येत नाहीच. शिवाय आपण जेवढे म्हणून काही जाणले ते सत्यही समग्रपणे आपण उघड करू शकत नाही. आपण सांगू शकतो त्यातला काही निवडक भागच. सत्याची थोडीशी चुणूक आपण दाखवू शकतो. परंतु सगळे सत्य उघड करून दाखवता येत नाही.

शिवाय दुसऱ्याबद्दलच्या चांगल्या नि वाईट गोष्टी सांगताना आपल्याही भल्याबुऱ्या समग्र गोष्टी आपल्याला सांगता आल्या पाहिजेत. स्वत:बद्दल आपण कितीसे निर्भयपणे, उघडपणे आणि धैर्याने बोलू शकतो? जिथे खुद्द स्वत:लाच आपण इतके दडवून ठेवतो तिथे दुसऱ्याला जगापुढे उघडे करण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? स्वत:च्या खासगी जीवनाबद्दल मला लिहावयाचे असेल, तर मला माझ्या चुकाही प्रामाणिकपणे लोकांसमोर उघड करता आल्या पाहिजेत. तरच मी खऱ्या अर्थाने आत्मचरित्र लिहू शकेन. अनेक दडपणांखाली जगत असताना तसे ते लिहिणे अशक्य आहे.

असे असले तरीही सांगण्यासारखे पुष्कळ शिल्लक उरतेच. जीवनाचा प्रवाह अखंड वाहतो आहे, सारखा पुढेच चालला आहे. त्याबरोबर आपणही वाहत चाललो आहोत. बराचसा गाळ खाली बसून जातो. पण बऱ्याचशा घटना आपल्याभोवती साचून त्यांचे एक विचित्र बेटच आपल्या पायांखाली तयार होते. तेच आपल्या जगण्याचा आधार बनते, जीवनप्रवाहातून वाहत जाताना ते बेटही आपण बरोबर घेऊन वाहत असतो.

‘वडिलांच्या सेवेसी’ हे असेच माझ्या आठवणींचे एक छोटेसे बेट. ह्यातल्या काही आठवणी गोड आहेत. काही आठवणी दु:खदायकही आहेत. पप्पा, आई आणि व्यंकटेश ह्या तिघांनीही माझ्यावर आपापल्या परीने खूप प्रेम केले. मीही माझ्या परीने त्यांच्यावर. आज वाटते, मी प्रेमात खूप कमीच पडते. निदान पप्पाविषयीच्या प्रेमात तर खूपच. ह्याहून खूप करायला हवे होते त्यांच्यासाठी. जे करू शकले नाही त्याची उणीव ह्या आठवणी लिहून भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. तरी तेही खूप कमीच आहे. ह्याचीही खंत मनात सलते आहे. तरीपण त्यांच्याबद्दल लिहून आपल्या मनातली कृतज्ञता व्यक्त करणे इतकेच माझ्या हातात होते.
पपांची मुलगी होण्याचे भाग्य मला लाभले ह्याबद्दल मी परमेश्वराची कशी उतराई होऊ. त्यांच्यामुळेच मी चुकत माकत वाङ्मयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. मराठी भाषेवर प्रेम करायला त्यांनीच मला शिकविले. मराठी भाषा शिकायला दुसरीकडे कुठे जावेच लागले नाही. त्यांना पाहता पाहता आणि त्यांना ऐकता ऐकता आपोआपच मला साहित्याची जाण आली, साहित्याची गोडी लागली, भाषेची समज आली. साध्या गप्पांच्या बैठकीतही ते बोल बोल म्हणता उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती करीत होते. त्या कोट्या, ते विनोद, सरस आणि सुरस आठवणी... त्या तसल्या मैफली आता होणार नाहीत. जे उत्कट आणि भव्य त्याचे वेड घेणाऱ्या आणि ‘अवघे मिळमिळीत’ टाकून देणाऱ्या पप्पांची मुलगी मी झाले म्हणूनच आयुष्यात काही ना काही स्वप्ने रचण्याची शक्ती मला मिळाली. लिहिले पाहिजे, जे लिहितो त्याहून सुंदर लिहिता आले पाहिजे, लेखन म्हणजे आपले समग्र जीवन झाले पाहिजे, अशी आकांक्षा, अशी धारणा त्यांनीच माझ्या मनात रुजवली.

माझ्या आईने आयुष्यात खूप दु:ख भोगले. वंचना, मनस्ताप, उपेक्षा, पराभव ह्या साऱ्यांची वेदना तिच्या काळजात जीवनभर काट्यासारखी रुतून बसली होती. तिच्या वाट्याला जे दु:ख आले, त्याला जबाबदार ती किती आणि दुसरी माणसे किती हा एक वेगळा प्रश्न. तथापि तिच्या जीवाची आयुष्यभर तडफड झाली ही गोष्ट तर खरीच. तिच्यामुळे मला दुसऱ्यांची दु:खे समजून घेण्याची शक्ती मिळाली. सहनशक्तीची ताकद मी तिच्यातून आजमावली आणि थोडीफार मिळवलीही. ट्रॅजेडी म्हणजे काय ह्याचा अर्थ मला आईमुळे समजला.

व्यंकटेशशी मी प्रेमविवाहच केला. त्याच्यावर मी प्रेम केले. तसेच त्यानेही माझ्यावर खूप प्रेम केले. माझ्याकरिता त्याने खूप समर्पण केले आणि मलाही करायला लावले. पप्पांकरिता, ‘मराठा’करिता त्याने आपली वकिली सोडली आणि आपली सर्व जिंदगी पणाला लावली. दुर्दैवाने त्याला त्याच्या धाडसामध्ये यश आले नाही. त्या अपयशाने खचून जाऊन शेवटी त्याने आपल्या आयुष्याचा आपणच नाश करून घेतला. अपयशाचे जे विदारक दु:ख त्याने भोगले त्याच्या नुसत्या स्मरणानेही माझे अंत:करण अनेकदा विदीर्ण होते. व्यंकटेश-माझा नवरा खरोखरीच एक चांगला माणूस होता; पण अखेर त्याच्या चांगुलपणालाही सर्व बाजूंनी तडे गेले. त्याच्या भग्न हृदयाला सांधण्यासाठी मी पराकाष्ठेचे प्रयत्न केले; पण मलाही त्यात यश आले नाही. व्यंकटेशमुळे मला आत्मपरीक्षणाची दृष्टी आली.

पप्पा, आई आणि व्यंकटेश ह्या तिघांपासूनही मला माझे अस्तित्व मिळाले. आपले अस्तित्व म्हणजे शंभर टक्के सुख नसतेच. अस्तित्वात सुख-दु:खाचे संमिश्र कल्लोळ असतात. ते कल्लोळ ह्या तिघांनी मला दिले. तिघांमुळेही मी घडत गेले, वाढत गेले, आज जिथे उभी आहे तिथपर्यंत येऊन पोचले. त्याबद्दलची कृतज्ञता ज्या शब्दांतूनक मी व्यक्त केली ते शब्द म्हणजे ‘वडिलांच्या सेवेसी.’

- शिरीष पै
(‘वडिलांच्या सेवेसी’ या डिंपल पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या पुस्तकातून साभार.)

(शिरीष पै यांच्या कारकिर्दीचा अल्पसा आढावा घेणारा स्लाइडशो सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link