Next
परदेशी साहित्यिकांची डॉ. आंबेडकर कॉलेजला भेट
प्रेस रिलीज
Saturday, September 29, 2018 | 02:14 PM
15 0 0
Share this article:



औंध : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्रामध्ये जागतिक भाषांचे प्रतिनिधित्व करणारे भाषाबन साकारणार आहे. त्यानिमित्त पेन इंटरनॅशनल काँग्रेस या आंतरराष्ट्रीय स्तरावरील साहित्यविषयक परिषदेत सहभागी झालेल्या १८० देशांमधून आलेल्या साहित्यिकांपैकी सात भाषेत लेखन करणाऱ्या साहित्यिकांनी औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयास भेट दिली.

परदेशी साहित्यिकांचा महाविद्यालयाच्या भेटीचा उपक्रम उत्साहात झाला. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली व मराठी विभागप्रमुख डॉ. संजय नगरकर यांच्या समन्वयाने झालेल्या या संवाद भेटीत मारिना गोर्झीका (रोमानिया), मोहम्मद शरीफ (सिएरा निऑन), निपुनी माओ (पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया), मोहम्मद मोहिद्दिन (बांगलादेश), डॉ. चिन्मोय हावलदर (बांगलादेश) या साहित्यिकांनी विद्यार्थी व प्राध्यापकांशी संवाद साधला. प्रारंभी मराठमोळ्या पद्धतीने परदेशी लेखक पाहुण्यांचे स्वागत विद्यार्थ्यांनी केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा लोकगीतांचा कार्यक्रम सादर केला. प्रा. एकनाथ झावरे यांनी रयत शिक्षण संस्था व महाविद्यालयाच्या माहितीपटाचे सादरीकरण केले.

त्यानंतर झालेल्या संवाद चर्चेत रोमानियाच्या साहित्यिक निपोनि माओ यांनी आपल्या साहित्यामधील प्रेरणा या आपल्या जीवनातील अनुभव असल्याचे सांगितले. सिएरा निपॉन येथील साहित्यिक मोहम्मद शरीफ यांनी जगातील विविध भाषांमध्ये लिहिल्या जाणाऱ्या साहित्यामागे मानवतावाद महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाचे सदस्य निपुनी माओ यांनी लोकभाषांमधून निर्माण होणारे साहित्य हे आपल्या संस्कृतीचा ठेवा असल्याचे प्रतिपादन केले. बांगलादेशातील साहित्यिक डॉ. चिन्मय हावलदर, मोहम्मद मोहिद्दिन यांनी बांगलादेश व भारतातील सांस्कृतिक आणि भाषिक खुणा एकच असून, आपणास मराठी साहित्याविषयी देखील आकर्षण असल्याचे सांगितले.



प्राचार्य डॉ. बोबडे म्हणाल्या, ‘पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये आणि इंटरनॅशनल काँग्रेसमध्ये बऱ्याच प्रमाणात साम्य असून, दोन्ही संस्था समता, बंधुता, न्याय यांचा पुरस्कार करणाऱ्या आहेत. त्यामुळेच आज पेन इंटरनॅशनल काँग्रेसचे सदस्य (लेखक) आमच्या महाविद्यालयाच्या भेटीस आल्यामुळे आम्हाला आनंद होत आहे.’

या प्रसंगी झालेल्या चर्चेत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, प्रा. एकनाथ झावरे, डॉ. संजय नगरकर, प्रा. पारकर या प्राध्यापकांनी, तर रवींद्र जाधव, चंद्रकांत सोनवणे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख मराठी विभागप्रमुख डॉ. नगरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. सविता पाटील यांनी केले. आभार प्रा. झावरे यांनी मानले.

या संवादानंतर परदेशी साहित्यिकांनी मराठी विभागास भेट देऊन विभागाअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची व मराठी साहित्यातील साहित्यिकांची माहिती घेतली. या वेळी मराठी विभागातील सुदेश भालेराव, मोनाली भालवणकर, नेहा काकडे, प्रज्ञा शिंदे, डॉ. अतुल चौरे, प्रा. कुशल पाखले, प्रा. किरण कुंभार, प्रा. सुप्रिया पवार, प्रा. नलिणी पाचर्णे यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.

दरम्यान, प्रा. भीमराव पाटील व डॉ. सुहास निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयातील दोनशे विद्यार्थ्यांनी जागतिक भाषा वारी, भाषा दिंडीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून ते बालगंधर्व रंगमंदिरापर्यंत सहभाग घेतला होता.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search