नवी दिल्ली : भारताने अंतराळ क्षेत्रात आणखी एक मोठे यश प्राप्त केले आहे. भारताचा संदेशवाहक उपग्रह ‘जीसॅट-३१’चे बुधवारी, सहा फेब्रुवारी रोजी पहाटे अडीचच्या सुमारास फ्रेंच गयाना येथील अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
युरोपीयन कंपनी एरियन स्पेसच्या एरियन रॉकेटने हे प्रक्षेपण केले. यानंतर ४२ व्या मिनिटानंतर तीन वाजून १४ मिनिटांनी उपग्रह भू-स्थैतिक कक्षेमध्ये स्थापित झाला. भारताने यापूर्वी अनेक उपग्रह फ्रेंच गयानातून प्रक्षेपित केले आहेत.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) दिलेल्या माहितीनुसार, या उपग्रहाचे वजन दोन हजार ५३५ किलोग्रॅम आहे. ‘जीसॅट-३१’ हा ४० वा संदेशवाहक उपग्रह आहे. यामुळे भू-स्थैतिक कक्षेत कू-बँड ट्रान्सपाँडर क्षमता वाढवेल. ‘जीसॅट-३१’चा कार्यकाळ १५ वर्षे आहे. ‘जीसॅट-३१’ आता भारताचा जुना संदेशवाहक उपग्रह ‘इनसॅट-४ सीआर’ची जागा घेईल. ‘जीसॅट ३१’चा वापर व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंक, डिजिटल सॅटेलाईट, न्यूज गॅदरिंग, डीटीएच आदी सेवांसाठी होईल. त्याचबरोबर हा उपग्रह आपल्या व्यापक बँड ट्रान्सपाँडरच्या मदतीने अरबी सागर, बंगालची खाडी आणि हिंद महासागराच्या विशाल समुद्री क्षेत्रावर संदेशवहनासाठी विस्तृत कव्हरेज देईल.
‘या प्रक्षेपणात कोणतीच समस्या आली नाही.एरियन स्पेस आणि इस्रोचे अधिकारी जानेवारीपासून येथे उपस्थित होते,’ अशी माहिती सतीश धवन स्पेस सेंटरचे संचालक एस. पांडियन यांनी दिली. ‘या वर्षी जुलैमध्ये भारताकडून याच प्रकारचा आणखी एक जीसॅट -३० उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहे,’ असेही ते म्हणाले.