सोलापूर : जिल्ह्यात ठिकठिकाणी ७०वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतही प्रजासत्ताक दिन उत्साहात झाला. या वेळी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गाणी व विविध कवायती सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.
पंढरपूर तालुक्यात गुणवत्तेत ही शाळा अग्रेसर आहे. ग्रामपंचायत सदस्या अर्चना बिस्किटे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याध्यापक सुनील शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापकांनी प्रास्ताविकात शाळेला भौतिक सुविधा मिळवून दिल्याबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले.
या प्रसंगी सरपंच दिनकर कदम, उपसरपंच गणेश भोसले, ‘रयत’चे शाळा समिती सदस्य नागनाथ माळी, ग्रामसेवक के. एच. नवले, गावकामगार तलाठी बी. के. ठाकरे, ‘रयत’चे जनरल बॅडी सदस्य बाळासाहेब पाटील, रोपळे विकास प्रतिष्ठानचे संचालक अर्जुन भोसले, बाळासाहेब भोसले, डॉ. हनुमंत खपाले, श्रीदत्त एरिगेशन सिस्टीमचे दत्तात्रय भोसले, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सारिका भोसले, उपाध्यक्ष शिवाजी बिस्कीटे, ‘विठ्ठल’चे माजी संचालक विलास भोसले, विलास (ल.) भोसले, ग्रामपंचायत सदस्या चित्रा भोसले, महाविर ट्रेडिंग कंपनीचे हर्षवर्धन शहा, जनसेवा संघटनेचे अशोक पाटोळे, संजय पाटील, शेतकरी संघटनेचे संभाजी पवार, योग शिक्षक अरुण भोसले, किशोर काकडे, दादा कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजवंदन नागनाथ माळी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्या चित्रा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. तलाठी कार्यालयातील ध्वजवंदन सरपंच दिनकर कदम यांच्या अध्यक्षतेखाली विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक विलास भोसले यांनी केले. श्री. शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयाचे ध्वजवंदन मुख्याध्यापक एस. एम. बागल यांनी, तर यश पब्लिक स्कूलचे ध्वजवंदन रेणुका पाचपुंड यांच्या अध्यक्षतेखाली भास्कर पाचपुंड यांनी केले.
या वेळी विद्यार्थ्यांना मान्यवर व ग्रामस्थांच्या हस्ते खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच कदम यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत साजरा झालेला प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम अविस्मरणीयच ठरल्याचे सांगितले; तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळेची केलेली स्वच्छता व सजावट फारच छान असून, चिमुकल्यांच्या सादर केलेल्या विविध कवायतींच्या प्रकारांनी आम्ही भारावून गेल्याचे त्यांनी नमूद केले.