Next
नवी दिल्लीत साजरा होणार छत्रपती शिवाजी महोत्सव
नाटक, संगीत व अन्य कार्यक्रमांचे आयोजन
प्रेस रिलीज
Wednesday, February 13, 2019 | 03:00 PM
15 0 0
Share this article:

नवी दिल्ली : ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समितीतर्फे १५ ते १९ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत राजधानी दिल्लीत छत्रपती शिवाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवात वैविध्यपूर्ण कार्यक्रम सादर होणार आहेत,’ अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समितीचे महासचिव निवृत्त कर्नल मोहन काकतीकर यांनी दिली.

येथील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महोत्सवातील सर्व कार्यक्रम येथील रफी मार्गवरील मावळणकर सभागृहात होतील. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १५ फेब्रुवारीला सायंकाळी ६.३० वाजता प्रसिद्ध वक्ते व इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचे ‘शिवाजी महाराजांच्या जीवनगाथा’ या विषयवार व्याख्यान होणार आहे.

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व आतापर्यंत ७००हून जास्त प्रयोग झालेले ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक १६ फेब्रुवारीला सायंकाळी ६.३० वाजता सादर केले जाईल. विद्रोही शाहीरी जलसा व रंगमाळा यांचे सादरीकरण असणाऱ्या या नाटकाची संकल्पना व गीत प्रसिद्ध शाहीर संभाजी भगत यांचे आहे. नाटकाचे लेखक राजकुमार तांगडे, तर दिग्दर्शक नंदू माधव आहेत. तत्पूर्वी सकाळी १० वाजता येथील राजौरी गार्डन परिसरातील शिवाजी महाविद्यालयात ‘आधुनिक भारतात शिवाजी महाराजांचे मूल्य व वारसा यांचे महत्त्व’ या विषयावर आंतर महाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धा होईल.

याच दिवशी जागतिक किर्तीचे कलाकार एस. बी. पोलाजी व कलाकारांचा समूह यांनी रेखाटलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत रांगोळी प्रदर्शन भरेल. हे प्रदर्शन सायंकाळी पाच वाजल्यापासून कॉन्स्टीट्यूशन क्लब येथे सर्वांसाठी खुले राहील.

१७ फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजता स्वरभारती प्रस्तुत  ‘शिव कल्याण राजा’ हा संगीतमय कार्यक्रम होईल. यात  प्रसिद्ध गायक व संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर व  अन्य कलाकार संगीतमय प्रस्तुती देतील, तर विद्यावचस्पती शंकर अभ्यंकर या कार्यक्रमाचे निवेदन करतील.

येथील मिंटो रोडस्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पार्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी १९ फेब्रुवारीला या महोत्सवाची सांगता होईल. श्री छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष मोतीलाल व्होरा आणि उत्तर दिल्ली महानगर पालिकेचे महापौर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करतील. सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होईल, असे काकतीकर यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search