Next
नटरंग
BOI
Friday, November 23, 2018 | 10:54 AM
15 0 0
Share this article:

५८व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतल्या प्राथमिक फेरीच्या सहाव्या दिवशी (२२ नोव्हेंबर २०१८) ‘नटरंग’ हे नाटक सादर झालं. आनंद यादव यांच्या कादंबरीवर आधारित असलेलं हे नाटक देवरुखमधल्या संगमेश्वर तालुका सांस्कृतिक कला मंच या संस्थेनं सादर केलं. त्या नाटकाचा राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी करून दिलेला हा परिचय...
........
आनंद यादव यांच्या ‘नटरंग’ कादंबरीवरून त्याच नावानं निघालेला चित्रपट खूपच गाजला. काही साहित्यकृती किंवा चित्र-नाट्यकृती अशा असतात, की आपण त्यांची नव्याने निर्मिती करून त्या सादर कराव्यात, असं अभिजात कलावंताला वाटतं. वेगवेगळ्या भाषांमधल्या नाटकांचं, कथा-कादंबऱ्यांचं नि कवितांचं आपल्या भाषांमध्ये रूपांतर होतं, ते याच ‘वाटण्या’मुळं. ‘कट्यार’सारखं नाटकही याच ‘वाटण्या’तून रूपेरी पडद्यावर येतं. 

‘संगमेश्वर तालुका सांस्कृतिक कला मंच’ या देवरुखच्या संस्थेलाही आपण नव्याने ‘नटरंग’ची निर्मिती करावी, असं वाटलं आणि नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या निमित्तानं त्यांनी ते रसिकांपुढे आणलं. या नाटकाची निर्मिती सुरेश आत्माराम कदम यांची, लेखन विजय पडळकर यांचं, तर दिग्दर्शन संजय सावंत यांचं होतं. 

तसं पाहिलं, तर मराठी रसिकांना ‘नटरंग’ नवीन नाही; पण नाटकाच्या माध्यमातून तेच कथानक पाहणं हा एकीकडे पुनर्प्रत्ययाचा अनुभव होतो, तर दुसरीकडे त्यातले संवाद, गीतं नि नेपथ्य संपूर्ण नवनिर्मितीचा प्रत्यय आणून देतात. 

गुणाजीराव वाघमारे या वयस्कर कलावंताच्या सत्काराच्या समारंभानं नाटकाची सुरुवात होते. स्टेजवर प्रुख पाहुणे बसलेले आणि निवेदक उभा एवढी दोनच माणसं. निवेदक भूमिका सांगतो आणि सत्कारमूर्तीला पाचारण करतो. नाट्यगृहाच्या प्रेक्षागाराच्.या पहिल्या रांगेत बसलेला एक वयस्कर मनुष्य उठतो आणि व्यासपीठावर जाऊन पुरस्कार स्वीकारतो. त्यानंतर त्यानं उच्चारलेल्या ‘दोन शब्दां’तून ‘नटरंग’ची कहाणी उलगडत जाते, फ्लॅशबॅक पद्धतीनं....

गुणाजी हा बांबूच्या टोपल्या विणण्याचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या कुटुंबातला कमावता तरुण. आई-वडील, पत्नी नि दोन मुलांचा चंद्रमौळी झोपडीतला गरिबीचा संसार. एकदा गावात आलेला तमाशा तो पाहतो आणि त्यालाही वाटतं, आपणच तमाशा काढावा. मित्रमंडळींना हा विचार एकदम मान्य. सातवीपर्यंत शिकलेला गुणा जन्मजात कलावंतच. स्वतःचं वग लिहितो. त्यात राजाची भूमिका तोच करणार असतो. तमाशात नाचणाऱ्या नर्तिकांची शोधाशोध सुरू होते. नाच्याच्या भूमिकेसाठी कुणीच तयार होत नाही. शेवटी गुणा स्वतःच त्यासाठी उभा राहतो.

यमुनाबाईच्या फडावर जाऊन तिची मुलगी नयना हिच्याकडून नृत्य शिकतो. नयना आपल्या तीन सख्यांसोबत गुणानं सुरू केलेल्या बोर्डावर उभी राहते. अल्पावधीतच त्यांचा तमाशा लोकप्रिय होतो. 

गुणाचा हा उद्योग घरंदाज कुटुंबाला नापसंत; पण ‘ज्याच्या अंगात हुनर हाय त्यानं कला करावी’ अशा मताचा गुणा कुणाचं मानत नाही. ही गोष्ट कानावर पडताच सासरा येतो, शब्दाशब्दी होते. मानहानी सहन न झालेला गुणाचा बाप गळफास लावून जीव देतो.

नयनाच्या प्रेमात पडलेला गुणा कुटुंब सांभाळतो खरा; पण नयनासोबतही संसार करू इच्छितो; पण नाच्याबरोबर संसार थाटायला ती तयार होत नाही. तरीही व्यवसाय म्हणून तमाशा सुरळीत चालू राहतो. एक दिवस माने नावाचा एक मातब्बर मनुष्य मुलाच्या लग्नात तमाशा ठेवण्यासाठी सुपारी ऑफर घेऊन येतो. नेमकी त्याच दिवशी दुसरीकडे खेळाची सुपारी असल्यामुळे गुणा आणि त्याचा मॅनेजर नम्रपणे नकार देतात. अपमानित झाल्याच्या भावनेनं माने निघून जातो. खेळ उभा राहतो. त्यात ‘अर्जुन आणि बृहन्नडा’ हा वग सुरू होतो. स्त्री-पुरुषातल्या परस्परांच्या भावनांची समरसता दाखवण्याच्या हेतूने गुणा तो सादर करीत असला, तरी नाच्यानं वगाचं मुख्य पात्र व्हावं, हे प्रेक्षकांना रुचत नाही. ते तमाशा उधळून लावतात. माने आणि त्याची माणसं नाच्या झालेला गुणा आणि त्याच्या सवंगड्यांना घेऊन जाऊन नाच्यावर अत्याचार करतात.

खिन्न मनानं गुणा पत्नी राहत असलेल्या तिच्या माहेरी येतो. ती नांदायला येण्यास तयार होत नाही. तमाशा मोडलेला. गुणाचं कोणी उरलेलं नाही. आता एकटेपणानं राहायचं; पण त्याला पायातल्या घुंगरांची सोबत खरी वाटू लागते. बाकी सगळं खोटं, हे घुंगरू खरे. ते पायात बांधून नटेश्वराची आराधना करीत नव्यानं जीवन सुरू करण्याच्या वळणावर गुणा येऊन पोहोचतो. पडदा पडतो.

सादरीकरण तर चांगलं झालंय. गरीब बाप, आंधळी आई, गुर्मीतला माने, तमाशाचा मॅनेजर, सोंगाड्या यांच्या भूमिका सुरेख वठल्या आहेत. बाप नाच्या झाल्यामुळे नाही नाही ते बोलणाऱ्या लोकांची चीड येणारा आणि बापाविषयीदेखील तिरस्कार वाटू लागलेला सात-आठ वर्षांचा मुलगा गौरव कनावजे या बालकलाकारानं ताकदीनं सादर केलाय. ठिगळं लावलेली लुगडी नेसणारी, नवऱ्याच्या तमाशानं तिडीक गेलेली आणि पारंपरिक धंद्यात सुख मानणारी, समाजाच्या वंचित स्वरावरची बाई रूपाली सावंत यांनी हुबेहूब साकारलीय. गुणाच्या मध्यवर्ती भूमिकेसाठी सुधीर सावंत यांनी घेतलेली मेहनत दखलपात्रच; पण खरोखरच टोपलीवाला आणून बसवलाय असं वाटावं अशा ताकदीनं त्याच्या बापाची भूमिका करणाऱ्या अभय पुरोहित या कलाकाराला दाद दिलीच पाहिजे.

संपर्क : राजेंद्रप्रसाद मसुरकर : ९९६०२ ४५६०१

(२३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता रत्नागिरीच्या ‘संकल्प कला मंच’ या संस्थेतर्फे ‘भर चौकात गांधी पुतळ्यासमोर’ हे नाटक सादर केलं जाणार आहे. या स्पर्धेतील सर्व नाटकांचे परिचय वाचण्यासाठी येथे क्लिक करा. स्पर्धेच्या वेळापत्रकासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
vaidehi About 257 Days ago
Good work ....BYTES OF INDIA
0
0
GANESH MADHUKAR SURVE About 299 Days ago
apratim good sthory and gud work all
1
0

Select Language
Share Link
 
Search