Next
‘मानवी जीवन समृद्ध करण्यात कलांची भूमिका महत्त्वाची’
BOI
Friday, May 04 | 03:09 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘चित्रपटाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दिशा मिळते. कलावंताला रसिकांच्या प्रेमाची आवश्यकता असते. मानवी जीवन समृद्ध करण्यात कलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते,’ अशी भावना ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी व्यक्त केली. तीन मे १९१३ रोजी दादासाहेब फाळके यांनी या देशात पहिला बोलपट निर्माण करून चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. या दिवसाचे स्मरण म्हणून संवाद, पुणे आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व रंगमंदिर येथे चित्रपट संमेलन भरवण्यात आले आहे. त्या अंतर्गत, मराठी चित्रपट क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या कलाकारांचा गौरव समारंभ गुरुवारी (तीन मे २०१८) आयोजित करण्यात आला होता. त्यात राजदत्त यांना किरण शांताराम यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. 

कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनेते विक्रम गोखले यांनाही या वेळी अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अभिनेते मनोज जोशी, डॉ. पी. डी. पाटील, मेघराज राजेभोसले, वामन केंद्रे, विजय कुवळेकर, रघुनाथ येमूल, सुनील महाजन, राजेश पांडे, सुप्रिया बडवे, राहुल रानडे यांच्यासह चित्रपट-नाट्य क्षेत्रातील मान्यवर या वेळी उपस्थित होते. 

राजदत्त म्हणाले, ‘रसिक प्रेक्षकांनो, तुमचे कलाक्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीवर प्रेम राहो. मग ती कला कोणतीही असो. तुम्ही प्रेम करत राहावे. त्यातूनच आम्हालाही प्रोत्साहन मिळते. कारण कलेचा उद्देशच माणसाला आनंद देण्याचा आहे. एखाद्याला चांगली वाट दाखविण्याचे कार्यही कलेतून होते. केवळ टाळ वाजवत देवाचे नाव घेण्यापेक्षा संत एकनाथांनी भारुडे रचली. भारुडातून सामान्यांना आनंद दिला.’ 

‘नाना हा अत्यंत प्रेमळ व मृदू मनाचा आहे. तो विचारी आहे. माणूस म्हणून तो मला आवडतो. कलाकाराचे कौतुक करण्याची वृत्ती त्याच्याकडे आहे. मी सैनिकांना, तर तो शेतकऱ्यांना मदत करतो आहे,’ अशी भावना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केली. 

‘विक्रम तू कायम मोठा आहेस. तू थोरला होतास आणि आहेस. तू ‘नटसम्राट’ केला असतास, तर आमच्यापेक्षा कितीतरी पटीने ती भूमिका तू उत्तम साकारली असतीस. तू ‘बॅरिस्टर’ केलंस, ते नाटक तू बसव. कारण मला ‘बॅरिस्टर’ करायचे आहे. तू बसविलेल्या ‘बॅरिस्टर’मध्ये मी नक्की भूमिका करीन,’ अशा शब्दांत नाना पाटेकर यांनी विक्रम गोखले यांचा गौरव केला. तसेच नानांनी विक्रम गोखले यांना वाकून नमस्कारही केला. 

(विक्रम गोखले, नाना पाटेकर यांची हृद्य मनोगते, तसेच या कार्यक्रमाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link