Next
कर्तव्याचे होई गाणे...
BOI
Thursday, December 07, 2017 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


विदर्भातल्या अंजनगावजवळच्या एका छोट्याशा, दोन हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावातली गुंजन नावाची मुलगी लहानपणापासूनच अन्यायाविरोधात बंड पुकारते आणि तिच्यातली अफाट जिद्द तिला शेकडो जणाचं पालकत्व बहाल करते. गुंजन सविता गोळे हिचा प्रचंड जिद्दीचा, काट्याकुट्यांच्या मार्गावरचा प्रेरणादायी प्रवास आज अनुभवू या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात....
....................
कर्तव्याचे होई गाणे, तन्मयतेची तान
परिश्रमाच्या वेलीवरचे यश सोनेरी पान
वेध कार्यक्रमात गुंजन गोळे आणि डॉ. आनंद नाडकर्णी... डॉ. आनंद नाडकर्णी यांची ही एक सुरेख गीतरचना! या गाण्यातल्या भावाप्रमाणे सगळं जुळून येणं एका ग्रामीण भागातल्या, कर्मठ घरात जन्म घेतलेल्या मुलीसाठी खूप कठीण आहे. आज काही ठरावीक शहरांमधूनच मुलींची स्थिती बदललेली बघायला मिळते. कारण त्यांचे पालक जागरूक असतात. त्यांना लहानपणापासून स्वातंत्र्याचा अर्थ उमगलेला असतो. त्यांच्यात निर्णयक्षमता आलेली असते. त्यांची दिशा निश्चित असते; मात्र हे प्रमाण खूप कमी घरांतून बघायला मिळतं. आई-वडील शिक्षित असले, मुली उच्च शिक्षण घेत असल्या, चांगल्या पगारावर नोकरी करत असल्या, तरी त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य उपभोगता येतंच असं नाही. पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा पुरुषांइतकाच त्यांच्या मनावरही आहे. मुलींनी काय करावं, काय करू नये, यावर घरातल्यांची आणि समाजाची अनेक बंधनं आजही आहेतच. अशा वेळी विदर्भातल्या अंजनगावजवळच्या एका छोट्याशा, दोन हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावातली गुंजन नावाची मुलगी लहानपणापासूनच अन्यायाविरोधात बंड पुकारते आणि तिच्यातली अफाट जिद्द तिला शेकडो जणाचं पालकत्व बहाल करते. तो प्रचंड जिद्दीचा, काट्याकुट्यांच्या मार्गावरचा तिचा प्रवास अनुभवायला हवा. 

लेखिका दीपा देशमुख आणि वीणा गवाणकर यांच्यासह गुंजनमला गुंजन भेटली ती डॉ. आनंद नाडकर्णींच्या परभणी इथल्या ‘वेध’ उपक्रमात! हसतमुख, प्रसन्न आणि उत्साहानं रसरसलेली गुंजन मला लेखक म्हणून ओळखत होती. ती माझ्या पुस्तकांवर भरभरून बोललीच. तिनं ‘मनात’ या पुस्तकाची पारायणं केली होती. मी उत्सुकतेनं तिला ‘मनात’विषयी बोलताच ती म्हणाली, तिनं मानसशास्त्र विषय घेऊन एमए केलंय आणि तिला ‘मनात’ हे पुस्तक खूपच आवडतं. गुंजनचा लाघवी स्वभाव तिच्याशी पहिल्याच भेटीत जवळीक निर्माण करून गेला. डॉ. आनंद नाडकर्णी हे रत्नपारखी असल्यानं त्यांनी तिला शोधून परभणीकरांना प्रेरित करण्यासाठी तिला ‘वेध’साठी आमंत्रित केलं होतं. त्यांनी तिच्याशी मनमोकळा संवाद साधत तिला बोलतं केलं. 

गुंजनचं घराणं मराठेपण आणि पाटीलपण जपणारं... त्यातही प्रतिष्ठा जपणारं... त्यासाठी पुरुषांना वेगळे नियम आणि स्त्रियांना वेगळे नियम... खरं तर स्त्रियांना कुठलंही स्वातंत्र्य नसणारं ते घर होतं. गुंजनची आई अंगी कलागुण असलेली, कबड्डीसारख्या खेळात तरबेज असलेली अतिशय गुणी मुलगी; पण लग्न होताच ते सगळं भूतकाळ म्हणून तिला गाडून टाकावं लागलं. नवरा म्हणेल ती पूर्व दिशा याप्रमाणे तिचं जगणं सुरू होतं. गुंजनच्या वडिलांच्या मनाविरुद्ध कुठलीही गोष्ट घडली, की ते घरात येऊन आपल्या हक्काच्या बायकोवर त्याचा राग काढत. आपला राग जिरेपर्यंत ते तिला मारहाण करत. तिचं मन, तिच्या इच्छा यांना समजून घेण्याची त्यांना इच्छा नव्हती. गुंजनच्या आईनं मुलांना घेऊन आत्महत्येचेही दोनदा अयशस्वी प्रयत्न केले होते. वडिलांची अमानुष मारहाण होताना मध्ये आड येणाऱ्या गुंजनवरही अनेकदा तिचे वडील हात उचलत. घरातलं हे अन्यायाचं वातावरण गुंजनला सहन होत नसे. तिच्या बालमनाला ही असमानता खटकत असे; पण तिच्या लहान वयामुळे तिची ताकद कमी पडत असे. आपण या वातावरणातून बाहेर पडलं पाहिजे हे मात्र त्या लहान वयातही गुंजनला कळून चुकलं होतं. 

आपण खूप शिकायचं, मोठं व्हायचं. स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि आपल्या आईवर होणारा अन्याय दूर करायचा, अशी स्वप्नं गुंजन बघायची. खरं तर गुंजनचं पाळण्यातलं नाव कोमल ठेवलं होतं. मनाला कणखरपणाचे आणि खंबीरपणाचे धडे देणाऱ्या गुंजनला कोमल हे नाव स्वतःलाच खटकायला लागलं. ती तेव्हा अंगणवाडीत जात असे, इतकी लहान होती. एके दिवशी तिनं आपल्या बाईंना आपलं नाव कोमल हे आपल्याला आवडत नसून आपलं नाव गुंजन असं ठेवावं असं सांगितलं. इतकी लहान मुलगी धीटपणे इतका विचार करते आणि आपल्याला सांगते हे बघून बाईंना आश्चर्य वाटलं आणि त्या गुंजनच्या घरी आल्या. गुंजन हे नाव छान असून तुमच्या मुलींनं ते नाव स्वतःच ठेवलंय, असं त्यांनी कौतुकानं सांगितलं. बाईंनीच सांगितल्यामुळे घरातही गुंजन नाव मान्य केलं गेलं. 

गुंजन शाळेत जायला लागली. परिश्रम करत पास व्हायला लागली. आपल्याला आपल्या गावापासून दूर जायचं असेल, वडिलांची मारहाण टाळायची असेल तर आपल्याला चांगलं शिकलं पाहिजे, हे गुंजनला कळत होतं. लहानपणापासूनच गुंजनला परिश्रम करण्याची सवय आणि तयारी होती. ती इतर मुलांच्या शिकवण्या घ्यायची. स्वतःच्या आणि इतरांच्या शेतातली कामं करायची. वडिलांना कळू न देता ही कसरत तिला करावी लागायची. घरातून बाहेर पडण्यासाठी गुंजननं ‘एनसीसी’त भाग घ्यायचं ठरवलं. तिच्या आजोबांमुळे तिला खेळांची आवड निर्माण झाली होती. काठी चालवणं, दांडपट्टा आणि तलवारबाजी हे खेळ आपल्या आजोबांकडून तिला शिकता आले. तिला ‘एनसीसी’चं आकर्षणही होतं. एके दिवशी गावात एका सैनिकाचा मृतदेह आला. तिरंग्यात लपेटलेला त्या सैनिकाचा मृतदेह पाहून गुंजनच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला. आपणही देशासाठी आपल्या आसपासच्या लोकांसाठी काहीतरी उदात्त आणि चांगलं केलं पाहिजे, असं तिला वाटायला लागलं. वडील घरात नसले, की ती आपल्या आईला आणि भावाला सांगायची, ‘मैं भी आऊंगी, तो तिरंगे में लपेटकेही आऊंगी.’ देशासाठी मरायचं असा ध्यास तिनं घेतला होता. हळूहळू मोठी होत असताना गुंजननं आपण देशासाठी मरायचं नाही, तर जगायचं असं ठामपणे ठरवलं. आपणही सैन्यदलात जायचं आणि देशाची सेवा करायची असा तिनं निश्चपय केला. 

पुढे एनसीसी, रायफल शूटिंग या गोष्टींमुळे गुंजनला घरापासून बाहेर राहण्याची संधी मिळाली. तसंच पुढे मानसशास्त्र घेऊन एमए करायचं असल्यानं गुंजन अमरावतीमध्ये येऊन पोहोचली. घरातल्या दहशतीच्या वातावरणामुळे, वडिलांच्या कटू अनुभवामुळे जगातले सगळे पुरुष वाईट असतात असं तिच्या मनावर बिंबलं होतं; मात्र अमरावतीला आल्यावर तिथे सैन्यदलातल्या अनेक अधिकाऱ्यांशी तिची भेट झाली. अनेक लोक भेटले आणि जगात सगळेच पुरुष वाईट असतात, हे मत गळून पडलं. जग फक्त अन्यायानं भरलं आहे असं नसून, जग सुंदर आहे आणि ते सुंदर मनाच्या लोकांनी भरलेलं आहे ही गोष्ट तिला उमगली. 

तिनं सैन्यदलात जाण्यासाठी खूप परिश्रम घेतले; पण दुर्दैव असं, की नेमका त्या दिवसांत गुंजनचा मोठा अपघात झाला आणि तिच्या पाठीच्या मणक्यांना मोठी दुखापत झाली. तिची सैन्यदलात निवड होऊ शकली नाही. गुंजनला काही क्षण खूप वाईट वाटलं; मात्र त्यातून लगेचच बाहेर येत तिनं ठरवलं, ‘मी घेतलेली मेहनत, परिश्रम आणि माझी तयारी या गोष्टी मी वाया जाऊ देणार नाही. मला सैन्यदलात जाता आलं नाही, तरी माझ्या परिसरातले शंभर जण मी अधिकारी म्हणून तयार करीन आणि त्यांना मार्गदर्शन करीन.’ आज गुंजनच्या प्रयत्नांना यश आलं असून, तिच्या मार्गदर्शनामुळे २३ तरुण सैन्यदलात दाखल झाले आहेत, तर काही जण अधिकारीपदावर जाऊन पोहोचले आहेत. 

स्त्रियांना स्वसंरक्षणाचे धडेएकदा गुंजन रस्त्यावरून आपल्या दुचाकीवरून जात होती. त्या वेळी तिनं बघितलं, की एका कारमधून चार तरुण जात होते आणि रस्त्यावरून दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणींना ते अश्लील भाषेत छेडत होते. त्या मुली खूपच घाबरून गेलेल्या होत्या. गुंजननं आपली गाडी वेगात घेऊन त्या मुलांच्या कारसमोर आणून थांबवली. त्या मुलांना शिव्या देत तिनं कारमधून उतरायला भाग पाडलं. एव्हाना शंभरेक बघ्यांची गर्दी जमली. त्या मुली तर घाबरून रडायलाच लागल्या. त्या मुलींना गुंजन म्हणाली, ‘तुम्ही त्यांना उलट प्रतिकारादाखल बोलला का नाहीत, चार शिव्या का दिल्या नाहीत?’ तेव्हा त्या मुलींनी दिलेलं उत्तर ऐकून गुंजनला धक्काच बसला. मुली म्हणाल्या, ‘चांगल्या घरातल्या मुली शिव्या देत नसतात.’ स्वतःचं संरक्षण करण्याऐवजी त्या पळपुटेपणा स्वीकारायला तयार होत्या. घरात कळलं, तर घरातल्यांकडून आपल्यावरच आळ घेतला जाऊन आपलं शिक्षण बंद केलं जाईल, अशी भीतीही त्यांच्या मनात होती. या घटनेनंतर गुंजननं निश्चय केला आणि तिनं तरुणींसाठी/गृहिणींसाठी स्वसंरक्षण कार्यशाळा घ्यायला सुरुवात केली. आजोबांकडून गिरवलेले लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा यांचे धडे तिच्या कामी आले. तरुणींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं मोठं काम गुंजननं सुरू केलं. पुरुषांना धडा शिकवण्याचे अनेक मार्ग ती या कार्यशाळेतून तरुणींना शिकवते.

मनोरुग्णांनाही मायेनं खाऊ घालणारी गुंजनगुंजनचं काम वाढत चाललं होतं. अनेक सामाजिक संस्थांशी गुंजन जोडली गेली होती. एकदा तिनं बघितलं, की एक मनोरुग्ण आणि त्यातही प्रेग्नंट असलेली एक स्त्री अर्धवट कपड्यांमध्ये रस्त्यात बसून एका कागदावरचं अन्न चिवडत होती. गंमत म्हणजे तिच्या त्याच कागदावरचं ते शिळं अन्न एक कुत्राही खात होता आणि हे दृश्य बघणारी काही टारगट मुलं तिला काठीने टोचून हसत होती. हे दृश्य बघून गुंजनला खूप वाईट वाटलं. मनोरुग्णांशी सर्वसामान्यांचं असं वागणं तिला विकृतीचं एक विदारक दर्शन देऊन गेलं. तिनं त्या मुलांना हुसकावून लावलं. त्या स्त्रीला ती रोज भेटत राहिली. तिला खायला घालत राहिली. मनोरुग्ण फक्त प्रेमाचे भुकेले असतात, हे गुंजनला त्या अनुभवानं शिकवलं. काही दिवसांनी ती स्त्री गुंजनची वाट बघायला लागली. तिच्याबरोबर ती हॉस्पिटमध्येही दाखल झाली; मात्र तिच्या बाळंतपणात ती आणि तिचं बाळ दोघंही वाचू शकले नाहीत. या प्रसंगानंतर गुंजननं मनोरुग्णांसाठी काम करायचं ठरवलं. मनोरुग्णांना स्वच्छ करताना, त्यांना आंघोळ घालताना तिच्या डोळ्यातलीच नव्हे, तर मनातली नग्नताही नष्ट झाली. 

एका अनुभवानं तर गुंजनला माणूस म्हणून आणखीनच मोठं केलं. एड्स झालेला एक मुस्लिम मुलगा तिला भेटला. त्याच्या कानांमधून पू वाहत होता आणि त्याची जखम काही केल्या बरी होत नव्हती. त्याला कुठलाही डॉक्टर तपासायला तयार नव्हता. गुंजननं त्याला बरं करायचं ठरवलं. तिनं त्याला आपल्या गाडीवर बसवून हॉस्पिटलमध्ये दाखल करायचं ठरवलं. त्याला गाडीवर बसवलं, तेव्हा तो मुलगा अंतर राखून बसला. गुंजन त्याला म्हणाली, अरे, मला नीट पकडून बस ना. तरीही तो मुलगा बुजलेला होता. अखेर गुंजननं त्याचा हात पकडून स्वतःच्या पोटाशी नेला. गुंजनचा स्पर्श होताच. त्या मुलाचा बांध फुटला आणि तो तेरा-चौदा वर्षांचा मुलगा ढसढसा रडायला लागला. त्याच्या आईनंतर त्याला इतकं प्रेमानं इतक्या जवळ कोणीही घेतलं नव्हतं. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टरही मुस्लिमच होते; मात्र त्यांनी गुंजनला विचारलं, तुम्ही याच्या कोण आहात? गुंजनच्या कपाळावरची मोठी टिकली आणि मुलाच्या डोक्यावरची क्रोशाची टोपी त्यांचा धर्म दाखवत होती. तेवढंच कुतूहल त्या डॉक्टरला होतं; मात्र त्या दोघांमधलं माणुसकीचं, मानवतेचं नातं त्यांना दिसतच नव्हतं. त्यानं तपासणीनंतर ‘या मुलाला उपचारांसाठी ताबडतोब नागपूरला हलवावं लागेल, अन्यथा हा सकाळपर्यंत मरण पावेल,’ असं सांगितलं. 

गुंजनला काय करावं ते सुचेनासं झालं. तिला अॅम्ब्युलन्स मिळेना. कुठलाही गाडीवाला तिच्याबरोबर यायला तयार होईना. अखेर एकाची गाडी घेऊन गुंजननं त्यात स्वतः पेट्रोल भरलं आणि स्वतः गाडी चालवत ती सहा तासांऐवजी पावणेतीन तासांत नागपूरला पोहोचली. त्या मुलावर वेळेत शस्त्रक्रिया होऊ शकल्यानं त्याचा जीव वाचला. हे सगळं करत असताना गुंजनला उदरनिर्वाहासाठी, इतरांच्या मदतीसाठी अपार कष्ट करावे लागत होते आणि आजही ते कष्ट ती आनंदाने करते. एका वेळी दीड-दोनशे पोळ्या कर, निरमाची पाकिटे विक, खासगी नोकऱ्या कर अशी अनेक कामं गुंजननं केली. यातूनच तिचा ‘मीरांगण’ नावाचा एड्सग्रस्त मुलांसाठीचा प्रकल्प उभा राहिला. आज ‘एचआयव्ही’बाधित ५७ मुलं गुंजन सांभाळते आहे. त्यांचं आरोग्य आणि त्यांचं शिक्षण यासाठी झटते आहे. 

गुंजनला साथ देणारा तिच्यासारखाच आश्विन नावाचा जोडीदार भेटला आहे. दोघंही पहाटे नव्हे, तर मध्यरात्री तीन-साडेतीनला उठतात. गुंजन अडीचशे-तीनशे इडल्या तयार करते. इडली आणि चटणी घेऊन एका ठरावीक ठिकाणी ते दोघं पोहोचतात. सकाळी आठ वाजेपर्यंत ४५ ते ५० गरीब लोकांना ते इडली-चटणी मोफत खाऊ घालतात. इतरांना १० रुपयांना इडली-चटणी विकतात आणि नऊ वाजता घरी परततात. गुंजनचा नवरा इंटेरिअर डेकोरेटर असून, तो तिला मनापासून तिच्या कामात साथ देतो. त्यामुळे साहजिकच तिला तिचं काम करण्यात अधिक उत्साह येतो. 

डॉ. प्रकाश आमटे यांच्यासहगुंजनच्या कामाला स्थळाकाळाच्या सीमा नाहीत. नेपाळ, केदारनाथ, काश्मीर इथे आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये लोकांना मदत करण्यासाठी गुंजन तिथे धावली. मृतदेहांचा खच पडलेला तिनं बघितला. त्या वेळी तिच्या उरल्यासुरल्या भौतिक गरजा गळून पडल्या. आवडनिवड अशी काही राहिली नाही. गिर्यारोहण, ट्रेकिंग करणाऱ्या गुंजनला निराशा आली, की ती कळसूबाईच्या शिखरावर जाऊन पोहोचते. आजपर्यंत तिनं कळसूबाईच्या शिखरावर १४ वेळा यशस्वीपणे चढाई केली आहे. शिखरावर पोहोचलं, की तिथे आपण एकटेच असतो. शाबासकीची थाप द्यायची झाली, तरी ती आपणच आपल्याला द्यायची असते, असं तिला वाटतं. त्यामुळे इतरांकडून असलेल्या आपल्या अपेक्षा गळून पडल्या आहेत असं ती सांगते. 

गुंजन बुलेट चालवते; मात्र तिला अपघात झाल्यानं सध्या तिच्या पायात आणि हातात स्टील रॉड बसवावे लागले आहेत. आजही तिचा वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यातला संघर्ष तिच्यासोबत असतो. तरीही तिची जिद्द कायम असून, ती आता एड्सविषयीची जनजागृती करण्यासाठी राज्यभर अॅक्टिव्हावरून फिरणार आहे. गुंजनला वाचनाची प्रचंड आवड आहे. बाबा आमटे, तुकाराम आणि बुद्ध तिला आवडतात. बुद्धाचं तत्त्वज्ञान अंगीकारण्याचा तिचा प्रयत्न असतो. आपण आपलं काम आपल्या आनंदासाठी करत असल्याचं गुंजन सांगते. गुंजनने सहजपणे सांगितलेल्या या वाक्यावरूनच तिची विचारसरणी आणि काम करण्याची पद्धत आपल्याला सहज लक्षात येऊ शकते.

आज शेकडो गरीब, उपेक्षित लोकांची आई झालेली गुंजन फक्त २७ वर्षांची तरुणी आहे. तिच्यातल्या वात्सल्यानं तिला अनेकांची आई बनवलं आहे. अनेक पुरस्कारांनी तिला गौरवलं गेलंय. डॉ. आनंद नाडकर्णींच्या गीतांच्या ओळींना सार्थ ठरवणाऱ्या गुंजनला आणि तिच्या कार्याला मनापासून सलाम!

गुंजनशी संपर्कासाठी ई-मेल : gunjangole15@gmail.com

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात.)

(दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.) 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Shirin Kulkarni About
Great article Deepa tai! What an inspiration for people like me. Hats off to Gunjan!
0
0
Usha Gosavi About
Gunjan tuzya jiddila v tu karat asalelya kamala shatashah pranam
0
0

Select Language
Share Link
 
Search