Next
अद्भुततेचा अनुभव देणारी ‘अनटायटल्ड’ तंत्रचित्रे
BOI
Thursday, June 14, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

आधुनिक कलेत भारतीयत्व असे काहीतरी हवे आणि त्याच्यापाशी आपली बांधिलकी हवी, असे मानणारी एक लाट चित्रकला क्षेत्रात आली होती. या लाटेला उंचीवर नेण्याचे काम ज्या काही चित्रकारांनी केले, त्यापैकीच एक म्हणजे गुलाम रसूल संतोष. त्या काळातील बहुतेक चित्रकार अमूर्त चित्राला ‘अनटायटल्ड’ असे नाव देत असत. असे असले, तरी संतोष यांची ‘अनटायटल्ड’ चित्रे अद्भुततेच्या रचनांचा अनुभव देणारी आहेत. ‘स्मरणचित्रे’ या सदरात आज जी. आर. संतोष यांच्या चित्रांबद्दल...
.........
अमूर्त चित्रांच्या तांत्रिक शक्यतांचा विचार करणारा चित्रकारांचा समूहच्या समूह भारतात १९६०-७०च्या दशकात निर्माण झाला. आधुनिक कलेत भारतीयत्व असे काही तरी हवे आणि त्याच्यापाशी आपली बांधिलकी हवी, असे मानणारी एक लाट चित्रकला क्षेत्रात आली होती. या लाटेला उंचीवर नेण्याचे काम काही चित्रकारांनी केले. जी. आर. संतोष हे दिल्लीस्थित चित्रकार त्यापैकीच एक.

मूळचे काश्मीर खोऱ्यातील असलेले संतोष १९९०च्या सुमारास दिल्लीतील गढी परिसरात असलेल्या चित्रकारांच्या स्टुडिओत राहत. त्यांना तिथे सरकारी अकादमीच्या अंतर्गत भलामोठा स्टुडिओ लाभला होता. असे स्टुडिओ तत्कालीन प्रभावी चित्रकारांना गढी परिसरात ललित कला अकादमीच्या सौजन्याने उपलब्ध होत होते. त्यात मनजित बावांचा समावेश होता. त्यांच्या जवळच अर्पिता सिंग यांचा स्टुडिओ होता. बहुधा शिष्यवृत्ती मिळालेले सी. जगदीश हे शिल्पकारही त्यात होते. इतर स्टुडिओंच्या मानाने संतोष यांचा स्टुडिओ भव्यच होता. आम्ही दोन मित्र त्यांना भेटायला गेलो होतो. फोन वगैरे करून जाण्यासाठी आमच्याकडे फोन-बिन नव्हताच. तेव्हा सरळ जाऊन धडकलो. बहुधा त्यांनाही वेळ होता. त्यांनी आनंदाने आमच्याशी संवाद साधला.

आम्ही पुण्याहून आलो आहोत, वगैरे सांगितल्यावर आमच्या चित्रांचे फोटो त्यांना दाखवले. फोटो पाहिल्यावर मोकळेपणाने ते म्हणाले, ‘अॅब्स्ट्रॅक्ट आर्ट के पीछे मत जाओ। ये तो युरोप-अमरिका में साठ-सत्तर के दशक के पहले बहोत हो चुका है।’ आपण स्वतः अशा अमूर्त चित्रकारीवर कसे प्रयोग केले आणि पुढेही काय केले, हे सांगितले. ललित कला अकादमीच्या वार्षिकांकात त्यांच्या सुरुवातीच्या चित्रांचे छापील फोटो आम्ही दोघांनीही पाहिले होते. जाडजूड रंग लावलेले... चित्रकारीच्या भाषेत त्याला ‘इम्पॅस्टो’ म्हणतात... बहुतेक पांढरे किंवा फिके रंग. त्यावर गडद रंगाचे स्ट्रोक्स वगैरे असे सर्वसाधारण स्वरूप होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे रंग लावण्याच्या तंत्राच्या बाहेर जाऊन कलावंताने स्वतःच्या चित्राकडे पाहायला हवे. त्यांनी तसे प्रयत्न स्वतः करून पहिले होते. त्यांचा स्टुडिओ म्हणजे मला तेव्हा तरी दृश्य कलेची एक भलीमोठी प्रयोगशाळा वाटली होती. रंग-आकाराच्या हर तऱ्हेच्या शक्यता त्यांनी करून पाहिल्या होत्या बहुधा. चित्रांची संख्या प्रचंड होती. साधारणत: ५००-६०० चित्रे असावीत. लहान-मोठ्या चौकटीवर ताणलेले आणि रंगवलेले कॅनव्हास नीट लावून, काळजीपूर्वक ठेवले होते. या संख्येवरून त्यांच्या कामाचा झपाटा लक्षात येत होता. चित्रे पाहिली तर अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने रंगवलेली होतो. टिपिकल अॅबस्ट्रॅक्टचे तंत्र सोडून त्यांनी केव्हाच वेगळा प्रवाह स्वीकारला होता. तो त्यांचा प्रयोग होता.

तांत्रिक कला म्हणून ज्या समकालीन प्रयोगांचा उल्लेख होतो, त्या प्रयोगात जी. आर. संतोष अग्रगण्य मानले जातात. शैवपंथीय तत्त्वज्ञान काश्मीरच्या भागात, दृष्य रूपात, ‘यंत्र’ स्वरूपात, उपासना रूपात अस्तित्वात होते. शिव-शक्तीच्या मीलनातून, म्हणजे पुरुष-प्रकृतीच्या नैसर्गिक अस्तित्वातून सृष्टीची निर्मिती झाली. त्या तत्त्वज्ञानाचे ही यंत्रसंस्कृती म्हणजे दृष्यरूप. जशी विविध देव-देवतांची स्तोत्रे असतात, तशीच विविध देवतांची यंत्रे असतात. स्तोत्रात जसे काव्यात्मक बदल होतात, परंतु मूळ ढाचा साधारण तसाच असतो, असेच या यंत्रांचेही असते. भारतात सर्वत्र ही यंत्रे उपासना विधीत प्रचलित आहेत. हे किंवा या स्वरूपातील ‘भारतीयत्व’ त्यांनी स्वीकारले. आता असे भारतीयत्व वगैरे असते का, असे प्रश्न नंतर विचारले गेले हे खरे. परंतु १९७०च्या दशकात हा नवा प्रयोग त्यांनी सुरू केला व पुढे सातत्याने अगदी १९९०पर्यंत ते अशी ‘तांत्रिक’ म्हणतात, तशा भौमितिक रचनांची चित्रे करत राहिले.

या प्रयोगाला यशही मिळाले, स्वीकार झाला. दिल्लीच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि मुख्यतः राजकीय वर्तुळात त्यांची उठबस असे. एक प्रकारे त्यांना आदरही होता आणि त्यांचा दबदबाही होता. तरीही ते आम्हाला साधे वाटले. पांढरा झब्बा-पायजमा अशा वेशात ते होते आणि आमच्यासारख्या नव्या पोरांशी कलेविषयी पोटतिडकीने बोलत राहिले. त्यांची तांत्रिक चित्रे म्हणजे वर्तुळ, त्रिकोण, चौकोन अशा भौमितिक आकारांच्या रचना होत. आकारात लहान-मोठ्या प्रतिमा एकमेकांमध्ये गुंतलेल्या, एकमेकांवर मांडलेल्या... बहुतेक सर्व सिमेट्रिकल रचना.... मध्यापासून दोन्ही बाजू सारख्या. तांत्रिक रचनांमधील गडद, भडक रंग त्यांनीही स्वीकारले होते. रंग गडद असले, तरी सपाट रंगलेपनाबरोबरच रंगच्छटांनी त्रिमिती आणण्याचे काम त्यांनी केले होते. अद्भुतता आणि नाट्यपूर्णतेचा मिलाफ या भौमितिक रचनांमध्ये दिसतो. यापूर्वी त्यांनी मानावाकृतींची चित्रेही केली होती. 

गुलाम रसूल संतोष मूळचे श्रीनगरचे. वडिलांच्या मृत्यूच्या पश्चात शाळा सोडलेली. लिहिणे, साइन बोर्ड रंगवणे, रेशमी वस्त्रे विणणे आणि घरांच्या भिंतींना सफेदी देणे अशी कामे त्यांनी सुरुवातीला केली. १९५४च्या सुमारास त्यांना नारायण श्रीधर बेंद्रे यांच्या हाताखाली फाइन आर्टमधील शिष्यवृत्ती मिळाली आणि ते गुजरातमध्ये बडोद्याला स्थलांतरित झाले. पुढे त्यांनी काश्मिरी भाषेत काव्य, नाटके, निबंध लिहिले. शारदा नावाची काश्मिरी लिपीदेखील ते वाचू शकत. संतोष यांची चित्रे नजर वेधून घेणारी, रंगसंगतीच्या मर्यादा पळणारी आणि नेत्रसुखद होती. 

संतोष यांच्या काही चित्रांमध्ये हिमाच्छादित शिखरे, दिव्य काहीतरी प्रकाश, बौद्ध मठांमध्ये चितारलेले असतात तसे ढग, अशा अनेक गोष्टी भौतिक आकारांना संगत करताना दिसतात. प्रकृती रूपात व पुरुष रूपात या रचनांना गुंफवताना एक तरलता त्यांच्या चित्रात दिसते आणि सृजनात्मक बंधन स्वीकारलेले जाणवते. १९९८ साली दिल्लीत त्यांचे निधन झाल्याचे वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याचे वाचल्याचे स्मरते. जी. आर. संतोष यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा प्रसारभारतीने केलेला माहितीपट त्यांच्या कलात्मक योगदानाचे महत्त्व विशद करणारा आहे. तो दाखवला गेला. 

‘कंटेंपररी इंडियन पेन्टिंग’ या के. विक्रमसिंग दिग्दर्शित लघुपटात जी. आर. संतोष यांच्या चित्रांचा उल्लेख ‘समकालीन भारतीय कलेतील महत्वाचे चित्रकाम’ असा केला आहे. ‘त्यांच्या चित्रातील भौमितिकता जीवनाची आहे. ज्ञानाची, आत्मज्ञानाची उलटीसुलटी कमळे अनेक स्त्री प्रतिमांसोबत त्यांनी गुंफली आहेत. त्यांची चित्रे अद्भुततेने भरलेली आहेत,’ असा उल्लेख करण्यात आला आहे. (जी. आर. संतोष यांच्यावरील एका माहितीपटाच्या व्हिडिओची लिंक लेखाच्या शेवटी दिली आहे. तो व्हिडिओ जरूर पाहावा.)

संतोष यांच्या बहुतेक चित्रांची शीर्षके ‘अनटायटल्ड’ अशी आहेत. त्या काळातील बहुतेक चित्रकार अमूर्त चित्राला ‘अनटायटल्ड’ असे नाव देत असत. असे असले, तरी संतोष यांची ‘अनटायटल्ड’ चित्रे स्मृतिचित्रांच्या या प्रवासात अद्भुततेच्या रचनांचा अनुभव देणारी आहेत, हे चित्रे गांभीर्याने पाहिली की लक्षात येते.


- डॉ. नितीन हडप
ई-मेल : nitinchar@yahoo.co.in

(लेखक पुण्यातील चित्रकार असून, काष्ठशिल्पे, पुरातन वास्तू, फॅशन आदी त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. ‘स्मरणचित्रे’ या पाक्षिक सदरातील सर्व लेख https://goo.gl/w99eTN या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search