Next
पसारा - मनातला!
BOI
Thursday, April 18, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

घरादारात पसारा होतो, तसा मनातही पसारा होतो... अनावश्यक विचारांचा, नको त्या आठवणींचा आणि बऱ्याच गोष्टींचा... मनातला तो पसारा आवरण्याबद्दलचा हा ललित लेख...
........
त्या रविवारी सकाळीच घरातले सगळेच बाहेर गेले होते. रविवार असल्याने मला सुट्टीच. खूप महिन्यांनी मी एकटीच घरी होते. अगदी मला आवडतो असा एखादा दिवस माझ्यापुरेसा. सकाळी एकेक जण जाईपर्यंत माझी गडबड चालूच होती. एकीकडे मनात... दिवसभर एकटी तर काय काय करायचं, हा विचार चालूच होता. उलटसुलट असे अनेक विचार मनात येत होते.

सगळेच बाहेर पडून गेले. मग मी एकटीच. पाच मिनिटे अगदी शांत बसले. मग मस्तपैकी चहा केला. अगदी शांतपणे चहाचा आस्वाद घेतला. आज वेळ आहे, तर जरा घर आवरावं थोडंसं, असं मनात आलं. मग वाटलं, छे काहीच करू नये... फक्त आराम करावा. मस्त शांतपणे वाचन करावं. एकटीच आहे तर कपाट आवरावं शांतपणे.. रविवार आहे, त्यामुळे टीव्हीवर एखादा छान पिक्चर लागेल, तो बघेन. असंख्य गोष्टी कराव्याशा वाटत होत्या; पण गंमत अशी, की हे सगळे विचार अर्धा तास एका जागेवर बसूनच करत होते. मनात फक्त विचारांची गर्दी झाली. थोडं काम, थोडा आराम, सगळं थोडं थोडं करावं, असा विचार मनात आला. तेवढ्यात लक्ष समोरच्या भिंतीकडे गेलं. जळमटं... ओह् नो...... झाडायला हवं. छे... पण खरंच उठावंसं वाटेना.

काही क्षण अगदी असेच गेले. वेळ आहे भरपूर, तर थोडा पसारा आवरावा. थोडा वेळ स्वत:साठी; पण.... काही तरी काम केलं हे दिसलं पाहिजे घरातल्यांना, म्हणून थोडं आवरायला घेतलंच.

पसारा आवरणं म्हणजे न संपणारं काम. बारीक सारीक नुसतं आवरत राहायचं. पसारा आवरायला कुठून सुरुवात करू कळेना. काही क्षण तशीच बसून राहिले. ‘पसारा’ या शब्दाभोवती मन पळू लागलं. विचारांचं चक्र फिरू लागलं.

 माझ्या मनात पण असा बराच पसारा झालाय, या मनात आलेल्या वाक्याचे प्रतिध्वनी उमटले मनावर... असंख्य. 

बाप रे. खरंच मनातसुद्धा किती पसारा झालाय नुसता. डिस्टर्ब करायला कोणीही नव्हतं. सगळं बाजूला ठेवलं. आता एकच करायचं, पसारा आवरायचा, अगदी नको असलेलं टाकून द्यायचं. काहीसं थोडं जपून ठेवायचं. लागलेच कामाला पसारा आवरायच्या; पण... या मनातला, माझ्या मनातला. असंख्य आठवणी, प्रसंग, घटना, अनेक चांगल्या-वाईट क्षणांच्या आठवणी... खरंच, मनात नुसती गर्दी झाली होती. काय काय अन् किती ते साठलं होतं मनात. कुठलाही प्रसंग केव्हाही आठवत असे. माझ्या लहानपणी जेव्हापासून आठवतंय, अगदी तेव्हापासून ते अगदी या क्षणापर्यंत मन भरून गेलं होतं. तरीही भर पडतच होती विचारांची! नको त्या विचारांची, आठवणींची उगाच मनात गर्दी झाली होती. जागा अडून राहिली होती. छे छे, काय झालंय हे आपल्या मन आणि बुद्धीचं. अगदी शांत बसले. मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केला. हाच पसारा आता आधी आवरते. कसा आवरायचा हा पसारा, हे समजेना. प्रयत्न तर करते.

मनातले नको असलेले विचार काढून टाकले. कोणाबद्दल तरी, कशाबद्दल तरी उगाचच विचारांचं जाळंच मनात झालं होतं. असंख्य घटना, प्रसंग... चांगले अन् वाईटही, उगाचच मनात साठून राहिले होते. हे सगळं काढूनच टाकू या. असं करत करत मनातला कोपरा न् कोपरा रिकामा केला.

माझं मन मी आवरलं... स्वच्छ, नितळ, रिकामं झालं ते. आता एकच ठरवलं, फक्त चांगल्याच आठवणी, विचार मनात ठेवायचे आणि आवश्यक असतील तरच. वाचलेलं लक्षात का राहत नाही - या कैक दिवसांपासून पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. जागा कुठे उरली होती मनात... आणि आता.... किती फ्रेश वाटतंय, हलकं वाटतंय. किती वेळ लागला... फक्त अर्धा तास... मन एकदम हलकं-फुलकं झालं.

वा! जमलं मला माझ्याच मनातला पसारा आवरायला! दिवसभर घरात छान कामं झाली. घर आणि मी फ्रेश. खूप दिवसांनी खरंच इतकं छान वाटत होतं. संध्याकाळ झाली. एकेक जण घरी आले. चलो, रुटीन चालू. छान स्वयंपाक केला होता. छान गप्पा मारत जेवलो. मग, काय केलंस दिवसभर? व्हॉट्सअॅपवर ऑनलाइनपण दिसली नाहीस?

सगळ्यांच्या सगळ्या प्रश्नांना माझं एकच उत्तर-

पसारा आवरला - मनातला  अन्  दारातला...

पुन्हा मनात विचार सुरू... अधूनमधून असा आवरायला हवा पसारा... हो ना!

- आभा राजेंद्र घाणेकर, रत्नागिरी
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Geetanjali bhagwat Chiplun About 4 Hours ago
Very fine. This cleaning of mind is essential for our daily routine .
0
0
RACHANA JOSHI About 9 Hours ago
अप्रतिम....सहज सोपे
0
0
प्रेरणा About 19 Hours ago
अगदी खरं लिहिलयस आभा .... सगळ्यांच्या मनातलं....खूपच सुंदर... भारीच एकदम
0
0
संजना चव्हाण About 19 Hours ago
असा पसारा सर्वानाच आवरता आला तर किती छान होईल नाही? प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे...!! खूप छान अरु....
1
0
Rohini About 1 Days ago
Nice story 👌👌
1
0

Select Language
Share Link
 
Search