Next
‘जीआयबीएफ’तर्फे उद्योजकांचा ११ मे रोजी सन्मान
प्रेस रिलीज
Wednesday, May 08, 2019 | 02:43 PM
15 0 0
Share this article:

पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. जितेंद्र जोशी. शेजारी डावीकडून दीपाली गडकरी, अभिषेक जोशी, निलेश ओसवाल व धीरेंद्र आपटे.

पुणे : ‘आपल्या उद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमची (जीआयबीएफ) स्थापना केली आहे. ‘जीआयबीएफ’मध्ये अनेक देशांचे दूतावास, उद्योग मंत्रालय आणि विविध देशांतील उद्योजक जोडले जात असून, उद्योगांच्या जागतिक विस्तारासाठी हे उपयुक्त ठरत आहे. उद्योजकांनी जागतिक बाजारपेठेत आपला उद्योग नेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी फोरमतर्फे ११ मे २०१९ रोजी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांना सन्मानित केले जाणार आहे, अशी माहिती ‘जीआयबीएफ’चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जितेंद्र जोशी यांनी दिली. 

डेक्कन येथील पीवायसी जिमखाना येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी वर्ल्ड ट्रेंड सेंटरचे कॉर्डीनेटर निखिल ओसवाल, ‘जीआयबीएफ’च्या आंतरराष्ट्रीय समन्वयक दीपाली गडकरी, ‘जीआयबीएफ’चे सहसचिव धीरेंद्र आपटे, युवा समन्वयक अभिषेक जोशी आदी उपस्थित होते.

डॉ. जोशी म्हणाले, ‘भारत हा वेगाने विकसित होणारा आणि जागतिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करीत असलेला देश आहे. भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’, ‘स्किल्स डेव्हलपमेंट’ यांसारख्या अभियानामुळे भारतासह विदेशी कंपन्यांना व्यवसायाच्या मोठ्या संधी उपल्बध झाल्या आहेत. अशावेळी जागतिक स्तरावर उद्योजकांना एक सामायिक व्यासपीठ असावे, या कल्पनेतून ‘जीआयबीएफ’ची स्थापना केली. या व्यासपीठाच्या माध्यमातून ऑटोमोबाइल, अभियांत्रिकी, केमिकल, फार्मास्युटिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स, अवजड उद्योग, सेवा क्षेत्र अशा विविध व्यावसायिकांना जोडण्याचा प्रयत्न केला आहे. याला कोणत्याही धर्माचे, जातीचे किंवा प्रदेशाचे बंधन नाही. व्यवसाय करणारा कोणीही या फोरमचा सभासद होऊ शकेल.’

‘आज ‘जीआयबीएफ’चे ३७ देशांमध्ये कार्य सुरू असून, जवळपास ५३ हजार सभासद आहेत. जागतिक मुख्यालय दुबई येथे, मुख्य कार्यालय नवी दिल्ली येथे, तर कॉर्पोरेट कार्यालय पुण्यात आहे. एमडीएच मसाल्याचे चुनीलाल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, गायक बप्पी लहरी, संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्यासह इटली, मलेशिया, हंगेरी, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इथिओपिया, इराक आदी देशांचे दूतावास या फोरमचे मानद सभासद झाले आहेत. गेल्या वर्षभरात ‘जीआयबीएफ’ने आंतरराष्ट्रीय स्तरावर ८० कोटींची व्यावसायिक उलाढाल केली आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली.

‘जागतिक स्तरावरील उद्योजकांशी व्यावसायिक भागीदारी करण्याची संधी ‘जीआयबीएफ’मुळे उपलब्ध होणार आहे. जागतिक स्तरावर उद्योगाला प्रोत्साहित करण्यासाठी राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘जीआयबीएफ पुरस्कार’ दिला जाणार आहे. त्यातील पश्चिम विभागाच्या पुरस्कारांसाठी निवड समितीने २५ उद्योजकांनी निवड केली आहे. व्हर्लपूल, फिनोलेक्स, केसरी यांसह इतर उद्योग समूहांना या वेळी सन्मानित केले जाणार आहे. इथिओपिया, अफगाणिस्तान आणि इंडोनेशिया दूतावासातील अधिकारी यांच्यासह लीला पुनावाला, झेलम चौबळ आदी या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ११ मे रोजी सकाळी नऊ वाजता ‘ट्रेड बियाँड वेस्ट’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. परी रोबोटिक्सचे मंगेश काळे, ‘एचडीएफसी’चे अजय सचदेव, कॉउन्सल जनरल इंडोनेशिया आडे सुकेदार, कौन्सुल जनरल इथिओपिया डेमेक अंबुलू, कौन्सुल जनरल नदीम शरीफी हे या चर्चासत्रात सहभागी होतील,’ असेही डॉ. जोशी यांनी सांगितले. 

नीलेश ओस्वाल म्हणाले, ‘अनेक मोठ्या कंपन्या लहान कंपन्यांकडून सेवा घेतात. लघु व माध्यम स्वरूपाच्या कंपन्यांना जोडण्याचे काम ‘जीआयबीएफ’ करत आहे. जागतिक स्तरावर व्यवसाय विस्तारासाठी जवळपास ३२९ शहरांसोबत जोडले गेलो आहोत. हे सर्व ‘जीआयबीएम’मुळे साध्य झाले आहे. त्यामुळे अनेक कंपन्या विविध देशांमध्ये ग्लोबल एक्सचेंग, प्रोग्रेस होण्यास मदत होणार आहे. ३१ जुलै रोजी तैवान ट्रेड ऑर्गनिझशनचे २० सदस्य पुण्यात येणार असून, ‘जीआयबीएफ’सोबत वन-टू-वन बिझनेस करार होणार आहे. ‘जीआयबीएफ’च्या माध्यमातून ग्लोबल कनेक्ट निर्माण होणार असून, वर्ल्ड ट्रेड सेंटर ‘जीआयबीएफ’सोबत जोडल्याचा आनंद आहे.’

पुरस्कार वितरणाविषयी : 
दिवस : शनिवार, ११ मे २०१९ 
वेळ : सायंकाळी सात वाजता 
स्थळ : हॉटेल हयात, नगर रोड, पुणे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search