Next
‘वैकुंठनायका’ कार्यक्रमामधून श्रोत्यांनी अनुभवली अभंगरंगाची उधळण
आषाढी एकादशी निमित्त गुरू-शिष्य परंपरेचे दर्शन
BOI
Saturday, July 13, 2019 | 03:06 PM
15 0 0
Share this article:

‘वैकुंठनायका’ कार्यक्रमात अभंग सादर करताना (डावीकडून) धनंजय म्हैसकर, आशिष रानडे व सौरभ काडगांवकर

पुणे : गुरू आणि शिष्य यांच्यातील नाते हे सलगीचे असते;मात्र ही सलगी स्वतःचे काम साधून घेण्यासाठी नसते, तर भक्ती मार्गाने गुरूपर्यंत पोहोचण्यासाठी असते. अशाच भक्तीमार्गाचे दर्शन ‘वैकुंठनायका’ या अभंगांच्या कार्यक्रमात झाले. 

संत परंपरेतील अभंगांबरोबरच नव्या रचनांच्या भक्तीरसात पुणेकर रसिक श्रोते चिंब झाले. शहरात सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेने प्रफुल्लित झालेल्या वातावरणात आषाढी एकादशीचे औचित्य साधत आयोजिलेला ‘वैकुंठनायका’ हा अभंग रचनांचा सांगीतिक कार्यक्रम रंगला.    

‘वैकुंठनायका’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपली देदिप्यमान संत व सांगीतिक परंपरा श्रोत्यांच्या समोर आली. संत सेवा संघ आणि समर्पित क्रिएशन्स यांच्या वतीने कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संतांच्या शब्दांतून आणि संगीतातील गुरू-शिष्य परंपरेबरोबरच संगीत परंपरा यांच्यातील नव्या, जुन्या अभंगांचा सुरेख संगम या वेळी रसिकांसमोर आला.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात संगीत परंपरेतील गुरू-शिष्य परंपरा श्रोत्यांसमोर सादर झाली. यामध्ये पं. संजीव अभ्यंकर यांचे शिष्य धनंजय म्हैसकर, पं. आनंद भाटे यांचे शिष्य आशिष रानडे आणि पं. रघुनंदन पणशीकर यांचे शिष्य सौरभ काडगांवकर या तरुण आश्वासक गायकांनी प्रसिद्ध अभंगांची सुरेल मैफल सादर केली. ‘राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी’ या वारकरी संप्रदायातील बीजमंत्राने या तिघांनी कार्यक्रमाला सुरुवात केली. यानंतर आशिष रानडे यांनी संत नामदेव महाराजांच्या ‘माझा भाव तुझे चरणी...’, ‘माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तिरी...’ या अभंगांच्या सादरीकरणाने भक्तीरसात रंगलेले अवघे पंढरपूर समोर उभे केले. यानंतर धनंजय म्हैसकर यांनी नाथमहाराजांचा ‘ऐसे पंढरीचे स्थान, याहून आणिक आहे काय...?’, समर्थ रामदास स्वामींचा ‘ध्यान लागले रामाचे...’ हे अभंग सादर केले. सौरभ काडगावकर यांनी नाथमहाराजांच्या ‘या पंढरीचे सुख पाहता डोळा, उभा तो जिव्हाळा योगियांचा’ आणि ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल...’ या अभंगांचे सादरीकरण करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या वेळी कीर्तनकार श्रेयस बडवे यांनी निरुपण केले. त्यांना पांडुरंग पवार (तबला), मनोज भांडवलकर (पखावज), शुभदा आठवले (संवादिनी), सिंथेसायझर (केदार परांजपे), उद्धव व स्वप्निल कुंभार (तालवाद्य) आणि माऊली टाकळकर (टाळ) यांनी साथसंगत केली. 

 ‘वैकुंठनायका’ या अभंगांच्या कार्यक्रमात सादरीकरण करताना (डावीकडून) पं. संजीव अभ्यंकर, पं. आनंद भाटे व पं. रघुनंदन पणशीकर

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात संगीतकार जीवन धर्माधिकारी यांनी संगीतबद्ध केलेल्या नवीन अभंग रचनांचे सादरीकरण झाले. भारतरत्न पं. भीमसेन जोशी, संगीतमार्तंड पं. जसराज आणि गानसरस्वती किशोरीताई आमोणकर या परंपरेतील आजच्या काळातील अध्वर्यु असलेले पं. आनंद भाटे, पं. संजीव अभ्यंकर आणि पं. रघुनंदन पणशीकर यांनी स्वरमैफल सजवत, भक्तीमय वातावरणाची निर्मिती केली. 

या वेळी पं. संजीव अभ्यंकर यांनी संत श्री निळोबारायांच्या ‘नमो ज्ञानेश्वरा...’ या अभंगाने सुरुवात करीत संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ व संत मुक्ताई यांची रुपे रसिकांसमोर जणू जिवंत केली. यानंतर पं. रघुनंदन पणशीकर यांनी ‘गुरू हा संत कुळीचा राजा, गुरू हा प्राणविसावा माझा...’ हा संत ज्ञानेश्वर यांचा अभंग सादर करीत गुरूचे महत्त्व विशद केले. यानंतर पं. आनंद भाटे यांनी सादर केलेल्या संत एकनाथ महाराजांच्या ‘विटेवरी दिसे स्वानंदाचा गाभा, श्रीमुखाची शोभा काय मानू...’ या अभंगाने उपस्थितांनी शब्दरूपी वारी अनुभविली.

संत सेवा संघाच्या विश्वस्त स्वर्णिमा यांनी या वेळी निरुपण केले. प्रशांत पांडव (तबला), प्रसाद जोशी (पखावज), शुभदा आठवले (संवादिनी), सिंथेसायजर (केदार परांजपे), उद्धव व स्वप्निल कुंभार (तालवाद्य), माऊली टाकळकर (टाळ) यांनी साथसंगत केली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search