Next
नेरुळ-उरण उपनगरी रेल्वेसेवा सुरू
BOI
Monday, November 12, 2018 | 04:28 PM
15 0 0
Share this article:खारकोपर :
‘पूर्वी नदीच्या काठावर मानवी संस्कृतीचा विकास झाला. आताच्या आधुनिक काळाच्या संदर्भात बोलावयाचे झाल्यास, जेथे दळणवळण सुविधा उपलब्ध आहेत, तेथे संस्कृतीचा विकास होईल. मुंबई, नवी मुंबई, एमएमआरडीए अंतर्गत येणारा परिसर येथे निर्माण होणाऱ्या वेगवान दळणवळण सुविधांचा रायगड जिल्ह्यापर्यंत होणारा विकास पाहता या सर्व क्षेत्राचा एकत्रितपणे ‘महामुंबई’ म्हणून विचार करावा लागेल. त्यासाठी सरकार विकासाचे नियोजन व प्रयत्न करीत आहे,’ असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खारकोपर (ता. पनवेल, जि. रायगड) येथे केले. नेरुळ ते उरण रेल्वेमार्गावरील पहिल्या टप्प्यातील उपनगरीय रेल्वेसेवा ११ नोव्हेंबर ०१८ रोजी  खारकोपरपर्यंत सुरू झाली. या सेवेचा उद्घाटन सोहळा खारकोपर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते व रेल्वे व कोळसा मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत पार पडला.

या वेळी नेरुळ, सीवूडस दारावे/ बेलापूर-खारकोपर (फेज १) नवीन लाइन व पनवेल-पेण विद्युतीकरण कार्याचे उद्घाटन, बेलापूर/नेरुळ-खारकोपर विभागातील ईएमयू सेवेचे उद्घाटन, वसई रोड-दिवा-पनवेल- पेण विभागातील मेमू सेवेचे उद्घाटन, उंबरमाली व थानसीत येथे नवीन उपनगरीय स्थानकांची पायाभरणी, तसेच परळ स्टेशन नवीन प्लॅटफॉर्म, शिवडी, मुंब्रा, भांडुप, परळ, कळवा, घाटकोपर येथे नवीन ओव्हरब्रिज, सर्वच २७३ उपनगरीय रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मची उंची ९०० मिलिमीटरने वाढवली, २३ स्थानकांवर ४१ एक्सलेटर्स, सहा स्थानकांवर १० लिफ्ट, सहा स्थानकांवर नवीन शौचालये, ७७ स्थानकांवर ३१८ एटीव्हीएम सुविधा, सहा स्थानकांवर २०६ सीसीटीव्ही कॅमेरे, भिवंडी रोड-नावडे रोड येथील दोन नवीन बुकिंग ऑफिसेस, सानपाडा ईएमयू कारशेड येथे एक मेगावॉट सौरऊर्जा प्रकल्प या विविध लोकोपयोगी सुविधांचे लोकार्पणही करण्यात आले.खारकोपर रेल्वेस्थानक आवारात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे व कोळसा मंत्री पीयूष गोयल यांच्यासह केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, राज्याचे बंदरे, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री, तसेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडको अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार राजन विचारे, खासदार अरविंद सावंत, आमदार संदीप नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार मनोहर भोईर, आमदार रमेश पाटील, ‘जेएनपीटी’चे विश्वस्त महेश बालदी, कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील, ‘सिडको’चे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शर्मा, मुख्य प्रशासकीय अधिकारी (निर्माण) एस. के. तिवारी, मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, पनवेलच्या महापौर कविता चौतमोल, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, माजी खासदार रामशेठ ठाकूर, लोकनेते दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, तसेच रेल्वे, सिडको प्रशासनाचे अधिकारी व स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

रिमोट कंट्रोल व व्हिडिओ लिंकद्वारे लोकार्पण
या वेळी विविध सेवांचे लोकर्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे करण्यात आले. तसेच व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवून दिवा-पनवेल-पेण विभागातील मेमू सेवेचे उद्घाटन करण्यात आले. व्हिडीओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवून खारकोपर– बेलापूर लोकल रेल्वेलाही रवाना करण्यात आले.

पनवेल ठरणार महत्त्वाचे टर्मिनस
या वेळी फडणवीस यांनी वेळेच्या आत प्रकल्प पूर्ण झाल्याने समाधान वाटत असल्याचे नमूद करून सिडको, रेल्वेचे अभिनंदन केले. ते म्हणाले, ‘मुंबईसह कोकण परिसराचा विकास करताना आता महामुंबईचाच विचार करावा लागेल. त्यात ‘एमएमआरडीए’अंतर्गत येणारा भाग, मुंबई, नवी मुंबई या क्षेत्राचा एकत्र विचार करावा लागेल. २०१४नंतर राज्यात रेल्वे मार्ग मंजुरी, दुहेरीकरण, विद्युतीकरण या कामांना केंद्राकडून मान्यता मिळाल्याने ही कामे होण्याच्या वेगात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे रेल्वे  प्रवाशांच्या सेवांच्या पूर्ततेसाठी मोठ्या प्रमाणावर कामे होत आहेत. नवी मुंबईच्या दक्षिण भागातील या विकासाची भविष्यातील वाढ रायगड जिल्ह्यात होत आहे. त्या दृष्टीने पनवेल हे भविष्यातील महत्त्वाचे टर्मिनस ठरणार असून, त्या दृष्टीने आम्ही विकासाचे नियोजन करीत आहोत. याच परिसरात मेट्रो, उपनगरी रेल्वे सुविधा व ट्रान्स हार्बर लिंकच्या धर्तीवर विकास करण्यासाठी केंद्राकडून राज्याच्या १२ हजार १६७ कोटी रुपयांच्या दळणवळण सुविधा विकास प्रकल्पास मान्यता मिळाली आहे. त्यात ५० टक्के केंद्र व ५० टक्के राज्यसरकार योगदान देणार आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या उन्नत रेल्वेमार्गाची निर्मिती केली जाणार आहे. याचा विस्तार करताना येऊ घातलेल्या नैना प्रकल्पाच्या दृष्टीने हा समग्र दळणवळण प्रकल्प आराखडा तयार केला आहे. त्यात ३६० अंश दळणवळण सुविधा निर्मितीसाठी नियोजन होत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्मितीनेही वेग घेतला आहे. या ठिकाणी उपनगरीय रेल्वे सुविधांचे जाळे उभे करत असताना सिडकोमार्फत स्टेशनजवळ ४० हजार घरांच्या उभारणीचे नियोजन आहे. या  जवळपासच्या परिसरात दोन लाख घरांचे नियोजन करण्यात आले आहे. निवासाची सोय स्टेशनपासून जवळ असेल, तर सार्वजनिक दळणवळण सुविधांचा वापर वाढतो.’

प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य
ते म्हणाले, ‘ही विकासकामे करत असताना प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. ज्यांनी जागा दिली म्हणून नवी मुंबई उभी झाली, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्यांच्या मागणीनुसार क्लस्टर म्हणून विकासाचा प्रयत्न होत आहे. ही सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.’ 

प्रवाशांच्या सुविधांसाठी क्षमता विकास - रेल्वेमंत्री गोयल
आपल्या भाषणात रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले, ‘केंद्र आणि राज्य मिळून विकासाचे डबल इंजिन काम करीत आहे. म्हणून गतीने विकास होतोय. दिवा-पेण रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम नऊ महिने आधीच पूर्ण केले. महामुंबई क्षेत्रातील नागरिकांना व रेल्वे प्रवाशांना सुविधा देण्यासाठी रेल्वे क्षमता विकास करीत आहे. केंद्र, राज्य शासन, प्रशासन आणि स्थानिक जनतेचा सहभाग अशा सामूहिक प्रयत्नातून विकासाचे काम होत आहे. रेल्वे प्रवाशांना चांगली सुविधा देता यावी यासाठी २०० नवीन वातानुकूलित रेल्वेगाड्यांची उपलब्धता लवकरच करण्यात येईल. मुंबई व नवी मुंबई भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दळणवळणाची चांगली सुविधा देण्यात या रेल्वेसेवेची मोठी भूमिका असेल.

‘मुंबईसोबत रायगडचा ‘महामुंबई’ म्हणून विकास करा’
केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते या वेळी म्हणाले, ‘उपनगरीय रेल्वे सुविधांचा विकास करताना त्यात रायगड जिल्ह्याचा आणि पर्यायाने कोकणचा समावेश होत आहे ही समाधानाची बाब आहे. ही रेल्वेसेवा आज पेणपर्यंत विस्तारत असली तरी रोह्यापर्यंत उपनगरी रेल्वे सेवा सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. लवकरच ही सेवा रोह्यापासून सुरू करता येईल. ही सुविधा अलिबागपर्यंत नेण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्यातून लवकरच पेण-अलिबाग रेल्वेने जोडणार आहोत. दळणवळण सुविधा विकासासाठी प्रयत्नांचा भाग म्हणून वडखळ ते अलिबाग चौपदरी रस्त्याचे काम सुरू आहे. या दळणवळण सुविधांमुळे सर्व परिसराचा एकसंघ विकास होईल आणि त्या विकासाचे खारकोपर हे मध्यवर्ती केंद्र असेल. रेल्वे सर्वांत स्वस्त, सुरक्षित, जलद प्रवास सुविधा देते. त्यामुळे ‘महामुंबई’चा विकास होतोय.’ 

या विकासाच्या कामांसाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आणि रेल्वेमंत्र्यांचे आभार मानले व पनवेल विस्तारीकरणासाठीही सिडकोने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search