Next
‘दर्या’च्या निमित्तानं ‘ग्राफिक नॉव्हेल’चं मंथन
अदिती अत्रे
Sunday, July 30 | 12:45 PM
15 0 0
Share this story

मराठी साहित्यविश्वात आता आणखी एका नव्या साहित्यप्रकाराची भर पडत आहे. पुस्तकं, कॅसेट, ई-बुक्स, ऑडिओ बुक्स...यानंतर काय... या प्रश्नाचं उत्तर पुण्यातल्या विक्रम पटवर्धननं दिलं आहे. ‘दर्या’ ही मराठीतली पहिलीवहिली ग्राफिक नॉव्हेल विक्रम या दिवाळीत मराठी वाचकांच्या भेटीला घेऊन येत आहे. त्याचा हा प्रयोग आणि त्या निमित्तानं एकंदरच ग्राफिक नॉव्हेल या प्रकाराचा घेतलेला हा धांडोळा...
..........
पेशानं फोटोजर्नालिस्ट असलेल्या पुण्यातल्या विक्रम पटवर्धननं ‘दर्या’ नावाची ग्राफिक नॉव्हेल लिहिली असून, त्याचा लेखनाच्या क्षेत्रातला हा पहिलाच प्रयत्न आहे. ही कादंबरी सुमारे दोनशे पानांची असून, त्यातून मराठी वाचकांना कथेसोबतच रंगीत चित्रांचा आस्वाद घेता येणार आहे. दर्या या कादंबरीची कथा ६०० ते ८०० वर्षांपूर्वीच्या कोकणातल्या कोळ्यांच्या आयुष्याभोवती फिरते. कोकणाचं सौंदर्य, मच्छिमारांचं आयुष्य, समुद्र आणि आधुनिकीकरणापूर्वीचा काळ या सगळ्या गोष्टी दृश्य स्वरूपात अनुभवणं हा एक वेगळा वाचनानुभव ठरणार आहे. ही कादंबरी ‘ग्राफिक नॉव्हेल’ स्वरूपात आणण्याबद्दल विक्रम सांगतो, ‘मी स्वतः एक ‘व्हिज्युअलायझर’ असल्याने माझी कादंबरी कृष्णधवल बनणं शक्यच नव्हतं. मला एखादी गोष्ट सुचते तेव्हा ती दिसते.’ यातूनच ग्राफिक नॉव्हेल बनवण्याची कल्पना विक्रमच्या डोक्यात आली. गेली दोन वर्षं विक्रम त्याच्या कथेवर काम करत होता. कादंबरीतली सर्व चित्रं ‘एमआयटी स्कूल ऑफ डिझायनिंग’मधून उत्तीर्ण झालेल्या आमीरखान पठाण यानं काढली असून, विक्रमचा भाऊ, गीतकार आणि सुप्रसिद्ध पटकथालेखक क्षितिज पटवर्धन व गौरी भाडळे हे या पुस्तकाचे प्रकाशक असतील. कोकणच्या भूमीत घडणारी ‘दर्या’ अमराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी समीर कुलकर्णी यांनी या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद केला आहे. विक्रमची ही ग्राफिक नॉव्हेल मराठीत पहिलीच असली, तरी मुळात ती संकल्पना मात्र जुनी आहे. या निमित्ताने त्या संकल्पनेचीही थोडी ओळख करून घेऊ या.

कार्टून स्ट्रिप हा प्रकार मराठी वाचकांना अगदी जवळून परिचित आहे. अनेक वर्षे वर्तमानपत्रातून आणि आता ऑनलाइन माध्यमातून भेटीला येणारा ‘चिंटू’ ही आपल्या सर्वांसाठी कॉमिक्स या प्रकाराची सर्वांत जवळची ओळख. त्याशिवाय चंपक किंवा तत्सम लहान मुलांसाठी असलेली साप्ताहिकं, पाक्षिकं किंवा मासिकांमध्ये असलेल्या दोन किंवा तीन पानी चित्रकथा (‘चंपक’मधला ‘चिकू’ आठवा जरा!) हाही कॉमिक्सचा भाग झाला. भारतात इंग्रजी वृत्तपत्रांतील कार्टून स्ट्रिप्स, चिंटू, चंपक आणि टिंकलमध्ये येणाऱ्या चित्रकथा या पलीकडे साहित्यप्रकार म्हणून या चित्रांना आणि त्यातून पुढे सरकणाऱ्या कथांना फारशी ओळख नाही; पण परदेशात मात्र चित्रकथा हा प्रकार फार आवडीनं वाचला गेला. अनेक पिढ्या कॉमिक्स म्हणजेच चित्रकथा वाचत मोठ्या झाल्या. कॉमिक बुक्स, चित्रकथा हा फक्त लहानांनी वाचण्यापुरता मर्यादित साहित्यप्रकार राहू नये, म्हणून साठीच्या दशकात कॉमिक बुक्सची बाजारपेठ प्रौढ वाचकांसाठीही खुली राहण्याकरिता कॉमिक्सचा आकार मोठा केला गेला. कथेचं रूपांतर कादंबरीत झालं. त्यात प्रौढांच्या भावविश्वातले विषय हाताळायला सुरुवात झाली आणि ‘ग्राफिक नॉव्हेल’ हा वेगळा साहित्यप्रकार उदयाला आला.

‘टार्गेट ऑडियन्स’चं वय वाढल्यानं आवश्यक ते बदलही ‘ग्राफिक नॉव्हेल’मध्ये करण्यात आले. रेखाटनं प्रौढ होत गेली, वापरली गेलेली रंगशैली बदलली, भाषा बदलण्यात आली. मुख्य म्हणजे लहान मुलांसाठीच्या चित्रकथांमध्ये असलेली आशयानुरूप ‘लिटरल’ चित्र न राहता, आता गोष्टीच्या दृश्यात्मक भागाचा भार हा चित्रांवर, तर चित्रात न दाखवता येणारा भाग हा शब्दांवर अवलंबून राहिला. शब्द आणि चित्रांचं मेंदूनं एकत्र ‘डिकोडिंग’ केल्याशिवाय आशय स्पष्टपणे पोहोचू नये, इतकी ती गुंफण काही वेळा घट्ट होत गेली.

पुण्यातल्या तेजस मोडक या तरुणानं अनेक इंग्रजी ग्राफिक नॉव्हेल्ससाठी चित्रं काढली आहेत. ग्राफिक नॉव्हेल या वरकरणी गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या आणि मराठी वाचकांसाठी तशा नव्या असलेल्या साहित्यप्रकाराविषयी अधिक जाणून घेण्याकरिता तेजसशी संपर्क साधला. त्यानं हा विषय अगदी साध्या-सोप्या शब्दांत उलगडून सांगितला. तो त्याच्याच शब्दांत इथं देत आहे.

ग्राफिक नॉव्हेल म्हणजे...

ग्राफिक नॉव्हेलचं माध्यम कॉमिक्स हेच आहे. आपण फिल्मचं उदाहरण घेतलं तर त्यात जसे अॅनिमेशन, लहान मुलांसाठीचे चित्रपट, फीचर फिल्म असे प्रकार काही असले, तरी माध्यम फिल्म हेच राहतं. तसंच कॉमिक्स आणि ग्राफिक नॉव्हेल या दोन्हीचं माध्यम एकच आहे. दोन्हींमध्ये शब्द आणि चित्रं वापरून गोष्ट मांडली जाते.

कॉमिक्स आणि ग्राफिक नॉव्हेलमध्ये काही धूसर फरक आहेत. कॉमिक्समध्ये आठवडा, पंधरवडा, महिना किंवा काही ठराविक काळानंतर तुकड्यांमध्ये, भागांमध्ये गोष्ट प्रसिद्ध केली जाते. ग्राफिक नॉव्हेलमध्ये कोणत्याही कादंबरीप्रमाणेच फ्रंट कव्हर ते बॅक कव्हर एकच गोष्ट सांगितलेली असते. त्यामुळे तो फरक माध्यमाचा नसून, प्रकाराचा आहे. काही सुप्रसिद्ध प्रकाशकांनी साप्ताहिकांमध्ये प्रकाशित झालेल्या कॉमिक्सच्या भागांना एकत्र करून त्याची ग्राफिक नॉव्हेल तयार केल्याचीही उदाहरणं आहेत.

भारतात कॉमिक्सचं कल्चर फारसं कधीच नव्हतं. अमर चित्रकथा, टिंकल असे काही अपवाद सोडता बाकी कशाला फारशी राष्ट्रीय ओळख नव्हती. पाश्चात्य देशांमध्ये कॉमिक्स या साहित्यप्रकाराचा स्वतःचा असा एक सुवर्णकाळ होता, तसा भारतात कधीच नव्हता. घराघरांत टीव्ही यायच्या आधी, म्हणजे साधारण साठी-सत्तरीचा काळ हा परदेशातल्या कॉमिक्सचा सुवर्णकाळ होता. टीव्हीच्या येण्याने कॉमिक्सची लोकप्रियता थोडीफार ओसरायला लागली. तेव्हा नव्या प्रकारे कॉमिक्सचं मार्केटिंग करावं या हेतूने ‘ग्राफिक नॉव्हेल’ हा शब्द रूढ केला गेला. मोठे प्रकाशक सुरुवातीला ‘बॅटमॅन’ या सीरिजमधले ‘५०० ते ५२०’ असे कॉमिक्स स्वरूपात प्रसिद्ध झालेले भाग एकत्र छापायचे आणि त्याला ग्राफिक नॉव्हेल म्हणायचे.

ग्राफिक नॉव्हेलमधली चित्रं आणि कॉमिक्समधली चित्रं यांच्यात फारसा फरक नाही; पण या क्षेत्रातली काही लोकं त्या दोन्ही साहित्यप्रकारांतली चित्रं, रेखाचित्रांमधला फरक सांगू शकतात; पण त्यात ढोबळ फरक नाहीत. प्रत्येक चित्रकार, आर्टिस्टच्या शैलीनुसार कॉमिक्स आणि ग्राफिक नॉव्हेलमधली चित्रं बदलत जातात. चित्रं आणि शब्द या दोन्हींवर कथेचा वेगवेगळा भाग सोपवण्यात आलेला असतो. कॉमिक्समध्ये शब्दांना अनुरूप चित्रं रेखाटलेली असतात; पण या बाबतीतलं ग्राफिकचं व्याकरण वेगळं आहे. ग्राफिक नॉव्हेलमध्ये शब्दांना पूरक चित्रं रेखाटलेली असतात. गृहीत वाचकवर्ग प्रौढ असल्यानं शब्द जे सांगतात त्यापेक्षा वेगळा भाग चित्रं व्यक्त करतात. कधी कधी तर, लिखित मजकुराच्या अगदी विरुद्ध काही तरी चित्रांमधून पोहोचत असतं, अर्थांचे समांतर स्तर तयार होतात आणि कथा उलगडत जाते. शब्द व चित्रं या दोन्हींची सांगड वाचकानं आपापल्या विचारानुसार घालायची असते. काही तरी सांगणारा (नरेटिव्ह) म्हणून ग्राफिक नॉव्हेल हा साहित्यप्रकार तसा गुंतागुंतीचा आहे.

भारतीय प्रादेशिक भाषांचा विचार करायचा झाला, तर ग्राफिक नॉव्हेल हा प्रकार आपल्याकडे कधी घडला नाही; पण असं ऐकिवात आहे, की आपल्याकडे दिवाळीत दिवाळी अंक असतात, तसं बंगालमध्ये दुर्गापूजेनिमित्त काही कॉमिक्स दर वर्षी निघतात; पण तीसुद्धा कॉमिक्सच आहेत. ग्राफिक नॉव्हेल्स भारतीय भाषांमध्ये फारशा तयार झाल्या नाहीत.

‘अमर चित्रकथा’चे भाषांतर होऊन ते भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे; पण कथांची लांबी फारशी नसल्याने ‘अमर चित्रकथा’ही चित्रकथा म्हणजे कॉमिक्स या गटात राहते. त्यात तुलनेनं लहान आणि स्वतंत्र कथा असल्यानं ते नॉव्हेल किंवा कादंबरी या गटात मोडत नाही.

मराठीत ग्राफिक नॉव्हेल येणं हा प्रयोगच नवीन असल्याने लोकांकडून ते मोठ्या प्रमाणावर वाचलं जाईल. मराठी वाचकांनी असं काही तरी नक्की वाचावं. सिनेमा किंवा कोणत्याही दृक्-श्राव्य माध्यमाच्या बाबतीत प्रेक्षकांना समोर येईल तो आशय फक्त अनुभवायचा असतो. चित्रं हलत असतात, कथा घडत असते.. ते एक ‘टेंपोरल’ माध्यम आहे. म्हणजे दोन तासांचा सिनेमा हा तुम्ही बघितलात काय आणि इतर कोणी काय.. सिनेमा त्याची कथा दोन तासांतच सांगतो; पण कोणतंही पुस्तक आणि आत्ताच्या संदर्भात ‘ग्राफिक नॉव्हेल’मध्ये वाचकाचा सक्रिय सहभाग असणं गरजेचं असतं. एखादा वाचक एखादं पुस्तक दोन तासांत वाचेल आणि दुसरा एखादा कदाचित तेच पुस्तक एका तासात वाचेल. वाचक स्वतःच्या मनात एखादी कथा कशी उभी करतो, तो त्या कथेत किती प्रमाणात गुंतत जातो, यावर हा लागणारा वेळ बदलत जातो. त्यामुळे पुस्तकं हे तुलनेने थोडंसं काम करायला लावणारं माध्यम आहे. पुस्तकं आपल्याकडून काम करून घेतात; पण सिनेमा मात्र तितकं काम करून घेत नाही. ग्राफिक नॉव्हेल हा प्रकार पुस्तक रूपात चित्रं आणि शब्द मांडत असल्याने ते वाचकांकडून काम करून घेतं आणि खरं तर तशा वाचनाची सवय व्हावी लागते. मगच त्या वाचनाची मजा वाढते. ग्राफिक नॉव्हेलमध्ये वाचकाला चित्रांमुळे दृश्यात्मक मदत मिळत असली, तरी वाचकाच्या आकलनशक्तीनुसार त्यांचे वरवर किंवा खोल अर्थ लावले जातात. एकच ग्राफिक नॉव्हेल दर वेळी वाचताना वेगवेगळ्या अंगांनी कळत जाते आणि मग ‘अरे, या आधी हे दिसलंच नव्हतं’ किंवा ‘अच्छा, हे असं म्हणायचंय तर इथे’ असं वाटून घटना परत नव्यानं उलगडत जाते. हेच ग्राफिक नॉव्हेलचं वेगळेपण आहे.

ई-मेल : Aditi.Atre@myvishwa.com
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link