Next
दुर्मीळ माहितीसह ‘महात्मा फुले समग्र वाङ्मय’ प्रसिद्ध
BOI
Thursday, April 12, 2018 | 11:23 AM
15 0 0
Share this story

पुणे : थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी (११ एप्रिल) ‘महात्मा फुले समग्र वा‍ङ्मय’ या ग्रंथाच्या नव्या रूपाचे लोकार्पण करण्यात आले. प्रा. हरी नरके यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे. ज्योतिरावांचे दत्तकपुत्र यशवंतराव यांनी स्वतः लिहिलेलं फुले चरित्र, ज्योतिरावांच्या सहकाऱ्यांनी लिहिलेली चरित्रं, ज्योतिरावांचे समग्र लेखन, त्यांच्या पुस्तकांमधील प्रस्तावना अशा दुर्मीळ मजकुराची भर या नव्या आवृत्तीमध्ये घालण्यात आली आहे. हा ग्रंथ मुंबई, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, पुण्यासह राज्य शासनाच्या सर्व ग्रंथागारांमध्ये बुधवारपासून उपलब्ध झाला आहे.

प्रा. हरी नरके‘बाइट्स ऑफ इंडिया’ने प्रा. हरी नरके यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी याविषयी अधिक माहिती दिली. ‘१९६९मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष असताना, त्यांनी धनंजय कीर आणि प्रा. स. गं. मालशे या दोन मोठ्या संशोधाकांकडे महात्मा फुले यांच्या समग्र वा‍ङ्मयाचे संपादन करण्याची जबाबदारी दिली आणि त्याच वर्षी साहित्य संस्कृती मंडळाने याची पहिली आवृत्ती काढली. १८४२ ते १८९० या ४८ वर्षांच्या काळात महात्मा फुलेंनी जे लेखन केले त्याचे संकलन म्हणजे ‘महात्मा फुले समग्र वाङ्मय.’ यामध्ये त्यांचे ‘तृतीय रत्न’ हे मराठीतील पहिले आधुनिक नाटक, शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र मांडणारा पोवाडा, तत्कालीन सामाजिक स्थिती दर्शवणारा, रूढी-परंपरा मांडणारा ‘गुलामगिरी’सारखा ग्रंथ आणि इतर स्फुटलेखन असे बहुमोल साहित्य आहे,’ असे प्रा. नरके यांनी सांगितले. 

पुढे १९९०मध्ये म्हणजे महात्मा फुले यांच्या स्मृतिशताब्दी वर्षी हे समग्र साहित्य डॉ. य. दि. फडके यांच्याकडे संपादनासाठी सोपवण्यात आले. त्यावर आवश्यक ते संस्कार करून फडके यांनी त्याची पुन्हा सुधारित आवृत्ती काढली. त्यादरम्यान प्रा. हरी नरके यांनी त्यांना या कार्यात सहकार्य केले होते. आता पुन्हा हे समग्र साहित्य नव्याने आणण्याची संपूर्ण जबाबदारी प्रा. नरके यांच्याकडे सोपवण्यात आली. ‘यापूर्वी एवढ्या मोठ्या दिग्गज लोकांनी यावर संशोधन करून हे काम केलेले असल्याने त्याला एक विशिष्ट उंची प्राप्त झालेली आहे. असे असताना आता माझ्यावर असलेली जबाबदारी खूप मोठी होती,’ अशा भावना प्रा. नरके यांनी व्यक्त केल्या. 

‘या ग्रंथावर नव्याने काम करत असताना, आम्ही त्यात २०० पृष्ठांच्या मजकुराची भर घातली आहे. महात्मा फुले यांनी वेळोवेळी लिहिलेल्या, परंतु आजवर कुठेही लिखित स्वरूपात न आलेल्या काही मजकुराचा त्यात समावेश आहे,’ असे प्रा. नरके यांनी सांगितले.

महात्मा फुले‘त्या काळात असलेल्या बालविवाहाच्या प्रथेबाबत गव्हर्नर जनरलनी महात्मा फुलेंना त्यांचे मत विचारले होते. याव्यतिरिक्त विधवा पुनर्विवाहास कायद्याने परवानगी द्यावी का, याबाबतही मत देण्यास सांगण्यात आले होते. चार डिसेंबर १८८४ रोजी महात्मा फुले यांनी या विषयांवर अतिशय सविस्तरपणे आपली मते गव्हर्नर जनरलला कळवली होती. हे सगळे पुराभिलेखागारात उपलब्ध होते. त्याचा आता या नव्या ग्रंथात समावेश करण्यात आला आहे,’ अशी माहिती प्रा. नरके यांनी दिली.

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले‘सदाशिव गोवंडे यांच्या घरी राहत असलेल्या एका ब्राह्मण विधवेसंदर्भातील घटना आणि १८८७मध्ये पुण्यातील तळेगाव ढमढेरे गावातील कऱ्हेकर आणि भुजबळ या आडनावांच्या दोन स्त्रियांनी सत्यशोधक पद्धतीने लग्न लावण्याचा केलेला प्रयत्न आणि त्याला झालेला विरोध या दोन घटनांबद्दलच्या माहितीचा या नव्या आवृत्तीत समावेश केला असल्याचे प्रा. नरके यांनी सांगितले. 

‘महात्मा फुले हे संपादक होते, पत्रकार होते. त्यांच्या पत्रकारितेच्या काळात त्यांनी अनेक विषयांवर लिहिलेले ग्राउंड रिपोर्ट आहेत. तेही आजवर प्रसिद्ध झाले नव्हते. ते सगळे रिपोर्टही या नव्या आवृत्तीत प्रसिद्ध करण्यात आले आहेत. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली ‘सत्यशोधक’ पद्धतीने लग्न करण्याची पद्धत आणि त्या संदर्भातील माहितीचा समावेश त्यात आहे. मामा परमानंद हे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या कार्याचे लेखन करणारे मुंबईतील त्या काळातील एक मोठे लेखक होते. त्यांनी सयाजीराव गायकवाड यांना या दोघांच्या कार्यासंदर्भात काही पत्रे लिहिली होती. ती पत्रेही या आवृत्तीत प्रसिद्ध केली आहेत. महात्मा फुलेंचा मुलगा यशवंत याने महात्मा फुलेंवर लिहिलेला पहिला आत्मचरित्रपर ग्रंथदेखील यामध्ये आहे. महात्मा फुलेंच्या पुस्तकांना वेगवेगळ्या विचारवंतांनी प्रस्तावना लिहिलेल्या होत्या. त्यांचा समावेश या आवृत्तीत करण्यात आला आहे. एकंदर २०० पृष्ठांचा नवीन मजकूर या आवृत्तीच्या माध्यमातून पहिल्यांदाच लोकांच्या समोर येत आहे,’ असे प्रा. नरके यांनी स्पष्ट केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Tushar Bhamare About 145 Days ago
Where should i buy this book? Can i order online? If yes provide me details.
0
0
Balkrishna G. Tayade About 310 Days ago
Sir, whethere "Mahatma Fule Samagra Wangmay" is available to purchase by individual. What is the cost of it. How it can be obtained? Please guide.
0
0

Select Language
Share Link