Next
पुस्तकवेडे अप्पा
BOI
Thursday, February 01, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

आपल्या गॅरेजमध्ये अप्पा
वाचलेली पुस्तकं नि भेटलेली माणसं, आयुष्यात खूप काही शिकवतात, असं एक वचन आहे. म्हणूनच पुस्तकं वाचणारा नि माणसं जोडणारा मनुष्य ज्ञानी आणि खूप भाग्यवान असतो... पुण्यातले प्रमोद आमोंडीकर ऊर्फ अप्पा ही अशीच एक व्यक्ती... ते आहेत एका गॅरेजचे मालक, पण त्यांचं वाचनवेड अगदी एखाद्या अभ्यासू विद्यार्थ्यालाही लाजवेल असं आहे. आपल्यासोबत बाकीच्यांनाही वाचनाची गोडी लावण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. अशा या पुस्तकवेड्या अप्पांची गोष्ट वाचू या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ सदरात...
.........
प्रमोद आमोंडीकर ऊर्फ अप्पाआपल्या आसपास, आजूबाजूला अनेक भन्नाट माणसं वावरत असतात. ती आपल्या इतक्या परिचयाची असतात, की ती सर्वसामान्यांपेक्षा वेगळी आहेत ही गोष्ट सहजपणे लक्षातच येत नाही. त्यातलीच ही व्यक्ती म्हणजे अप्पा - म्हणजेच प्रमोद आमोंडीकर! पुण्यातल्या एका कार वॉशिंग सेंटरचे संचालक, एका गॅरेजचे मालक!

एकदा काही कामासाठी जंगली महाराज रोडवर असताना साठीचे एक गृहस्थ, पाठीला पट्टा लावलेला, गळ्याला पट्टा बांधलेला (बहुदा स्पाँडिलायटिस असावा), स्थूल शरीरयष्टी, सावळा रंग, चेहरा प्रेमळ... मला बघून धावतच आले. त्यांच्या हातात ‘कॅनव्हास’ पुस्तक होतं. त्यांना धाप लागली होती. जवळ येताच त्यांनी नमस्कार केला. ‘तुम्ही दीपा देशमुख मॅडम ना?’ असं विचारलं. मी होकारार्थी मान हलवली. त्यांनी हातातलं ‘कॅनव्हास’ पुस्तक माझ्यासमोर स्वाक्षरीसाठी पुढे केलं. मी स्वाक्षरी केली आणि त्यांच्याशी बोलताना कळलं, की पौड रोडवर त्यांचं सागर वॉशिंग सेंटर आणि चॅम्पियन गॅरेज आहे. एका गॅरेज चालवणाऱ्या माणसाच्या हाती कॅनव्हास बघून मला खूपच आश्चर्य वाटलं. 

त्यानंतर दोनच दिवसांत सकाळच्या वेळेत मोबाइल वाजला. पलीकडून आवाज आला, ‘दीपा मॅडम, अप्पा बोलतोय. दोन मिनिटं बोलू शकतो का?’ मी ‘हो’ म्हणताच ते म्हणाले, ‘मॅडम तुमची ‘सुपरहिरो’ची पुस्तकं विकत घेतली आहेत. त्यावर स्वाक्षरी हवी आहे. फक्त पाच मिनिटं तुमचा वेळ घेईन. येऊ का घरी?’ फक्त स्वाक्षरी घेण्यासाठी, बाणेर भागात इतक्या दूर त्यांनी त्रास घेऊन यावं असं मला वाटेना; पण त्याचबरोबर त्यांच्या आवाजातली आतुरता मला नाही म्हणू देईना. मी त्यांना ‘या’ म्हटलं, पत्ता सांगितला. पंधरा ते वीस मिनिटांत अप्पा घरी आले. 

लेखक डॉ. आनंद नाडकर्णी आणि लेखिका दीपा देशमुख यांच्यासमवेत अप्पाआल्या आल्या त्यांनी ‘सुपरहिरो’ मालिकेतल्या पुस्तकांवर माझी स्वाक्षरी घेतली. ही मालिका कशी सुरू झाली याविषयी मी त्यांना थोडक्यात सांगितलं आणि ‘आता ही पुस्तकं वाचून झाली की मला प्रतिक्रिया कळवा,’ असंही सांगितलं; मात्र ही सगळी पुस्तकं विकत घेतल्या घेतल्या लगेचच वाचून काढल्याचं अप्पांनी सांगितलं. मग त्या पुस्तकांविषयी, त्यातल्या प्रसंगांविषयी ते भरभरून बोलत राहिले. मी लिहिलेल्या ‘प्रकाश आमटे’ या पुस्तकातल्या भावलेल्या भागाविषयी ते मलाच सांगत राहिले. त्यानंतर त्यांनी बाबा आमटे, साधनाताई आमटे यांच्या त्यागाविषयी बोलायला सुरुवात केली. बा. भ. बोरकर यांनी साधनाताईंना एकदा पत्र लिहिलं आणि त्यात त्यांनी दोन ओळी लिहिल्या... 
उत्तुंग हे वादळ कसे, तुझ्या मुठीत माइले
आज मी मुली तुझी वंदितो ग पाऊले

त्यांचं वाचन आणि त्यातही त्यांना पाठ असलेले संस्कृत श्लोक, कविता ऐकून मी थक्क झाले. बोलता बोलता त्यांना आमच्या गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या गाडीचं सर्हिटससिंग आणि छोटी-मोठी दुरुस्ती करायची असल्याचं मी बोलताच त्यांनी जाताना लगेचच गाडी नेली आणि सायंकाळी आणूनही दिली. बिलाची रक्कम अगदी किफायतशीर, योग्य! त्यांच्या या तत्परतेविषयी मला खूपच आश्चर्य वाटलं. त्यानंतर अधूनमधून त्यांचा फोन यायचा... ‘मॅडम कशा आहात?’ कुठे काय चांगलं मिळतं इथपासून अनेक गोष्टी अप्पांकडून मला कळत गेल्या आणि त्यांच्यातल्या सच्च्या माणसाशी स्नेहाचं एक नातं निर्माण झालं. 

यानंतर ‘विदेशी जीनियस’ असो वा ‘भारतीय जीनियस,’ अप्पा फोन करून घरी येत राहिले आणि पुस्तकांवर स्वाक्षरी घेत राहिले. गोष्ट इथेच थांबत नाही, तर केवळ माझीच नव्हे, तर त्यांना आवडलेली, नव्यानं वाचलेली पुस्तकंही अप्पा घेऊन येतात. त्यावर आपलं मत व्यक्त करतात आणि ते पुस्तक जाताना ‘वाचा मॅडम’ असं आवर्जून म्हणून ठेवून जातात. या वयात त्यांनी कॅलिग्राफीचा वर्ग केल्यामुळे त्या पुस्तकावर ते अतिशय सुबक, सुवाच्य अक्षरात नावही घालून देतात. 

अप्पांशी गप्पा मारताना अनेक गोष्टी लक्षात आल्या. अप्पांवर अनेक मानसिक आणि शारीरिक आघात झाले. त्यांच्या जागी दुसरा कोणी असता तर खचला असता. जिवाला कंटाळला असता. चिडचिडा आणि विक्षिप्त झाला असता; मात्र आपल्या दुःखांवर, अडचणींवर मात करण्यासाठी अप्पांनी सकारात्मक मार्गाचा अवलंब केला. त्यांनी पुस्तकांना आपला मित्र बनवलं. खरं तर शिक्षण फारसं नाही, वयामुळे दृष्टी कमजोर झालेली, पाठीचा त्रास, शरीराच्या अनेक कुरबुरी, कौटुंबिक अनेक समस्या, असं असतानाही त्यांनी पुस्तकांची साथ सोडली नाही आणि पुस्तकांनी त्यांची! 

‘पुस्तकपेठ’चे संजय भास्कर जोशी यांच्यासोबत अप्पा‘अक्षरधारा’ असो वा ‘पुस्तक पेठ’... अप्पा नियमितपणे मंदिरात जावं तसं पुस्तकांच्या दुकानात जातात. दुकानमालकाकडे नवीन पुस्तकांची चौकशी करतात आणि त्यांच्या सल्यातंने ती विकत घेतात. त्यांना आवडलेल्या पुस्तकांच्या जास्त प्रती विकत घेऊन ती आवर्जून दुसऱ्याला भेट देऊन वाचायला भाग पाडतात. लहान लहान गावांमध्ये जाऊन तिथल्या शाळांना भेटी देऊन तिथलं ग्रंथालय पुस्तकं देऊन आणखी मोठं करायला ते हातभार लावतात. विकत घेतलेल्या पुस्तकांवर त्यांना लेखक किंवा लेखिकेची स्वाक्षरी हवी असते. त्यासाठी ते संपर्क साधतात आणि जमेल तसं जमेल तिथे पोहोचून स्वाक्षरी मिळवतात. पहिल्याच भेटीत ते समोरच्याच्या मनात आपली जागा निर्माण करतात. 

आपल्या गॅरेजला यावं असं निमंत्रण त्यांनी मला दिलं. एके दिवशी त्या भागातून जात असताना मी अप्पांना फोन केला आणि मी येत असल्याचं सांगितलं. पुण्यातल्या पौड रोडसारख्या गजबजत्या भागात गॅरेजसाठीचा इतका मोठा परिसर बघून मी चकित झाले. अनेक गाड्या लागलेल्या... काहींची दुरुस्ती सुरू, तर काहींची आंघोळीची तयारी! सगळे जण आपापल्या कामात मग्न! मी अप्पांच्या तिथेच असलेल्या छोट्याशा ऑफिसमधल्या खुर्चीत स्थानापन्न झाले. समोरच्या भिंतीवर अच्युत गोडबोले यांच्याबरोबरचा त्यांचा एक फोटो लावलेला दिसला. मी त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं बघताच ते म्हणाले, ‘तुम्ही लेखक मंडळी आमच्यासाठी देवासारखी! आता याच माणसानं बघा ना, किती क्षेत्रांत किती अभ्यासपूर्ण काम करून ठेवलंय. आमच्यासारख्या वाचकांवर त्यांनी खूप मोठे उपकार करून ठेवलेत. मी यांचा चाहता आहे. केवळ बुद्धिमत्ताच नव्हे, तर या माणसातल्या माणुसकीनं मला आकर्षित केलं आहे. त्यांच्यासोबतचा फोटो मला खूप ऊर्जा देतो.’

पुण्यातल्या वाचन जागर महोत्सवात दीपा देशमुख आणि वसंत वसंत लिमये यांच्यासोबत अप्पामी अप्पांचं बोलणं ऐकत होते. बोलत असतानाच समोर टेबलवर डिंकाचे लाडू आले, गरमागरम कॉफी आली. ‘चितळें’चे डिंकाचे लाडू किती चांगले असतात आणि रोज एक लाडू आवर्जून खाल्ला पाहिजे, असं अप्पांनी आग्रहानं सांगितलं. अप्पांच्या गॅरेजमधल्या काम करणाऱ्यांशी माझं बोलणं झालं. बोलायला अतिशय विनयशील असलेली ही सगळी माणसं अप्पांवर जीव टाकणारी. अप्पांनाही त्या सगळ्यांविषयी खूप ममत्व दिसलं. अप्पांचं वाचनवेड केवळ त्यांच्यापुरतं मर्यादित नसून, ते आपला मुलगा सागर, त्याचे तुषार वगैरे मित्र आणि गॅरेजमध्ये काम करणारी मंडळी या सगळ्यांशीच पुस्तकांविषयी बोलत राहतात. 

या मंडळींना आपण पुस्तकातल्या गोष्टी ऐकायची सवय कशी लावली याविषयी एक गमतीदार किस्सा अप्पा सांगतात. एकदा अब्दुल कलामांचं ‘विंग्ज ऑफ फायर’ हे पुस्तक वाचून अप्पा खूपच प्रभावित झाले. या पुस्तकाविषयी ते दिसेल त्याच्याशी बोलायला लागले. एके दिवशी तर त्यांनी आपल्या एका मेकॅनिकला विचारलं, ‘तुला अब्दुल कलाम माहीत आहेत का?’ तो आपली मान वर न करता, काम करत म्हणाला, ‘हो माहीत आहेत ना, अब्दुल आणि कलाम हे दोन भाऊ असून, ते मार्केट यार्डमध्ये काम करतात. अब्दुल जरा बरा आहे; पण कलाम एकदम बदमाश माणूस आहे बघा. ‘अप्पांनी कपाळावर हात मारून घेतला आणि त्याला म्हटलं, ‘अरे, तुला कळतंय का तू काय बोलतो आहेस? अब्दुल कलाम हे आपल्या भारताचे राष्ट्रपती आहेत.’ त्यावरही त्याच्या चेहऱ्यावरची रेषाही हलली नाही. राष्ट्रपती कोणीही असला, तरी त्याच्या रोजच्या आयुष्यावर त्याचा कुठलाच परिणाम होणार नाहीये, असं त्याचा चेहरा सांगत होता. आहे तो क्षण जगायचा. आपल्याला ना भूतकाळ, ना भविष्यकाळ! त्या मेकॅनिकचं जगण्याचं तत्त्वज्ञान ऐकून अप्पांनी त्यांच्या नीरस, रटाळ आयुष्यात थोडी झुळुक आणण्यासाठी त्यांनी वाचलेल्या पुस्तकांवर सोप्या शब्दांत बोलायला सुरुवात केली. त्यानंतर, काम करणाऱ्या सगळ्यांनाच अप्पांकडून नवनवीन माहिती ऐकायची गोडीच लागली. एक दिवस जरी अप्पांनी काही सांगितलं नाही, तर सगळे जण आपापलं काम सोडून अप्पांजवळ येऊन ‘नवं काही सांगा’ असं म्हणायला लागले. 

अप्पांच्या गॅरेजमधले कर्मचारीअप्पांच्या या लाघवी स्वभावानं त्यांनी अनेक माणसं जोडली आहेत. तसंच गाडीची दुरुस्ती असो वा वॉशिंग, ते अतिशय तत्पर सेवा पुरवतात. ग्राहकाला संतुष्ट करतात. एकदा तर अशी गंमत झाली, एक माणूस त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, ‘तुम्ही कुठलंही वाहन धुवून देता का?’ अप्पा म्हणाले, ‘हो देतो. घेऊन या.’ त्यावर तो मनुष्य म्हणाला, ‘बघा बरं, मी वाहन आणल्यावर मग नाही म्हणाल.’ अप्पा म्हणाले, ‘मी शब्दाचा पक्का माणूस आहे. तुम्हाला मी विन्मुख परत पाठवणार नाही.’ तो मनुष्य गेला आणि काहीच वेळात चक्क एका महाकाय हत्तीला घेऊन अप्पासमोर येऊन उभा राहिला. अप्पा म्हणाले, ‘हे काय आहे?’ तो म्हणाला, ‘लक्ष्मीचं वाहन!’

अप्पांनी हत्तीच्या आंघोळीची तयारी केली. पाइप घेऊन सगळे मेकॅनिक हत्तीला आंघोळ घालू लागले. हत्तीनंही मनसोक्त आनंद लुटला आणि हे अनोखं दृश्य बघण्यासाठी अप्पांच्या गॅरेजच्या परिसरात प्रचंड मोठी गर्दी जमली. तासाभराने हत्तीची ऐतिहासिक आंघोळ आटोपली. हत्तीच्या मालकानं समाधानानं अप्पांना बिलाची रक्कम विचारली. अप्पांनी नम्रपणे पैसे घेण्यास नकार दिला. हत्तीला आंघोळ घालण्याचं आपल्यालाच पुण्य मिळालं, त्याची सेवा करता आली, अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि हत्तीला निरोप दिला. 

गॅरेजमधल्या कर्मचाऱ्यांसोबत अप्पा

पुरोगामी विचारांचा, माणसं जोडणारा, मदतीला धावणारा अप्पा नावाचा हा माणूस ‘पुस्तके आम्हा सोयरे वनचरे’ म्हणत मस्त जगतोय. प्रत्येक वेळी फोन केला, की मॅडम ‘सिंफनी’ची वाट बघतोय, पुढलं पुस्तक कधी येणार, असं आवर्जून विचारत असतो. आपल्या काटेरी आयुष्याला सुंदर बनवणारी, आपल्याबरोबरच इतरांच्याही आयुष्यात आनंद भरणारी अप्पांसारखी माणसं म्हणजे अनवट वाटेवरती फुलं उधळत चालणारी माणसं आहेत.

अप्पांना भेटायचंय? अप्पांकडे गाडी दुरुस्त करायचीय? अप्पांबरोबर गप्पा मारत पुण्यात कुठे काय चांगलं मिळतं याची यादी घ्यायचीय? त्यांच्याशी जरूर संपर्क साधा. 

संपर्क : ९८२२३ ३०४२०, ९९२१२ १८८८८

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search