Next
लंबी रेस का घोडा!
BOI
Sunday, November 05, 2017 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

पवारांसारखा दिग्गज नेता समोर असताना आणि शिवसेनेसारखा सतावणारा मित्रपक्ष पाठीशी असताना देवेंद्र फडणवीस हे सरकार उत्तम पद्धतीने चालवू शकले, यात त्यांची कसोटी लागलेली आहे. त्यातून एक नवा नेता महाराष्ट्राला मिळाला आहे. अमिताभ बच्चनच्या शब्दात सांगायचे तर हा ‘लंबी रेस का घोडा’ आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीची मीमांसा करणारा ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी लिहिलेला लेख येथे प्रसिद्ध करत आहोत. 
............
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. खरे बघितले तर तोच एक मोठा चमत्कार आहे आणि म्हणूनच आजच्या सर्व भाजप मुख्यमंत्र्यांत हा एक तरुण नेता राजकीय कसोटीला उतरला, असे म्हणावे लागेल. कारण बाकीच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी स्पष्ट बहुमत आहे किंवा निदान अल्पमताचे सरकार इतक्या आत्मविश्वासाने चालवण्याची सत्त्वपरीक्षा अन्य कुठल्या भाजप मुख्यमंत्र्याला द्यावी लागलेली नाही. मुळात कुठलाही प्रशासकीय अनुभव गाठीशी नसताना फडणवीस यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. खुद्द नरेंद्र मोदी वा भाजपच्या अन्य मुख्यमंत्र्यांना कधीच अल्पमताचे सरकार चालवावे लागले नाही. जिथे तशी वेळ आली, तिथे किरकोळ अन्य पक्षीय आमदारांचा पाठिंबा घ्यावा लागला होता. दुसरीकडे फडणवीस यांची स्थिती अतिशय दुर्धर अशी बनवण्यात आली होती. सरकार स्थापन झाल्यापासून विरोधी पक्ष या मुख्यमंत्र्याला गोत्यात घालायला उत्सुक होतेच; पण त्याच्याही आधी स्वपक्षानेही फडणवीसांना राजकारण गढूळ करूनच हे अग्निदिव्य पार पाडण्यास पुढे केले होते. जिथे म्हणून आशेने बघावे, तिथे अडथळे व समस्याच या तरुण नेत्याला भेडसावत होत्या. दुसरा कोणीही अशा स्थितीत राजीनामा टाकून फरारी झाला असता. यापूर्वी इतक्या प्रतिकूल परिस्थितीत सरकार चालवण्यासाठी शरद पवारच ख्यातनाम होते. अन्य कुणाला इतक्या विपरीत स्थितीत सरकार स्थापन करावे लागले नव्हते, की चालवण्याचे शिवधनुष्य पेलण्याचा प्रसंग आला नव्हता. म्हणूनच सलग तीन वर्षे कुठल्याही प्रसंगाला देवेंद्र फडणवीस पुरून उरले, हा चमत्कार मानायला हवा. किंबहुना हा नवा तरुण नेता पुढील दोन दशकांत भाजपाला दीर्घकालीन नेतृत्व देऊ शकेल, अशी खात्रीच त्याने घडवली असे म्हणता येईल. तीन वर्षांपूर्वी राज्यातली राजकीय स्थिती काय होती?

लोकसभा जिंकताना राज्यात शिवसेना व भाजप यांच्यात युती होती आणि तशीच ती विधानसभेतही चालू राहील, ही अनेकांची अपेक्षा होती; पण विधानसभेचा मोसम जसजसा जवळ येत गेला, तसतशी दोन पक्षांतली रस्सीखेच वाढत गेली. पाव शतकातली युती त्यातूनच संपुष्टात आली. यापूर्वी युतीमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे प्रमुख नेते होते. त्यांच्या निधनानंतर सेनेवर उद्धव ठाकरे यांना तितकी हुकूमत राखता आलेली नाही. बाळासाहेबांच्या हयातीतच नारायण राणे व राज ठाकरे बाहेर पडले आणि शिवसेनेची संघटना विस्कळीत होत गेली. युती असताना त्याचे चटके भाजपलाही सोसावे लागले; पण युती सोडून बाहेर पडण्याइतका भाजपही समर्थ नव्हता की त्याच्या राज्य नेतृत्वापाशी तितका आत्मविश्वास नव्हता; मात्र नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर भाजपमध्ये नवा उत्साह संचारला आणि देशभर मोदीलाट असल्याने त्याचाच प्रभाव महाराष्ट्रातही दिसत होता. त्याचाच लाभ युतीला मिळाला; पण दिल्लीची सत्ता काबीज केल्यावर आणि महाराष्ट्रातही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला धूळ चारल्यावर, भाजपच्या इथल्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला होता. अशा वेळी शिवसेनेला झुगारून बहुमत मिळवणे भाजपला तरीही अशक्य होते आणि विधानसभेच्या निकालात त्याचेच प्रतिबिंब पडले. त्यात मोठा पक्ष होऊन दाखवताना भाजपपाशी कोणी खंबीर राज्यनेता मात्र नव्हता. ज्याला राज्यव्यापी चेहरा म्हणता येईल, असे गोपीनाथ मुंडे यांचे लोकसभा निकालानंतर अल्पावधीतच निधन झाले. त्यांच्या तोडीस तोड म्हणता येतील असे नितीन गडकरी लोकप्रिय चेहरा म्हणावेत असे नेते नव्हते. त्यामुळेच सेनेशी फारकत घेऊन खेळलेला जुगार पूर्णपणे यशस्वी झाला नाही आणि राज्यात सत्ता जवळ असली तरी सोपी राहिलेली नव्हती. बहुमतही नव्हते आणि इतरांशी सहज जुळवून घेऊ शकेल, असा कोणी मुरब्बी नेताही भाजपकडे नव्हता. 

ही झाली राज्यातली पक्षीय मांडणी. विविध पक्षांमध्ये भाजप सर्वांत प्रभावी व यशस्वी पक्ष ठरला असला, तरी त्याच्यापाशी स्वतःचे बहुमत नव्हते. तरी शरद पवारांनी बाहेरून बिनशर्त पाठिंबा देऊन सरकार स्थापनेची पळवाट दिलेली होती; मात्र ‘राष्ट्रवादी’लाच नावे ठेवून इतके यश मिळवल्यानंतर त्याच पक्षाच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणे वा चालवणे हा आत्मघात ठरला असता. त्यामुळे भाजपला यश मिळाले, तरी पेच पडलेला होता. त्यातच राज्याचा नेता कोण याचाही निकाल लागायचा होता. अर्थातच केंद्रीय मंत्रिपद भूषवणारे नितीन गडकरी स्पर्धेत होते. तसेच मुंडेकन्या पंकजा, मुंडेंच्या पिढीतले एकनाथराव खडसेही स्पर्धेत होते. शक्य झाल्यास दुसऱ्या फळीतले देवेंद्र यांच्या पिढीतलेही काही नेते संधी शोधत होते. ही झाली पक्षांतर्गत बाजू; पण महाराष्ट्राची एक वस्तुस्थिती आणखी होती. या राज्यात ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद खूप जुना आहे आणि त्याला राजकीय इतिहास आहे. अशा स्थितीत देवेंद्र फडणवीस हे नाव नेत्यांमध्ये येत असले, तरी जातीचा बोजा त्यांच्या माथी होता. म्हणूनच त्यांचे नाव पुढे करायला कोणी राजी नव्हते. किंबहुना याची एक पार्श्वभूमीही सांगता येईल. त्यापूर्वी एका वाहिनीला मुलाखत देताना पवारांनी परोक्ष या विषयाचा उल्लेख केलेला होता. ‘महाराष्ट्राला विकासाच्या राजकीय मार्गाने घेऊन जाईल असा नेता कोण व कुठल्या पक्षात आहे,’ या प्रश्नाचे उत्तर देताना पवार म्हणाले होते, ‘नितीन गडकरी तसे नेते आहेत; पण त्यांचाही पक्ष गडकरींना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार बनवणार नाही.’ पवारांनी असे सांगण्यामागे महाराष्ट्रातील जुना तोच राजकीय वाद कारण होता. मग इतकी उत्तम प्रतिमा असून गडकरी जातीमुळे मागे पडत असतील, तर फडणवीसांचा क्रमांक त्यात आघाडीवर असूच शकत नाही. अशा स्थितीत या तरुणाला मुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागली होती.

मग एका बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पारंपरिक विरोधक होते, तर नव्याने शत्रुत्व घेतलेली शिवसेना विरोधात दंड थोपटून उभी होती; पण मोदी-शहांच्या नेतृत्वाने गडकरींना नकार देऊन फडणवीस यांनाच आपला कौल दिला. कुठलाही पूर्वानुभव गाठीशी नसताना त्यांनी जबाबदारी स्वीकारली. त्यांनी बहुमताची तजवीजही न करता थेट शपथविधी उरकला आणि राजकारण अधिक गुंतागुंतीचे होत गेले. कारण दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना यांची बेरीज बहुमतात जाणारी होती आणि त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाच तर फडणवीस सरकार एकही दिवस टिकण्याची शक्यता नव्हती. तरीही शपथविधी उरकणे, तसेच बहुमत सिद्ध करायला विधानसभेचे अधिवेशन बोलावणे, हा मोठा जुगार होता. तोही खेळला गेला आणि आवाजी मतदानाने सरकारने तग धरला; पण त्यात केलेली चलाखी लपून राहिली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यातला पाठिंबा लोकमताला रुचलेला नव्हता आणि त्याची कबुली खुद्द फडणवीसांनीच आपल्या वक्तव्यातून दिली. राजकीय हयातीत लोकांचे शिव्याशाप जितके मिळाले नाहीत, तितके विश्वास संपादनानंतर चार दिवसांत वाट्याला आले, अशी कबुली देणारा बहुधा देशातला हा पहिलाच मुख्यमंत्री असावा. त्यातून फडणवीसांचा प्रामाणिकपणा दिसतो, तसेच वास्तवाला सामोरे जाण्याची इच्छाशक्तीही जाणवते; पण पुढल्या काळात त्यांनी कट्टर शत्रू झालेल्या शिवसेनेला अधिक सत्तेचा वाटा दिल्याशिवाय सत्तेत सहभागी करून घेण्याची चतुराई दाखवली. शिवसेनेतील नेत्यांच्या सत्तालोलुपतेचा धूर्तपणे वापर करून घेत त्यांनी सत्तेवर मांड ठोकण्याची जी हिंमत दाखवली, ती कौतुकास्पद आहे. कारण त्यांनी आपली अगतिकता संपवून शिवसेनेलाच सत्तेसाठी गरजू बनवले आणि बहुमताचा खुंटा पक्का करून घेतला. नंतर त्यांनी मागे वळून बघितले नाही.

तीन वर्षांपूर्वी मोदीलाटेने राजकारण बदलले. त्याच्याआधी महाराष्ट्रात तरी संभाजी ब्रिगेड वा मराठा अस्मितेने इतके आक्रमक रूप धारण केले होते, की फडणवीस यांच्यासारख्या ब्राह्मणाने मुख्यमंत्रिपदाचे स्वप्नही बघणे हा गुन्हा ठरला असता. पुण्यातल्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा खणून काढला गेला आणि त्यासाठी मराठा तरुणांचे जमाव हिंसक बनवून पुढे करण्यात आले होते. अवघ्या महाराष्ट्राची समस्या म्हणजे इथला ब्राह्मणवर्ग असा एक देखावाच उभारलेला होता. संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड वा मराठा सेवा संघ अशा विविध नावांनी धुडगूस घातला जात होता. त्यामुळे कुठल्याही स्थितीत भाजप व ब्राह्मणी शिक्का बसलेल्या पक्षाला महाराष्ट्रात काही राजकीय स्थान असू शकते, यावर राजकीय विश्लेषकांचा विश्वासही बसला नसता. अशा ब्राह्मण विरोधाला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची छुपी साथ व कुमक होती, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळेच शिवसेना-भाजप युती वा भाजप कोणत्या मराठा नेत्याला पुढे करणार, याची प्रतीक्षा चालू होती. मग तोच भाजप फडणवीस नामक कुणा ब्राह्मणाला पुढे करील, ही शक्यताच दुरापास्त होती. किंबहुना म्हणूनच नितीन गडकरी पात्र असूनही भाजप त्यांचे नाव पदासाठी पुढे करू शकत नाही, असे पवारांनीच सांगून टाकलेले होते. हे गडकरींसारख्या अनुभवी नेत्यांच्या बाबतीत असेल, तर फडणवीस यांच्यासारख्या अननुभवी तरुणाची कथाच वेगळी होते ना? त्याने कोणाकोणाला अंगावर घ्यावे आणि कुणाशी कसे लढावे? पक्षांतर्गत, पक्षबाह्य व राजकीय परिस्थिती अशा सर्वच बाजू फडणवीसांना अगदी प्रतिकूल होत्या. म्हणूनच ‘दिल्लीत नरेंद्र व मुंबईत देवेंद्र’ ही घोषणा सोपी असली, तरी व्यवहारी जगात ती अशक्य वाटणारी बाब होती. किंबहुना तसे काही झाले, तर ते फडणवीस यांच्यासाठी अग्निदिव्यच असेल, अशी स्थिती होती. मागल्या दोन दशकांत महाजन-मुंडे यांनी महाराष्ट्रातला भाजप आपल्या खिशात टाकला होता. त्यांच्या कृपेशिवाय अन्य कोणाला पक्षात डोके वर काढता येत नव्हते. त्यापैकी प्रमोद महाजन यांचे आकस्मिक अपघाती निधन झाले आणि मुंडे यांना एकहाती पक्षाचा डोलारा सांभाळावा लागत होता. त्यातही नितीन गडकरी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर दुफळी माजलेली होती. एका क्षणी मुंडे पक्ष सोडायला निघाल्याच्या बातम्या आल्या होत्या; पण तो विषय लवकरच निकालात निघाला. तरी गटबाजी कायम राहिली होती; पण लोकसभेनंतर अकस्मात मुंडे यांचेही अपघाती निधन झाले आणि महाराष्ट्रात भाजपला नाथाभाऊ खडसे वगळता कोणी ज्येष्ठ नेता उरला नव्हता. म्हणून तर जेव्हा विधानसभेच्या वेळी युतीमध्ये बेबनाव निर्माण झाला, तेव्हा प्रदेशाध्यक्ष फडणवीस असूनही निर्णयाची घोषणा खडसे यांनीच केली होती. अनेक पक्षांतून इच्छुकांना गोळा करण्याचे डावपेचही नाथाभाऊच खेळत होते. साहजिकच त्यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नव्हती. पुढे मुख्यमंत्रिपदाचे नाव निश्चित करण्याची वेळ आली, तेव्हाही खानदेशात आपल्या अनुयायांच्या जमावाचे मोर्चे, दिंड्या काढून त्यांनी त्या शंकेला पुष्टी दिली होती. ही पार्श्वभूमी विचारात घेतली, तर फडणवीस यांच्या कारकिर्दीकडे बघता येईल. त्यांच्या शपथविधीवर शिवसेनेकडून बहिष्कार घालण्यापर्यंत वेळ आली आणि विधानसभेच्या अधिवेशनात शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांची विरोधी नेतेपदी नेमणूक करण्यापर्यंत परिस्थिती गेलेली होती. अशा वातावरणात पंकजा मुंडे तर आपली जाहिरात ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ म्हणून डंका पिटत होत्या आणि नाथाभाऊ डझनभर खाती आपल्याकडे घेऊनही नाराज होते. म्हणजेच सर्वोच्चपदी फडणवीस; पण त्यांच्या हाती सत्तेची सूत्रे नाहीत, अशीच एक समजूत राजकीय क्षेत्रात निर्माण झालेली होती.

...पण नरेंद्र मोदी हा अपवाद आहे आणि त्यांच्यामध्ये अपवादात्मक निर्णय घेण्याची धमक आहे. तसे नसते, तर अल्पमतातले सरकार चालवण्यासाठी या नव्या तरुणाला मुख्यमंत्रिपदी बसवण्याचा जुगार खेळला गेलाच नसता. अगदी प्रामाणिकपणे सांगायचे, तर माझ्यासारख्या अनुभवी पत्रकाराला व राजकारणाच्या अभ्यासकालाही ही निवड राजकीय आत्महत्या वाटली होती आणि तसे मी तेव्हा अनेक लेखांतून स्पष्टपणे मांडलेले आहे. त्यामुळेच त्या अर्थाने फडणवीस यांनी माझा व अनेकांचा साफ भ्रमनिरास केला, हे आता मान्य करायला हवे. कारण हा अनुभवी तरुण नेता अशा प्रतिकूल राजकीय वातावरणात सरकार चालवू शकणार नाही आणि कोवळ्या वयात अशी गुंतागुंतीची जबाबदारी आल्यामुळे त्याखाली पुरता दबून जाईल, असेच वाटत होते. किंबहुना त्यामुळे चांगली पात्रता असल्याने दीर्घ काळ मराठी राजकारणावर छाप पाडण्याच्या कुवतीच्या एका तरुण नेत्याचा हकनाक बळी दिला गेला, अशीही माझी तत्कालीन प्रतिक्रिया होती; पण तीन वर्षे फडणवीस यांनी राज्यातील सरकार व राजकारण यांचा समतोल राखण्यातून आपले कौशल्य सिद्ध केले आहे. अगदी विरोधकांना चोख उत्तर देत आणि शत्रुवत वागणाऱ्या मित्रांनाही काटेकोर हाताळून, आपण दीर्घकालीन मॅरॅथॉन शर्यतीचे खेळाडू असल्याची साक्षच दिलेली आहे. आपले दुबळेपण लक्षात ठेवून आणि विरोधकांचे दुबळेपण जोखून, या नेत्याने मुख्यमंत्रिपद नुसते सांभाळले नाही, तर विविध समस्यांची हाताळणी करताना लवचिकता दाखवून मुरब्बीपणाचे पुरावे दिलेले आहेत. विरोध किती कडाडून करावा आणि कुठे त्याच विरोधाची धार थोडी कमी करून बाजी मारावी, याचे तारतम्य असल्याशिवाय हे अग्निदिव्य पार पाडणे अशक्य आहे. विरोधकांना रोखायचे आणि पक्षांतर्गत स्पर्धकांना लगाम लावायचा, याचे धडे या तरुणाने या अनुभवातून गिरवलेले दिसतात.

तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांची राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पक्षाने निवड केली, तेव्हा त्यांच्याकडे नागपूरचे वा विदर्भाचे नेते म्हणून बघितले जात होते. विदर्भवादी अशी त्यांची हेटाळणी शिवसेनेने केलेली आहे. ती काहीशी वस्तुस्थिती होती. कारण प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले, तरी राज्याच्या पक्षीय राजकारणात तेव्हाही मुंडे-खडसे यांचाच वरचष्मा होता. त्यापैकी विधानसभा निवडणूक लागली, तेव्हा मुंडे हयात नव्हते आणि खडसे मुख्यमंत्रिपद मिळण्यासाठी ईर्ष्येने कामाला लागले होते. ते गमावल्यामुळे खडसे प्रतिस्पर्धी झाले होते. उलट राज्यात स्वबळावर ६३ आमदार निवडून आणणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख अधिक राज्यव्यापी नेतृत्व म्हणून उदयास आले होते. त्यामुळेच पुढल्या तीन वर्षांत फडणवीस यांची खरी राजकीय स्पर्धा पक्षात खडसे यांच्याशी, तर राज्यात उद्धव ठाकरे यांच्याशी रंगलेली होती. त्यापैकी खडसे यांना त्यांच्याच एका आगाऊपणाने गोत्यात आणले आणि स्पर्धेतून बाजूला केले. मग उरले उद्धव ठाकरे आणि शिवसेना! त्यांच्याशी नाजूक संबंध सांभाळत सरकार चालवण्याची कसरत फडणवीस यांना करावी लागली. वास्तविक उद्धव ठाकरे यांनी सत्तेत सहभागी होण्यापेक्षा बाहेरून पाठिंबा दिला असता, तर तेच मुख्यमंत्र्याला आपल्या बोटावर नाचवू शकले असते; पण ती शक्यता सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे राहिली नाही. तिथे फडणवीस यांनी पहिली बाजी मारली. त्यांनी कुठलेही महत्त्वाचे खाते सेनेला दिले नाही; पण मंत्रिपदे डझनभर दिली. त्यामुळे सत्तेत असूनही शिवसेनेला कुठलाही निर्णायक अधिकार मिळू शकला नाही; पण अनेक नेत्यांना सत्तापदाची चटक लागली. त्यामुळे शिव्याशाप कितीही दिले, तरी सेनेची सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता संपून गेली. तिथेच त्यांनी उद्धव ठाकरे यांचा मोठा पराभव केलेला होता. म्हणूनच मागल्या तीन वर्षांत वारंवार धमक्या देऊनही सेनेला सत्तेबाहेर पडणे शक्य राहिलेले नाही.

यातली गोम लक्षात घेण्यासारखी आहे. विधानसभेत तुटलेली युती सत्तेत परत एकत्र आली. तशीच ती अनेक महापालिका वा जिल्हा परिषदेतही सत्तेसाठी एकत्र आली; पण जवळपास कुठल्याच महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये भाजपने शिवसेनेला मतदानाच्या वेळी युतीमध्ये घेतलेले नाही. निवडणूकपूर्व युती हा विषय गेल्या तीन वर्षांमध्ये कायमचा निकालात काढला गेला आहे. या कालावधीमध्ये शिवसेनेला स्वबळावर लढताना भाजपला मागे टाकण्यात यश मिळू शकले नाही. अगदी मुंबईतही भाजपने शिवसेनेला तुल्यबळ नगरसेवक निवडून आणताना आपली मते वेगळी राखली व टिकवलेली आहेत. या कालखंडात शिवसेनेने सतत राज्य सरकार वा केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात जोरदार झोड उठवलेली आहे; पण त्याचा लाभ सेनेला मिळू शकला नाही, की अन्य विरोधी पक्षांनाही त्याचा फायदा घेता आलेला नाही; पण दरम्यान या प्रत्येक निवडणुकीत राज्यातील भाजपच्या प्रचाराची एकहाती सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी उचललेली आहे. विधानसभेच्या वेळी तशी स्थिती नव्हती. फडणवीस हे भाजपचे स्टार प्रचारक नव्हते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना ती जबाबदारी पेलावी लागत होती; पण मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक निवडणुकीत फडणवीस यांनी एकट्याने शेकडो प्रचारसभा घेऊन आपली भूमिका लोकांपर्यंत नेली आणि मतांच्या रूपाने तिला प्रतिसाद मिळत असल्याचेही सिद्ध केले आहे. थोडक्यात, तीन वर्षांत स्थिती कशी बदलली, ते लक्षात घेण्याची गरज आहे. तेव्हा एकट्या उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या प्रचाराची आघाडी सांभाळली होती, तर पलीकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखा दिग्गज आखाड्यात उतरला होता. तरीही सेनेने ६३ आमदार निवडून आणले होते; पण ती आघाडी गेल्या तीन वर्षांत शिवसेना गमावून बसली आहे आणि त्याच काळात भाजपचा आघाडीचा प्रचारक म्हणून फडणवीस समोर आले आहेत.

शिवसेना वा अन्य विरोधकांशी दोन हात करायला, आता भाजपला पंतप्रधानांची मदत मागायची गरज राहिलेली नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर राजव्यापी नेता म्हणून निर्माण झालेली पक्षातील पोकळी फडणवीस यांनी भरून काढली आहेच; पण त्याच कालावधीत उद्धव ठाकरे यांच्याशी झुंज देत त्यांना तुल्यबळ होऊन पुढे मुसंडी मारली आहे. या तीन वर्षांत आपण काय मिळवले वा काय गमावले, याचा विचार शिवसेनेने करायचा असेल, तर ही बाब लक्षणीय आहे. गेल्या महापालिका व जिल्हा-तालुका मतदानात राज्यभर दौरे करून फडणवीसांनी आपली एक प्रतिमा जनमानसात ठसवलेली आहे. विधानसभेच्या वेळी तशी प्रतिमा एकहाती प्रचार करून उद्धव ठाकरे यांनी उभी केली होती. मोदी सोडल्यास उद्धव ठाकरे यांच्याइतका कोणी अन्य राज्यनेता तेव्हा दुसरा नव्हता. मागल्या तीन वर्षांत तीच जागा देवेंद्र फडणवीस यांनी बळकावली आहे. याला राजकारण म्हणतात. सतत भागीदारी द्यायची आणि लढाईच्या रिंगणात मात्र परस्पर विरोधात दोन हात करायचे, अशी काही चमत्कारिक स्थिती या तीन वर्षांत राहिलेली आहे. त्यातला धूर्तपणाही समजून घेतला पाहिजे. शिवसेनेने सतत फडणवीस यांच्यावर झोड उठवली आहे; पण तिचे मंत्री मात्र गप्प असतात. मुख्यमंत्री सहसा अकारण शिवसेनेवर तोंडसुख घेत नाहीत. जिथे गरज असेल तिथे अत्यंत बोचरे शब्द वापरून सेनेला घायाळ करीत असतात. शिवसेना सत्तेसाठी अगतिक आहे आणि तिच्यात लढण्याची क्षमता राहिलेली नाही, असे चित्र निर्माण करण्यात फडणवीस कमालीचे यशस्वी झाले आहेत. त्यासाठी आवश्यक असलेली लवचिकता त्यांनी दाखवली आहे आणि प्रसंगी आपण आक्रमकही होऊ शकतो, याचा पुरावा दिलेला आहे. राजकारण वाचाळतेने साध्य होत नाही, तर अनेकदा शब्दांपेक्षाही कृती प्रभावी असते, याची साक्ष त्यांनी दिलेली आहे.

मध्यंतरी शिवसेनेच्या एका नेत्याने जुलै महिन्यात भूकंप करणार असल्याचे बोलून दाखवले. तेव्हा फडणवीस यांनी दिलेले उत्तर मोठे सूचक होते. आपला पक्ष कधीही मध्यावधी निवडणुकीला सज्ज असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले. मजेशीर गोष्ट अशी, की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ‘मातोश्री’ येथे उद्धव ठाकरे यांना राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने भेटणार होते. त्याच दरम्यान फडणवीसांनी ‘मध्यावधी’ची भाषा केलेली होती. त्याचा अर्थ कुठल्याही क्षणी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच्या धमक्यांना भाजप वा मुख्यमंत्री भीक घालत नाहीत, इतकेच त्यांना सांगायचे होते. किंबहुना आपण तशी तयारीच करत आहोत आणि शिवसेनेसह इतर पक्षांनी हिंमत असेल तर ते आव्हान स्वीकारावे, असा इशाराच त्यातून दिलेला आहे. इतकी टोकाची भाषा बोलण्याची हिंमत या मुख्यमंत्र्यात कुठून आली? एक तर त्याला आता तीन वर्षांच्या अनुभवाने काही शिकवलेले आहे. दुसरी गोष्ट आजच्या परिस्थितीत कुठलाही विरोधक आपल्याशी दोन हात करण्याइतका सबळ उरलेला नाही, अशी खात्री आहे. किंबहुना आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष निवडणुका लढण्याची वा जिंकण्याची इच्छाशक्तीच गमावून बसलेले आहेत. त्यामुळे फडणवीसांना ते आव्हानच वाटेनासे झाले आहे. उरलेली शिवसेना मित्र की शत्रू अशा गोंधळात स्वतःच फसलेली आहे. तिलाही राज्यव्यापी लढतीची इच्छा उरलेली नाही. अन्यथा जिल्हा, पालिका मतदानाच्या वेळी पक्षप्रमुख राज्यभर फिरताना दिसले असते. राज्याचा कारभार सांभाळतानाही फडणवीस राज्यभर सभा घेत होते आणि उद्धव ठाकरे मुंबई, पुणे, नाशिकच्या पलीकडे फिरकू शकले नाहीत. यातून विधानसभा लढण्याची अनिच्छाच स्पष्ट होते. जिंकण्याची गोष्ट दूरची झाली, मागल्या तीन वर्षांत देवेंद्र फडणवीस या तरुणाने आपण मोदी, शिवराज चौहान वा वसुंधराराजे यांच्यापेक्षा कमी नसल्याचे कृतीने सिद्ध केले आहे.

आता तीन वर्षांनी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा नेता म्हणून आपली यशस्वी प्रतिमा उभी केली आहे. या कालावधीत मराठा क्रांती मोर्चा व शेतकरी कर्जमाफी अशा दोन मोठ्या पेचप्रसंगांतून त्यांना जावे लागले आहे. त्यांनाही समर्थपणे सामोरे जाऊन त्यांनी आपले राजकीय बस्तान इतके पक्के केले आहे, की निदान आजच्या क्षणाला तरी त्यांच्या स्पर्धेत कोणी दिसत नाही. त्यांच्या पक्षात वा अन्य पक्षात त्यांच्या राज्यव्यापी प्रतिमेला तुल्यबळ ठरू शकेल, अशी कोणी राजकीय व्यक्ती दृष्टिपथात नाही. अर्थात हे स्थान प्राप्त करण्यासाठी त्यांना अनेक टक्केटोणपे खावे लागले आहेत. प्रसंगी ठामपणा व वेळ आलीच तर विनम्र पवित्राही घ्यावा लागला आहे. ही लवचिकता कुठल्याही महत्त्वाकांक्षी राजकीय नेत्यांमध्ये असावीच लागते. नुसती महत्त्वाकांक्षा अनेकांकडे असते; पण त्यासाठी आवश्यक अशी परिस्थिती हाताळण्याची पात्रता मोलाची ठरत असते. कधी त्यासाठी प्रतीक्षा करावी लागते, तर कधी धोके पत्करावे लागत असतात. शरद पवारांनाही अखेरीस मराठा जातीच्या अस्मितेचा आश्रय घेण्याची आज नामुष्की आलेली आहे आणि ब्रिगेडी मानसिकतेला चुचकारण्याची वेळ आली. त्याला ही तीन वर्षे व त्या कालखंडात घडलेले राजकारण जबाबदार आहे. त्यात कर्जमाफी व मराठा मोर्चाचाही समावेश आहे. त्यानंतरही अल्पमतातले सरकार फडणवीस सहजगत्या टिकवू शकले, त्यामुळेच पवारांचाही धीर सुटलेला दिसतो. अन्यथा त्यांनी अफजलखानाचा विषय उकरून काढण्याचा धोका पत्करला नसता. आजवर भले बहुमताचा पल्ला पवारांना गाठता आला नसेल; पण राज्यव्यापी चेहरा वा नेता म्हणून पवारांकडेच बघितले जात होते. अगदी विलासराव वा अन्य नेत्यांना पक्षातही इतका एकहाती वरचष्मा दाखवता आलेला नव्हता. अनेक पक्षांना व नेत्यांना हाताळण्याचे कौशल्य इतर कोणाला दाखवता आले नव्हते. फडणवीस आता तिथे जाऊन पोहोचले आहेत.

आपण ‘मध्यावधी’ला सज्ज आहोत असे ठामपणे म्हणताना तशी वेळ आली तर आपण जिंकू शकतो, हा आत्मविश्वासही आहे. किंबहुना त्यातले शब्द बारकाईने वाचले, तर तथ्य लक्षात येऊ शकते. बहुमत मिळवण्याच्या गमजा या मुख्यमंत्र्याने केलेल्या नाहीत, तर पुन्हा एकदा सर्वांत मोठा पक्ष होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे. याचा अर्थच आपल्याला भले राज्यातील जनतेचे निर्विवाद पाठबळ मिळणार नाही; पण अन्य कोणी आपल्या स्पर्धेतही नाही, असा विश्वास त्यामध्ये नक्कीच सामावला आहे. इतका पल्ला हा तरुण का गाठू शकला, त्याचाही ऊहापोह आवश्यक आहे. देवेंद्र फडणवीस यांची सर्वांत जमेची बाजू म्हणजे ते सत्तेसाठी हपापलेले नाहीत. केव्हाही सरकार कोसळेल अशा स्थितीत त्यांनी राज्याची सत्ता हाती घेतली होती. आजही ते गणित बदललेले नाही. तीन मोठे पक्ष एकत्र आले तरी त्यांचे बहुमत होऊ शकते. तशीच परिस्थिती कायम आहे; पण तसे हे पक्ष एकत्र आले तर त्यांचीच राजकीय विश्वासार्हता निकालात निघू शकते आणि त्यांनी एकत्र टिकणे ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. हे इतकेच भांडवल घेऊन फडणवीस यांनी सरकार बनवले होते. त्याचा चतुराईने वापर करीत त्यांनी इथवर मजल मारलेली आहे; पण तसे करताना कधीही सरकार पडेल आणि सत्ता जाईल, याचीही मानसिक तयारी त्यांनी ठेवली होती. ही अलिप्तता त्यांची खरी शक्ती आहे. तिथेच त्यांनी शिवसेनेतील सत्तालोलुप नेत्यांना गळाला लावून सरकारमध्ये आणले आणि सरकार टिकवले आहे. या तीन वर्षांत व्यक्तिगत पातळीवर कुठलाही आरोप त्यांच्यावर होऊ शकला नाही. हे त्यांचे दुसरे पाठबळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निखळ पाठिंबा ही त्यातली तिसरी बाजू आहे. अशा विविध अनुकूल गोष्टी व प्रतिकूल बाबी, आपल्या राजकीय डावपेचांसाठी चतुराईने कशा वापराव्यात, त्याचे कौशल्य या तरुणाला राजकारणात यशस्वी करून गेले आहे.

पवारांसारखा दिग्गज मराठा नेता समोर असताना आणि शिवसेनेसारखा सतावणारा मित्रपक्ष पाठीशी असताना देवेंद्र फडणवीस हे सरकार तीन वर्षे चालवू शकले, यात त्यांची कसोटी लागलेली आहे. त्यातून एक नवा नेता महाराष्ट्राला मिळाला आहे. आपली कुठलीही राज्यव्यापी प्रतिमा नसताना केवळ मोदींच्या लोकप्रियतेमुळे आपण सत्तेपर्यंत पोहोचलो आहोत, याचे भान फडणवीस राखू शकले हे त्यांच्या यशाचे गमक आहे; पण त्या संधीचे सोने करून त्यांनी राज्यभर आपल्या कारभाराचा व पर्यायाने आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवण्याचा केलेला प्रयत्न याला कारणीभूत झाला आहे. मोदींनी बोट धरून उभे केले व चालायला शिकवले असेल; पण बोट सोडून आपल्या पायावर उभे राहणे व चालायला लागणे, हे या तरुणाचे कर्तृत्व नाकारून चालणार नाही. मुंडे-महाजन यांच्यानंतर पक्षात निर्माण झालेली राज्यव्यापी नेतृत्वाची पोकळी त्यांनी भरून काढली आहे. त्यांचे सुदैव इतकेच, की आधीच्या नेत्यांसमोर जसे पवार व बाळासाहेब असे दिग्गज नेते उभे होते, तितक्या उंचीचे कोणी आज फडणवीस यांना आव्हान देण्यासाठी समोर नाही; पण पक्षात वा पक्षाबाहेर काही आव्हान नसल्याने मुजोरीही येऊ शकते. त्याच्या आहारी जाऊन मिळवलेले कर्तृत्वही मातीमोल होऊ शकते. तसे होऊ नये याही बाबतीत हा तरुण मुख्यमंत्री सावध असल्याची साक्ष वेळोवेळी मिळत असते. वयही त्याच्या बाजूचे असल्याने पुढल्या काळात मराठी राज्याला गुजरातसारखा खमक्या निर्विवाद नेता मिळू शकेल काय, त्याचे उत्तर फडणवीसच देऊ शकतील. कारण समोर असलेले विस्कटून टाकणे त्यांच्याच हातात आहे आणि त्याची जपणूक करणेही त्यांच्यावरच अवलंबून आहे. स्वतःविषयी खोटा आत्मविश्वास वा अहंकार नसणे, ही या तरुणाची सर्वांत मोठी जमेची बाजू असल्याने महाराष्ट्राच्या जातीय राजकारणाला मूठमाती देण्याचे काम त्याच्याकडून व्हावे, हीच अपेक्षा! 

अमिताभ बच्चनच्या शब्दात सांगायचे तर हा ‘लंबी रेस का घोडा’ आहे.

- भाऊ तोरसेकर

(लेखक मुंबईस्थित ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांचा हा लेख ‘किस्त्रीम’ मासिकाच्या ऑगस्ट  २०१७च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. लेखक आणि ‘किस्त्रीम’च्या परवानगीने हा लेख येथे प्रसिद्ध करण्यात आला आहे.)

(देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सरकारच्या कामांचा आढावा आणि पुढील आव्हानांचा वेध घेणारे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध झालेले लेख https://goo.gl/X7zddo या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search