Next
३५ कलाकार जागवणार ‘भारत छोडो’चा इतिहास
राजपथावरील पथसंचलनासाठी महाराष्ट्राचा ‘भारत छोडो’ चित्ररथ सज्ज
BOI
Wednesday, January 23, 2019 | 02:05 PM
15 0 0
Share this story

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील पथसंचलनासाठी सज्ज असलेला महाराष्ट्राचा चित्ररथ

नवी दिल्ली : ‘करेंगे या मरेंगे’, ‘भारत छोडो’ अशा घोषणांच्या निनादात यंदा प्रजासत्ताक दिनी राजपथावर स्वातंत्र्याची चळवळच अनुभवण्यास मिळणार आहे. राजपथावरील पथसंचलनासाठी यंदा महाराष्ट्राचा ‘वंदे मातरम्’च्या सुरात १९४२च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाचा इतिहास जिवंत करणारा चित्ररथ तयार करण्यात आला आहे.

२६ जानेवारीला, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्रासह १६ राज्यांचे आणि सहा केंद्रीय मंत्रालयांचे असे एकूण २२ चित्ररथ राजपथावरील पथसंचलनात सहभागी होणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या जनसंपर्क विभागाचे संचालक नम्पीबौ मरिनमई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विशेष म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीचे औचित्य साधून यंदा अनेक राज्यांनी ‘गांधी’ या संकल्पनेवर चित्ररथ उभारले आहेत. ‘महात्मा गांधी प्रत्येक राज्याशीच कोणत्या ना कोणत्या प्रकारे जोडले गेलेले आहेत. त्यामुळे गांधीजी ही मध्यवर्ती संकल्पना दिली आहे. परंतु प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे प्रदर्शनही या चित्ररथांमधून केले जाणार आहे’, अशी माहिती मरिनमई यांनी दिली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राबरोबरच गुजरातचाही ‘गांधी’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सर्वांचे आकर्षण ठरणारा असेल. 

गुजरातचा यंदाचा चित्ररथप्रजासत्ताक दिन अवघ्या काही दिवसांवर आला असताना राजपथावर होणाऱ्या संचलनासाठी विविध राज्यांच्या चित्ररथांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जागतिक ख्यातीचे कला दिग्दर्शक नितिन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ४० कारागिरांनी अतिशय आकर्षक असा महाराष्ट्राचा चित्ररथ उभारला आहे.

महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या पुढील भागात दृढ निश्चय व करूणामयी स्वभाव दर्शविणारी व ‘भारत छोडो’ची घोषणा देणारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची मोठी प्रतिमा उभारण्यात आली आहे. मध्यभागी एकात्मतेचे प्रतिक असणारा ‘चरखा’ उभारण्यात आला आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात मुंबईची खास ओळख ‘गेट वे ऑफ इंडिया’ची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. तसेच चित्ररथाच्या दोन्हा बाजूंना, १९४२मध्ये तत्कालीन ‘गवालिया टँक’ अर्थात ‘ऑगस्ट क्रांती मैदाना’वर झालेल्या ‘छोडो भारत चळवळी’ची भव्यता दर्शवणारा जनसागर, विविध म्युरल्सच्या माध्यमातून दर्शवण्यात आला आहे.

चित्ररथावर घोषणा देणाऱ्या स्वातंत्र्य सेनानींची व इंग्रज पोलिस अधिकाऱ्यांची भूमिका कलाकार साकारणार आहेत. याशिवाय चित्ररथाच्या दोन्हीही बाजूंना ‘करेंगे या मरेंगे’, ‘भारत छोडो’, अशा घोषणा देणारे एकूण ३५ कलाकार हा ‘भारत छोडो चळवळी’चा ऐतिहासिक लढा साकारणार आहेत. हे ३५ कलाकार मुंबईतील ‘व्हिजनरी परफॉर्मिंग आर्ट’ गृपचे कलाकार आहेत.

‘वंदे मातरम्’ गीत असणार आकर्षण
देशप्रेमाची ज्योत जागवणाऱ्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगाणाची धूनही राजपथावर या चित्ररथासह सादर होणार आहे. प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी ही धून तयार केली आहे.  

‘भारत छोडो’ आंदोलनातील महाराष्ट्राचे योगदान अधोरेखित करणारा हा चित्ररथ लक्षवेधी ठरेल, असा विश्वास कला दिग्दर्शक नितिन देसाई यांनी व्यक्त केला. मुंबई येथील फिल्म डिव्हीजनमध्ये उपलब्ध असलेल्या डॉक्युमेंटरी आणि मनीभवन येथील दस्तावेज यांचा अभ्यास करून राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा आकर्षक चित्ररथ तयार झाला असल्याचे ‘महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालया’च्या संचालक स्वाती काळे यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link