पुणे : शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या स्कायसायक्यू (SkySciQ), रोटरी क्लब ऑफ पुणे पौड रोड आणि भोर राजगड, वनराई, ९५ बिग एफएम या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या पक्षी संवर्धन शोधनिबंध स्पर्धेची अंतिम फेरी आणि बक्षीस समारंभ १९ व २० जानेवारी २०१९ रोजी किलबिल संमेलनात करण्यात आले. हे संमेलन भोर येथील स्काउट गाईड प्रशिक्षण केंद्रात उत्साहात झाले.
बक्षीस समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विज्ञान लेखक आनंद घैसास, ‘वनराई’चे अध्यक्ष रवींद्र धारिया, रोटरीचे (३१३१) माजी प्रांतपाल प्रशांत देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांच्या निबंधांपैकी निवडक निबंधांचे सादरीकरण स्पर्धकांनी या संमेलनात केले. यातील निवडक विद्यार्थ्यांना एकूण चार लाख रुपयांची शिष्यवृत्ती या स्पर्धेच्या निमित्ताने ‘स्कायसायक्यू’ संस्थेने दिली.
महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातील हजारो निसर्गप्रेमी विद्यार्थी, शिक्षकांचा या उपक्रमास उत्तम प्रतिसाद लाभल्याची माहिती संस्था प्रमुख दीप्ती मोहन पुजारी यांनी दिली. या वेळी ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ. गिरीश जठार, डॉ. संजीव नलावडे यांनी मार्गदर्शन केले. ‘पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील करिअर संधी’ या विषयावर तज्ज्ञ मंडळींचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
‘बिग एफएम’चे एमजे बंड्या यांनी सूत्रसंचालन केले. हा चर्चासत्राचा कार्यक्रम सर्व पक्षीप्रेमींसाठी खुला होता.