Next
एका वेगळ्या विक्रमाच्या निमित्ताने...
अनिकेत कोनकर
Tuesday, December 05 | 07:29 PM
15 0 0
Share this story

‘झी मराठी’ने प्रसिद्ध केलेल्या ‘उत्सव नात्यांचा’ या दिवाळी अंकाच्या तब्बल ७५ हजार प्रतींची विक्री झाली. एखाद्या वाहिनीने आपल्या माध्यमाच्या ‘गुडविल’चा चांगला उपयोग करून मुद्रित माध्यमात केलेली ही कामगिरी म्हणजे एक वेगळा विक्रमच म्हणावा लागेल. त्या औचित्याने या संदर्भातील अनेक बाजूंची चर्चा करणारा हा लेख...
..................
मराठी भाषेतील दिवाळी अंकांच्या परंपरेला यंदा १०८ वर्षे पूर्ण होत असतानाच दिवाळी अंकांच्या विश्वात एक विक्रम घडला आहे. ‘झी मराठी’ या एका मनोरंजन वाहिनीने ‘उत्सव नात्यांचा’ हा दिवाळी अंक प्रकाशित करून टीव्ही माध्यमाव्यतिरिक्त वेगळ्या म्हणजेच मुद्रित माध्यमात प्रवेश करून एक वेगळा पायंडा यंदा पाडला. वाचक कमी झाले आहेत, अशी ओरड ऐकू येत असतानाच झी मराठीने प्रकाशित केलेल्या दिवाळी अंकाच्या तब्बल ७५ हजार प्रती विकल्या गेल्या आहेत. हा एक प्रकारचा विक्रमच म्हणावा लागेल. 

ग्रंथाली आणि झी मराठी यांनी या अंकाची संयुक्त निर्मिती केली असून, नाटककार प्रशांत दळवी हे या अंकाचे संपादक, तर सुदेश हिंगलासपूरकर हे या अंकाचे प्रकाशक आहेत. एखाद्या दिवाळी अंकाच्या एक हजार प्रती विकल्या गेल्या, तर ते मोठे यश समजले जाते. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या आणि मोठी परंपरा असलेल्या अंकांच्याच पाच हजार किंवा त्याहून जास्त प्रती प्रसिद्ध केल्या जातात. खरे पाहायला गेले, तर ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राचा विचार केला, तर सगळ्या दिवाळी अंकांच्या खपाचा एकत्रित आकडाही तितकासा समाधानकारक नाही. दिवाळी अंकांच्या परंपरेचे जेवढे गोडवे गायले जातात, ते पाहता प्रत्यक्षात त्यांना मिळणारा प्रतिसाद मात्र तुलनेने मोठा नसतो. या पार्श्वभूमीवर ‘झी मराठी’च्या दिवाळी अंकाला मिळालेला प्रतिसाद खूप काही सांगणारा आहे.

हा अंक सर्वांनाच खूप आवडला असे अजिबातच नव्हे किंवा तो सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक आहे असेही नव्हे. त्याचे साहित्यिक मूल्य काय, असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला आहे. काही जणांनी त्यावर टीकाही केली आहे. केवळ मनोरंजनविश्वातील आणि त्यातही एकाच वाहिनीच्या १८ वर्षांच्या प्रवासाशी निगडित असलेल्या विविध घटकांच्या आठवणी आणि वाहिनीच्या जन्मापासूनची कथा असे या अंकाचे स्वरूप आहे. त्यामुळे साहजिकच सर्वांना तो अंक आवडणे शक्यच नव्हते. परंतु मालिका किंवा चित्रपटांच्या निर्मितीबद्दल, कलाकारांच्या आयुष्याबद्दल, तसेच पडद्यामागच्या गोष्टींबद्दल प्रेक्षकांना प्रचंड कुतुहल असते. ते बरोबर ओळखून ‘झी-मराठी’ने या दिवाळी अंकात नेमके तेच उपलब्ध करून दिले. एरव्ही प्रत्येक दिवाळी अंकात मनोरंजनाचा, काही पानांचा एक विभाग असतो. हा तर अख्खा अंकच त्या विषयाला वाहिलेला होता. त्यामुळे समाजातील मोठ्या वर्गाला तो आवडणे साहजिक होते. काही नवे वाचक या अंकामुळे तयार झाले, असे धाडसी विधान करायला वाव आहे. कारण केवळ टीव्ही पाहणारे आणि एरव्ही काहीही अजिबात न वाचणारे लोक केवळ ‘झी मराठी’ आणि त्यातील कलाकार या ‘फॅसिनेशन’मुळे पुस्तकांच्या स्टॉलकडे वळले. हे नवे वाचक म्हणजे रूढार्थाने सगळे काही वाचणारे असतील असे नव्हे किंवा कायम ते वाचत राहतील, असेही नव्हे; पण त्या निमित्ताने ते वाचनसंस्कृतीकडे निदान काही अंशी तरी वळले, असे म्हणता येईल. दुसऱ्या बाजूला, माहितीच्या, अनुभवांच्या, प्रयोगांच्या ‘डॉक्युमेंटेशन’चे महत्त्व लक्षात घेतल्यास या अंकालाही नक्कीच काही तरी साहित्यिक मूल्य आहे. भले त्याचे परिप्रेक्ष्य एका ठरावीक वाहिनीपुरते, एका ठरावीक विषयापुरते आणि ठरावीक आवड असलेल्या वाचकांपुरतेच मर्यादित असले, तरी त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. 

अंकाची केवळ १०० रुपये असलेली किंमत हाही या अंकाच्या विक्रीच्या विक्रमाला कारणीभूत असलेला एक घटक ठरला. एकंदरीतच पुस्तकांची निर्मिती हा एक खर्चिक भाग आहे. त्यामुळे दिवाळी अंकांची किंमत कमी ठेवणे दिवाळी अंकांच्या प्रकाशकांना कठीण जाते. जाहिराती, छपाई, वितरण या सगळ्या बाजू सांभाळताना प्रकाशक मेटाकुटीला येतात. तरीही ते नेटाने मेहनत घेऊन दर्जेदार अंक प्रसिद्ध करतात. त्यामुळेच ही उज्ज्वल परंपरा टिकून राहिली आहे; मात्र वाढलेल्या खर्चामुळे बहुतेकशा चांगल्या दिवाळी अंकांच्या किमती आता १२५-१५० रुपये किंवा त्याहून जास्त असतात. एरव्ही मॉलमध्ये हजारो रुपये सहज खर्च करणाऱ्यांना दिवाळी अंकांच्या किमती मात्र खूप वाटतात, हे कटू असले, तरी वास्तव आहे. (अर्थात, हे प्रत्येकाच्या प्राधान्यक्रमानुसारही ठरते.) या पार्श्वभूमीवर, ‘झी मराठी’ने अंकाची किंमत केवळ १०० रुपये एवढीच ठेवल्याने ‘काय आहे ते घेऊन बघू या तरी’ असा विचार सहजपणे करणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी मोठी ठरली असावी. 

याबाबत ‘झी मराठी’चे बिझनेस हेड नीलेश मयेकर यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी या अंकाबद्दलचा वाहिनीचा दृष्टिकोन मांडला. ‘झी मराठी वाहिनीचा टीआरपी तीनशे ते पाचशे आहे. याचा अर्थ तीन ते पाच कोटी प्रेक्षक झी मराठी वाहिनी पाहतात. त्याच्या सुमारे एक टक्का म्हणजे साडेतीन लाख. या साडेतीन लाखांच्या केवळ सुमारे वीस टक्के म्हणजे ७५ हजार अंक आम्ही प्रसिद्ध केले होते. ते सर्व अंक वितरित झाले. प्रकाशन व्यवसायातील अनेकांनी त्यांच्या अनुभवानुसार आम्हाला दोन ते पाच हजार अंकच प्रसिद्ध करण्याचा सल्ला दिला होता; प्रत्यक्षातील चित्र मात्र आत्ता सांगितले तसे आहे,’ असे नीलेश मयेकर यांनी सांगितले. ‘एवढे असूनही राज्यातील सर्व इच्छुक ग्राहकांपर्यंत आम्ही पोहोचू शकलोच नाही. सुमारे दोन लाख जणांना आम्ही हवा असूनही अंक देऊ शकलो नाही,’ असेही मयेकर यांनी नमूद केले. ‘यातून होणाऱ्या आर्थिक लाभापेक्षा मराठी भाषा टिकण्यासाठी लागणार असलेला हातभार मोठा आहे. कारण मराठी वाचक आणि प्रेक्षक वाढण्यासाठीच त्याचा उपयोग होणार आहे. तसा तो व्हावा, हाच आमचा दिवाळी अंकामागचा उद्देश आहे. या अंकाच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या अनेक व्यक्तींनी त्यासोबत बाकीचेही काही दिवाळी अंक विकत घेतले असतील. त्यामुळे हा दिवाळी अंकाच्या अख्ख्या ‘कम्युनिटी’चाच फायदा आहे,’ असेही मयेकर यांनी सांगितले. 

या दिवाळी अंकाच्या ऑनलाइन वितरणाची जबाबदारी ‘बुकगंगा डॉट कॉम’ने सांभाळली होती. तसेच दिवाळी संपल्यानंतर अनेक दिवसांनीही या अंकाची मागणी कायम असल्याने तो ‘ई-बुक’ स्वरूपात ‘बुकगंगा’वर उपलब्ध करण्यात आला आहे. या दिवाळी अंकाबाबत लोकांमध्ये किती उत्सुकता होती, हे ‘बुकगंगा’कडे आलेल्या कॉल्सच्या संख्येवरून सहज कळते. ‘या दिवाळी अंकाच्या उपलब्धतेची तारीख जाहीर झाली आणि त्यासोबत फोन बुकिंगसाठी ‘बुकगंगा’च्या कॉल सेंटरचा ८८८८ ३०० ३०० हा नंबरही देण्यात आला होता. या जाहिरातीनंतर ‘बुकगंगा’कडे कॉल्सचा ओघ सुरू झाला. सात ते आठ दिवस दररोज सुमारे साडेतीन ते चार हजार कॉल्सना ‘बुकगंगा’ची टीम उत्तरे देत होती. या दिवसांतील ‘मिस्ड कॉल्स’ची संख्या तब्बल ५० हजार एवढी आहे. राज्यातल्या अगदी छोट्या-छोट्या गावांतूनही फोन येत होते आणि काही छोट्या गावांतही प्रत्येकी १५-२० अंक विकले गेले. ‘बुकगंगा’ने झी मराठीच्या जवळपास २० हजार अंकांचे वितरण केले,’ अशी माहिती ‘बुकगंगा’चे सीईओ मंदार जोगळेकर यांनी दिली. 

या अंकाच्या जाहिरातीसाठी विशेष असे काही धोरण ठरवले नव्हते, असे मयेकर यांनी सांगितले; मात्र त्यांच्याकडे असलेल्या टीव्हीच्या माध्यमाचा उपयोग त्यांनी चांगल्या प्रकारे करून घेतल्याची उदाहरणे मात्र विविध ठिकाणी पाहायला मिळाली. ‘झी मराठी’ने विविध कलाकारांना घेऊन केलेल्या, तसेच प्रत्येक मालिकेच्या चमूला घेऊन केलेल्या जाहिराती विशेष गाजल्या. किंबहुना त्या जाहिरातींचाच या अंकाच्या विक्रीसाठी मोठा हातभार लागला, असे म्हणता येईल. रात्रीच्या प्राइम-टाइममधील मालिकांमधील कलाकारांनी केलेल्या जाहिरातींमुळे प्रेक्षकांमध्ये अंकाबद्दलची उत्सुकता निर्माण करण्यास मोठा हातभार लागला. ‘रात्री नऊनंतर मिनिटाला चारशे ते पाचशे कॉल्स ‘बुकगंगा’कडे येत होते,’ असे जोगळेकर यांनी सांगितले. यावरून प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा अंदाज येतो. ‘दिवाळी अंकासारखी गोष्ट आपण फोनवरूनही मागवू शकतो, या सुविधेचाही उपयोग प्रेक्षक-वाचकांनी करून घेतला, असे म्हणता येईल,’ असे जोगळेकरांना वाटते. 

‘झी मराठी’ने केलेल्या जाहिरातींमुळेच अंकाची मोठी चर्चा बाजारपेठेत झाली. (एवढी जाहिरात अन्य दिवाळी अंक करू शकत नाहीत, हेही तितकेच खरे आहे.) मालिकांचा, त्यातील पात्रांचा लोकांच्या मनावर किती प्रभाव आहे, ही गोष्टही यातून कळते. पुण्यातील पुस्तकविक्रीचे महत्त्वाचे ठिकाण असलेल्या अप्पा बळवंत चौकातील महत्त्वाच्या पुस्तक दुकानांत ऐन दिवाळीत या अंकाची असलेली चर्चा, तो अंक उपलब्ध झालाय का याची विचारणा करण्यासाठी येणारे ग्राहक याचा अनुभव प्रस्तुत लेखकाने स्वतः घेतला आहे. हा अंक विकत घेण्यासाठी आलेले अनेक जण तो अंक नाही म्हणून दुकानातील दुसरे काही अंक विकत घेऊन गेले, असा अनुभव मुंबईतील काही प्रमुख पुस्तकविक्रेत्यांनी सांगितला. म्हणजे हा अन्य दिवाळी अंकांच्या विक्रीसाठी झालेला फायदाच म्हणायला हवा. 

‘वाचकवर्ग वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य वाचतो. ‘हॅरी पॉटर’ची पुस्तके केवळ लहान मुलांपुरती मर्यादित न राहता, विविध वयोगटांतील वाचकांना ती आवडली. त्याप्रमाणेच सर्व प्रकारच्या वाचकवर्गाला हवे ते आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या साहित्याची निर्मिती व्हायला हवी. त्यासाठी वाचक आहेत, हे या उदाहरणावरून प्रकर्षाने जाणवले,’ असे जोगळेकर यांनी सांगितले. त्यांचा हा मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे.

‘झी मराठी’च्या दिवाळी अंकाचे संपादक प्रशांत दळवी यांनी अंकाच्या संपादकीयातून मांडलेल्या विचारांतूनही या अंकाचे महत्त्व स्पष्ट होते. ‘१९०९ साली प्रसिद्ध झालेल्या पहिल्या दिवाळी अंकाचं नाव होतं ‘मनोरंजन.’ आज १०८ वर्षांनंतर एक मनोरंजन वाहिनी पहिला दिवाळी अंक काढतेय. आज काही महत्त्वाची वर्तमानपत्रं वक्तृत्व, एकांकिका स्पर्धा, सामाजिक उपक्रमांना मदत करणारे कार्यक्रम आयोजित करताना दिसतात, तर ‘झी मराठी’ला दृकश्राव्य माध्यमापलीकडे जाऊन मुद्रणक्षेत्रात मुशाफिरी करावीशी वाटते. अशी ‘सांस्कृतिक घुसळण’ होणं हीच तर खरी आज काळाची गरज आहे,’ असे दळवी म्हणतात. या दिवाळी अंकाच्या पाठोपाठ आता झी मराठी वाहिनीच ‘दिशा’ नावाचे साप्ताहिकही घेऊन येत आहे. सर्व वयोगटातील वाचकांना हवे असणारे साहित्य त्यात असेल, असा अंदाज त्याच्या जाहिरातींवरून बांधता येऊ शकतो. ही घुसळण वाढवणारे असेच उपक्रम होत राहिले, तर मराठीच्या भवितव्याची चिंता करावी लागणार नाही, असे वाटते. त्यातून चांगले साहित्य देण्याची स्पर्धाही वाढू शकते. 

सकस आणि वैविध्यपूर्ण ‘कंटेंट’ दर वर्षी देणारे आणि खरोखरच मराठी साहित्यात मोलाची भर घालणारे कित्येक दिवाळी अंक महाराष्ट्रात प्रसिद्ध होतात. तसेच केवळ जाहिरातींनी भरलेले आणि व्यवसाय म्हणूनच प्रसिद्ध केले जाणारेही अनेक अंक आहेत. ‘झी मराठी’च्या दिवाळी अंकाची यापैकी कोणत्याच वर्गाशी तुलना करता येणार नाही; त्याच्याकडे एक वेगळा प्रयोग म्हणूनच पाहायला हवे. कारण बाकीच्या दिवाळी अंकांना हा अंक म्हणजे काही पर्याय होऊ शकत नाही; प्रत्येक अंकाचा आपला असा वाचकवर्ग आहे, तो कायमच राहणार आहे; पण असे आणखी प्रयोग झाल्यास समाजात नवा वाचकवर्ग तयार होण्यास नक्की मदत होईल, असे वाटते. म्हणूनच अंतिमतः मराठी भाषेच्या दृष्टीने काही चांगले घडणार असेल, तर त्याचे स्वागतच करायला हवे. मुद्रित माध्यमाचे संचित घेऊन अनेक वाहिन्या मोठ्या झाल्या, स्थिरावल्या. झी वाहिनीचा उपक्रम या संक्रमणाच्या उलट्या दिशेचा प्रवास दर्शवतो. त्यामुळे एक प्रकारे माध्यम संक्रमणाचे वर्तुळ पूर्ण झाले आहे.

(या अंकाचा परिचय करून देणारा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link