पुणे : उरुळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमातील नवीन महिला उपचार केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी (१८ जानेवारी) आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण व विधिमंडळ कामकाज मंत्री गिरीश बापट उपस्थित होते.

महिलांसाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या या उपचार केंद्रामुळे महिला रुग्णांची मोठी सोय होणार आहे. समाजातील गरीब रुग्णांसाठी मोफत अथवा वाजवी दरात ही सुविधा उपलब्ध झाली असल्याने सर्व आर्थिक स्तरांतील रुग्णांसाठी ही सेवा लाभदायक ठरेल. याव्यतिरिक्त जीवनशैली व कामाच्या दबावामुळे सतत तणावग्रस्त राहणाऱ्या तरुणांसाठीही आश्रमाच्या माध्यमातून चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी खाजदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार बाबूराव पाचर्णे हेदेखील उपस्थित होते.
उरुळी कांचन येथील या निसर्गोपचार आश्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांनी १९४६मध्ये केली होती. त्या काळात गांधीजी आठ दिवस या आश्रमात राहिले असताना त्यांनी याठिकाणी विविध प्रकारच्या नैसर्गिक उपचार पद्धतींचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णांवर उपचार करण्याचा पायंडा पाडला. आज बहुतांश रोगांवर, आजारांवर प्रभावीपणे नैसर्गिक उपचार पद्धतीचा अवलंब करणारी ही एक अग्रणी संस्था समजली जाते. दर वर्षी १० हजारांहून अधिक रुग्णांवर याठिकाणी उपचार केले जातात. एका वेळेस २०० रुग्णांवर उपचार होऊ शकतील, एवढी या उपचार केंद्राची क्षमता आहे.

आहार, योगा व्यायामपद्धती, मसाज, स्टीम बाथ, जलोपचार, अॅक्युप्रेशर यांसारख्या उपचार पद्धती वापरून स्थूलता, मधुमेह, उच्च रक्तदाब, संधिवात, दमा, मायग्रेन आणि तणावग्रस्त आजारांवर आश्रमात प्रभावीपणे उपचार केले जातात. याव्यतिरिक्त दैनंदिन जीवनात आहाराचे महत्त्व, तणावापासून मुक्तता मिळवण्याची माहिती या विषयांवर व्याख्याने आयोजित केली जातात. आरोग्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी योगा व निसर्गोपचाराचे प्रशिक्षण वर्गही घेतले जातात.