Next
आमच्या पिढीला पडणारे प्रश्न नाटकातून मांडत आलो : सतीश आळेकर
BOI
Saturday, December 09, 2017 | 04:41 PM
15 0 0
Share this article:

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि त्यांच्या पत्नी दीपा यांनी स्थापन केलेल्या रूपवेध प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ‘तन्वीर सन्मान’ यंदा ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांना जाहीर झाला. आज, नऊ डिसेंबर रोजी सायंकाळी पुण्यात ज्येष्ठ समीक्षक पुष्पा भावे यांच्या हस्ते त्यांना गौरविले जाणार आहे. त्या निमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’तर्फे विवेक सबनीस यांनी घेतलेली सतीश आळेकर यांची ही मुलाखत...
..............

देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतरच्या काळात काही चांगले घडेल, या आशेवर तरुण झालेल्या पिढीचा हळूहळू भ्रमनिरास होत गेला. त्याचे एक प्रतिनिधी असणारे सत्तर ते ऐंशीच्या पिढीतले बंडखोर नाटककार म्हणून सतीश आळेकरांनी स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. महाविद्यालयीन जीवनात ‘झुलता पूल’ या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेतील लेखनापासून मिकी आणि मेमसाहेब, महानिर्वाण, महापूर, बेगम बर्वे, शनिवार-रविवार, दुसरा सामना, अतिरेकी, पिढीजात यापासून ‘एक दिवस मठाकडे’ या दीर्घांकापर्यंत त्यांचा गेल्या चार दशकांचा नाट्यप्रवास आहे. याशिवाय परदेशात शिष्यवृत्त्या मिळवून तिथेही ‘बेगम बर्वे’सारखे नाटक त्यांनी इंग्रजीतून सादर केले. अलीकडे आलेल्या ‘व्हेंटिलेटर,’ तसेच ‘चि. व चि. सौ. कां’ या मराठी चित्रपटांत त्यांनी केलेल्या भूमिकाही लोकांना आवडल्या. अशा या ज्येष्ठ नाटककाराशी साधलेला हा संवाद...


- तन्वीर सन्मान मिळाल्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन! हा पुरस्कार मिळाल्याचे जाहीर झाल्यावर तुमच्या मनात नेमके काय आले? 

- माझ्या कलेच्या कारकिर्दीबद्दल मिळालेल्या या पुरस्काराबद्दल आनंद झाला. या पुरस्काराचे वेगळेपण अशासाठी आहे, की नाट्यक्षेत्रात टिकून राहताना किंवा आपला प्रवाह ओळखून त्याला चिकटून राहताना ज्या लोकांचे आदर्श डोळ्यांपुढे ठेवले, अशा दिग्गजांनी त्यांची कारकीर्द हौशी रंगभूमी चळवळीच्या माध्यमातून सुरू केली. स्वत:ची मध्यमवर्गीय मर्यादा असून, त्यातून मोठे होताना रूपवेध प्रतिष्ठान उभे करून, त्या माध्यमातून उतराई होण्याचा ते प्रयत्न करताहेत. आतापर्यंत ज्यांना ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे, त्यांची नुसती नावे वाचतानाही छाती दडपून जाते. मनात न्यूनगंडाची भावनाही निर्माण होते, की आपण या योग्यतेचे आहोत का? अशा या संमिश्र भावनेतून मला आनंद होतोय. डॉ. लागूंची कारकीर्द पाहत आम्ही लहानाचे मोठे झालो. स्वातंत्र्योत्तर काळात जनतेला काय आवडते यापेक्षा आपण काय करायला हवे असा ‘एकला चलो रे’ हा मार्ग त्यांनी स्वीकारला. अशा दिग्गजांतर्फे मिळत असलेला हा पुरस्कार मला खूप महत्त्वाचा वाटतो. 


- नाटकाचे वेगळेपण त्यातील संवादांमधून घडत असते. मूळ मनात सुचलेली कल्पना व प्रत्यक्षात उतरलेले काम यात नाटकनिर्मितीची प्रक्रिया घडते. तुमचा हा सर्जनशील प्रवास नेमका कसा आहे? 

- रूढार्थाने साहित्य म्हणतात तसा मी साहित्यिक नाही. मी कथा, कविता, कादंबरीसारखे लिहीत नाही, तर मी नाटकाच्या किंवा प्रयोगाच्या माध्यमातून लिहीत असतो. १९५२मध्ये पुण्यात भालबा केळकरांनी स्थापन केलेल्या ‘प्रोग्रेसिव्ह ड्रामेटिक असोसिएशन’ या संस्थेत आधी पडद्यामागची कामे, त्यानंतर अभिनय व शेवटी लेखन असा माझा प्रवास आहे. त्यातूनच मला लिहिण्याचा मार्ग सापडला. त्या पद्धतीने माझी जडणघडण होत गेली. नाटक या कलाकृतीच्या सर्वच अंगांमध्ये काम करताना त्या अनुभवाच्या आधारे मी नाटक लिहायला सुरुवात केली. कारण नाटक ही सांघिक कला आहे. त्यातील लेखन हा त्याचा एक पैलू आहे. रंगमंच व्यवस्था, नट, दिग्दर्शक हे त्यातले अनेक घटक आपल्या पद्धतीने काम करत असतात. या सृजनप्रक्रियेत हा सामूहिक ऐवज आहे. 


- पण नाटकाचे विषय तुम्हीच निवडले होतेत. आयुष्यातील अस्थिरता किंवा माणूस नियतीच्या हातातील एक खेळणे आहे, यातून नाटकाबद्दलचे आकर्षण तुम्हाला वाटले का? प्रेक्षकांच्या मनातही ते नाटक घडत असतेच ना? 

- हो. कारण नाटक हा समाजजीवनाचा एक आरसा असतो व त्यात जीवनाचे प्रतिबिंब उमटते, असे जे म्हटले जाते ते खरे आहे; पण असे असले तरी नाटक लिहून मी मोकळा झालो असे घडत नाही. कारण नाटक निर्मितीतील प्रत्येक विभागात मला रस आहे. नाटक तयार झाल्यानंतर त्याचे प्रयोग लावेपर्यंतचा सर्व आर्थिक भागही माझ्या कक्षेत येतो. मला जे सांगायचे आहे, त्यासाठी प्रयोग ही एक मंचित कला आहे हे विसरून चालत नाही. प्रेक्षकाच्या मनातील नाटक हे माझे नाटक पाहून चालले असते हे खरे आहे. त्याचे कधी स्वागत होते, तर कधी होत नाही. मला माझ्या विषयाचा प्रयोग लोकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे वाटते. त्यामुळे ‘महानिर्वाण’चे ५००, ‘महापूर’चे ५०, ‘बेगम बर्वे’चे ६०-७०, तर ‘दुसरा सामना’चे १५०-२०० प्रयोग होऊ शकले. मी आमच्या पिढीला पडणारे प्रश्नन नाटकातून मांडत आलो. त्या काळात इतर नाटककार होतेच; पण माझे विचार इतर नाटकांमधून येत नाहीत, हे लक्षात आल्यावर माझी स्वत:ची एक वाट बघता बघता तयार झाली. तेव्हा सिनेमा, दूरदर्शनपेक्षा नाटक  हेच आमचे मुख्य लक्ष्य होते. वसंत देसाईंसारखे दिग्गज संगीतकार सिनेमातून नाटकांकडे वळले, तर विजया मेहतांसारख्यांनी समांतर रंगभूमीला वाहून घ्यायला सुरुवात केली. व्यावसायिक रंगमंच, राज्य नाट्य स्पर्धा, नाटकांना होणारी वाढती गर्दी, संगीत रंगभूमीचे झालेले पुनरुज्जीवन ही तेव्हाची आणखी काही आकर्षणे नाटक लिहिण्याला कारणीभूत ठरली. मला नाटक हाच पर्याय महत्त्वाचा वाटत गेला.


- तुम्ही निवडलेल्या नाटकांच्या विषयांबाबत काय सांगता येईल?

- भोवतालची परिस्थिती आपल्याला कशी दिसते, त्यावर विषय अवलंबून असत. आजच्या पिढीकडे पाहिले, तर ती दुभंगलेली दिसते. तिची अभिव्यक्ती तुकड्या-तुकड्यांनी दिसते. आमच्या पिढीला व त्यापूर्वीही एकसंघ नाटक सापडलं. ‘पुलं’चे नाटक म्हणजे ‘पुलं’चेच नाटक हे लक्षात येते. आजच्या पिढीच्या मानाने आमचे जीवन स्थिर व शांत होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो कालखंड होता. आता काहीतरी चांगले घडेल अशी एक सकारात्मक मनोधारणा निर्माण झाली होती. नवचैतन्य होते. माणसाने चंद्रावर नुकतेच पाऊल ठेवले होते. जगण्याकडे पाहण्याचा एक रोमँटिक दृष्टिकोन तयार झाला होता. पण याच काळात मध्यमवर्गीय जाणिवांमध्ये प्रचंड उलथापालथ होत होती. दुसरे महायुद्धही काही वर्षांपूर्वी संपले होते. स्थलांतरितांचे लोंढे शहरांकडे येऊ लागले. १९७२नंतर दुष्काळग्रस्त ग्रामीण भागातील माणसे मुंबई-पुण्याकडे येऊ लागली. १९६१मध्ये पानशेत धरण फुटले व पुण्याचे रूप पालटत गेले. कनिष्ठ व उच्च मध्यमवर्गीय ही प्रतवारी ठळकपणे जाणवू लागली. यातूनच जगण्याचे विषय व आधीच्या पिढीला पुढच्या पिढीने तपासण्याचे काम सुरू झाले. मूल्यांचा ऱ्हास, बेकारी, काळा बाजार, बाजारातील वस्तू गडप होणे, नियमांची होत नसलेली अंमलबजावणी यातून आमच्या पिढीला निराशा येत गेली. जगण्यातील भ्रष्टपणाला विरोध म्हणून तेव्हा तेंडुलकर ते कानिटकर व नंतर आमच्या पिढीच्या नाटककारांत ती अभिव्यक्त  होत गेली. या सर्व प्रक्रियेला देशपातळीवरील ‘पॅन इंडिया’ पद्धतीचे स्वरूप येत गेले. हेच विषय तेव्हा बंगालमध्ये बादल सरकार, कर्नाटकात गिरीश कार्नाड, तर मुंबईत विजय तेंडुलकर मांडत होते. ही सारीच नाटके एकमेकांच्या भाषांमध्ये याच काळात भाषांतरित किंवा रूपांतरित होत गेली. 


- तुम्ही लिहिलेले नाटक दुसऱ्या दिग्दर्शकाने बसवले, तर तुम्हाला काय वाटते? तुमच्या व दिग्दर्शकाच्या मनातील नाटक याबद्दल काही सांगता येईल का? नाटककार म्हणून तुमचा अनुभव काय आहे? 

- याबाबत माझा अनुभव संमिश्र आहे. मी लिहिलेले नाटक मीच बसवणार आहे, हे आधी ठरूनच गेलेले असायचे. पुढे ‘महापूर’ हे नाटक माझा समवयस्क सहकारी मोहन गोखले याने दिग्दर्शित केले; पण नाटककार म्हणून माझी प्रकृती त्याला चांगली ठाऊक होती. त्यामुळे मला जे सांगायचे आहे, तेच त्याने नेमकेपणाने अधोरेखित केले. पुढे ‘दुसरा सामना’ या नाटकाचे दिग्दर्शन आधी विजया मेहता करणार होत्या. त्याच्या काही तालमीही झाल्या; पण हे आपल्या पद्धतीचे नाटक नाही हे त्यांच्या लक्षात आल्यावर दिग्दर्शनाची जबाबदारी वामन केंद्रे यांनी स्वीकारली. इथवर ठीक होते; पण माझी नाटके जेव्हा अन्य भाषांमध्येही सादर होत गेली, तेव्हा त्याच्यावर माझे कोणतेही नियंत्रण नव्हते. गुजराती व हिंदीतही ‘महानिर्वाण’ झाले ते सरळ भाषांतर नसून, ‘ट्रान्सक्रिएशन’ होते. मराठी भाषा, त्यातली संवेदना, त्यातली कीर्तन परंपरा हे मुद्दे होतेच; पण सुदैवाने या साऱ्या गोष्टी ओळखून चपखल हिंदी अनुवाद करणारे मध्य प्रदेशातील डॉ. वसंत देव यांच्यासारखे अनुवादक मला व इतर अनेक मराठी नाटककारांना लाभले. शांता गोखले यांनीही माझ्या नाटकांची इंग्रजी रूपांतरे केली. पुढे मी ‘युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जिया’ येथे ‘बेगम बर्वे’चे इंग्रजीत १७ प्रयोग बसवले. त्यातला प्रयोगाचा व साहित्याचा भाग यातला भेद आपण मान्य करायला हवा. 


-  तुमच्या नाटकाची सुरुवात वास्तवाने होते; पण ते पुढे स्वप्नदृश्यात्मक किंवा फँटसीच्या अंगाने किंवा ब्लॅक ह्यूमरच्या अंगाने जात राहाते. महानिर्वाण, महापूर किंवा अगदी बेगम बर्वे यांपर्यंतच्या सर्वच नाटकांमध्ये ती नाटके अॅकब्सर्ड पातळीवर किंवा काहीशा अगम्य प्रदेशात प्रवेश करतात. ते निराशावादाकडे झुकणारे मध्यमवर्गीय विश्व आहे म्हणून का? 

- नाटक ही मुळात खोटी रचलेली कला आहे. रंगमंचावर खरी मोटार किंवा विमान दाखवता येत नाही. तसा आभास निर्माण करणं हे खोटं खोटं व आव्हानात्मक वाटतं. माझ्या नाटकातील मुद्दे व त्यापुरती गोष्ट सांगत पात्रे व्यक्त होत जातात. आपल्या लोककलेत ज्याप्रमाणे गिरकी घेतल्यानंतर आपण पुण्यात येतो, पुन्हा गिरकी घेतल्यावर मुंबईत, तसे नाटकात लोकांना ‘मेक बिलीव्ह’ किंवा ‘सस्पेंडेड बिलीफ’मधून नाटकातील वास्तव स्वीकारावे लागते. प्रेक्षक हा खोटेपणा मान्य करतात; पण या खोटेपणाच्या शक्यतेतूनच माणसाच्या अंतर्मनात जाता येते. मनातले कंगोरे उलगडून दाखवता येतात. हा अद्भुततेचा खेळ माझ्या नाटकात आहेच. ती एक जादूच आहे! मी निराशावादाकडे जात नाही. अजूनही बदल होतोय असे सारखे वाटत राहते. आज नळाला पाणी नाही, घरात वीज नाही, भ्रष्टाचार दूर होणार हे वाटताना सुसंस्कृत माणूस साधी नीतिमूल्ये पाळत नाही, याचेही वाईट वाटत राहते. त्या अर्थाने जगण्यातली सकारात्मकता आपण घालवली आहे. सरकारी नोकरी नको म्हणून माझे वर्गमित्र यूके, यूएस किंवा मध्यपूर्वेत नोकरीला गेले. तसेच लेखकाच्या मनातही स्वत:चे एक गाव असते. ते त्याने मुद्दाम निर्माण केलेले असते. त्यातून मानवी मनाच्या जवळ जाण्याच्या शक्यता वाढत जातात असे वाटते.  


- तुमच्या नाटकातील विनोदामागे श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या प्रेरणा असल्याचे आदिबंधात्मक समीक्षा करणारे अरुण खोपकर सांगतात. तुमचे मत काय? 

- हे त्यांचे मत आहे. कोल्हटकरांशी माझा कधी संबंध आला नाही. त्यांचे धडे मी शाळेत असताना वाचले होते. तेच चिं. वि. जोशींच्या विनोदाबाबतही सांगता येईल. विनोदातील टायमिंगचा सेन्स ‘पुलं’च्या एकपात्री प्रयोगामुळे आला. सुहासिनी मुळगावकरांचेही तसेच म्हणता येईल. माझ्या नाटकांचा ‘ब्लॅक ह्यूमर’ हा त्याचाच एक भाग आहे. स्वातंत्र्यानंतर २५ वर्षांत निराशा पदरी पडलेल्या माझ्या पिढीच्या रागातून, संतापातून हा विनोद निर्माण झाला आहे. भालचंद्र नेमाड्यांच्या ‘कोसला’पासून पुढेही आपल्याला तेच दिसते. माझ्या अनेक नाटकांमध्ये बापाला सवाल करणारा मुलगा दिसतो तो याच कारणाने. मला किंवा आमच्या पिढीला हेच ठासून सांगण्यासाठी नाटक करावेसे वाटले. मध्यमवर्गीयांतून आल्यामुळे घरातील चूल थंडावणार नाही याची काळजी घेणाऱ्या राष्ट्रीय बँकाही मिळाल्या. अनेक कलांवतांना या बँकांनी आधार दिला व नाट्यसेवा करता आली. मला हवी असणारी नाटके मी त्यातून लिहू व सादर करू शकलो. नाटक व जगण्यातील समतोल साधण्याचा आदर्श मला ‘फर्ग्युसन’मध्ये रसायनशास्त्र शिकवणाऱ्या भालबा केळकरांनी घालून दिला. 


- सध्या नवीन काही लिहिले आहेत का? बऱ्याच दिवसांत तुमचे नवीन नाटक पाहण्यात आले नाही.

- एरव्ही नाटक हे मी माझ्यापुरते लिहीत असतो. त्यातले मला वाटलेले नंतर मंचावर येते. १९९०नंतर सारे अर्थकारण बदलत गेले. त्याची सारीच कारणे मला कळली नाहीत. या काळात नाटक लिहिताना अधिक अंतर्मुखता आली. आपल्याला काही वेगळे सांगायचे आहे का? जे लिहायचे ते कुणासाठी? आताच्या पिढीचे जगण्याचे स्वरूपच बदलून गेले आहे. ते पाहिले, की असे प्रश्नच पडतात. लिहिणे चालू आहेच. सध्या दोन नाटकांवर माझे काम चालू आहे. तसेच चित्रपटांमधूनही भूमिका मिळतात. अर्थात मी अजिबात लिहिले नाही असे नाही. २००४मध्ये ‘पिढीजात’, तर २०१२मध्ये ‘एक दिवस मठाकडे’ हा दीर्घांक लिहिला व तो सादरही झाला. 


- रंगकर्मी म्हणून तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!

- धन्यवाद. 

(पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या पन्नाशीवेळी सतीश आळेकर यांनी जागवलेल्या आठवणी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आळेकर यांची पुस्तके ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. आळेकर यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)
 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search