Next
सब कुछ सीखा हमने...
BOI
Sunday, December 24 | 06:45 AM
15 0 0
Share this story

राज कपूर आणि गीतकार शैलेंद्रशोमॅन राज कपूर आणि संवेदनशील गीतकार शैलेंद्र हे दोघे खास मित्र. १४ डिसेंबर हा राज कपूर यांचा जन्मदिन, तर शैलेंद्र यांचा मृत्युदिन, हा एक विचित्र योगायोगच. नुकत्याच होऊन गेलेल्या या दिवसानिमित्त ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या शैलेंद्र यांनी राज कपूर यांच्या ‘अनाडी’ चित्रपटासाठी लिहिलेल्या या सुंदर गीताचा... सब कुछ सीखा हमने, ना सीखी होशियारी...
.......................................
राज कपूरडिसेंबर महिन्यातील ११ तारखेची आठवण चांगल्या आणि वाईट अशा दोन गोष्टींसाठी होते. ११ डिसेंबर हा दिलीपकुमार यांचा जन्मदिवस आणि कवी प्रदीप यांचा स्मृतिदिन! असाच एक दिवस म्हणजे १४ डिसेंबर. १४ डिसेंबर १९२४ हा राज कपूर यांचा जन्मदिवस आणि १४ डिसेंबर १९६६ हा गीतकार शैलेंद्र यांचा मृत्युदिन! शैलेंद्र हा राज कपूरचा आवडता गीतकार! दोघे खास मित्र; पण एकाच्या वाढदिनी दुसऱ्याचा स्मृतिदिन! हेच जीवन! हीच नियती! हेच नशीब! 

गीतकार शैलेंद्र‘चिठिया हो तो हर कोई बाँचे, भाग ना बाँचे कोय...’ हे शैलेंद्रनेच लिहून ठेवले होते! आपणा सगळ्यांच्या बाबतीत ते खरे असते. शैलेंद्रचे हेच वैशिष्ट्य होते, की तो मनाला भावणारी, मनाला पटणारी शब्दरचना करायचा आणि ती गाणी लोकांना आपली वाटायची! अर्थात जीवनातील संघर्षातून त्याने जे दुख, अवहेलना, अपेक्षाभंग अनुभवले, तेच त्याच्या काव्यात उतरलेले दिसतात. ‘बेटीबेटे’ (१९६४) चित्रपटातील एका गीतात तो लिहितो, ‘है बुझा बुझा सा दिल, बोझ सास सास पर जी रहे है, फिर भी हम सिर्फ कल की आँस पर!’ ही ओळ शैलेंद्रच्या अनुभवातून आली असेल, पण ती आपल्यालाही ‘आपलीच कथा’ वाटते. हाच प्रकार दाग (१९५२), अनाडी (१९५९) या चित्रपटातील गीतांमधून जाणवतो. 

...आणि तो केवळ व्यथाच मांडतो असे नाही, तर ‘चलना जीवन की कहानी रुकना मौत की निशानी...’ असे लिहून प्रेरणाही देतो. साध्या सरळ शब्दांत चित्रपटाच्या कथानकातील व्यक्तिमत्त्वांच्या भावना व्यक्त करणारी गीते जशी त्याने लिहिली, तशीच उत्स्फूर्त काव्येही लिहिली. राज कपूरच्या ‘आवारा’ चित्रपटाचे कथानक माहीत होण्याच्या आधीच केवळ ‘आवारा’ या शीर्षकावरून त्याने गीत लिहिले होते. 

शैलेंद्र त्यांच्या परिवारासोबत३० ऑगस्ट १९२३ रोजी रावळपिंडी येथे जन्मलेल्या शैलेंद्रचे मूळ नाव शंकरदास केसरीलाल शैलेंद्र असे होते. जन्मानंतरच्या काही वर्षांतच त्यांचा परिवार मथुरा येथे राहण्यास गेला. त्या काळातच ते कविता लिहू लागले. आपल्या कवितांच्या आधारे ते भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात उतरले. १९४२मध्ये त्यांना तुरुंगवासही झाला होता. त्यानंतर त्यांनी रेल्वेमध्ये नोकरी केली. त्या संदर्भातील प्रशिक्षणासाठी ते आग्रा येथे गेले असता एका तरुणीच्या प्रेमात पडले व काही काळाने तिच्याशीच विवाहबद्ध झाले. १९४७मध्ये नोकरीच्या संदर्भातच त्यांना मुंबईला यावे लागले. या सर्व घडामोडींत त्यांचे काव्यलेखन सुरूच होते. त्यामुळेच मुंबई येथील वास्तव्यात एका कविसंमेलनात राज कपूरची व त्यांची ओळख झाली. काही घटना घडल्या व काही काळाने ते आर. के. स्टुडिओमध्ये दाखल झाले. पुढे चित्रपटप्रेमींसाठी उत्कृष्ट चित्रपटगीतांचा खजिना निर्माण करणारे ते पाच जण- हसरत, शैलेंद्र, शंकर- जयकिशन आणि मुकेश यांना राज कपूरने एकत्र आणले आणि मग मधुर चित्रपटगीतांची ‘बरसात’ सुरू झाली. नायिकेच्या गीतांसाठी लता मंगेशकरही त्यामध्ये होत्याच!

गीतकार शैलेंद्रकेवळ राज कपूरच्याच नव्हे, तर अन्य निर्मात्यांच्या चित्रपटांसाठीही शैलेंद्रने पुढे गाणी लिहिली. ती सारी काव्ये म्हणजे अक्षरगाणीच होती व आहेत. शैलेंद्र यांनी त्यांच्या कारकिर्दीत १६९ चित्रपटांसाठी ७६८ गीते लिहिली. अर्थातच यापैकी १२४ चित्रपटांसाठी त्यांनी जी गीते लिहिली, ती शंकर-जयकिशन यांनी संगीतबद्ध केली होती. अन्य चित्रपटांचे संगीतकार एस. डी. बर्मन, दत्ताराम, रवी, हेमंतकुमार असे होते.

चित्रपटगीतांव्यतिरिक्त शैलेंद्र यांनी लिहिलेली अन्य काव्ये हा एक स्वतंत्र लेखाचा विषय ठरू शकतो. तसेच त्यांनी निर्माण केलेला ‘तीसरी कसम’ हा चित्रपटही एक मोठा विषय आहे. त्या चित्रपटाची निर्मिती, त्या काळात झालेला खर्च आणि ‘आपले’ म्हणणाऱ्या माणसांकडून शैलेंद्रना झालेला मनस्ताप या सर्वांमुळेच शैलेंद्र यांचा मृत्यू झाला, असे म्हणणे कदाचित फार चुकीचे ठरणार नाही. कारण हा भावनांवर जगणारा कवी हळवा होता, व्यवहारी नव्हता. आपले कोण, परके कोण त्याला कळले नव्हते आणि ते वास्तव त्याने काव्यात त्यापूर्वीच मांडले होते. आपण कसे आहोत ते तो ज्या काव्यातून सांगतो, तेच ‘सुनहरे गीत’ आज आपण पाहू या.

सच है दुनियावालों के हम है अनाडी

आम्ही सगळे काही शिकलो, पण थोडीशी हुशारी (ज्याला या दुनियेत व्यवहारीपणा म्हणतात, धंदेवाईक नजर, छे छे व्यावसायिक दृष्टी म्हणतात) मात्र आम्ही शिकलो नाही. लोकहो हेच खरे, की आम्ही अडाणीच राहिलो आहोत. 

दुनिया ने कितना समझाया
कौन है अपना कौन पराया 
फिर भी दिल की चोट छुपाकर 
हमने आप का दिल बहलाया
खुद ही मर मिटने की ये जिद है हमारी 

कोण जवळचे, कोण दूरचे, कोण आपले, कोण परके हे किती किती प्रसंगातून जगाने आम्हाला दाखवून दिले, एक प्रकारे समजावून सांगितले; पण तरीही आमच्या हृदयातील काही शल्य आम्ही कोणापुढेही उघड न करता (आमचे दु:ख झाकून ठेवून) तुम्हा सर्वांना खूश करत गेलो, रिझवत गेलो (वास्तविक पाहता तुम्हीही परके आहात हे आमच्या लक्षातच आले नाही) स्वत:च्या हातानेच दु:ख ओढवून घेण्याचा आमचा हा स्वभाव, स्वत:च स्वत:ला संपवून टाकण्याचा आमचा हा हट्ट? खरेच की हो आम्ही अडाणी राहिलो.

दिल का चमन उजडते देखा 
प्यार का रंग उतरते देखा 
हमने हर जीनेवालेको 
धन दौलत पे मरते देखा 
दिल पे मरनेवाले मरेंगे भिखारी

आम्ही काही स्वप्ने बघितली, ती सत्यात उतरविण्याची धडपड केली आणि नंतर ती स्वप्ने पूर्ण होण्याऐवजी चक्काचूर होताना पाहिली (हे सारे तुमच्यामुळेच घडले). अर्थातच आमच्या हृदयाचा बगीचा (चमन) उजाड होताना आम्ही पाहिला आणि प्रीतीचा रंग उडून जातानाही, कमी कमी होतानाही पाहिला. (या जगात) आम्ही प्रत्येक माणसाला धनदौलतीसाठी जीव टाकताना पहिले (प्रेमासाठी जीव टाकणारे आम्हाला भेटलेच नाहीत) खरेच की हो आमच्यासारखे भावनांवर जगणारे या जगात निष्कांचन अवस्थेतच मरायचे नाही का? आम्ही खरेच अडाणी आहोत. 

असली नकली चेहरे देखे, 
दिल पे सौ सौ पहरे देखे 
मेरे दुखते दिल से पूछो, 
क्या क्या ख्वाब सुनहरे देखे 
टूटा जिस तारे पे नजर थी हमारी 

(या जगात आम्ही काय काय पाहिले नाही?) खरे, खोटे चेहरे पहिले. (क्षणात चेहरे बदलणारे, वागणे बदलणारे, नकली मुखवटे धारण करणारे पाहिले) (तुमच्या संदर्भात विचार करायचा नाही असे) ठरवून शंभर वेळा मनाला पहाऱ्यात ठेवले, ते तुमच्याकडे न वळवण्याचा प्रयत्न केला. माझ्या या दुःखी अंत:करणाला विचारा, की त्याने कोणकोणती स्वप्ने पाहिली होती (की जी भंगली). तुटलेल्या ताऱ्यावर आमची नजर होती (अर्थात ज्यांच्याकडून अपेक्षापूर्ती होणार नाही त्यांच्याकडून मी अपेक्षा ठेवल्या). कारण खरेच आम्ही अडाणी होतो. हुशारी आम्हाला जमलीच नाही, आम्ही ती शिकलोही नाही. 

राज कपूर आणि गीतकार शैलेंद्रएका साध्यासुध्या, सरळमार्गी, भावुक मनाच्या, जीवनातील सर्व बाजूंनी अयशस्वी ठरलेल्या मनाची स्थिती शैलेंद्र यांनी किती साध्या-सोप्या शब्दांत मांडली आहे बघा! आणि या अशा आशयसंपन्न काव्याकरिता बांधलेली चाल, वाद्यमेळ ही संगीतकार शंकर-जयकिशन यांची कलाकुसर! गाण्यातील दर्द स्पष्ट करणारा मुकेश यांचा आवाज व पडद्यावरचा राज कपूर यांचा अभिनय! गीताचे दिग्दर्शन हृषीकेश मुखर्जींचे कौशल्य. वाढदिवस-हृदयाच्या आकाराचा केक-त्याचे कौतुक-केक कापणे, टाळ्यांचा आवाज व नायकाचा एकाच ओळीचा संवाद ‘और देखो दिल पर छुरिया चल रही है!’... आणि मग लगेचच संगीताची सुरुवात! गाण्याचे एकेक कडवे- मोतीलाल, नूतन आणि शुभा खोटेसाठी! कथानकाच्या अनुषंगाने त्या त्या कडव्याचा अर्थ! 

काय आणि किती सांगावे एकाच गीताबद्दल? ‘सुनहरे गीत’ असे असते...

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.)

(दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link