Next
‘प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवठा’
प्रश्नोत्तराच्या तासात मुख्यमंत्र्यांची माहिती
प्रेस रिलीज
Wednesday, June 19, 2019 | 03:24 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘राज्यात मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यातील प्रत्येक गावात नळाद्वारे पिण्याचे पाणी देण्यात येणार आहे. दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या निती आयोगाच्या बैठकीत पुढील पाच वर्षांत ‘हर घर को नल से जल’ ही योजना राबविण्यात येणार आहे,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

परभणी शहराला पाणी पुरवठा करण्याबाबत सदस्य जयप्रकाश मुंदडा यांनी प्रश्न विचारला होता. त्यावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘केंद्र शासनाच्या निकषानुसार गाव आणि शहरांमध्ये पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न आहे. राज्यात दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण भागात प्रती व्यक्ती २० लिटर पाणी दिले जाते. त्यामध्ये वाढ करण्यासाठी आढावा घेण्यात येईल. गेल्या पाच वर्षांत अमृत योजनेच्या माध्यमातून बहुतांश शहरांच्या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. या योजना ४० टक्के पूर्णत्वास आल्या आहेत. लातूरमधील अमृत योजनेचे काम ९० टक्के झाले असून, ऑगस्टअखेर काम पूर्ण होईल.’ 

राज्य शासनाची पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता असून, ज्या योजना केंद्र शासनाच्या निकषात बसत नाहीत त्याचा मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश करून पाणी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, एका उपप्रश्नाला उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर म्हणाले, परभणी शहराला पाणी पुरवठ्याच्या योजना सप्टेंबरअखेर पूर्ण करण्यात येतील आणि शहरातील नागरिकांना प्रति व्यक्ती १३५ लिटर पाणी दिले जाईल.’

या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अजित पवार, गणपतराव देशमुख, विजय वडेट्टीवार, संजय सावकारे, जयकुमार गोरे, बच्चू कडू, अमित देशमुख, यशोमती ठाकूर यांनी भाग घेतला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search