Next
नाट्यसंगीत : नाट्य आणि संगीत यांचा समतोल
BOI
Tuesday, March 26, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


पूर्वी संगीत ऐकण्याची इतर कोणती माध्यमं उपलब्ध नसताना रसिक केवळ संगीत ऐकण्यासाठी नाटकाला येत असत, त्यामुळे लांबलेल्या पदांसहित सहा-सहा तास नाटकं चालायची, मात्र आता संगीत आणि नाट्य यांचा समतोल राखला गेला नाही, तर ते आताच्या नाट्यरसिकांना आवडत नाही. त्यामुळे या गोष्टीचं भान ठेवूनच प्रयोग सादर केला गेला पाहिजे... ‘सूररंगी रंगले’ सदरात या वेळी मधुवंती पेठे सांगत आहेत नाट्यसंगीत आणि त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल...
.............................................
‘नाट्यसंगीत’ या गीतप्रकाराबद्दल विचार करताना, हे नाटकातलं संगीत आहे याचा विसर पडता कामा नये. म्हणजे, नाटकातील एखादा प्रसंग अधिक उठावदार करण्यासाठी, त्या नाट्यपदाची योजना तिथे केलेली असते, हे भूमिका करणाऱ्या कलाकाराने नेहमीच लक्षात ठेवावं लागतं. एखादं नाट्यपद नाटकात गाणं आणि तेच पद मैफलीत सादर करताना गाणं, यांत फरक आहे. मैफलीत ते कितीही वेळ गायलं तरी चालतं, पण नाटकात त्या गाण्याचं प्रयोजन ओळखूनच गायला हवं. 

'संगीत ओंकार' नाटकात नायकाच्या भूमिकेत नायक राहूल पेठेया नाट्यपदांमध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे गायकी अंगानं गाण्याची पदं, तर दुसरा प्रकार अभिनयप्रधान पदं. रंगभूमीवर तो नायक किंवा नायिका त्या प्रसंगात एकटीच असेल, तर ते पद थोडं लांबलं तरी चालतं. पूर्वी अशी एकट्याची पदं काही खास कारणांसाठी पण घेतली गेली आहेत. जसं, एक प्रवेश संपल्यावर, नायकाला किंवा नायिकेला पुढच्या प्रवेशासाठी वेष बदलायचा असेल तर, किंवा नेपथ्यात काही बदल करावयाचे असतील तर, अशी पदं ‘ड्रॉप’वर घेतली जात असत. ही पदं आलाप, ताना यांनी रंगवून गाईली जात असत. याउलट जी पदं दोघांमधील संवाद सुरू असताना येत, ती बहुदा शब्दप्रधान आणि अभिनयासह रंगवावी लागत. 

सुरुवातीच्या काळात जेव्हा रसिक फक्त संगीताचा आस्वाद घेण्यासाठी संगीत नाटकांना येत असत, तेव्हा ती नाटकं पाच-सहा ताससुद्धा चालत असत; पण १९६०नंतरच्या काळात, जेव्हा आकाशवाणी, संगीत संमेलनं, खासगी व म्युझिक सर्कल्स यांच्यातर्फे होणारे कार्यक्रम अशा वेगवेगळ्या माध्यमांतून, रसिकांना संगीत ऐकायची संधी मिळत होती, तेव्हा ते रसिक संगीत नाटकाला, पूर्वीच्या काळातील रसिकांसारखे फक्त संगीत ऐकण्यासाठी जात नसत. तर त्यांना त्यांतील कथानक, नाट्य हेदेखील अनुभवायचं असायचं. अशा वेळी जर त्यांतील कलाकार, नाट्य सोडून फक्त गाण्यांकडे जास्त झूकत असतील, तर ते रसिकांना मान्य नव्हतं. ही गोष्ट लहानपणी मी स्वत: अनुभवली होती. 

आमच्या ‘चेंबूर हायस्कूल’च्या भव्य पटांगणात नाट्यमहोत्सव व्हायचा. तेव्हा रोज गद्य नाटकाचा मनापासून आस्वाद घेणारे प्रेक्षक, संगीत नाटकाच्या दिवशी मात्र नाटकात गाणं सुरू झालं, की चहापाण्यासाठी ब्रेक घ्यायचे. मला खूप आश्चर्य वाटायचं. रोज तन्मयतेनं नाटकाचा आनंद घेणाऱ्या त्या प्रेक्षकांना, संगीत नाटक का बरं खिळवून ठेवू शकत नाही? खास संगीत नाटकांची आवड असणारे प्रेक्षक, त्यातील संगीताचा आनंद घेत होते, पण सर्वसामान्य प्रेक्षकांना हे संगीत नाटक का बरं बांधून ठेवू शकत नसावं, हे विचार माझ्या मनात नेहमी येत असत.

'संगीत मानापमान'मधील 'भामिनी'च्या भूमिकेत मधुवंती पेठेतेव्हा याचं उत्तर शोधत माझ्या मनाशीच मला वाटायचं, की नाटकातल्या नाट्यापेक्षा संगीत जास्त तर होत नाही ना? ‘संगीत’ आणि ‘नाट्य’ यांचा समतोल राखला गेला नाही, तर ते आताच्या नाट्यरसिकांना आवडत नाही. त्यामुळे या गोष्टीचं भान ठेवूनच प्रयोग सादर केला गेला पाहिजे. याव्यतिरिक्त नंतरच्या काळात जगण्याची लयही बदलत चालली होती. पूर्वीइतका निवांतपणा लोकांकडे राहिला नव्हता. हे ओळखून संगीत नाटकाचाही कालावधी, गद्य नाटकांसारखा अडीच-तीन तासांचा व्हायला हवा, त्यांतील विषयही काळानुसार बदलले पाहिजेत, नवीन तरूण पिढीतील गायक-गायिका नाटकात यायला हव्यात, असा सारासार विचार करून १९९३मध्ये आम्ही ‘संगीत मानापमान’चा नेटका प्रयोग तीन तासांत बसवून तो सादर केला. सुप्रसिद्ध नाट्य समीक्षक बाळ सामंत यांची आम्हांला शाबासकीही मिळाली. असा नेटका प्रयोग बसवल्याबद्दल, नाटकाचे दिग्दर्शक अविनाश आगाशे यांचं त्यांनी कौतुक केलं होतं.

नाट्यसमीक्षक बाळ सामंतया अनुभवानं अधिक समृद्ध झाल्यानंतर केलेल्या आणखी एका नाटकाबद्दल तुम्हाला सांगायला आवडेल. २००१मध्ये बोरीवलीच्या ‘नादब्रह्म’ संस्थेनं एका नवीन संगीत नाटकाची निर्मिती केली. मी त्या नाटकाला संगीत दिलं होतं. यापूर्वी अनेक गीतांना मी संगीत दिलं असलं, तरी नाटकाला संगीत देण्याच्या माझी ती पहिलीच वेळ. त्यामुळे नाटक नवीन - संगीत ओंकार, नाटककार नवीन - वसंत केतकर, संगीत दिग्दर्शक नवीन - मी स्वत:, मुख्य भूमिका करणारे मुलं-मुली १८-२० वर्षांचे तरूण पिढीतील माझे शिष्य, असा योग जुळून आला. दिग्दर्शक संजीव पंडित अनुभवी, पण नव्याशी नातं जोडून वागणारे असे होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेणारे होते. पूर्वीच्या नाटकांमध्ये, कलाकारांना गाण्यासाठी प्रत्येक वेळी स्टेजच्या मध्यभागी माईकसमोर यावं लागत असे, पण ती पद्धत बदलून आम्ही कॉलर माईक वापरले. त्यामुळे वावरण्यातला सहजपणा जपला गेला. कुठेही बसून, उभं राहून गाण्याची मोकळीक मिळाली. 

शास्त्रीय संगीताबरोबरच, भावगीतासारखं सुगम संगीतही वापरून पदांच्या चाली दिल्यामुळे विविधता मिळाली. नाटकाचं कथानक आणि मोजक्याच प्रसंगी येणारी पदं, याचा समतोल राखला गेला. खूप मनापासून चार-पाच महिने तालमी केल्यामुळे, सर्वांच्या कामात, गायनात सहजता आली. स्थानिक पातळीवर हा प्रयोग यशस्वी झालाच, पण त्याचबरोबर सांगलीला ‘महाराष्ट्र राज्य संगीत नाटक स्पर्धे’तही या नाटकाला यश मिळालं. गायक कलाकारांना त्यांच्या संगीत भूमिकांसाठी आणि मला संगीत दिगदर्शनासाठीही पुरस्कार मिळाले. त्यानंतर निरनिराळ्या संस्थांनीही आमच्या नाटकाला आमंत्रित केलं. अडीच-तीन तासांत होणारं तरुणांचं संगीत नाटक, असं कौतुक नाटकाला लाभलं. माझं खूप दिवसांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान मिळालं. 

त्याही पुढे जाऊन मी स्वत: नवीन संगीत नाटक लिहिलं. स्वत:चे विचार मांडणारं, जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला लावणारं सूर माझे सोबती हे संगीत नाटक मी लिहिलं आणि २००७मध्ये त्याची निर्मितीसुद्धा केली. संगीतात करिअर करणारी नायिका आणि २१व्या शतकातील आयटी क्षेत्रातील ताणतणावांमुळे त्रस्त झालेला नायक, यांच्या संसाराचं चित्रण या नाटकात होतं. त्या अनुभवांबद्दल पुढे कधीतरी नक्कीच लिहीन.

संगीत नाटक हे मराठी रंगभूमीचं खास वैशिष्ट्य आहे. बालगंधर्वांनी अजरामर केलेला तो मखमली पडदा, दुसऱ्या कोणत्याही भाषिक रंगभूमीला लाभला नाही. तो जपणं हे आपलं कर्तव्यच आहे, असं आपण सर्वांनी मानलं पाहिजे. त्याची गोडी ही अवीट आहे. फास्ट फूडच्या जमान्यात कितीही इन्स्टंट पदार्थ आले, तरी पुरणपोळीची अवीट गोडी जशी वेगळीच असते, तशीच ही संगीत नाटकांची परंपरा जपली गेली पाहिजे. कालानुरुप त्याच्या स्वरूपात, विषयांत बदल होतील, पण त्याची रंगत कधीच कमी होणार नाही, हे नक्की.

- मधुवंती पेठे
ई-मेल : madhuvanti.pethe@gmail.com

(लेखिका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार आहेत. ‘सूररंगी रंगले’ हे सदर दर १५ दिवसांनी मंगळवारी प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/ANhKXW या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search