Next
पुण्यात दोन दिवसीय भारतदर्शन राष्ट्रीय महोत्सव
प्रेस रिलीज
Wednesday, October 24, 2018 | 02:25 PM
15 0 0
Share this article:

पत्रकार परिषदेत माहिती देताना डावीकडून रिता सेठिया, रचना शिकरे, नारायण फड व हसन शेख.

पुणे : जयहिंद परिवार, लाइफस्टार ग्लोबल वेलफेअर फाउंडेशन, भारतदर्शन वर्ल्ड सेंटर आणि आर्टिस्ट ग्लोबल कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय कला व हस्तकला प्रदर्शन आणि भारतदर्शन राष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन केले आहे. २७ व २८ ऑक्टोबर २०१८ रोजी घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक सभागृहात हा महोत्सव होणार आहे.

कला, संस्कृती, चित्रपट, संगीत, नृत्य, गायन, वादन याचे दर्शन घडविणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन २७ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ११.४५ वाजता भटक्या, विमुक्त जाती-जमाती राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष भिकूजी उर्फ दादा इदाते यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युनियन बँक ऑफ इंडियाचे क्षेत्र प्रबंधक एच. सी. मित्तल असणार आहेत. या प्रसंगी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे डॉ. कल्याण गंगवाल, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, उद्योजक अविनाश जोगदंड, युवासंत शामजी महाराज यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गौरव महाराष्ट्र पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

महोत्सवात आयोजित कला व हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटनही या वेळी होणार आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी मारुती विजय गायकवाड स्प्रे पेंटिंगचा डेमो दाखविणार आहेत. नेहरू सांस्कृतिक केंद्रातील राजा रवी वर्मा कलादालनात हे कलाप्रदर्शन होणार असून, ते दोन्ही दिवस सर्वांसाठी सकाळी १० ते रात्री आठ या वेळेत विनामूल्य खुले राहणार आहे. उद्घाटनानंतर काव्य संमेलन होईल. महोत्सवादरम्यान लघुचित्रपट दाखविले जातील; तसेच मुकेश कनेरी यांचे व्याख्यान, सुजाता धडफळे यांचे हस्तकला प्रात्यक्षिक, बॉलिवूड धमाका हा गायनाचा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम होतील.    

२८ ऑक्टोबर रोजी ‘योग’ या विषयावर चर्चासत्र होणार असून, यात डॉ. मधुसूदन घाणेकर, योगाचार्य विदुला शेंडे, हिमांशू संख्ये, रमेश अगरवाल, स्मिता सोवनी, योगराज गुरुजी आदी सहभागी होणार आहेत. या वेळी ‘क्रीएटिंग हॅप्पीनेस’ या सत्राच्या माध्यमातून कला व शिल्प प्रदर्शन, पेंटिंग्स बनविणे यांसारखे विविध उपक्रम सकाळी ११.३० ते १.३० या वेळेत होतील; तसेच या सत्रात आवश्यक साहित्य हे आयोजकांमार्फत मोफत देण्यात येईल. ‘सामाजिक संस्थांचे देशाच्या आणि समाजाच्या विकासात योगदान’ या विषयावर मार्गदर्शन, तसेच बीड येथील श्रावणबाळ आश्रम आणि बालग्राम या संस्थांचा सन्मान केला जाणार आहे. त्यानंतर नृत्यस्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा होतील.

‘महोत्सवाचा समारोप २८ ऑक्टोबरला सायंकाळी ५.३० वाजता होईल. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बालहक्क राज्य आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, जम्मू काश्मीरचे पंतप्रधान कार्यालयाचे विशेष कर्तव्य अधिकारी डॉ. सागर डोईफोडे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, चाटे शिक्षण समूहाचे प्रा. फुलचंद चाटे, उद्योगपती आबासाहेब नागरगोजे, तुळशीराम गुट्टे महाराज उपस्थित राहणार आहेत. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे,’ अशी माहिती भारतदर्शन वर्ल्ड सेंटरचे प्रमुख नारायण फड, रचना शिकरे, हसन शेख, रिता सेठिया, प्रशांत ताम्हाणे यांनी दिली.

उद्घाटनाविषयी :
दिवस :
शनिवार, २७ ऑक्टोबर २०१८
वेळ : सकाळी ११.४५ वाजता
महोत्सव कालावधी : २७ व २८ ऑक्टोबर २०१८
प्रदर्शनाची वेळ : सकाळी १० ते रात्री आठ
स्थळ : नेहरू सांस्कृतिक सभागृह, घोले रस्ता, रत्नागिरी.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search