Next
‘महात्मा फुले संग्रहालयात होणार कायमस्वरूपी कलादालन’
‘व्हीनस आर्ट फेस्ट’ चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी बापट यांची माहिती
प्रेस रिलीज
Tuesday, June 11, 2019 | 03:21 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘महात्मा फुले वस्तू संग्रहालयात एक विभाग चित्रांसाठी ठेवण्यात आला आहे. हे संग्रहालय सरकारी असले, तरी शासनाची कोणतीही मदत न घेता आम्ही त्याची दुरुस्ती केली आहे. पुणे शहराची ओळख असलेल्या या संग्र्हलायातील या चित्र दालनात आधीच काही चित्र आहेत; परंतु ही जागा आम्ही कायमस्वरूपी कलादालनासाठी देऊ इच्छित आहोत. येथे चित्र, शिल्प अशा कलांसाठी विनामूल्य व्यासपीठ उपलब्ध होईल,’ असे पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी सांगितले.

निवडक ४५ चित्रकारांची चित्रे प्रथमच एकाच व्यासपीठावर ‘व्हीनस आर्ट फेस्ट २०१९’ चित्र प्रदर्शनाच्या निमित्ताने आली आहेत. व्हीनस ट्रेडर्सच्या ४५ वर्धापनदिनानिमित्त या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन खासदार बापट यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर व्हीनस ट्रेडर्सचे सुरेंद्र करमचंदानी, प्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे उपस्थित होते. 


हे प्रदर्शन आठ ते १० जून २०१९ या कालावधीत जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिरातील बालगंधर्व कलादालनात भरविण्यात आले होते. यापुढेही दर वर्षी अशाप्रकारचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. या प्रसंगी राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिल्पकार जितेंद्र सुतार, कलेच्या क्षेत्रात डिलीट पदवीचे पहिले मानकरी ठरलेले मुरली लाहोटी, मराठी स्वाक्षऱ्यांमधील सर्जनशील कलाकार गोपाल वाकोडे, कला शिक्षण क्षेत्रातून डॉ. अवधूत अत्रे, डॉ. मिलिंद ढोबळे, आर्ट टू डे गॅलरीच्या प्रियंवदा पवार, डॉ. सुभाष पवार यांचे सत्कार बापट यांच्या हस्ते करण्यात आले. 

चित्रांच्या दुनियेत एक नवी स्फुर्ती मिळत असल्याचे सांगत बापट म्हणाले, ‘केवळ चेहरेच बोलतात असे नाही, तर चित्रही बोलतात. चित्रांची भाषा आंतरिक असते. त्यातून चित्रकाराच्या भावना, संवेदना, वेदना हे सारेच व्यक्त होत असतात. ही कला अनादिकालापासून आहे आणि पुढेही अशीच राहील. बऱ्याचदा एखाद्या प्रश्नाचे गांभीर्य त्यावरील पुस्तक वाचूनही जेवढे कळणार नाही त्यापेक्षा लवकर त्यावरील चित्र बघून समजते.’

‘राजकारण आणि राष्ट्रकारण यात फरक आहे आणि या सरकारच्या विजयानंतर राष्ट्रकारण सुरू होत आहे. पूर्वी शासन दरबारी कलेला, कलाकारांना फार मान होता. तो आता कमी झाल्यासारखा वाटतो आहे. जेवढे महत्त्व बॉलीवूड आणि क्रिकेटला आहे तेवढे शिल्पकला, चित्रकलेला उरलेले नाही असे जाणवते. या कलांना महत्त्व देऊन पुढे नेणे गरजेचे आहे,’ असे परांजपे यांनी सांगितले. 


या चित्रप्रदर्शनात ज्येष्ठ चित्रकारांपासून ते आजच्या काळातील नावाजलेले चित्रकार यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांचे काम पाहण्याची संधी चित्रप्रेमींना मिळत आहे. यात रवी परांजपे, मुरली लाहोटी, रावसाहेब गुरव, जयप्रकाश जगताप, सुधाकर चव्हाण, शोभा पत्की, मंजिरी मोरे, स्नेहल पागे, रवी देव, मिलिंद मुळीक, संदीप यादव, संजय भालेराव, विलास कुलकर्णी, विवेक निंबाळकर, शरद तरडे, आदित्य शिर्के आदींच्या कलेचा आस्वाद रसिकांनी घेतला. या प्रदर्शनात पेन्सिल, चारकोल, खडू, जलरंग, तैलरंग, अॅक्रॅलिक आदी सर्वच माध्यमांतील चित्र मांडण्यात आली होती. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search