Next
‘पाच वर्षांत संस्कृतला आले अच्छे दिन’
BOI
Monday, July 22, 2019 | 05:52 PM
15 0 0
Share this article:

संस्कृत प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात बोलताना नीरज दांडेकर. शेजारी डॉ. कल्पना आठल्ये, डॉ. किशोर सुखटणकर आदी.

रत्नागिरी :
‘देशात गेल्या पाच वर्षांत संस्कृतसाठी ‘अच्छे दिन’ आले आहेत. ‘आयआयटी’मध्ये वैकल्पिक विषय म्हणून संस्कृत शिकवतात. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्येही संस्कृत शिकवले जाते. तमिळनाडूमध्ये पहिलीपासून सातवीपर्यंत संस्कृत शिक्षण दिले जाते. महाराष्ट्रातील संस्कृत शिक्षकांनीही लोकांना संस्कृत शिकवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. दररोज एखाद्या व्यक्तीला संस्कृतमधील काही ना काही शिकवा. प्रतिदिन संस्कृत लिहा, वाचा,’ असे आवाहन ‘संस्कृत भारती’चे नीरज दांडेकर यांनी केले.

नीरज दांडेकर यांचा सत्कार करताना प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर.

कालिदास संस्कृत विश्वतविद्यालय, जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग, संस्कृत भारती व गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत शिक्षकांचा पाच दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम रत्नागिरीत आयोजित करण्यात आला होता. २१ जुलै रोजी त्याचा सांगता समारंभ झाला. त्या वेळी ते बोलत होते. बदललेल्या अभ्यासक्रमानुसारचे महाराष्ट्रातील हे पहिले प्रशिक्षण होते.

कार्यशाळेत सहभागी संस्कृत शिक्षक

‘उत्तर प्रदेशमध्ये संस्कृत अकादमी कार्यरत आहे. तेथे संस्कृत संभाषणासाठी संस्कृत शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. संस्कृत भाषा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. रामटेक, नागपूर येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वकविद्यालयाने संस्कृत बालसाहित्य प्रकाशित केले आहे. अल्प दरामध्ये ही पुस्तके उपलब्ध आहेत. संस्कृत विश्व विद्यालयातर्फे महाराष्ट्रात संस्कृत शिक्षकांसाठी ४० कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. कुलगुरूंच्या पुढाकारामुळे हे शक्य होत असून, त्यासाठी आर्थिक तरतूद एप्रिलमध्येच करून ठेवली आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, प्रशिक्षक राजेश ठक्कर, प्रणव गोगटे, हिरालाल शर्मा या वेळी उपस्थित होते. 

प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर. शेजारी मान्यवर.

डॉ. सुखटणकर म्हणाले, ‘महाविद्यालयास नॅकची ए ग्रेड मिळाली आहे. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून संस्कृत विभाग सक्षम व प्रबळ आहे. संभाषण कौशल्याप्रमाणे शिक्षक, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम चांगल्या रितीने झाले. महाविद्यालयाची कालिदास व्याख्यानमाला महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे.’

डॉ. आठल्ये यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक रोहित भोळे, सानिका पंडित, यामिनी गोसावी यांनी अनुक्रमे संस्कृत, मराठी व हिंदीमधून मनोगत व्यक्त केले. वर्षातून एकदा असे प्रशिक्षण व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रशिक्षणार्थी शिक्षकांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने रत्नागिरी जिल्हा संस्कृत शिक्षक संघटनेच्या अध्यक्ष रेखा इनामदार यांनी उत्कृष्ट नियोजनाबद्दल डॉ. कल्पना आठल्ये यांचा सत्कार केला. रवींद्र पाटणकर यांनी सूत्रसंचालन केले. आशिष आठवले यांनी आभार मानले.  

हेही जरूर वाचा : 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search