Next
फॉन रायन्स एक्स्प्रेस
प्रसन्न पेठे (Prasanna.pethe@myvishwa.com)
Tuesday, September 12 | 02:22 PM
15 1 0
Share this story

‘If only one gets out, it's a victory’ असं म्हणणारा रांगडा, उतावळा ब्रिटिश मेजर फिंचम आणि थंड डोक्याने सुटकेचे प्लान्स आखणारा अमेरिकन कर्नल रायन यांच्यामधली जुगलबंदी. जर्मनव्याप्त इटलीच्या नयनरम्य प्रदेशातून मित्र राष्ट्रांच्या युद्धकैद्यांनी केलेल्या पलायनातला रोमांचक थरार मांडणारी फिल्म ‘फॉन रायन्स एक्स्प्रेस’.... पाहू या आजच्या ‘सिनेसफर’मध्ये...
.....................
फॉन रायन्स एक्स्प्रेस 

दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या काळात नाझीव्याप्त इटलीमधल्या युद्धकैद्यांनी एक मालगाडी हायजॅक करून, स्वित्झर्लंडमार्गे केलेल्या सुटकेच्या प्रयत्नांची उत्कंठावर्धक कहाणी सांगणारा हा १९६५ सालचा ब्लॉकबस्टर सिनेमा! एरव्ही कायम संगीतिकांमधून गाजणारा अमेरिकेचा सर्वांत लोकप्रिय गायक-अभिनेता फ्रँक सिनात्रचा हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा लोकांना प्रचंड आवडला आणि १९६५ सालचा लक्षवेधी हिट सिनेमा ठरला! सिनात्रला तोलामोलाची साथ दिली ब्रिटिश मेजर फिंचमच्या भूमिकेतल्या ट्रेव्हर हॉवर्ड या ब्रिटिश अभिनेत्याने! डेव्हिड वेस्टहायमरच्या प्रसिद्ध कादंबरीवर बनलेल्या या सिनेमाचा शेवट मात्र कादंबरीपेक्षा वेगळा होता.

सिनेमाची सुरुवात होते ती इटलीमधल्या एका किनाऱ्यालगतच्या गावामध्ये. गस्तीवर निघालेल्या एका इटालियन सैनिकांच्या ट्रकच्या डोक्यावरून एक अमेरिकन फायटर प्लेन धूर सोडत जाताना दिसतं. विमानाचं इंजिन निकामी झाल्याने त्यांच्या डोक्यावरून पुढे जात ते विमान काही अंतरावर जाऊन कोसळतं. जवळच कॅफेमध्ये निवांत बसलेले दोन जर्मन अधिकारी ते पाहतात आणि जीपने त्या दिशेने जातात. कोसळलेल्या विमानाने एव्हाना पेट घेतलेला असतो आणि ट्रकमधून उतरलेले इटालियन सैनिक जवळ उभे असतात. जर्मन अधिकाऱ्यांनी पायलटविषयी विचारल्यावर पायलट अपघातात गेल्याचं ते सांगतात. समाधान झालेले जर्मन अधिकारी सवयीने ‘हेल हिटलर’ म्हणून तिथून निघतात. त्यांची पाठ वळताच ते इटालियन सैनिक त्यांना जीभ काढून वाकुल्या दाखवत ट्रकमधून निघतात तेव्हा त्यांच्यात त्या विमानातून बचावलेला अमेरिकन कर्नल आपल्याला दिसतो.

इटालियन सैनिकांच्या ट्रकमधून तिथल्या ब्रिटिश आणि अमेरिकन युद्धकैद्यांच्या छावणीत रवानगी झाल्यावर त्याची गाठ तिथल्या युद्धकैद्यांच्या लीडरशी पडते. नुकताच आपला कर्नल ‘स्वेट-बॉक्स’मध्ये हाल होऊन मरण पावल्यामुळे तिथे सर्वांत सीनियर असणाऱ्या ब्रिटिश मेजर फिंचमपेक्षा कर्नल रायन हा रँकने वरचा असल्याने तो आता युद्धकैद्यांचा लीडर बनतो; पण ते ब्रिटिश मेजरला आवडलेलं नसतं. मेजरचे पळून जाण्याचे प्रयत्न आणि इटालियन अधिकारी बताग्लियाविरुद्ध त्याची सततची संघर्षाची भूमिका याचा परिणाम म्हणून बताग्लियाकडून सर्वच युद्धकैद्यांना त्रास सोसावा लागत असतो. दोन वेळचं बरं खाणं नशिबात नसतं. स्वच्छ कपडे मिळणं बंद झालेलं असतं. अस्वच्छ कपड्यांमुळे आणि आंघोळ नसल्याने कैद्यांमध्ये आजार वाढत असतात. यावरून कर्नल रायन आणि मेजर फिंचममध्ये वैचारिक संघर्षाची ठिणगी पडते. इटालियन्सच्या म्हणजे पर्यायाने जर्मनांच्या बाजूने कर्नल रायन झुकतोय, असं वाटून कॅम्पवरचे मेजर फिंचमचे लोक त्याला उपहासाने ‘फॉन रायन’ अशी जर्मन उपाधी देतात.  

कर्नल रायनला हे दिसत असतं, की अमेरिकन सैन्य काही आठवड्यांतच इटलीवर हल्ला करून त्यांची सुटका होईल आणि त्यामुळे अकारण जीव धोक्यात घालून पळून जाण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीत व्यवस्थित रहाणं चांगलं अशी त्याची धारणा असते. तो बताग्लियाकडून कैद्यांसाठीच्या सर्व सोयी पुन्हा सुरू करून घेण्याच्या बदल्यात, त्याला कैद्यांनी सुटकेसाठी चालवलेल्या प्रयत्नांची माहिती देतो. त्या बदल्यात बताग्लिया त्यांना आंघोळीसाठी शॉवर्स, रेड क्रॉसची पार्सल्स वगैरे काही सोयी देतो; पण धूर्तपणे नवीन कपडे मात्र देण्याचं वचन फिरवतो. कर्नल रायन लगोलग सर्व कैद्यांना अंगावरचे कपडे उतरवून त्यांची होळी करायला सांगतो. त्याची ही चाल यशस्वी होऊन सर्व कैद्यांना आंघोळीसाठी शॉवर्सबरोबरच त्यांचे चांगले कपडे परत मिळतात; पण इकडे रायनला मात्र शिक्षा म्हणून ‘स्वेट-बॉक्स’मध्ये टाकण्यात येतं.

काहीच दिवसांत अमेरिकन सैन्य इटलीवर चाल करून आल्याची आणि इटली शरणागती पत्करणार असल्याची वार्ता येऊन कॅम्पवरचे सैनिक पळून जातात; मात्र बताग्लिया कैद्यांच्या हातात सापडतो. मेजर फिंचम त्याला ठार मारण्याचे आदेश देतो; पण ‘स्वेट-बॉक्स’मधून सुटका झालेला कर्नल रायन पुन्हा सूत्र हाती घेऊन बताग्लियाला ठार मारण्याऐवजी ‘स्वेट-बॉक्स’मध्ये कोंडून ठेवण्यास सांगतो. पुन्हा त्याच्याविषयी नाराजीची भावना बळावते.

तेवढ्यात कॅम्पवरून जर्मनांचं टेहळणी विमान घिरट्या घालून जातं. बताग्लियाच्या हाताखालचा अधिकारी कॅप्टन ओरीआनी त्यांना सांगतो, की आता जर्मन सैनिक कुठल्याही क्षणी त्यांना पकडायला पुन्हा येतील, त्यामुळे त्यांनी पळून जावं आणि त्यासाठी तो त्यांना जंगलातला रस्ता दाखवण्याची तयारी दर्शवतो. त्याच्यावर विश्वास ठेवून रायन सर्व युद्धकैद्यांना ताबडतोब कॅम्प सोडून त्याच्यामागोमाग निघायला सांगतो. सर्व जण निघतात. ते जंगलात आतमध्ये शिरेपर्यंत त्यांना पकडायला आलेलं जर्मन सैन्य कॅम्पकडे जाताना त्यांना दिसतं.

जंगलात पडक्या अवशेषांमध्ये रात्र घालवण्यासाठी ते थांबतात. इटालियन कॅप्टन ओरिआनी सुरक्षित वाट शोधण्यासाठी निघून जातो. इकडे जर्मन सैनिक कॅम्पवर पोचून बताग्लियाची सुटका करतात. तो त्यांना कैदी जंगलाकडे पळून गेल्याचं सांगतो. आणि त्यांच्याबरोबर युद्धकैद्यांच्या मागावर येतो. जर्मन सैनिक चुपचाप जंगलात शिरून आसरा घेत असलेल्या युद्धकैद्यांना घेरतात. पळापळ सुरू होते. जर्मन सैन्याच्या गोळीबारात पळणारे बरेच कैदी मारले जातात. उरलेल्या सर्वांना पुन्हा कैद करून जवळच्या रेल्वेमार्गावरच्या मालगाडीत नेण्यात येतं. जखमी कैद्यांना गोळ्या घालून संपवलं जातं. मालगाडीच्या डब्यात रायन आणि फिंचमला जखमी अवस्थेतला कॅप्टन ओरिआनी दिसतो. त्यालाही कैद केलेलं असतं. रायनच्या आदेशावरून जिवंत ठेवलेल्या बताग्लियामुळे कैदी पुन्हा पकडले गेले. कित्येक जण मारले गेले हे पाहून उद्विग्न झालेला मेजर फिंचम त्याची ‘You'll get your Iron Cross now, "Von" Ryan!’ अशा कडक शब्दांत निर्भर्त्सना करतो.

दरम्यान, मालगाडीच्या प्रत्येक डब्यात कोंबलेले कैदी आणि प्रत्येक बंद डब्यावर चढून पहारा देणारा एकेक मशीनगनधारी नाझी सैनिक असा त्या मालगाडीचा प्रवास जर्मन कॅम्पच्या दिशेने सुरू होतो. आता इथून सुटणं अशक्यप्राय असल्याचं जाणून मेजर फिंचम, कर्नल रायनला पुन्हा डिवचतो, ‘No chance of our tunneling from this coupe, Von Ryan!’ ....आणि त्याचे ते शब्द ऐकून रायनच्या डोक्यात एक विलक्षण कल्पना येते...ती म्हणजे, डब्याच्या तळाशी फुटबोर्डवर असलेल्या फळ्या उचकटून त्यातून चालत्या गाडीतून डब्याच्या खालच्या दिशेने रुळामधल्या जागेत जायचं. तिथनं अंधारात बाहेर पडून दोन डब्यांच्या मधल्या शिड्यांपर्यंत पोचायचं आणि मग पहारा देणाऱ्या सैनिकांना ठार करून गाडीचा ताबा मिळवायचा. नंतर हायजॅक केलेली ती मालगाडी स्वित्झर्लंडमध्ये नेऊन तिथून सुटका करून घ्यायची! 

आणि त्यानंतर सुरू होतो एक अफलातून थरार!!.....अंधारात त्यांचं शिताफीनं रुळांच्या बाहेर जाऊन शिडीपर्यंत जाणं...काही सैनिकांना मारून त्यांचे ड्रेस आणि गन्स घेईपर्यंत अचानक पुढे गाडी स्लो होत सिग्नलला थांबणं...मग सर्व सैनिकांनी पाय मोकळे करायला खाली उतरल्यावर अंधारात कैद्यांच्या होणाऱ्या हालचाली...बेसावध सैनिकांवर हल्ले करताना अचानक ते सावध होणं...अंधारातला गोळीबार.....सैनिकांना मारून गाडीचा ताबा घेईपर्यंत अचानक दूरवरून त्याच ट्रॅकवरून त्यांच्या मागोमाग जर्मन ट्रूप्स घेऊन दुसरी ट्रेन येताना दिसणं....दरम्यान त्यांनी शेवटच्या डब्यात पकडलेल्या जर्मन ऑफिसर फॉन क्लेमेंटबरोबर त्याची रखेल गॅब्रिएलासुद्धा असणं....आणि या टप्प्यावर सिनेमातलं थ्रिल वाढत जातं...

क्लेमेंट त्यांना सांगतो, की गाडीच्या पुढच्या प्रत्येक टप्प्यात ठराविक स्टेशन्सवर त्याला स्वतःला पुढच्या ऑर्डर्स मिळणार असतात आणि त्यानुसार त्यांनी जायचं असतं...मग रायन त्यांच्यातल्या जर्मन बोलू शकणाऱ्या आणि साधारणपणे क्लेमेंटसारख्या दिसणाऱ्या कॅप्टन कोस्तांझोला तोतया क्लेमेंट बनवतात....

खऱ्या क्लेमेंटला डब्यात खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं. इकडे मालगाडी पुढच्या स्टेशनवर थांबते आणि भरपूर नाझी सैनिक पाहणी करायला येतात. जर्मन बोलू शकणारा एकटा कोस्तांझोच असतो....गाडी जास्त वेळ स्टेशनवर थांबणं धोक्याचं असतं. कारण मागून येणारी गाडी एव्हाना प्लॅटफॉर्मच्या टोकाला दिसायला लागलेली असते... पुढे काय होतं?..... गॅब्रिएला स्वतःची सुटका करून घेऊन क्लेमेंटला सोडवते का?... त्यांचं काय होतं?... सैनिकांनी भरलेली मागची ट्रेन त्यांना गाठते का?... आसपासचा अगदीच अनोळखी प्रदेश... वरून विमानातून होणारा बॉम्बवर्षाव... त्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या रेल्वे ट्रॅक्समुळे गाडी पुढे जाण्यात निर्माण झालेली गंभीर समस्या... पाठीवर त्यांच्यापर्यंत पोहोचणारी नाझी तुकडी... यातून ते मार्ग काढू शकतात का?... न्यूट्रल (युद्धापासून अलिप्त) अशा स्वित्झर्लंडपर्यंत ते पोहोचू शकतात का?... असा अगदी ‘नेल बायटिंग फिनिश’ असणारी ही फिल्म!!! ‘If only one gets out, it's a victory’ या वाक्याला असणारा खोल संदर्भ!!.....

अवश्य बघावी अशीच ही रोमांचक दृश्यांची फिल्म! मार्क रॉबसनचं दिग्दर्शन आणि जेरी गोल्डस्मिथचं पूरक पार्श्वसंगीत!! ‘फॉन रायन्स एक्स्प्रेस!’

ई-मेल : Prasanna.Pethe@myvishwa.com

(‘सिनेसफर’ हे सदर दर मंगळवारी प्रसिद्ध होते.) 
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link