Next
जीवन में पिया तेरा साथ रहे...
BOI
Sunday, December 23, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

नामवंत संगीतकार वसंत देसाई यांचा २२ डिसेंबर हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘जीवन में पिया तेरा साथ रहे’ या गीताचा...
...........
हिंदी चित्रपटसृष्टीतील गीत आणि संगीत क्षेत्रात मराठी माणसाचे कर्तृत्व या विषयाचा विचार केला, तर त्यामध्ये सी. रामचंद्र, लता मंगेशकर, स्नेहल भाटकर, सुधीर फडके अशी अनेक नावे घ्यावी लागतील. त्यामध्ये संगीतकार वसंत देसाई यांचे नावही आवर्जून घ्यावे लागेल. कालच, २२ डिसेंबर रोजी त्यांचा स्मृतिदिन होता. १९७५मध्ये एका विचित्र अपघातात सापडून ते गेले. त्यांनी संगीत दिलेली खूप गाणी आपल्या माघारी ठेवली आहेत, असे नाही; पण तरीही त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांमधील काही गीते विसरता येण्यासारखी नाहीत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत फार तर ५० चित्रपटांना संगीत दिले असेल; पण त्यातही काही वैशिष्ट्यपूर्ण गीते आहेत. 

कोकणातील मालवण गावी वसंतरावांचे आजोबा राहत होते आणि ते कीर्तनकार होते. वसंतरावची आई घरात अनेक वेळा ओव्या व भजने म्हणत असे. अशा परिस्थितीमुळे भक्तिसंगीत बालपणापासून त्यांच्या कानावर पडत होते. कुडाळ येथे शालेय शिक्षण घेत असतानाच ते हार्मोनियम वाजवण्यास शिकले. अभिनयाचे व संगीताचे शिक्षण त्यांनी बालवयातच खेडोपाडी चालणाऱ्या नाटकांमधून घेतले होते. त्यांची संगीताची व अभिनयाची आवड पाहून त्यांच्या चुलतभावाने त्यांना प्रभात चित्रसंस्थेत दाखल केले. 

तेथे असताना १९३०मध्ये त्यांनी ‘खुनी खंजीर’ या मूकपटात काम केले. नंतर १९३२मधील ‘अयोध्या का राजा’ या चित्रपटात त्यांनी एक गाणे गायले. नंतर अमृत मंथन, अमर ज्योती, वहाँ या चित्रपटांमधून त्यांना गाण्याची संधी मिळाली. हे गायन चालू असतानाच त्यांनी उस्ताद आलमखान व इनायत खाँ यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. रंगभूमीवर जाऊन काही नाटकांमध्ये कामे केली. 

१९३९ सालानंतर मात्र त्यांनी आपले सगळे लक्ष फक्त संगीतावरच केंद्रित केले; पण मध्यंतरीच्या काही काळात चित्रपटांमधील काम कमी असल्याने त्यांनी एक वाद्यवृंद सुरू केला. त्याचे प्रयोग सुरू झाले. अल्प कालावधीतच निर्माते- दिग्दर्शक जे. बी. एच. वाडिया यांनी त्यांना त्यांच्या चित्रपटाला संगीत देण्यासाठी बोलावले. त्या चित्रपटाचे नाव होते ‘शोभा.’ ते संगीत लोकांना भावले. त्यामुळेच त्यांना आणखी दोन चित्रपटांची कामेही मिळाली. व्ही. शांताराम यांची राजकमल ही चित्रसंस्था १९४२मध्ये सुरू झाल्यावर त्यांच्या ‘शकुंतला’ या चित्रपटाला वसंतरावांनीच संगीत दिले होते. हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरल्यामुळे संगीतकार वसंत देसाई खऱ्या अर्थाने नावारूपाला आले. 

व्ही. शांताराम यांचे ते खास व नित्याचे संगीतकार बनले. राजकमल चित्रसंस्थेच्या नंतरच्या चित्रपटांना त्यांनीच संगीत दिले. व्ही. शांताराम यांनी संगीताचे वेगवेगळे प्रयोग वसंत देसाई यांच्याकडून करून घेतले. गाण्यांमधून प्रतिध्वनीचा प्रयोग त्यांनी ‘परबत पे डेरा’ या चित्रपटातून केला, तर ‘डॉ. कोटणीस की अमर कहानी’ या चित्रपटाला संगीत देताना त्यांनी चिनी स्वरांचा उपयोग केला होता. १९५०पासून वसंतरावांचा नावलौकिक झाला होता. १९५५चा ‘झनक झनक पायल बाजे’ हा चित्रपट वसंतरावांच्या कारकिर्दीतील शिरपेचाचा तुरा ठरला. १९५६मध्ये आलेल्या ‘तूफान और दिया’ या चित्रपटानेही प्रचंड लोकप्रियता मिळवली. ओघानेच वसंतरावांनाही ती मिळाली. 

या काळात वसंतरावांनी यशाची हॅट्ट्रिक साधली. झनक झनक पायल बाजे, तूफान और दिया आणि दो आँखे बारह हाथ या चित्रपटांची गाणी, संगीत प्रचंड लोकप्रिय ठरले. आजही ते आवर्जून ऐकले जाते; मात्र संगीतकार वसंत देसाई यांचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला ‘गूंज उठी शहनाई.’ प्रकाश पिक्चर संस्थेचा हा शास्त्रीय संगीतप्रधान चित्रपट १९५९मध्ये प्रदर्शित झाला होता व त्याचे दिग्दर्शन विजय भट्ट यांनी केले होते. ज्युबिली स्टार राजेंद्र कुमार हा त्याचा नायक, तर अमिता त्याची नायिका होती. या चित्रपटासाठी सुप्रसिद्ध सनईवादक बिस्मिल्ला खान यांनी सनई वाजवली होती. या चित्रपटातील नऊ गाणी श्रवणीय होती आणि ती लोकप्रियही झाली. 

यानंतर त्यांनी प्यार की प्यास, आशीर्वाद, गुड्डी अशा काही चित्रपटांना संगीत दिले. गुड्डी चित्रपटाच्या वेळी त्यांनी वाणी जयराम या नव्या गायिकेला संधी दिली. १९५०-५१च्या सुमारास ‘अपना देश’ आणि ‘शीशमहल’ या चित्रपटांमध्ये त्यांनी अशाच प्रकारे पुष्पा हंस या पंजाबी गायिकेला संधी दिली होती. 

‘दो आँखे बारह हाथ’करिता त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटातील पडद्यावर संध्या आणि प्रत्यक्षात लता मंगेशकर यांनी गायलेले लोरी गीत अर्थात अंगाई गीत वेगळेच आहे. ते संगीतात गुंफनाना नैसर्गिक आवाजांचा वापर व एक विशिष्ट ठेका वापरून वसंतरावांनी एक वेगळी कल्पकता दाखवली होती. 

मध्यंतरी ब्रेथलेस साँग हा एक प्रकार नवीन पिढीने आणला. त्याचे खूप कौतुक झाले. परंतु हा प्रकार १९६८च्या ‘आशीर्वाद’ चित्रपटातून वसंत देसाईंनी प्रथम आणला होता. अशोककुमार या ज्येष्ठ अभिनेत्याकडून ‘रेलगाडी’ हे गाणे त्यांनी गाऊन घेतले होते. तीच नवीन पिढीची ‘ब्रेथलेस’ पद्धत होय, हे ते गाणे ऐकल्यावर आपल्या लक्षात येते. 

हिंदी चित्रपटात असे वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या वसंत देसाई यांनी मराठी चित्रपटांनाही संगीत दिले होते,. त्यामध्ये अमर भूपाळी, श्यामची आई अशा चित्रपटांचा समावेश होतो. 

असे हे संगीतकार वसंत देसाई २२ डिसेंबर १९७५ रोजी अचानक हे जग सोडून गेले. त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी, त्यांनी संगीतबद्ध केलेले एक मधुर गीत आपण आता पाहू या! चित्रपट अर्थातच गूंज उठी शहनाई! या चित्रपटाची गीते भरत व्यास यांनी लिहिली होती. त्यातीलच एक सुखद प्रेमगीत - मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेले! 

गीताच्या सुरुवातीला नायिका नायकाला साद घालत म्हणते -

साथ जियेंगे साथ मरेंगे अमर हमारा प्यार

आम्हा प्रेमिकांची वाट या जगातील कोणतीही भिंत (अर्थात अडथळे) अडवू शकत नाही. आम्ही एकत्रच जगू आणि एकत्रच (एकमेकांसमवेत) मरू (आणि) आमचे प्रेम अमर आहे व अमरच राहील. 

नायिकेची ही साद ऐकून नायकही तिच्याकडे जातो व दोघे मिळून गाऊ लागतात -

जीवन में पिया तेरा साथ रहे 
हाथो में तेरे मेरा हाथ रहे

हे प्रिया/हे प्रिये जीवनात मी तुझ्या साथीला आहे. तुझा हात माझ्या हातात राहू दे!

नायिका त्याच्या प्रेमाचा परिणाम सांगताना गाते -

सिंगार भरा पिया प्यार तेरा
झनकार करे हो मेरे कंगना में 
लगी जबसे लगन मेरे मन में सजन 
शहनाई बजे हो मेरे अंगना में 
सरगम की सदा बरसात रहे

हे प्रिया, माझ्या हातातील कंकणाचा नाद तुझ्या प्रेमाचा शृंगार मला ऐकवतो. जेव्हापासून तुला भेटण्याची ओढ माझ्या मनाला लागली, तेव्हा माझ्या मनाच्या अंगणात सनईचे सूर निनादत आहेत. ही अशी संगीताच्या सुरांची बरसात सतत राहू दे, मला सतत ऐकू येऊ दे (असे मला वाटते) 

नंतर पुढे हे दोन्ही प्रेमिक गातात - 

जब तक सूरज चंदा चमके 
गंगा जमुना में बहे पानी 
रहे तब तक प्रीत अमर अपनी 
है ये जनम जनम की दीवानी 
रानी याद मिलन की ये रात रहे 
पिया याद मिलन की ये रात रहे

तो सांगतो, की जोपर्यंत हे चंद्र-सूर्य आहेत व जोपर्यंत गंगा यमुना या नद्या वाहत आहेत, तोपर्यंत आपले प्रेम अमर राहणार आहे. त्याच्या या सांगण्यावर ती सांगते, की मीही जन्मोजन्मी तुझीच प्रेमदिवाणी राहणार आहे. तिने असे आश्वस्त केल्यावर तो म्हणतो, आपल्या मीलनाची ही रात्र कधी विसरू नकोस. त्यावर तीही म्हणते, की आपल्या मीलनाची ही रात्र स्मरणीय राहील. 

भरत व्यास यांनी लिहिलेले हे गीत तसे साध्या-सोप्या शब्दांतील व आटोपशीर आहे; पण ते संगीतात गुंफताना वसंत देसाई यांनी ‘आऽऽ आऽऽ आऽऽ ओऽऽऽ ओऽऽऽ असे आलाप इतक्या योग्य ठिकाणी वापरलेत. काही ओळी पुन्हा गाऊन घेतल्या आहेत, तर काही ठिकाणी एक ओळ गायकाला तर एक गायिकेला गायला लावली आहे. त्यामुळे या गीताची गोडी खूप वाढली आहे. शिवाय एक ठेका, लय आहेच! स्वरसम्राज्ञी व भूलोकीच्या गंधर्वांचे स्वर या गीताला ‘सुनहरे गीत’ बनवून गेले आहे. 

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Vijay Anant Nafde About 268 Days ago
Very nice efforts.
0
0

Select Language
Share Link
 
Search