Next
तुम्ही हे शब्द लिहिताना चुकता का?
BOI
Friday, March 02 | 10:30 AM
15 0 0
Share this story


मराठी भाषा बोलताना, लिहिताना रोजच्या वापरातल्या अनेक शब्दांचे लेखन अनेकांकडून अनेकदा अयोग्य पद्धतीने केले जात असल्याचे दिसते. अनेक मराठी घरांमध्ये एकही मराठी शब्दकोश नसतो. असला तरी त्यात शब्दांचे योग्य-अयोग्य लेखन पडताळून न पाहता केवळ अनुकरण करण्याची सवय वर्षानुवर्षे चालत आली आहे. परंतु एखादी गोष्ट वर्षानुवर्षे चुकीची केली म्हणून ती बरोबर ठरत नसते. म्हणूनच कारणे समजून घेऊन  शब्दांच्या योग्य लेखनाची सवय लावून घेतली पाहिजे. मराठी राजभाषा दिन साजरा करता या गोष्टीचेही भान असणे आवश्यक आहे. म्हणूनच हमखास चुकणाऱ्या काही  शब्दांबद्दल सांगणारा शुद्धलेखनतज्ज्ञ अरुण फडके यांचा लेख प्रसिद्ध करत आहोत.
.............
‘भाष्’ म्हणजे ‘बोलणे’ या संस्कृत धातूपासून ‘भाषा’ हा स्त्रीलिंगी शब्द तयार झाला. ‘मनातील विचार आणि कल्पना व्यक्त करण्यासाठी मुखावाटे निघालेल्या ध्वनींचा सार्थ समूह म्हणजे भाषा,’  अशी भाषेची व्याख्या प्र. न. जोशी यांनी त्यांच्या ‘सुबोध भाषाशास्त्र’ ह्या पुस्तकात केली आहे. अलीकडच्या काळातील इंग्रजी कोषांमध्येसुद्धा भाषेच्या व्याख्येत ‘लिहिणे’ या क्रियेचा उल्लेख केलेला आढळतो. म्हणजेच आजच्या काळात भाषा ही केवळ मुखावाटे निघणारी गोष्ट राहिलेली नसून, अनेक माध्यमांद्वारे संपूर्ण जगात ती पसरत आहे. 

भाषा ही प्रवाही आणि परिवर्तनशील अशी गोष्ट आहे. ती बोली स्वरूपात असते, तेव्हाही तिच्यात बदल होत असतात आणि ती लेखी स्वरूपात असते, तेव्हाही तिच्यात बदल होत असतात. या बदलांची दिशा योग्य असली पाहिजे. भाषा जेव्हा केवळ बोली रूपात असते, तेव्हा तिच्या शब्दरूपांत आणि शब्दार्थांमध्ये खूप बदल होत असतात. हे बदल भराभर होत असतात आणि ह्या बदलांमध्येही ठिकठिकाणी भिन्नता आढळते. बोलीभाषांमध्ये भिन्नता असूनही जिच्या लिखाणात अनेक बाबींमध्ये ठिकठिकाणी एकसूत्रता किंवा एकवाक्यता आढळते, अशी भाषा म्हणजे ‘प्रमाण भाषा’ होय. 

या सगळ्याचा अभ्यास करून समाजातील काही अभ्यासू व्यक्तींनी एकत्र येऊन, चर्चा करून प्रमाण भाषेच्या लेखनाचे काही नियम ठरवले आहेत. भाषेत वापरले जाणारे शब्द ठिकठिकाणी कसे वापरले आहेत, त्यांच्या रूपांमध्ये कोणत्या प्रकारचे भेद दिसतात, या शब्दांची रूपे काळानुसार कशी बदलत गेली आहेत, बोली रूप आणि लेखी रूप यामध्ये काय भिन्नता आहे, नवीन आलेले किंवा येणारे शब्द लिहिण्याची प्रवृत्ती काय आहे, परभाषेतील शब्द स्वीकारताना ते कोणत्या पद्धतीने लिहिले जात आहेत, अशा सगळ्या बाबींचा विचार हे नियम ठरवताना केला गेला आहे.           
  
मराठीत बोलताना किंवा लिहितानाही आपण बोलण्याच्या किंवा लिहिण्याच्या ओघात आणि वेगात बरेचसे शब्द चुकीचे लिहितो. अगदी परंपरागतरीत्या ते शब्द तसेच लिहिले जात असल्याने आपल्याला त्यात काही वावगे किंवा चुकीचे वाटत नाही. परंतु शुद्धलेखनाच्या काही नियमांनुसार जेव्हा ते शब्द आपण तपासतो, तेव्हा आश्चर्यकारकरीत्या ते शब्द चुकीचे आहेत असे समजते. खुद्द मराठीतले असोत अथवा इतर भाषांचे मराठीत लिहिताना असोत (विशेषतः इंग्रजीतील) असेच काही हमखास चुकणारे अनेक शब्द आहेत. 

संधी हा प्रकार विशेषतः संस्कृत भाषेत वापरला जातो. परंतु संस्कृतमध्ये तयार झालेले कितीतरी शब्द आपण मराठीत जसेच्या तसे वापरतो. त्यापैकी काही शब्द असे आहेत, की दोन शब्द लागोपाठ उच्चारले, तर आपल्या बोलण्यात खंड पडत आहे, असे वाटते. त्याचप्रमाणे तेच दोन शब्द आपण वारंवार उच्चारत राहिलो, तर पहिल्या शब्दातील अंत्य वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील आरंभीचा वर्ण ह्यांचे नैसर्गिकरीत्या एकत्रीकरण होऊन त्यातून एक नवाच वर्ण तयार होत आहे आणि आपल्या उच्चारांतून एक वेगळाच शब्द निर्माण होत आहे, असे जाणवते. अशाच संधीक्रियांमधून जेवढे बरोबर तेवढेच चुकीचे शब्दही तयार होतात आणि आपण ते सररास तसेच वापरतो.            

असेच काही शब्द पाहू या. डावीकडे लिहिलेले म्हणजे - चिन्हाच्या आधी लिहिलेले शब्द योग्य आहेत. चुकीचे शब्द उजवीकडे लिहिले असून, त्यांच्यापुढे ‘x’ हे चिन्ह दिले आहे.

मथितार्थ - मतितार्थ x
मध्यांतर - मध्यंतर x
दीपावली - दिपावली x
शुभाशीर्वाद - शुभाशिर्वाद x
रवींद्र - रविंद्र x
हृषीकेश - ऋषिकेश x
सर्वोत्कृष्ट - सर्वोत्कृष्ठ x
अल्पोपाहार - अल्पोपहार x
सोज्ज्वळ - सोज्वळ x
कोट्यधीश - कोट्याधीश x
कोट्यवधी - कोट्यावधी x
त्र्यंबक - त्रिंबक x
पृथक्करण - पृथःकरण x
धिक्कार - धिःकार x
पश्चात्ताप - पश्चाताप x 
तत्त्व - तत्व x
महत्त्व - महत्व x 
व्यक्तिमत्त्व - व्यक्तिमत्व x
उद्ध्वस्त - उध्वस्त x
मुक्तच्छंद - मुक्तछंद x 
रंगच्छटा - रंगछटा x
पितृच्छाया - पितृछाया x
मातृच्छाया - मातृछाया x
चतुर्मास - चातुर्मास x
दुर्भिक्ष - दुर्भिक्ष्य x
निर्घृण - निघृण x
निर्भर्त्सना - निर्भत्सना x
चतुरस्र - चतुरस्त्र x
दुरन्वय - दुरान्वय x
पुनःप्रक्षेपण - पुनर्प्रक्षेपण x
मनःस्थिती - मनस्थिती x
पुनःस्थापना - पुनर्स्थापना x 
यशःशिखर - यशोशिखर x
मनस्ताप - मनःस्ताप x

हे किंवा असे काही सर्वसाधारण आणि नेहमीच्या वापरातले शब्द आपण हमखास चुकीचे उच्चारतो आणि लिहितोही. असेच इतर काही शब्दही आहेत, जे चकित करणारे आहेत. ते त्यांच्या स्पष्टीकरणासह पाहू या... 

सार्वकालिक, सर्वकालीन, तत्काळ - सर्वकालिक, सार्वकालीन, तात्काळ 
सार्वकालिक, सर्वकालीन, तत्काळ हे योग्य शब्द आहेत आणि सर्वकालिक, सार्वकालीन, तात्काळ हे चुकीच्या पद्धतीने लिहिलेले शब्द आहेत. सर्वकाल ह्या शब्दाला इक हा प्रत्यय लागताना पहिल्या अक्षराची वृद्धी होऊन सार्वकालिक असा शब्द तयार होतो. सर्वकाल ह्या शब्दाला ईन हा प्रत्यय लागून सर्वकालीन असा शब्द तयार होतो. ईन हा प्रत्यय पहिल्या अक्षराची वृद्धी करत नसल्याने सार्वकालीन हे रूप अयोग्य. ह्याचप्रमाणे, तत्काल ह्या शब्दापासून तात्कालिक आणि तत्कालीन असे दोन शब्द तयार होतात. सर्वकालीन आणि तत्कालीन ह्या दोन शब्दांमधील इकार दीर्घ आहे हे लक्षात ठेवावे. तत्काल ह्या शब्दातील ल चा ळ करून (जसे कुल - कुळ, मल - मळ) मराठीने या शब्दाचे तद्भव रूप तत्काळ असे केले आहे. तात्काल किंवा तात्काळ हे दोन्ही शब्द अयोग्य होत. याचप्रमाणे - 

साहाय्य, साहाय्यक (योग्य) - सहाय्य, सहाय्यक x
जाज्वल्य - जाज्ज्वल्य x
तज्ज्ञ - तज्ञ x
अनावृत - अनावृत्त x
षष्ट्यब्दीपूर्ती - षष्ठ्यब्दिपूर्ती x
अल्पसंख्याक, बहुसंख्याक (योग्य)  - अल्पसंख्यांक, बहुसंख्यांक x
उद्योगीकरण, औद्योगिकीकरण, भगवीकरण (योग्य) - औद्योगीकरण, भगवेकरण x
महाराष्ट्रीय - महाराष्ट्रीयन x
सर्जन, सर्जनशील, सर्जनशीलता (योग्य) - सृजन, सृजनशील, सृजनशीलता x
प्रथितयश - प्रतिथयश x
उद्धृत - उधृत x

यांसारखे इतरही अनेक शब्द आहेत, जे आपण हमखास चुकीचे बोलतो आणि लिहितोही. खरे तर या गोष्टी, सवयी सुधारणे अगदी सहज शक्य आहे. गरज आहे ती योग्य नियोजनाची, आपल्या भाषेबद्दलच्या आपुलकीची आणि अभिमानाची, जागतिकीकरणाच्या या स्पर्धेत आपली भाषा ही ज्ञानभाषा झाली पाहिजे ह्या तळमळीची, मला मातृभाषेत शुद्ध लिहिता आले पाहिजे ह्या इच्छाशक्तीची! तर आणि केवळ तरच, शुद्धलेखन हा आग्रह न राहता ती आपली सवय होईल... 

(मराठी शुद्धलेखन अॅपविषयी सविस्तर वाचण्यासाठी https://goo.gl/CCFuFA येथे क्लिक करा. मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध झालेले सर्व लेख, कविता आणि व्हिडिओ https://goo.gl/qgDdWU या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
सुहास घुमरे About 287 Days ago
खूप उपयुक्त माहिती .......
0
0
रमेश यशवंत वाकनीस About 288 Days ago
खूप छान माहिती धन्यवाद...एक शंका... कथा कादंबरी नाटक हे प्रकार हाताळताना बोली भाषेचा उपयोग करावा लागतो..,पुस्तक छापताना शुध्द लेखनाचे काटेकोर नियम पाळणे ( प्रमाण भाषेत बोलणारी पात्रे सोडून) कसे शक्य होइल ?
1
0
VINAYAK KHORJUVEKAR About 289 Days ago
भारी प्रशिक्षण दिलंत धन्यवाद दादा
0
0
मुग्धा फडके About 289 Days ago
अत्यंत माहितीपूर्ण लेख....मी स्वतः अशा अनेक चुका करत होते..पण मला आता ते कळलं...आभार !!
0
0

Select Language
Share Link