Next
सरकारी इमारतींत एलईडी उपकरणे; महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक
BOI
Tuesday, May 23, 2017 | 03:45 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : सरकारी इमारतींमध्ये एलईडी उपकरणे बसवण्याच्या प्रकल्पात पुढाकार घेणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरले आहे. या उपक्रमांतर्गत दीड हजार अनिवासी शासकीय इमारतींमध्ये एलईडी उपकरणे बसवली जाणार आहेत. त्यामुळे राज्याची दर वर्षी सुमारे १७५ कोटी रुपयांची बचत होणार आहे. केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत याबाबतच्या करारावर नुकत्याच सह्या करण्यात आल्या. तसेचत, देशभरात सर्वसामान्यांच्या घरांमध्ये ७७ कोटी एलईडी बल्ब बसवण्याच्या केंद्र सरकारच्या प्रकल्पामुळे दर वर्षी ४० हजार कोटी रुपयांची वीजबचत होणार आहे, अशी माहितीही गोयल यांनी दिली. ‘इमारतींमधील ऊर्जा कार्यक्षमता’ या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळा गोयल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत नुकतीच झाली.

‘देशभरात ऊर्जा कार्यक्षम एलईडी उपकरणे बसविण्याच्या केंद्र सरकारच्या उपक्रमाची दखल जगभरातील अमेरिका, स्वीडन आदी पुढारलेल्या देशांनीही घेतली आहे,’ असे गोयल यांनी सांगितले. ‘जगभरातील १९३ देशांनी एकमताने कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यासाठी कार्यपत्रिका तयार केली होती. त्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगाचे नेतृत्व केले. अक्षय ऊर्जा कार्यक्रम राबवण्याचा भारताचा दृढ संकल्प आहे. इंग्लंड सरकार आणि भारत सरकार यांच्यात नुकत्याच झालेल्या करारानुसार ‘उजाला’ कार्यक्रमांतर्गत तेथील १० कोटी बल्ब बदलण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला,’ अशी माहिती गोयल यांनी दिली.

‘यापूर्वी दर वर्षी सहा लाख एलईडी बल्बची निर्मिती केली जात होती. आता केंद्र सरकारच्या कार्यक्षमतेमुळे एका दिवशीच तेवढ्या बल्बची निर्मिती केली जात आहे,’ असेही गोयल यांनी सांगितले. ‘यापूर्वी ३१० रुपयांना विकला जाणारा हा बल्ब या क्षेत्रातील नामांकित कंपन्यांशी चर्चा केल्याने सर्वसामान्यांना केवळ ९९ रुपयांना उपलब्ध करून दिला जात आहे. भारतातील ७७ कोटी बल्ब बदलण्याच्या कार्यक्रमामुळे सर्वसामान्य नागरिक केंद्र सरकारच्या योजनेशी जोडले गेले. या प्रकल्पामुळे दर वर्षी देशाची ४० हजार कोटी रुपयांची बचत होणार असून, कार्बन उत्सर्जनात ८० दशलक्ष टनांनी घट होणार आहे. तसेच ११ हजार २०० कोटी युनिट्स वीज वाचणार आहे. ऊर्जा कार्यक्षमता हा विषय इमारतींशी लागू असल्याने यापुढे वास्तुशास्त्रज्ञ, बांधकाम व्यावसायिकांनाही ऊर्जा कार्यक्षम इमारतींच्या कार्यक्रमात सहभागी करुन घेण्याची गरज आहे,’ असे गोयल यांनी सांगितले. 

भारतात सर्वाधिक २३ हजार मेगावॉट विजेची मागणी महाराष्ट्रात असताना ही परिस्थिती राज्य सरकारने अत्यंत कार्यक्षमतेने हाताळली, याचे गोयल यांनी कौतुक केले. ‘वेस्टर्न कोलफिल्डकडून होणारा नियमित आणि दर्जेदार कोळसा पुरवठादेखील यासाठी उपयुक्त ठरला असून, वीजनिर्मितीचा खर्च २० टक्क्यांनी कमी झाला आहे. विजेची मागणी कार्यक्षमपणे हाताळल्यामुळे सर्वसामान्यांचे वीजबिल कमी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य् ठरले आहे,’ असेही ते म्हणाले.
‘एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड’ अर्थात ‘ईईएसएल’बरोबरच्या करारानुसार एक हजार पाचशे अनिवासी सरकारी इमारती ‘सोलर पॉवर अँड रिनोव्हेटिव्ह सस्टेनेबल हब’ (स्पर्श) या पर्यावरणस्नेही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत ऊर्जा कार्यक्षम करण्यात येणार आहेत.  

‘सौरऊर्जा संयत्रांसाठी केंद्राकडे मागणी करणार’
सरकारच्या सर्व इमारतींवर सौरऊर्जा संयंत्रे बसविण्यासाठी केंद्राकडे मागणी करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ‘राज्यातील सर्व शासकीय इमारतींसोबतच खासगी इमारतीही ऊर्जा कार्यक्षम म्हणजेच ग्रीन इमारती करण्याचा संकल्प सरकारने केला आहे. नवीन इमारतींना परवानगी देतानाच इमारतींचा आराखडा ‘ग्रीन’ स्वरूपाचा असल्याशिवाय परवानगी दिली जाणार नाही, असे धोरण यापूर्वीच स्वीकारले आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. 

‘या इमारतींमध्ये ऊर्जाबचतीसाठी लागणाऱ्या साधनांकरिता सुमारे सव्वातीनशे कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक ‘ईईएसएल’मार्फत करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारला कोणतीही भांडवली गुंतवणूक करावी लागणार नाही, हे या उपक्रमाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. यातून महाराष्ट्र सरकारची पुढील सात वर्षांत सुमारे ६५० ते ७०० कोटी रुपयांची बचत होणार आहे. पहिल्या पाच वर्षांत वाचणाऱ्या वीजबिलाच्या रकमेची परतफेड पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. ‘स्पर्श’ प्रकल्पांतर्गत वर्षभरात ११ लाख बल्ब, सात लाख पंखे आणि २५ हजार वातानुकुलन यंत्रे बदलण्यात येणार आहेत. या प्रकल्पात ईईएसलएल सुमारे ३२५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या उपक्रमामुळे दर वर्षी १७५ कोटी रुपये बचत होणार आहे. यातून १०९ कोटी रुपयांचा परतावा ‘ईईएसएल’ला दिला जाईल,’ असेही ते म्हणाले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search