Next
अनुभवश्रीमंती देणारा बिनपैशाचा प्रवास
सुरेखा जोशी
Wednesday, November 29 | 03:45 PM
15 0 0
Share this storyमनोरंजनाची अत्याधुनिक साधनं, खिशात खुळखुळणारा किंवा क्रेडिट-डेबिट कार्डच्या रूपानं नांदणारा भरपूर पैसा, प्रवासासाठी आरामदायी वाहनं अशा युगात आपण सध्या वावरतो. या पार्श्वभूमीवर, एकही पैसा, स्मार्टफोन, कॅमेरा यांपैकी काहीही न घेता केवळ सायकलवरून १०-१२ दिवस ग्रामीण भागात प्रवास घडवून आणणारी स्वपथगामी सायकल यात्रा गेली काही वर्षं आयोजित केली जात आहे. स्वतःचा, माणसातल्या माणसाचा शोध घेणाऱ्या आणि अनुभवश्रीमंत करणाऱ्या या बिनपैशाच्या प्रवासाबद्दल....
...........
सध्या समाजाच्या सर्वच स्तरांमध्ये सोशल मीडियाचा बोलबाला आहे. या आधुनिक तंत्रज्ञानात अक्षरशः दररोज बदल घडत आहेत. ते आत्मसात करण्याची धडपड शिशुवर्गातील मुलांपासून ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावरील आजीआजोबांपर्यंत सगळ्यांच्यातच दिसून येते. चकचकीत मॉल्स, मल्टिप्लेक्सच्या आजच्या जमान्यात आणि जवळ पैसे असतील तर काहीही विकत घेता येतं असं मानण्याच्या या काळात पैसे, स्मार्टफोन, कॅमेरा व क्रेडिट–डेबिट कार्डस् यांच्याशिवाय प्रवास आणि तोही सायकलवरून, अशी कल्पना कोणी मांडली तर? ती कल्पना मांडमाऱ्याला वेड्यातच काढलं जाईल; पण तशी केवळ कल्पनाच मांडली गेली नाहीये, तर गेली १०-१२वर्षं ती अंमलातही आणली जातेय. रामावतार सिंह नावाचे एक अवलिया अशी अनोखी सायकल यात्रा आयोजित करत आहेत. ‘स्वपथगामी सायकल यात्रा’ असे सार्थ नाव असलेली ही सायकल सफर आतापर्यंत राजस्थान, उत्तराखंड, गोवा, कर्नाटक अशा वेगवेगळ्या राज्यांमधून आयोजित करण्यात आली आहे.
  
सायकल यात्रा ही रामावतार सिंह ऊर्फ रामजींची कल्पना. रामजी हे एक कलाकार तर आहेतच, शिवाय पक्षी-प्राणिप्रेमी आणि विज्ञानप्रेमीदेखील आहेत. पैसे, मोबाइल आणि आधुनिक साधनं यांच्याशिवाय खेड्यांमधून सायकलवरून प्रवास करायचा ही त्यांची कल्पना आहे. ‘२००५मध्ये मी काही सहकाऱ्यांबरोबर मेवाड भागात सायकलवरून प्रवास करत होतो. तिथल्या वनस्पती व त्यांचे औषधी उपयोग यांच्या अभ्यासासाठी तो प्रवास होता. त्यातूनच मला पैसे आणि मोबाइल सोबत न ठेवता यात्रा करण्याची कल्पना सुचली. या प्रवासात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कोणीही सहभागी होऊ शकतं. यात्रेचा मूळ हेतूचं उल्लंघन होईल, अशी कोणतीही कृती करायची नाही, ही एकच अट,’ असं रामावतारसिंह यांनी सांगितलं.

कुठलाही संदेश देणं वा प्रचार करणं हा सायकल यात्रेचा हेतू नाही. ही कुठलीही स्पर्धा नाही किंवा पर्यटन अथवा पिकनिकही नाही. ही एक शोधयात्रा आहे. एकमेकांच्या मदतीनं, नव्या गोष्टी शिकत शिकत करायचा प्रवास आहे. ग्रामीण व शहरी भागातील लोकांमध्ये विविध कौशल्यं, ज्ञान व नव्या संकल्पना यांचं आदानप्रदान व्हावं हा या प्रवासाचा हेतू आहे. विशेषतः शहरी नागरिकांना ग्रामीण भागातल्या लोकांच्या जीवनानुभवातून काही शिकायला मिळावं या उद्देशानं सायकल यात्रा आयोजित करण्यात येते. 

वेगवेगळ्या गावांतून आलेले आणि एकमेकांसाठी पूर्ण अनोळखी असणारे हे यात्रेकरू प्रवासाच्या पहिल्या दिवशी एकमेकांशी ओळख करून घेतात. ओळख झाल्यानंतर सगळे मिळून प्रवासाची तयारी करतात. सायकल तपासणं, प्रवासाचा मार्ग ठरवून त्यानुसार नियोजन करणं आदी कामं पहिल्या दिवशी केली जातात. प्रत्यक्ष सायकल प्रवास दुसऱ्या दिवशी सुरू होतो. कपडे, अंथरूण पांघरूण, बॅटरी, रोजच्या गरजेच्या वस्तू आणि आपल्याला येत असलेलं कौशल्य दुसऱ्यांना शिकवण्यासाठी आवश्यक साधनं एवढंच सामान यात्रेत सहभागी होणाऱ्यांनी आपल्यासोबत न्यायचं असतं. प्रवासात प्रथमोपचाराची कुठलीही साधनं नेली जात नाहीत. गरज पडल्यास नैसर्गिक, घरगुती उपचार केले जातात. 

यात्रा साधारण दोनशे किलोमीटर अंतराची असते. प्रवासाच्या पहिल्या व शेवटच्या दिवशी राहण्यासाठी आणि जेवणासाठी होणारा चारशे रुपयांचा खर्च सहभागी होणाऱ्यांना द्यावा लागतो. त्याशिवाय सायकल भाड्यानं घेतल्यास त्यासाठीचा खर्च द्यावा लागतो; मात्र सहभागी होणाऱ्या कोणालाही केवळ पैशांसाठी नकार दिला जात नाही. 

प्रातिनिधिक फोटोअनोळखी लोकांबरोबर संवाद साधून त्यांच्यासोबत एक ऋणानुबंध तयार करण्याची तुमची कला, तुमची कल्पनाशक्ती, तुमचे कौशल्य यांचा या प्रवासात कस लागतो. प्रवासात कोणतीही अडचण आली, तर त्यावर मात कशी करायची याचं शिक्षण स्वानुभवातून मिळतं. प्रवास करताना वाटेत निसर्ग, ग्रामीण जीवनशैली, गावरान मेवा यांचा तुम्ही मनसोक्त आनंद घेऊ शकता, अशी ही संकल्पना आहे.

या वर्षी २८ सप्टेंबर ते चार ऑक्टोबर या कालावधीत राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील गावांमधून ही सायकल यात्रा आयोजित करण्यात आली होती. राजस्थानमधल्याच अगर नावाच्या गावातले गौतम खंडेलवाल त्यात सहभागी झाले होते. त्यांच्याकडून या प्रवासाचे काही अनुभव जाणून घेतले. ‘आम्ही सायकलवरून दररोज २५ ते ३० किलोमीटर प्रवास करत होतो. आठ दिवसांच्या प्रवासासाठी आम्ही एनर्जी स्नॅक्स बनवले होते. तेवढी एकच खाण्याची गोष्ट आम्ही आमच्यासोबत ठेवली होती आणि तीही ठराविक प्रमाणात. प्रवासाचं नियोजन करताना सगळे सहप्रवासी मिळून निर्णय घेतात. तो सगळेच जण मान्य करतात. आमच्यापैकी कोणीही एकमेकांना आधीपासून ओळखत नव्हतो. सगळ्यांना फक्त रामजी माहीत होते; पण प्रवासादरम्यान सगळ्यांच्यात खूप छान मैत्री झाली,’ असं गौतम यांनी सांगितलं.  

‘आम्ही ज्या ज्या गावात गेलो, त्या त्या गावातल्या लोकांशी आमचं छान आपुलकीचं नातं तयार झालं. आम्ही दिवाळीपूर्वी त्या गावांमधल्या लोकांना भेटून, त्यांना मिठाईही देऊन आलो. गावातील लोकांकडे आधुनिक साधनं जास्त नसतील; पण मनाची श्रीमंती खूप आहे. कुठल्याही गावात आमच्यापैकी कुणालाही उपाशीपोटी झोपावं लागलं नाही,’ असा अनुभव त्यांनी नमूद केला.

ग्रामीण व शहरी लोकांच्या नात्याबद्दल ते म्हणाले, ‘या प्रवासामुळे ग्रामीण व शहरी लोकांमध्ये अनोखे बंध तयार होतात. त्यांच्यातली दरी कमी होण्यास मदत मिळते. शहरातले लोक इंग्रजी भाषा, आधुनिक तंत्रज्ञान यात निष्णात आहेत, तर गावातले लोक शेतीची कामं, हँडपम्प बसवणं, हस्तकला यांसारख्या कामात वाकबगार आहेत. या दोघांच्या कौशल्यांचा समन्वय साधला तर जग अजून सुंदर होईल.’ 

एकंदरीत, ही संकल्पना जाणून घेतल्यावर असं वाटलं, की सायकलवरचा हा प्रवास चौकटीबाहेरचं शिक्षण देण्याचं मोठं काम करतो आहे. दुसऱ्याच्या चांगुलपणावरचा विश्वास त्यात महत्त्वाचा आहे. आनंदानं, सुरक्षित वातावरणात जगण्यासाठी किती कमी गोष्टी गरजेच्या आहेत हे प्रवासातून परतल्यावर लक्षात येतं आणि ज्यांच्याकडे साधनांची कमतरता आहे, ते लोक आपल्याजवळ असलेलं इतरांसोबत किती सहजपणे शेअर करतात, हे पाहून आश्चर्य वाटतं, असं हा प्रवास केलेल्यांचा अनुभव सांगतो. एक प्रकारे हा स्वतःचा आणि माणसातल्या माणसाचा शोध घेणारा प्रवास आहे. अनुभवश्रीमंत करणारा बिनपैशाचा प्रवास असं त्याला म्हणता येईल. अशा वातावरणात आपण कदाचित कायम राहू शकणार नाही; पण कधीतरी या वेगळ्या वाटेवरून जाऊन सुरक्षेचं भय आणि विश्वासातली शक्ती यांतला फरक पाहायला अशी अनोखी सायकल यात्रा करायला हरकत नाही. 

संपर्क : रामावतारसिंह : ९०७९२ ०५२१३
ई-मेल : ramjiram1@gmail.com

(या सायकल यात्रेविषयी माहिती देणारा एक माहितीपट सोबत देत आहोत.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Yogesh Watve About
Realy amazing, have to test as early as possible...
0
0

Select Language
Share Link