Next
डॉ. आंबेडकर, द. मा. मिरासदार, कवी संजीव, रामदास फुटाणे
BOI
Saturday, April 14, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

भारतरत्न डॉ. आंबेडकर, खळखळून हसवणारे विनोदी लेखक द. मा. मिरासदार, कवी संजीव आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांचा १४ एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
......  
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर 

१४ एप्रिल १८९१ रोजी महूमध्ये (इंदूर) जन्मलेले डॉ. भीमराव रामजी ऊर्फ बाबासाहेब आंबेडकर हे कायदेपंडित, समाजसुधारक आणि लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. 

भारताच्या ‘संविधानाचे शिल्पकार’ असं त्यांना आदराने म्हटलं जातं. त्यांनी दलितांसाठी राजकीय हक्क व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आणि कोट्यवधी शोषित, पीडित, क्रांतिकारी लोकांचे ते प्रेरणास्थान बनले.

त्यांनी मुख्यतः इंग्लिश भाषेतून लेखन केलं आहे. २२ पुस्तकं, १० अपूर्ण ग्रंथ, १० शोधनिबंध आणि अनेक लेख, परीक्षणं असं विपुल लेखन त्यांनी केलं आहे. 

सहा डिसेंबर १९५६ रोजी त्यांचं दिल्लीमध्ये निधन झालं. 

१४ एप्रिल १९९० रोजी त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च्च नागरी पुरस्कार मरणोत्तर देऊन गौरवण्यात आलं होतं. 

...........

दत्तात्रय मारुती मिरासदार 

१४ एप्रिल १९२७ रोजी अकलूजमध्ये जन्मलेले दत्तात्रय मारुती मिरासदार ऊर्फ ‘दमा’ हे मराठीचे बिनीचे विनोदी लेखक आणि पत्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत.

एकीकडे प्राध्यापकी सांभाळत असतानाच त्यांनी एकाहून एक धमाल विनोदी कथा लिहून मराठी माणसांना मनमुराद हसवलं. शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्या बरोबरचे त्यांचे विनोदी कथाकथनाचे कार्यक्रमही लोकांनी डोक्यावर घेतले. 

ग्रामीण जीवन, कधी तिथला साधेभोळेपणा, कधी इरसालपणा, विसंगती, विक्षिप्तपणा, टारगट आणि इब्लिस माणसं, कधी भंपक माणसांच्या बढाया यांवर त्यांच्या कथा बेतलेल्या असतात. मिश्कीलपणा आणि गावरान विनोद त्यांच्या लेखनातून प्रकर्षाने जाणवतो आणि खळखळून हसवतो. 

भोकरवाडी, नाना चेंगट, गणा मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान, सुताराची चहाटळ आनशी, ज्ञानू वाघमोडे अशा त्यांच्या व्यक्तिरेखा अमर झाल्याहेत. 

अंगत पंगत, भोकरवाडीच्या गोष्टी, भोकरवाडीतील रसवंतीगृह, फुकट, गंमतगोष्टी, हसणावळ, सरमिसळ, बेंडबाजा, भुताचा जन्म, चकाट्या, चुटक्याच्या गोष्टी, गाणारा मुलुख, गप्पागोष्टी, गप्पांगण, गोष्टीच गोष्टी, हुबेहूब, खडे आणि ओरखडे, मी लाडाची मैना तुमची, विरंगुळा, गुदगुल्या, नावेतील तीन प्रवासी, माझ्या बापाची पेंड अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

१९९८ साली परळी-वैजनाथमध्ये भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 

त्यांना विंदा जीवनगौरव पुरस्कार, शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार, पु. ल. जीवनगौरव सन्मान, महर्षी वाल्मिकी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. 

(द. मा. मिरासदार यांची विशेष मुलाखत वाचा https://goo.gl/LthSwV या लिंकवर. द. मा. मिरासदार यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
...........

कृष्ण गंगाधर दीक्षित

१४ एप्रिल १९१४ रोजी वांगीमध्ये (सोलापूर) जन्मलेले कृष्ण गंगाधर दीक्षित हे मराठी कवी आणि गीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत. 

ते व्यवसायाने छायाचित्रकार आणि मूर्तिकार होते. 

दिलरुबा, प्रियंवदा, माणूस, अत्तराचा फाया, गझलगुलाब, रंगबहार, आघात, देवाचिये द्वारी - असे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. 

२८ फेब्रुवारी १९९५ रोजी त्यांचा सोलापूरमध्ये मृत्यू झाला.
.......

रामदास फुटाणे 

१४ एप्रिल १९४३ रोजी जामखेडमध्ये (अहमदनगर) जन्मलेले रामदास फुटाणे हे वात्रटिकाकार आणि पटकथालेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केलं आहे. 

समाजकारण आणि राजकारण या विषयावरच्या त्यांच्या वात्रटिका लोकप्रिय आहेत.

फोडणी, सफेत टोपी लाल बत्ती, चांगभलं, कॉकटेल, मूक-संवाद!, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

त्यांच्या ‘फोडणी’ काव्यसंग्रहाला महाराष्ट्र सरकारचा  पुरस्कार मिळाला आहे. 

त्यांनी गेल्या वर्षी (२०१७) अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. त्या औचित्याने त्यांनी शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी वर्षभरात ७५ कविसंमेलने घेण्याचा संकल्प सोडला होता. त्यानुसार, शेतकऱ्यांना नवी उमेद, प्रेरणा देणारी  ‘हास्यधारा’ नावाची कृषी कविसंमेलने त्यांनी राज्यभर विविध ठिकाणी आयोजित केली. निराशेने ग्रासलेल्या शेतकऱ्यांपुढे काही आशादायी व सकारात्मक चित्र निर्माण करण्यासाठी ही कविसंमेलने आयोजित करत असल्याची त्यांची भूमिका आहे. 

(रामदास फुटाणे यांची विशेष मुलाखत वाचा https://goo.gl/KQYeCY या लिंकवर. रामदास फुटाणे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link